অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंगलोर

मंगलोर

मंगलोर बंदराचे दृश्यमंगलोर  कर्नाटक राज्यातील दक्षिण कानडा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण व भारतातील एक प्रमुख बंदर. लोकसंख्या १,९३,२३९; उपनगरांसह ३,०५,५१३ (१९८१). हे नेत्रावती आणि गुरुपूर या नद्यांच्या दुबेळक्यात वसले असून त्याच्या दक्षिण-पश्चिम बाजू नदीपात्रांनी वेढलेल्या आहेत. पाच किमी. लांबीच्या वाळूच्या दांड्यामुळे अरबी समुद्रावरील या बंदराला सुरक्षितता लाभली आहे.

हा वाळूचा दांडा दक्षिणेस खंडित झाला असून तेथूनच अरबी समुद्रातील जाहाजे गुरुपूर नदीद्वारे बंदरात प्रवेश करतात. बंदरापासून ९ किमी. आतपर्यंत मोठी जहाजे येऊ शकतात. शहराच्या परिसरात नारळी-पोफळीच्या बागा आहेत. १९७१ पासून डेरेबेल, कंकनडी, सोमेश्वर व उल्लाल  या नगरांचाही समावेश या शहरातच करण्यात आला असून हे एक औद्योगिक, व्यापारी व शैक्षणिक केंद्र बनले आहे. १८९६ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.


मंदेगोरा, मगनूर, मंगरौथ नित्रिअस ही मंगलोरची, यूरोपीय ग्रंथातील प्राचीन नावे होत. इ.स सातव्या शतकातील ‘मरतूरु’ ताम्रपटात या स्थळाचा ‘मंगलपुरा’ (मंगल-किल्ला) असा उल्लेख मिळतो. मंगलोर हे नाव मंगलादेवी मंदिरावरून पडले असावे आणि मंदिराचे नाव इ.स. दहाव्या शतकात येथे वास्तव्य असलेल्या राणी मंगलादेवीवरून पडले असावे. गुरुराज भट यांच्या मते हे ठिकाण राजकीय व सैनिकी दृष्ट्या महत्त्वाचे असल्यामुळे याला हे नाव पडले असावे. ‘कूडल’ (दोन नद्यांचे संगमस्थान) हे याचे स्थानिक नाव होय.

तेराव्या शतकात ही आलूप वंशाची राजधानी होती. चौदाव्या शतकात इराणच्या आखातावरील बंदरांशी मंगलोरचा मोठा व्यापार चालत असे. १३४२ मध्ये इब्न बतूता, १४४८ मध्ये अब्दुररझ्झाक (इराणचा राजदूत), १४९८ मध्ये वास्को द गामा व १५४ मध्ये दुआ बार्बोसा (पोर्तगीज प्रवासी) यांनी मंगलोरला भेटी दिल्या. विजयानगरच्या राजाने पोर्तुगीजांना येथील नदीच्या मुखाशी किल्ला बांधण्यास परवानगी  दिली होती (१५०५). १५२६ मध्ये हे शहर पोर्तुगीजांनी घेतले व त्यांनीच १५४७ मध्ये उजाड करून टाकले. १५५५ मध्ये शहराची पुनर्रचना करण्यात आली व त्यानंतर पुन्हा ते जाळण्यात आले. १६७० मध्ये पोर्तुगीजांना मंगलोरमध्ये वखार उभारण्यास बिदनूरच्या नायकांनी परवानगी दिली. अरबी व्यापाऱ्यांना मंगलोरमध्ये व्यापार करण्यास बंधने घातल्याने १६९५ मध्ये अरबांनी मंगलोर जाळून टाकले.

अठराव्या शतकाच्या पहिल्या दशकात बिदनूरच्या नायकांनी पोर्तुगीजांना मंगलोरबाहेर घालविले; परंतु पुन्हा १७१४ मध्ये त्यांना कारखाना उभारण्यास परवानगी दिली. १७६३ मध्ये हैदर अलीने मंगलोर घेऊन तेथे गोदी व दारूगोळा कारखान्याची उभारणी केली. १७६८ मध्ये हे शहर ब्रिटिशांनी घेऊन लगेचच सोडून दिले व १७९१ मध्ये पुन्हा घेतले. १७९४ मध्ये टिपू सुलतानाने ते जिंकले. त्याच्या हुकमावरून तेथील किल्लाही पाडून शेवटी १७९९ मध्ये ते ब्रिटिशांच्या ताब्यात आले. कूर्ग बंडाच्या काळात (१८३७) मंगलोरमध्ये घुसलेल्य बंडखोरांनी ब्रिटीशांची शासकीय कार्यालये पेटवून दिली ; तथापि हे बंड त्वरित मोडून काढण्यात आले.

मंगलोरच्या पश्चिमेस घाटमाथ्यापर्यंत लोह व मँगॅनीजचे साठे आहेत. औद्योगिक दृष्ट्या हे शहर महत्त्वाचे असून येथील ‘मंगलोरी कौले’ भारतभर प्रसिद्ध आहेत. याशिवाय हातमाग व सुती कापड उद्योग, मातीची भांडी, कॉफी आणि काजू, मत्स्योद्योग, जहाजनिर्मिती यांसाठीही मंगलोर प्रसिद्ध आहे. उल्लाल हे उपनगर तयार कपडे व काथ्याच्या वस्तुनिर्मितीसाठी विशेष महत्त्वाचे आहे. काजू निर्यातीच्या बाबतीत तर मंगलोर बंदराची जगात ख्याती आहे. यांशिवाय चंदनाचे लाकूड, मासे व माशांचे खत, कॉफी, मिरी, मातीची भांडी, कौले या येथील प्रमुख निर्यातवस्तू होत.

या विभागातील रस्त्यांचे हे प्रमुख केंद्र असून पश्चिम घाटाच्या पायथ्याचे दक्षिण लोहमार्गावरील हे अंतिम स्थानक आहे. हसन-मंगलोर हा मीटरमापी लोहमार्ग तयार करण्यात आला आहे. मुंबई, बंगलोर, पणजी या ठिकाणांशी येथून हवाई वाहतूक चालते. येथे पाण्याची लहान–मोठी अनेक कुंडे व जवळच एक छोटासा धबधबा आहे. डीझेलवर चालणाऱ्या विद्युत् शक्ती उत्पादन केंद्राद्वारे शहराला वीजपुरवठा केला जातो. येथे नऊ तलाव असून त्यांना नैसर्गिक झऱ्यांपसून पाणीपुरवठा होतो. येथील खडकांमध्ये असलेल्या गुहा चुकीने पांडवकालीन समजल्या जातात.

हरात चार किल्ले, टिपू सुलतानाने वांघलेला टेहळणी बुरूज, अनेक मंदिरे मठ, चर्च, मशिदी, मैदाने व उद्याने आहेत. येथील नवीन मंगलोर विद्यापीठ १९८० मध्ये स्थापन झाले असून स्त्रीशिक्षणावर विशेष भर देण्यात आलेला आहे. शहारच्या मध्यभागी असलेल्या ‘बावटा गुड्डा’ टेकडीवर जुने दीपगृह असून १९०० मध्ये येथे नवीन दीपगृहाची बांधणी करण्यात आली. तेथील सेंट ॲलोइशस चर्च प्रेक्षणीय आहे. त्याच्या छतावर व भिंतींवर बायबलमधील कथाप्रसंग सुंदर रीतीने रेखाटले आहेत. मंगलोरमध्ये हिंदूंबरोबरच ख्रिश्चन व मुस्लिम लोकांची संख्याही बरीच आहे. येथे कोकणी भाषेचा बराच प्रभाव आढळतो. [⟶बंदरे].


चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate