অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विजापूर

कर्नाटक राज्यातील इस्लामी वास्तूशैलीसाठी ख्यातनाम असलेले इतिहासप्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि त्याच नावाच्या जिल्हयाचे मुख्यालय. लोकसंख्या १,८६, ९३९ (१९९१). ते दक्षिण रेल्वेच्या मुंबई-बंगलोर रूंदमापी मार्गावर, मुंबईच्या आग्नेयीस सु.४०२ किमी.आणि सोलापूरच्या दक्षिणेस सु. ८१ किमी. वर वसले आहे. ते रस्त्याने पंढरपूर, सोलापूर, सांगली इ. महाराष्ट्रातील शहरांशी तसेच आंध्रप्रदेशातील हैदराबाद व कर्नाटकातील इंडी, बादामी इ. गावांशी जोडले आहे. विजापूर नावाविषयी इतिहासज्ञांत एकवाक्यात नाही, तथापि कोरीव लेख, संस्कृत-कन्नड-फार्सी साहित्य यांतून विजयपूर, राय राजधानी, दक्षिण वाराणसी, बिज्जनहळ्ळी, बिज्जपूर, मुहम्मदपूंर इ. भिन्न नामांतरे आढळतात. पूर्वी या जागी सात खेडी होती व तेथेच यादवांनी हे नगर वसविल्याचे सांगितले जाते. या सात खेड्यांपैकी बिजनहळ्ळी खेड्यावरून या नगराला विजापूर हे नाव पडल्याचे म्हणतात. नगराच्या परिसरातील काही देवालयांत चालुक्य व यादव वंशातील राजांचे शिलालेख आहेत. आर्क किल्ल्याच्या पूर्वद्वाराजवळील विजयस्तंभाताल लेखात विजयपूर असा स्पष्ट उल्लेख आहे. हा स्तंभ सातव्या शतकातील असावा, असे तज्ञांचे मत आहे.त्यावरून विजयपूर हे त्याचे नाव असावे असे दिसते. ‘विजयपूर’ या नावाचा उल्लेख चालुक्य राजा दुसरा जयसिंह (कार. १०१५-१०४३) याच्या इ. स. १०३६ व्या कोरीव लेखात तसेच नागचंद्रानी लिहिलेल्या इ. स. ११०० मधील मल्लिनाथपुराण या कन्नड चंपूकाव्यात आढळतात. त्यावरून इ.स. ११ व्या शतकात वा तत्पूर्वी विजयपूर हे नाव प्रचारात असावे. पुढे विजयपुर या संस्कृत शब्दाचे अपभ्रष्ट वा संक्षिप्त रूप विजापूर झाले असावे.

येथे आढळलेल्या बहुविध अवशेषांवरून विजापूर जिल्ह्यांत इतिहासपूर्व काळात मानवी वस्ती असावी. त्यानंतर चालुक्यांपर्यंतचा याचा इतिहास अस्पष्ट असून पौराणिक दंतकथा-वदंतांनी भरला आहे. चालुक्यांनी बादामी येथे राजधानी केल्यापासून मुसलमानांच्या आगमनापर्यंत या प्रदेशावर पश्चिम चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणी चालुक्य, होयसळ आणि यादव अशा विविध वंशांनी राज्य केले. त्यांच्या कोरीव लेखांतून त्यांच्या कोरीव लेखांतून तत्कालीन राजकीय परिस्थितीची कल्पना येते. दुसरा अलाउद्दीन अहमद (कार. १४३६-१४५८) याच्या वेळी त्याचा भाऊ महमूदखान याने विजयानगच्या मदतीने विजापूर आणि अन्य काही गावे घेऊन अयशस्वी बंड केले. विजापूर ही जहागीर या काळात महंमद गवानच्या देखरेखीखाली होती. बहमनी राज्यांचे पाच शाह्यांत विभाजन झाले, तेव्हा यूसुफ आदिलखान (कार. १४८९-१५१०) याने आदिलशाहीची स्थापना करून विजापूर ही आपली राजधानी केली. औरंगजेबाने १६८६ मध्ये आदिलशाही खालसा केली. १७२३ पर्यंत विजापूरवर मोगलांचा अंमल होता. पुढे ते हैदराबादच्या निजाम-उल् मुल्कच्या अखत्यारीत गेले (१७२३-१७६०). निजामाने हा भाग तोडून पेशव्यांना दिला. पेशवाईच्या अंतापर्यंत (१८१८) ते मराठ्यांच्या अधिसत्तेखाली होते. अव्वल इंग्रजी अमदानीत नवीन कलदुगी (विजापूर) जिल्हा इ. स. १८६४ मध्ये करण्यात आला आणि इंडी, हिप्परगी, विजापूर,मंगोली (बागेवाडी), मुद्देबिहाळ, बागलकोट, बादामी व हुनगुंद हे तालुके त्यात अंतर्भुत करण्यात आले. त्यावेळी हा जिल्हा मुंबई इलाख्यात होता. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जमखंडी, औंध, मुधोळ, कुरुंदवाड या विलीव संस्थानांतील काही खेडी त्यात समाविष्ट करण्यात आली आणि मुघोळ व जमखंडी हे दोन स्वतंत्र तालुके त्यात समाविष्ट झाले. राज्यपुनर्रचनेनंतर (१९५६) हा भाग मुंबई द्वैभाषिक राज्यात समाविष्ट झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर (१९६०) तो म्हैसूर (कर्नाटक) राज्यात अंतर्भूत करण्यात आला.

आधुनिक विजापूर ही धान्याची मोठी बाजारपेठ असून ते एक औद्योगिक शहर आहे. ते महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेलगत असल्यामुळे या राज्यांतील ग्रामीण भागांतून येथे खरेदीसाठी मोठा जनसमुदाय जमतो. तेथे अनेक लोक ऐतिहसिक वास्तू पाहण्यासाठी येतात. वास्तूंमुळे पर्यटकांचे ते आकर्षण बनले आहे. जिल्हात व शहरात हातभाग उद्योग मोठ्या प्रमाणात असून त्यांपैकी इलकल (इरकल) साड्या आणि गुलडेगुड खण तयार करण्याचे हातमाग आहेत. यांशिवाय उदबत्ती आणि साबण तयार करण्याचे लघुउद्योग सर्वत्र चालतात. कातडी कमाविणे आणि पादत्राणे बनविणे हा व्यवसाय कापड उद्योगाखालोखाल चालतो. हा परंपरागत व्यवसाय करणाऱ्यांना समगर आणि मोचिगर म्हणतात. शहरात वस्त्रोद्योग, तेलाच्या गिरण्या इ. मोठे व्यवसाय आहेत. विजापुरात वेगवेगळ्या बँक शाखा आहेत. युनिअन बँक ऑफ विजापूर अँड सोलापूर ही सर्वात जुनी स्थानिक पातळीवर कार्यरत असलेली बँक १९६४ मध्ये सांगली बँकेत विलीन करण्यात आली. येथे उपायुक्तांचे कार्यालय असून त्याच्या अखत्यारीत जिल्ह्यातील सर्व महसूल विभाग य़ेतात. शहराच्या पाणी, आरोग्य इत्यादी सुविधा नगरपालिका (स्था. १८५४) पुरविते. नगरपालिकेची तीन रूग्णालये आहेत. कुष्ठरोग निवारण (स्था. १९२८) ही जिल्ह्यातील अशा प्रकारची एकमेव संस्था आहे. याशिवाय शहरात शासकीय नागरी रूग्णालये, अनेक खासगी दवाखाने आणि रूग्णालये आहेत. शहरात नगरपालिकेची नेताजी पार्क आणि कौजलगी उद्याने, पुरातत्त्वीय खात्याची गगन महाल आणि सिकंदर ही उद्याने आहेत. शहरात मुलींची दोन माध्यामिक विद्यालये, मुलांसाठी नऊ माध्यमिक शाळा, एक संस्कृत पाठशाळा (स्था.१९०८), दोन अरेबिक विद्यालये (उर्दू शाळा), दोन संगीत विद्यालये, दोन शिक्षण प्रशिक्षण विद्यालये, सैनिक विद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन,आयुर्वेद महाविद्यालय, वाणिज्य महाविद्यालय, विजय महाविद्यालय (कला व शास्त्र) इ. शैक्षणिक संस्था आहेत.

वास्तुकला-चित्रकला इत्यादी

विजापूर जिल्हा हा हिंदू आणि इस्लामी वास्तुशिल्पकला यांचे आगर मानण्यात येतो.

आठव्या शतकापासून चौदाव्या शतकाअखेर विजापूरच्या विस्तीर्ण पट्ट्यात फारसे बांधकाम झाले नाही, मात्र आदिलशाही काळात इस्लामी वा मुस्लिम वास्तुकलेत मोलाची भर पडली आणि मशिदी दर्गे, महाल वा प्रासाद अशा तीन प्रकारच्या इमारती बांधण्यात आल्या. यांपैकी सु. वीस दर्गे आणि तेवढेच महाल सुस्थितीत अवशिष्ट असून मशिदींचे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कमी आहे. येथील बहुतेक वास्तू एकवर्णी पिंगट, स्थानिक वालुकाश्मात बांधलेल्या आहेत. राजधानीच्या दृष्टीने विजापूरचा प्रदेश सपाट वैराण व नदीहीन असा होता, त्यामुळे राजधानीसाठी हे ठिकाण योग्य नव्हते. संरक्षणाच्या दृष्टीने यूसुफ आदिलखानाने आर्क नावाचा मातीचा किल्ला शहराच्या मध्यभागी बांधला. पहिल्या आदिलशाहने त्याभोवती सु. १० किमी. घेराची दगडी तटबंदी बांधली. त्याला ९६ बुरूज व सहा मोठे दरवाजे ठेवले. त्यांची नावेही अलीपूर, बहमनी, शहापूर, मक्का, फत्तेह अशी ऐतिहासिक ठेवण्यात आली. त्या दरवाज्यांच्या आत दुसरा दरवाजा अशी संरक्षणात्मक ववस्था करम्यात आली. दरवाज्यावर सज्जा आणि दोन्ही बाजूंस टेहळणीच्या दृष्टीने दोन वर्तुळाकार मनोरे बांधण्यात आले. या तटाभोवती सु. १२-१५ मीटर रूंदीचा खंदक खणण्यात आला. किल्ल्यात आसार महाल,आनंद महाल, आरसे महाल, चिनी महाल, सातमजली महाल, गगन महाल, मक्का मशीद, चिंदडी मशीद इ. खास इमारती होत्या. त्यांतील फारच थोड्या सुस्थितीत आहेत. मक्का मशीद मक्केतील सुप्रसिद्ध मशिदीची प्रतिकृती असून

‘इब्राहिम रोझा’ कबर (१६१५): विजापूरची प्रसिद्ध वास्तू.तिच्यातील कमानी व काही स्तंभ दगडी आहेत, मात्र चिंदडी मशीद चुनेगच्चीत बांधलेली आहे. पाण्यासाठी एक विस्तीर्ण तलाव बांधण्यात आला होता. किल्लाच्या पडकोटात एक श्रीनृसिंहमंदिर असून ते जागृत स्थान मानले जाते. याशिवाय विजापूरमधील गोलघुमट, जुम्मा मशीद, ताजबावडी, अली रोझा, जोड घुमट,करीमुद्दीन मशीद, मलिक इ.मैदान तोफ, लांडाकसाब तोफ, चांदबावडी, इब्राहिम रोझा कबर मोती घुमट, अमिन दर्गा इ. वास्तु-वस्तु प्रसिद्ध असून त्यांपैकी जुम्मा अथवा जामी मशीद, इब्राहीम रोझा, गोलघुमट आणि मेहतर महाल या इमारती इस्लामी वास्तुकलेच्या प्रातिनिधिक असून यांव्यतिरिक्त विजापुरात अनेक लहान-मोठ्या तत्कालीन वास्तू आहेत.

जुम्मा मशीद किल्ल्याच्या पूर्वेस सु. एक किमी.वर असून तिचे बांधकाम अली आदिलशाहने तालिकोटच्या विजयानंतर इ. स. १५७५ मध्ये केले. ही भव्य असून तिचे प्रमुख सभागृह ६८×३५ मी. क्षेत्रफळाचे आहे. तीत प्रार्थनेसाठी एकावेळी अडीच हजार माणसे बसू शकतात. हिच्या रचनेत असंख्य कमानी असून तिच्या मुख्य मिहरापाचे रंगकाम आकर्षण आहे. मशिदीवरील घुमट लहान असून सुबक आहे. तिचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. तिच्या प्रवेशद्वाराचे काम औरंगजेबाचे पूर्ण केले.

पहिल्या इब्राहिम आदिलशाहने बांधलेली इब्राहिम रोझा ही त्याची कबर शहराच्या तटाबाहेर सु. एक किमी. वर पश्चिमेस आहे. तिचे मधले दालन चौरस असून त्याची १७.५×१७.५ मी. लांबी-रुंदी आहे. तिच्या पडवीत कमानीच्या दोन रांगा आहेत. घुमटाभोवती अनेक मीनार असून छत अगदी साधे सपाट आहे. कमानी व भिंतीवर नक्षीकाम आहे. कबरीसमोर एक मशीद आहे. तिच्या कमानी व मीनार नक्षीमुळे सुबक दिसतात. हिच्या दर्शनी भागात,दगडी साखळ्या लोंबताना दिसतात. त्या एकेक स्वतंत्र पाषाणखंडातून कोरून सजावट इस्लामी शिल्पकलेतील लक्षणीय प्रगती दर्शवितात. एकाच तटबंदीयुक्त प्रांगणात (१२० × ५१ मीटर) कबर आणि मशीद या दोन वास्तू शैलीकरण आणि भारदस्तपणा यांबाबतीत तोल सांभाळतात.

तिसरी महत्त्वाची व जगप्रसिद्ध इमारत म्हणजे मुहम्मद आदिलशाहची कबर-गोलघुमट. तिचे चार स्वतंत्र भआग आहेत. कबर नगारखाना, मशीद आणि धर्मशाळा वा अतिथिगृह. नगरखान्यात अलीकडे वस्तुसंग्रहालय केले आहे. तिचे बांधकाम सु. ३३ वर्षे चालू होते. ह्या वास्तूचा आराखडा चौरस असून प्रत्येक बाजू ४३.५ मी. आहे आणि चारी कोपऱ्यांत अष्टकोनी सातमजली मनोरे आहेत. त्यांच्यावर लहान घुमट आहेत. संपूर्ण वास्तूची उंची सु. ६८ मी. असून तिचे क्षेत्रफळ सु. १, ७०३.५० चौ. मी. आहे. माथ्यावर मध्यभागी प्रचंड घुमट आहे घुमटाच्या खाली दालन असून या भव्य दालनाच्या सभोवती टोकेरी कमानी चौकटीच्या साच्यात शिस्तबद्ध बसविल्या आहेत. त्यामुळे वास्तूची लयबद्ध स्पष्टपणे जाणवते. त्यावर सभोवती सव्वातीन मीटरचा सज्जा असून तिथे उभे राहून बोलले असता १०-१२ प्रतिध्वनी उमटतात. या ठिकाणीच प्रतिध्वनींचा नाद चमत्कार अनुभवावयास मिळतो. म्हणून त्यास ‘बोल घुमट’ असेही म्हणतात. खालच्या दालनात चबुतऱ्यावर मुहम्मद आदिलशाह, त्याच्या दोन बेगमा, रंभावती (वारांगना), मुलगी व नातू थडगी आहेत. प्रत्यक्षात खरी थडगी या थडग्यांखाली आहेत. ह्या वास्तूत भव्यता आहे पण कुठेच कलाकुसर नाही. ती जगातील एक भव्य इमारत आहे. [⟶ गोलघुमट].

या धार्मिक वास्तूंव्यक्तिरिक्त काही धर्मातीत अशा इमारती आहेत. त्यांपैकी काही प्रासाद जमीनदोस्त झाले असून गगन महाल, मेहतर महाल हे प्रासाद अवशिष्ट आहेत. गगन महाल इ. स. १५६० मध्ये बांधण्यात आला. त्याचा हेतू प्रामुख्याने राजवाडा आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी होता. ही ४०×२५ मीटरची आयाताकार वास्तू असून तिचे दोन स्वतंत्र विभाग आहेत. एक उघडा समोरचा दुमजली मंडप आणि दुसरा त्याच्या पाठीमागे एक सभागृह व लहान खोल्या. मेहतर महालातील सूक्ष्म, अनवट वास्तुशिल्पीय कोरीव काम आणि आकारिक घडण यांत हिंदूंच्या वास्तुकलेतील आकारिक घटक आणि शिल्पवैशिष्ट्ये यांचे संयोगीकरण झाले आहे. आर्क किल्ल्यात आनंद महालापासून जवळच सुभेदार करीमुद्दीन याने रेवय्या नावाच्या कारागिराकडून बांधून घेतलेली एक मशीद आहे. ती ‘करीमुद्दीन मशीद’ म्हणून ख्यातनाम असून सर्वांत जुनी इमारत आहे. ताजबावडी आणि चांदबावडी च्या स्मरणार्थ इ. स. १५७९ साली बांधली. अमीन दर्गा शहापूर द्वाराच्या पश्चिमेला असून ख्वाजा अमीरुद्दीनच्या स्मरणार्थ बांधला आहे. हे विजापुरातील मुसलमानांचे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. याशिवाय मलिक-इ-मैदान व लांडाकसाब या दोन मोठ्या तोफा असून त्यांपैकी लांडाकसाब तोफ ५.३४ मी. लांब असून तिचे वजन ४९ टन असावे. मलिक-इ-मैदान सु. साडेचार मीटर लांबीची ओतीव तोफ मक्का व शहापूर दरवाजा यांमधील तटावर ठेवलेली आहे. तिला ‘मुलुख मैदान’ असेही म्हणतात. वरील मशिदी, कवरी व तोफांव्यतिरिक्त कितीतरी लहान-मोठ्या प्रेक्षणीय इमारती शहरात आहेत. त्यांपैकी अंडू मशीद ही दुमजली असून हिच्यावरील मुख्य घुमट आणि मीनारांवरील लहान घुमट अंडाकृती असल्यामुळे तिला अंडू मशीद हे नाव प्राप्त झाले आहे.

विजापूरच्या इस्लामी वास्तुकलेत स्तंभांचा वापर अल्प प्रमाणात केला असून त्यांची जागा दोन कमानींमधील दगडी स्तंभांनी व्यापली आहे. येथे टोकेरी कमानींचा वापर सर्रास केला आहे. या नमुनेदार विजापुरी कमानी चार मध्याभागात केंद्रित झालेल्या प्रकारच्या आहेत आणि चौकटीच्या साच्यात शिस्तबद्ध बसविल्या आहेत. या वक्राकार कमानींमुळे एक लयबद्धता निर्माण झाली आहे, ती विजापूर वास्तुशैलीची खास निर्मिती होय. बांधकामात छजांचा अलंकरणासाठी वापर केला असून इमारतीची प्रलंबता आणि आकारमानानुसार त्याचा चपखल उपयोग केलेला आहे.

विजापूरची सुलेखनकला आणि चित्रकला, विशेषतः लघुचित्रशैली, यांना इस्लामी कलेत वेगळे स्थान आहे. आदिलशाहीतील सुलतानांनी दक्षिणेकडील हिंदू कैदी आणि निर्वासित यांचा कलेतील नवनिर्मितीसाठी फार मोठ्या संख्येने उपयोग करून घेतला. त्यांतून हिंदू संस्कृतीचा प्रभाव मुस्लिम कला आणि संस्कृत भाषा यांवर अभावितपणे पडला. हिंदूंची प्रणयकाव्ये, संगीत आणि फलज्योतिष यांवर आधारलेली त्यांची लघुचित्रे हा विजापूरमधील राज्यकर्त्यांचा मोठा शौकच बनला. बहुतेक सत्ताधीश कलाकार होते किंवा कलेचे भोक्ते होते. त्यांनी या दोन कलांना प्रोत्साहन दिले. विश्वकोशसदृश नुजुम-उल्-उलम या ग्रंथात (१५७०) सुरुवातीच्या काळातील सुलेखन आणि लघुचित्रे आढळतात. ही वेगवेगळ्या आकाराची असून ती सु. ८७६ भरतील. हा ग्रंथ डब्लिनच्या चेस्टर बिट्टी ग्रंथालयात असून त्यात मीना पक्षी हातावर घेतलेल्या एका तरुणीचे (योगिनी) चित्र अप्रतिम आहे. या चित्रांतील कलापरंपरांचा मूलस्त्रोत एतद्देशीय प्रामुख्याने विजयानगर- असून त्याच्या शैलीत इराणी छटा दृग्गोचर होते. दुसरा इब्राहिम आदिलशाह हा उत्तम चित्रकार होता. त्याने केलेली व त्याच्या वेळची अनेक व्यक्तिचित्रे व लघुचित्रे उपलब्ध असून ती वस्तुसंग्रहालयात व खाजगी संग्रहालयातील आढळतात. हळूहळू विजापूरची लघुचित्रशैली मूळ रूप गमावत असल्याची चिन्हे नंतरच्या काळात दिसतात. रागमाला चित्रांच्या मूलस्थानाविषयी विद्वानांत मतभेद आहेत; तथापि त्यांचे उत्पत्तिस्थान (उगमस्थान) दक्षिण भारतात आहे, हे वादातीत आहे. डॉ. मोतीचंद्र यांच्या मते यांचे मूलस्थान विजापूर असून दुसरा इब्रहिम आदिलशाही हा संगीत रागदारीचा उत्तम जाणकार होता आणि चित्रकारही होता. संगीतावरील त्याचे किताब ए नवरस हे पुस्तक प्रसिद्ध आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयातील हिंदोला रागाचे एक चित्र हे याचे उत्तम उदाहरण होय. सोळाव्या शतकात या कलेवर मोगल कलेचा प्रभाव वाढला. जहांगीर बादशाहने भेट म्हणून आपले व्यक्तिचित्र आदिलशहाकडे पाठविले होते (१६२०). आदिलशाहच्या कारकीर्दीत या कलेवरील यूरोपीय प्रभावही वाढला होता. आसर महालमधील अवशिष्ट भित्तिचित्रांवरून असे दिसते की काही इटालियन कलाकार विजापूरच्या दरबारी वास्तव्य करून असावेत.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate