অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सरोवर

सरोवर

सरोवर

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमिनीने वेढलेला किंवा बंदिस्त जलाशय म्हणजे सरोवर. लॅकॉस या ग्रीक शब्दाचा अर्थ खळगा किंवा तलाव, यावरून लेक (सरोवर) हा शब्द आला आहे. तलाव हे तुलनेने छोटे व उथळ असतात; परंतु आकाराच्या दृष्टीने सरोवर व तलाव यांच्यात वेगळेपणा दाखविणारे निश्चित प्रमाण किंवा मोजमाप नाही. सामान्यपणे सरोवर ही संज्ञा नैसर्गिक जलाशयाला वापरली जाते.

सरोवराचे स्थान, त्याच्या निर्मितीची कारणे, आकार व पाण्याचे स्वरूप इत्यादींमध्ये विविधता आढळते. जगातील काही मोठे अंतर्गत समुद्र म्हणजे सरोवरेच आहेत. उदा., मृत समुद्र, गॅलीली समुद्र, कॅस्पियन समुद्र, अरल समुद्र इत्यादी. अनेक मानवनिर्मित जलाशयांनाही सरोवर ही संज्ञा वापरली जाते. उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील हूव्हर धरणाचा जलाशय म्हणजे मीड सरोवर. काही वेळा किनाऱ्यावरील जलाशयांच्या बाबतींतही सरोवर ही संज्ञा वापरली जाते. उदा., भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओरिसा राज्यातील चिल्का सरोवर, व्हेनेझुएलातील माराकायव्हो व लुइझिअ‍ॅना राज्यातील पाँटचारट्रेन सरोवर.

कधीकधी नदीच्या अधिक रूंद पात्राच्या बाबतीतही सरोवर ही संज्ञा वापरली जाते. उदा., मिनेसोटा व विस्कॉन्सिन यांदरम्यानचे मिसिसिपी नदीतील पेपीन सरोवर. जगातील सर्वच भागांत सरोवरे आढळत असली, तरी बहुतांश सरोवरे भरपूर पावसाच्या प्रदेशात आढळतात.

काही सरोवरे अगदी उंच प्रदेशात तर काही समुद्रसपाटीपेक्षाही बरीच खोल भागात आढळतात. दक्षिण अमेरिकेतील तितिकाका हे जगातील सर्वाधिक उंचीवरील (सस.पासून ३,८०२ मी.) सरोवर आहे. रशियातील बैकल हे पाण्याच्या साठयाबाबत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे व जगातील सर्वांत जास्त खोली असणारे सरोवर आहे. मृत समुद्र सस.पासून ४०० मी. खोलीवर आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वांत मोठे सरोवर एअर सस.पासून १६ मी. खोलीवर आहे.

उथळ व खाऱ्या पाण्याचे हे सरोवर ऑस्ट्रेलियाच्या शुष्क प्रदेशात आहे. केवळ अधूनमधून येणाऱ्या वादळी पावसातच ते भरते. शुष्क प्रदेशातील सरोवरे पाऊस संपल्यानंतर बाष्पीभवनामुळे काही काळ कोरडी पडतात. सरोवरांच्या ओल्या व कोरडया ऋतूतील आकारमानात भिन्नता आढळते. आफ्रिकेतील सहारा वाळवंटाला जवळ असलेल्या चॅड सरोवराच्या बाबतीत अशी फार मोठी तफावत आढळते.

सामान्यपणे सरोवरे ही गोडया पाण्याची असतात असे मानले जात असले तरी अनेक सरोवरे, विशेषत: शुष्क प्रदेशातील, जास्त बाष्पीभवन क्रियेमुळे खाऱ्या पाण्याची बनलेली आहेत. कॅस्पियन समुद्र, मृत समुद्र व ग्रेट सॉल्ट लेक ही जगातील खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी आहेत. संयुक्त संस्थाने व कॅनडा यांदरम्यानची पंचमहासरोवरे ही जगातील मोठी गोड्या पाण्याची सरोवरे आहेत. सुपीरिअर हे जगातील सर्वांत मोठे गोडया पाण्याचे सरोवर आहे, तर कॅस्पियन समुद्र हे जगातील सर्वांत मोठे सरोवर आहे. अनेक सरोवरे अधिक उंचीवर व पर्वतीय प्रदेशातही निर्माण झालेली आढळतात.

रोवरांच्या निर्मितीची कारणे अनेक आहेत. जगातील आजची बहुतांश सरोवरे एके काळी हिमनदयांनी आच्छादलेल्या प्रदेशांत असून ती हिमनदयांच्या कार्यातून निर्माण झालेली आहेत. प्रवाही हिमनदयांच्या खननकार्यामुळे द्रोणींच्या वलशिळा खरवडल्या गेल्याने झालेल्या खोलगट भागांत सरोवरे निर्माण झाली. हिमोढांच्या संचयनामुळे पूर्वीच अस्तित्वात असलेल्या नदयांच्या प्रवाहमार्गात बांध निर्माण होतात. हिमनदया वितळू लागल्या की त्यांचे पाणी हिमोढाच्या वरच्या भागातील दरीत साचून सरोवरांची निर्मिती होते.

पर्वतीय प्रदेशातून वाहत असताना हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे पर्वत उतारावरील अर्धवर्तुळाकार किंवा एखादया आरामखुर्चीच्या आकाराचे खोलगट भाग निर्माण होतात. यांना सर्क म्हणतात. अशा सर्कमध्ये सरोवराची निर्मिती झालेली आढळते. हिमनदयांनी आपल्या बरोबर वाहून आणलेल्या गाळाच्या निक्षेपांमध्ये बर्फाचे गट गाडले जातात. जेव्हा त्यातील बर्फ वितळते तेव्हा गाळाचा ढीग खचून तेथे खड्डा तयार होतो. याला हिमगर्त असे म्हणतात.

अशा हिमगर्तात पाणी साचून सरोवराची निर्मिती होते.आशिया, यूरोप व उत्तर अमेरिका खंडांच्या उत्तरेकडील भागांत आढळणारी अनेक सरोवरे हिमनदीच्या कार्यामुळे निर्माण झालेली आहेत. उदा., पंचमहासरोवरे, कॅनडातील ग्रेट बेअर व ग्रेट स्लेव्ह सरोवरे इत्यादी.

एकटया कॅनडात जगाच्या जवळजवळ निम्मी सरोवरे असून त्यांतील बहुतांश प्लईस्टोसीन कालखंडातील हिमनदयांच्या कार्यामुळे निर्माण झालेलीआहेत. फिनलंडमधील अनेक सरोवरे याच प्रकारे तयार झाली आहेत.

चुनखडीच्या प्रदेशांत काही सरोवरे निर्माण झाल्याचे आढळते. पावसाच्या अम्लीय पाण्यात चुनखडी विरघळल्यामुळे अंतर्गत भागात गुहा व त्यांत चित्रविचित्र भूआकार निर्माण होतात. जेव्हा या गुहांचे छत खाली कोसळते तेव्हा तेथील भूपृष्ठावर खळगा पडतो. अशा खळग्यात पाणी साचून सरोवर तयार होते. यूगोस्लाव्हिया व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॅरिडा राज्यात अशी सरोवरे आढळतात.

दीच्या खालच्या टप्प्यातील मंद उताराच्या पूरमैदानात नदयांना नागमोडी वळणे प्राप्त होतात. अशा नागमोडी वळणाच्या भागातच पुराच्या वेळी नदीने आपले पात्र बदलल्याने तिच्या मूळ पात्रात सरोवर निर्माण होते. अशा सरोवरांना धनुष्कोडी किंवा कुंडल कासार सरोवर असे म्हणतात. जगात अनेक ठिकाणी नदीच्या खालच्या टप्प्यात अशी सरोवरे निर्माण झालेली आहेत. उदा., मिसिसिपी नदीतील सॉल्टन समुद्र (?). काही नदयांच्या प्रवाहमार्गात असणाऱ्या रूंद भागात सरोवरे तयार होतात. उदा., आयर्लंडमधील शॅनन नदीमार्गातील लॉक डर्ग सरोवर.

रोवरांची निर्मिती इतरही अनेक कारणांनी होते. भूसांरचनिक क्रियेमुळे भूकवचात वेगवेगळ्या प्रकारे सरोवरांची द्रोणी निर्माण होते. भूकवचातील प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेल्या खळग्यात किंवा खचदरीत पाणी साचून सरोवर तयार होते. उदा., रशियातील बैकल सरोवर. अशाच प्रकारची सरोवरे आफ्रिकेतील ग्रेट रिफ व्हॅलीमध्ये आढळतात. उदा., रूडॉल्फ, टांगानिका व न्यासा ही सरोवरे. भूकवच मंदगतीने खाली वाकत गेले तर तेथे सांरचनिक द्रोणी तयार होते. त्यामुळे वाहणारे प्रवाह अडले जाऊन तेथे सरोवर तयार होते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी टेनेसी राज्यात मिसिसिपी नदीजवळ आढळणारे रीलफुट सरोवर १८११-१२ मध्ये झालेल्या भूकंपामुळे निर्माण झाले आहे.

ज्वालामुखी क्रियेमुळेही सरोवरांच्या द्रोणी निर्माण होतात. जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा वाहत गेलेल्या लाव्ह्यामुळे प्रवाहमार्गात अडथळा निर्माण होऊन वरच्या भागात पाणी साचून सरोवर तयार होते. काही सरोवरे मृत ज्वालामुखींच्या मुखाशी असलेल्या खड्डयत पाणी साचून तयार होतात. उदा., इंडो-नेशियातील सुमात्रा बेटावरील टोबा सरोवर; अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी ऑरेगन राज्यातील केटर सरोवर.

जगातील काही सरोवरे उल्कापातामुळे निर्माण झालेली आहेत. उदा., महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. आफ्रिकेतील घाना या देशातील बोसूमवी सरोवर. जगातील काही सरोवरे प्रागैतिहास काळातील समुद्र व महासागरांचे अवशेष आहेत. उदा., कॅस्पियन समुद्र.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate