অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परताबगढ संस्थान

परताबगढ संस्थान

परताबगढ संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील राजस्थान राज्यातील एक जुने राजपूत संस्थान. क्षेत्रफळ सु. २,२७५ चौ. किमी. लोकसंख्या ९१,९६७ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. साडेसहा लाख रुपये. उत्तरेस उदयपूर, पश्चिमेस बांसवाडा, दक्षिणेस जावरा आणि पूर्वेस ग्वाल्हेर व इंदूर या संस्थानांनी ते सीमित झाले होते. माळवा-गुजरातच्या काठावर ते वसले असल्याने त्यास कांठल असेही म्हणत. मेवाडचा राणा मोकल याच्या सिसोदिया वंशातील बीका याने १५५३ मध्ये भिल्ल इ. आदिवासींना हटवून देवरिया (देवगड) हे शहर १५६१ च्या सुमारास नव्याने वसविले. बीकाच्या जसवंतसिंग नावाच्या एका वारसाने १७१८ मध्ये आपल्या मुलाला घेऊन उदयपूरला भेट दिली. या दोघांचा खून झाला तेव्हा त्याच्या हरिसिंह या दुसऱ्या मुलाने मोगलांना नजराणा देऊन त्यांच्या मदतीने पुन्हा मेवाडने गमावलेले आपले राज्य मिळविले. त्याला मोगलांनी हफ्त हजारी (सात हजार सैन्याचे सेनापतिपद) व महारावत हा किताब दिला. हरिसिंगाचा मुलगा प्रतापसिंग त्याच्या मृत्यूनंतर गादीवर आला (१६७४). त्याने परताबगढ हे शहर नव्याने वसविले (१६९८).

त्या वेळेपासून संस्थानचे नाव परताबगढ हे रूढ झाले. तथापि देवरिया-परताबगढ असे संयुक्त नावही काही दिवस प्रचारात होते. पुढे सावंतसिंगाच्या कारकीर्दीत (१७७५-१८४४) संस्थानात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. संस्थान व इंग्रज यांत १८०४ मध्ये संबंध येऊन एक तह झाला. या तहान्वये इंग्रजांनी संस्थानचे संरक्षण करावे आणि त्याच्या मोबदल्यात संस्थान होळकर यांना जी खंडणी देत असे, ती यापुढे त्यांनी इंग्रजांन द्यावी असे ठरले. पण कॉर्नवॉलिस गव्हर्नर असताना त्याने हा तह रद्द करून वेगळे धोरण ठरविले. त्यामुळे परताबगढ पुन्हा होळकरांचे मांडलिक संस्थान झाले व संस्थानने होळकरांना स्वसंरक्षणार्थ खंडणी देण्यास सुरुवात केली. पुढे १८१८ मध्ये पेशवाईचा शेवट झाल्यावर इंग्रजांनी आपल्या संस्थानविषयक धोरणात बदल केला आणि परताबगढ व इंग्रज यांमध्ये मंदसोर येथे एक तह झाला. या मंदसोरच्या तहान्वये संस्थान पूर्णतः इंग्रजांचे मांडलिक झाले. त्यामुळे होळकरांची खंडणी संस्थानाने इंग्रजांमार्फत द्यावी, असे ठरले. १८२३-२६ च्या दरम्यान सावंतसिंग व कुवर दीपसिंग यांमध्ये तंटा झाला. मात्र यानंतरचा संस्थानचा दर्जा इंग्रजांचे एक मांडलिक संस्थान म्हणून राहिला. संस्थानने वेळोवेळी इंग्रजांना मदत केली. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान १९४८ मध्ये विलीन होऊन राजस्थान संघात विलीन झाले.

परताबगढ हे राजधानीचे शहर वगळता संस्थानात ४१२ खेडी होती. संस्थानात रेल्वे नव्हती आणि परताबगढ-मंदसोर एवढी ३४ किमी. ची पक्की सडक सोडता रस्त्यांत फारशी सुधारणा झाली नाही. शिक्षण, आरोग्य, डाक, तारघरे या सर्वच सुधारणांबाबत संस्थान मागासलेले होते. संस्थानात परताबगढ, मग्रा व सागथली असे तीन तालुके होते आणि तालुक्यावरील अधिकाऱ्याला हाकिम म्हणत. संस्थानिकाला महारावत व दिवाणाला कामदार या संज्ञा वा किताब होते. अकरा जणांची राजसभा न्यायदान करी. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सालिमशाही रुपयाऐवजी इंग्रजी नाणी प्रचारात आली. २०% प्रजा भिल्ल आदिवासींची असून त्यांच्या समाजकल्याणासाठी आर्यसमाज व खिस्ती मिशनऱ्यांनी अनेक प्रयत्न केले.

 

कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate