অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टोंक संस्थान

टोंक संस्थान

टोंक संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील राजपुताना एजन्सीमधील एकमेव मुसलमान संस्थान. सध्या हा प्रवेश राजस्थान राज्यात मोडतो. क्षेत्रफळ ६,३९८ चौ. किमी. लोकसंख्या ३,५३,६८७ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. २० लाख रुपये. संस्थानचा प्रदेश विखुरलेला असून टोंक, अलीगढ व निंबहेर हे परगणे राजपुतान्यात तर सिरोंज, छाब्रा व पिराव हे परगणे पूर्वीच्या मध्य भारतात होत. या शहरांव्यतिरिक्त १,२८९ खेडी होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस यशवंतराव होळकरांच्या मदतीने अमीरखान (१७६८ – १८३८) या साहसी पठाणाने सिरोंज, टोंक आणि पिराव हे परगणे जिंकून टोंक संस्थानची स्थापना केली.

अमीरखान हा अफगाणिस्तानातील अफगाण वंशीय पठाण. मुहंमदशाहच्या कारकीर्दीत त्याचे आजोबा तालेहखान प्रथम हिंदुस्थानात आले आणि त्यांनी रोहिल्यांच्या सैन्यात नोकरी धरली. त्याचा मुलगा हयातखान याने मोरादाबादमध्ये संपत्ती मिळविली. यांनतर अमीरखानाने होळकरांशी संधान बांधून टोंकची स्थापना केली.

ब्रिटिशांनी त्याच्या वाढत्या सत्तेस पायबंद घालण्याकरिता टोंकला संमती दिली व त्याची फौज कमी करावयास लावली. मात्र ४० तोफा ठेवण्यास परवानगी दिली. ब्रिटिशांनी त्यास रामपुर किल्ला, अलीगढ हे प्रदेश तीन लाखांस देऊन मांडलिक केले. १८३४ मध्ये अमीरखानाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा वझीर मुहम्मुदखान  गादीवर आला. त्याने १८५७ च्या उठावात ब्रिटिशांना मदत केली आणि तात्या टोपेच्या फौजेचा पराभव केला. तेव्हा ब्रिटिशांनी त्यास मुसलमान कायद्यानुसार दत्तक घेण्याची सनद दिली. तो १८६४ मध्ये मृत्यू पावला आणि त्याचा मुलगा नबाब मुहम्मद अलीखान गादीवर आला. त्याच्या जुलमी राजवटीनंतर त्याला पदच्युत करण्यात आले (१८६७).

तीन वर्षे एजन्सी कौन्सिलच्या मदतीने रेसिडेंट कारभार पहात असे. त्यानंतर मुहम्मद अलीचा मुलगा मुहम्मद इब्राहीम अली गादीवर आला. याच्या कारकीर्दीत अनेक सुधारणा झाल्या. पहिल्या महायुद्धात याने ब्रिटिशांना मदत केली. जुनी जमीनदारीची वसुलीपद्धत रद्द करण्यात आली. नबाबाला न्यायादानाचे पूर्ण अधिकार होते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आरोग्य, शिक्षण, डाक-तार, पक्क्या सडका, रेल्वे, वनरक्षण, महसुलव्यवस्था इत्यादींत सुधारणा झाली. त्यामुळे संस्थानला अधिक कर्ज झाले.

एकूण राज्यव्यवस्थेत रेसिडेंटचा बराच हात असे. चवरशाही व मुहम्मदखानी नाणी प्रचारात होती. संस्थानात ८२ टक्के प्रजा हिंदू व १५ टक्के सुन्नी मुसलमानी होती. संस्थानात शिक्षण मोफत होते. १९४८ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले.

 

कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate