অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेरियार

पेरियार

भारताच्या केरळ राज्यातील महत्त्वाची नदी. ही सामान्यत उत्तर-पश्चिम या दिशेने केरळ राज्याच्या कोट्टयम् व एर्नाकुलम् या जिल्ह्यांतून वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. लांबी २२८ किमी. जलवाहन क्षेत्र ५,२८६.६ चौ. किमी. ही नदी कोट्टयम् जिल्ह्यात देविकुलम्‌च्या दक्षिणेस ९६ किमी. शिवगिरीच्या डोंगराळ भागात (पश्चिम घाटात) उगम पावते.

उगमानंतर ती उत्तरेकडे वाहत जाते. परंतु देविकुलम् तालुक्यात पश्चिमेकडे वळून एर्नाकुलम् जिल्ह्यातून वाहते. याच जिल्ह्यात अलवायेजवळ तिच्या प्रवाहाच्या दोन-शाखा होतात. यांतील प्रमुख शाखा वायव्येकडे वाहत जाते व तिला चलाकुडी ही नदी पुथेनवेलीक्काराजवळ मिळते.

हा संयुक्त प्रवाह मुनांबम्‌जवळ अरबी समुद्रास मिळतो.

पेरियारची दुसरी शाखा अनेक क्षीण प्रवाहांनी वाहते आणि वरापुझाजवळ वेंबनाड सरोवरास मिळते. हिला एडमाला, चेरूथोनी इ. नद्या मिळतात. नेरिआमंगलम्, पेरूमबवूर, कलडी, अलवाये, एलूर, परुर इ. हिच्या खोऱ्यातील महत्त्वाची शहरे आहेत.

नदीच्या पाणलोट क्षेत्रातील भरपूर पर्जन्य व भूरचना यांमुळे हिचा उपयोग जलसिंचनासाठी व जलविद्युत्‌निर्मितीसाठी केलेला आहे. या नदीवर तीन प्रमुख प्रकल्प आहेत.

पेरियार सरोवर : एक दृश्य.

पेरियार खोरे जलसिंचन प्रकल्प

 

 

एर्नाकुलम् जिल्ह्यात भूथ्थानकेत्तूजवळ प्लानचौडे येथे हिच्यावर २१०.९ मी. लांबीचे धरण बांधलेले असून त्यापासून ४०,९९६ हे. जमिनीस पाणीपुरवठा होतो.

इडिक्की जलविद्युत् प्रकल्प

देशातील प्रमुख जलविद्युत् प्रकल्पांमध्ये याचा समावेशहोतो. या प्रकल्पातइडिक्की, चेरूथोनी व कुलामाऊ अशी तीन धरणे अंतर्भूत आहेत. यांपैकी इडिक्की धरण एर्नाकुलम् जिल्ह्यातकुरवन व कुराथी या दोन टेकड्यांदरम्यानच्या इडिक्की घळईत असून त्याची उंची १६८.९७ मी. आहे.

चेरूथोनी या पेरियार नदीच्या उपनदीवर १३८.३८ मी. उंच व ६५१ मी. लांबीचे दुसरे धरण वतिसरे धरण किलिवाल्ली थोडू या नदीवर कुलामाऊ येथे असून त्याची उंची १०० मी. व लांबी ३८५ मी. आहे. तीनही धरणांमुळे ५९.८३ चौ. किमी. क्षेत्रफळाचा तलाव निर्माण झाला असून क्षमता १,९९६.३ द. ल. घ. मी. आहे. त्यातील पाणी कुलाभाऊ धरणाजवळून भुयारी मार्गांने मुलमत्तम् येथील विद्युत्-गृहाकडे नेले जाते.

या कार्यासाठी नाडुगानी पर्वतरांगेतून ७.०१ मी. व्यासाचा व दोन किमी. लांबीचा बोगदा काढला असून त्यातून दर सेकंदाला ५,४०० घ. मी. पाणी सोडले जाते. अंतिम टप्प्यावर ५०º कोन करून हे पाणी दोन भुयारी लोखंडी नळांतून विद्युत्‌गृहाकडे सोडले जाते. हे विद्युत्-गृह जमिनीखाली ३०० मी. खोलीवर, ६०० मी. लांबीच्या बोगद्यात असून १४१.१ मी. लांब, १९.८ मी. रुंद व ३४.६ मी. उंच अशा इमारतीत आहे. येथे प्रत्येकी १३० मेवॉ. विद्युत्-क्षमतेची सहा विद्युत्-जनित्रे आहेत. याशिवाय यापासून ६०,७०३ हे. जमिनीस पाणीपुरवठा होतो.

पेरियार जलसिंचन योजना

ही योजना भारतातील जुन्या योजनांपैकी आहे. पेरियारच्या उगमाजवळ ५२.७ मी. उंचीचे धरण बांधले आहे. यामुळे ३२.४ चौ. किमी. क्षेत्रफळाचा जलाशय निर्माण झाला असून यालाच पेरियार सरोवर असे म्हणतात. या धरणाचे पाणी १,७३८.५ मी. लांबीच्या बोगद्यातून वैगई नदीत सोडले आहे. वैगई नदीपासून ४०० किमी. लांबीचे कालवे काढले असून त्यापासून ४४,९२० हे . जमिनीस पाणीपुरवठा केला आहे.

या प्रकल्पामुळे पेरियार नदीचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी तामिळनाडूच्या कोरड्या आणि अवर्षणग्रस्त खोऱ्यात सोडल्याने तेथील लोकांना दिलासा मिळाला आहे. पेरियार सरोवराचा परिसर वनश्री व पशुपक्षी यांनी समृद्ध अशा अभयारण्यात मोडतो. हत्ती हा येथील प्रमुख प्राणी असून सांबर, रानरेडे, वाघ, अस्वल इ. प्राणी व अनेक प्रकारचे पक्षी येथे आढळतात. पेरियार सरोवर व अभयारण्य ही पर्यटकांची मोठीच आकर्षणे ठरली आहेत.

 

डिसूझा, आ. रे.; गाडे, ना. स.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate