অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेघालय

मेघालय

भारताच्या २२ घटक राज्यांपैकी ईशान्य भागातील एक राज्य. क्षेत्रफळ २२,४२९ चौ. किमी. लोकसंख्या १३,३५,८१९ (१९८१). मेघालयाच्या उत्तरेस व पूर्वेस भारतातील आसाम राज्य, तर दक्षिणेस व पश्चिमेस बागंला देश आहे. शिलाँग हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण तसेच राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे (लोकसंख्या १,७३,०६४–१९८१). पूर्वीच्या आसाम राज्यातील गारो हिल्स आणि संयुक्त खासी व जैंतिया हिल्स जिल्ह्यांचे मिळून २१ जानेवारी १९७२ रोजी भारतीय संघराज्यातील एक राज्य म्हणून मेघालयाची स्थापना करण्यात आली.

भूवर्णन

मेघालयाचा बहुतांश भाग पर्वतीय असून तेथे गारो, खासी व जैंतिया या प्रसिद्ध टेकड्या आहेत. प्राकृतिक दृष्ट्या मेघालयाचे पुढीलप्रमाणे तीन विभाग पाडता येतात : (१) दक्षिणेकडील तीव्र उताराचा प्रदेश, (२) मध्यवर्ती पठारी प्रदेश व (३) उत्तरेकडील आसामच्या खोऱ्याकडील काहीसा मंद उताराचा प्रदेश. राज्यात पश्चिमेकडील मैदानी प्रदेशाकडून पूर्वेकडे प्रदेशाची उंची वाढत जाते. पश्चिमेकडील गारो टेकड्यांमध्ये असलेली ३०० मी. उंची पूर्वेकडे खासी टेकड्यांमध्ये १,८०० मी. पर्यंत वाढलेली दिसते. तेथून पूर्वेकडे असलेल्या जैतिया टेकड्यांमध्ये प्रदेशाची उंची किंचितशी कमी झालेली आहे. राजधानी शिलाँग ही मध्यवर्ती पठारी प्रदेशात वसलेली असून‘शिलाँग पीक’ हे राज्यातील सर्वोच्च (१,९६५ मी.) ठिकाणही याच भागात आहे. या मध्यवर्ती पठारी प्रदेशाला शिलाँगचे पठार म्हणूनही ओळखले जाते. पश्चिमेकडे गारो टेकड्यांमधील नोक्रेक (१,४१२ मी.) हे राज्यातील दुसऱ्या क्रमाकांचे उंच शिखर आहे. कोळसा, चुनखडक, सिलिमनाइट ही मेघालयात सापडणारी मुख्य खनिजे आहेत. त्यांशिवाय केओलीन, फेल्स्पार, बॉक्साइट, जिप्सम, अभ्रक, डोलोमाइट इ. खनिजांचेही थोडेबहुत साठे आहेत.

नद्या : मध्यवर्ती पठारी प्रदेश हाच राज्यातील नद्यांचा मुख्य जलविभाजक आहे. येथील पर्वतीय व पठारी प्रदेशांतून अनेक नद्या वाहताना आढळतात. नद्या पर्वतीय प्रदेशातून व खडकाळ पात्रांमधून वाहत असल्याने त्या द्रुतगती आहेत तसेच त्यांच्या पात्रांमध्ये ठिकठिकाणी धबधबे व द्रुतवाह निर्माण झालेले दिसतात. चेरापुंजी जवळच्या मॉसमाई येथील नोहस्नीगथिआंग धबधबा प्रेक्षणीय आहे. राज्याच्या गारो हिल्स जिल्ह्यात कृष्णाई (दायरिंग), कालू (जिरा), भुगई (बुगी), निताई (दारेंग) व सोमेश्वरी (सिमसंग); खासी हिल्स जिल्ह्यातून किनशी, ख्री, उमत्र्यू, उमनगॉट; उमिआम मावफ्लांग व उमिआम रव्वान, तर जैतिंया हिल्स जिल्ह्यातून कोपिली, म्यिंटडू व ग्यिनटांग या नद्या डोंगराळ प्रदेशातून वाहत असल्यामुळे जलवाहतुकीच्या दृष्टीने निरुपयोगी आहेत. शिलाँगपासून सु. १६ किमी. अंतरावर बडापानी लेक हे प्रेक्षणीय सरोवर असून उमिआम हा प्रसिद्ध जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प आहे.

हवामान

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात बंगालच्या उपसागरावरून आलेले बाष्पयुक्त वारे व ढग मेघालयाच्या पर्वतीय प्रदेशात घुसतात. येथील विशिष्ट प्राकृतिक रचनेमुळे बाष्पयुक्त वारे व ढग तेथेच अडविले जाऊन मेघालयाची पर्वतीय भूमी सतत मेघाच्छादित राहते म्हणूनच त्यास मेघालय (मेघांचे आलय) असे नाव पडले आहे. मेघालयाचे हवामान सौम्य स्वरूपाचे आहे. गारो हिल्समधील वार्षिक सरासरी कमाल आणि किमान तपमान अनुक्रमे ३४º से. व ४º से. असून खासी व जैतिंया हिल्समधील हेच प्रमाण अनुक्रमे २३·३º से. व १२º से. आहे. मेघालय हा जगातील सर्वांत आर्द्र विभाग समजला जात असून तेथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० ते १,२७० सेंमी. आहे. जगातील सर्वांत जास्त पर्जन्याची चेरापुंजी-मॉसिनराम ही ठिकाणे याच राज्यात खासी टेकड्यांच्या दक्षिण उतारावर असून या दोन ठिकाणांचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे १,३०० सेंमी. व १,८०० सेंमी. आहे. चेरापुंजीजवळील मॉसिनराम हे जगातील सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण आहे. पूर्वी येथे पर्जन्याची नोंद घेतली जात नसे, त्यामुळे चेरापुंजी हेच जगातील सर्वांत जास्त पर्जन्याचे ठिकाण म्हणून मानले जाई. तथापि मॉसिनराम येथील पर्जन्याची नोंद घेतली जाऊ लागल्यापासून चेरापुंजीपेक्षा मॉसिमराम येथे पर्जन्यवृष्टी अधिक होत असल्याचे आढळून आले. राजधानी शिलाँग येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २४१·५ सेंमी.आहे.

वनस्पती व प्राणी

विपुल पर्जन्यवृष्टीमुळे मेघालयात विस्तृत असे जंगलमय प्रदेश आढळतात. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ८,५१,००० हे. क्षेत्र अरण्याखाली आहे. पाइन, साग, बांबू हे वनस्पतिप्रकार विपुल प्रमाणात आहेत. त्यांशिवाय बर्च, ओक, बीच, गुरग्रा, हळदू, डालू व कवठी चाफा हे वनस्पतिप्रकारही येथील जंगलांत आढळतात.

पूर्वी मेघालयात वन्य प्राणी पुष्कळ आढळत असत. अलीकडे त्यांची संख्या बरीच घटलेली आहे. येथील जंगलमय प्रदेशात हत्ती, वाघ, हरिण, सांबर, सोनेरी मांजर, हूलॉक, रानडुक्कर, रानरेडे, रानगवा, लांडगा, ससा, माकड, शेपटी नसलेले माकड, मुंगीखाऊ प्राणी, खार, साप हे प्राणी तसेच मोर, तितर, कबूतर, हॉर्नबिल, रानबदक, पोपट इ. पक्षी विपुल प्रमाणात पहावयास मिळतात.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate