অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रामपूर संस्थान

रामपूर संस्थान

रामपूर संस्थान

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या रोहिलखंडातील (उत्तर प्रदेश) एक संस्थान. क्षेत्रफळ २,२८३२ चौ. किमी.; लोकसंख्या सु. ४,७६,९१२ (१९४१); वार्षिक उत्पन्न सु. अठ्ठ्याहत्तर लाख रुपये. उत्तरेस नैनिताल, पूर्वेस बरेली, दक्षिणेस बदाऊन आणि पश्चिमेस मुरादाबाद या जिल्ह्यांनी ते चोहोबाजूंनी वेढलेले होते. संस्थानात रामपूर, शाहाबाद, मिलक व सुवार हे पाच तहसील असून सहा शहरे व १,१२० खेडी होती. एकूण लोकसंख्येपैकी निम्मी प्रजा मुसलमान होती. सतराव्या शतकाच्या अखेरीस शाहअलम आणि हुसेनखान हे दोन रोहिले मोगल दरबारात नोकरी निमित्त आले.

शाहअलमचा मुलगा दौदखान याने मराठ्यांबरोबरील युद्धात नाव मिळविले. त्यामुळे बदाऊनची सनद त्यास मिळाली. त्याचा दत्तक मुलगा अली मुहम्मद याला १७१९ मध्ये नबाब हा किताब आणि रोहिलखंडाचा भूप्रदेश मिळाला; पण त्याच्यावर बादशाहाची खप्पा मर्जी होऊन त्याला तुरुंगात डांबले (१७४५). नंतर त्याची सरहिंदच्या राज्यपालपदी नियुक्ती केली. अहमदशाह दुराणीच्या स्वारीचा फायदा घेऊन त्याने रोहिलखंडावर आधिपत्य स्थापिले (१७४८) आणि मोगल बादशाह बहादूरशाहकडून त्यास अनुमती मिळविली. त्याच्या मृत्यूनंतर रामपूरची जहागीर त्याचा धाकटा मुलगा फैझुल्लाखान याला मिळाली.

अयोध्येचा नबाब शुजाउदौला आणि इंग्रज यांनी मिळून रोहिल्यांवर १७७५ मध्ये चढाई केली आणि त्यांचा पराभव केला, पण रोहिल्यांचा प्रमुख सरदार फैझुल्लाखानाकडे त्याची रोहिलखंडातील रामपूरची जहागीर राहू दिली. फैझुल्लाखानाने या बदल्यात नबाबाला वार्षिक १५ लाख रुपये खंडणी द्यावी, असा करार झाला.

फैझुल्लाखानच्या मृत्यूनंतर (१७९३) त्याच्या मुलांपैकी थोरल्याचा खून करून धाकट्याने गादी बळकावली; तेव्हा इंग्रजांनी सैन्य पाठवून थोरल्याचा मुलगा अहमद अली खान याला गादीवर बसविले. १८०१ मध्ये नबाबाकडून इंग्रजांनी संपूर्ण रोहिलखंड आपल्या ताब्यात घेतला, पण संस्थान राहू दिले, खंडणी मात्र माफ केली. १८५७ च्या उठावातील मदतीबद्दल संस्थानाला सव्वा लाखाचा प्रदेश इंग्रजांकडून बक्षीस मिळाला.१९०२ मध्ये संस्थानात मर्यादित अधिकारांचे विधिमंडळ स्थापन झाले. सर सय्यद महंमद राजा अलीखान हे १९३० मध्ये गादीवर आले.

१९३७ मध्ये झालेल्या आंदोलनानंतर विधिमंडळाचे काही अधिकार थोडेबहुत वाढले. विसाव्या शतकात महसूल, न्याय, पोलीस इ. खात्यांची पुनर्घटना होऊन रेल्वे, सडका (४०७ किमी.), नगरपालिका, पाणीपुरवठा, दूरध्वनी, साखर कारखाने इ. क्षेत्रांत सुधारणा झाल्या. दुय्यम व प्राथमिक शिक्षण संस्थानात मोफत असून रामपूर शहरात एक अरबी व एक दुय्यम महाविद्यालय, संग्रहालय, रुग्णालय, राजवाडा, किल्ला आदी वास्तू आहेत. संस्थानचे स्वतःचे सैन्य असून संस्थानने इंग्रजांना अफगाण युद्धे व पहिले महायुद्ध यांत मदत केली. हे संस्थान १९४९ मध्ये संयुक्त प्रांतांत (उत्तर प्रदेश) विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate