অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोसी नदी

कोसी नदी

कोसी नदी

बिहार राज्याची अश्रूंची नदी’. मुख्य प्रवाहाची लांबी सु. ५९० किमी. ही पूर्व नेपाळच्या हिमालय प्रदेशात उगम पावते. तिचा एक शीर्षप्रवाह तर तिबेटातून येतो. उंच पर्वतांवरून येणाऱ्या सात प्रवाहांनी ती बनलेली असल्यामुळे तिला सप्त कोसी व त्या प्रदेशाला सप्तकोसिकी म्हणतात.

मुख्य प्रवाह सुन कोसी हा आहे. गाधीच्या कुशिक राजाची मुलगी कौशिकी हिने पुत्रप्राप्तीनंतर नदीचे रूप घेतले. तीच कोसी नदी अशी आख्यायिका आहे. सु. ९६ किमी. दक्षिण व नैर्ऋत्य दिशांनी वाहिल्यावर सुन कोसी पूर्व व आग्नेय दिशांस २९६ किमी. वाहते. तिला मग उत्तरेकडून अरुण व  पूर्वेकडून तांबर

कोसी नदीप्रवाह

नद्या मिळाल्यावर ती दक्षिणाभिमुख होते. भारत-नेपाळ सीमेच्या उत्तरेस ४८ किमी. छतरा येथे ती खडकाळ, अरुंद निदरीतून सपाटीवर येते. येथपर्यंतचा तिचा प्रवाह लहानमोठे धबधबे, द्रुतवाह इत्यादींनी युक्त असून मौंट एव्हरेस्टच्या पश्चिमेस गोसाइंतान व पूर्वेस कांचनजंघा यांमधील सु. ६२,४०० चौ. किमी.

पर्वतप्रदेशातील पावसाच्या व वितळलेल्या बर्फाच्या पुराचे पाणी ती आपल्या वेगवान प्रवाहाने घेऊन येते आणि त्याचबरोबर त्या पाण्याने कोरून काढलेले व गोळा केलेले दगडगोटे, वाळू, माती, झाडझाडोरा इ. माल मोठ्या प्रमाणात आणते. सपाटीवर येताच कोसीचा वेग एकदम कमी होतो. त्यामुळे तिने बरोबर आणलेले पदार्थ पात्रातच साठून राहतात आणि त्यांच्या अडथळ्यामुळे पाणी वाट फुटेल तिकडे पसरू लागते. त्याला एकच असा प्रवाहमार्ग राहत नाही व त्रिभुज प्रदेशातल्याप्रमाणे त्याचे अनेक फाटे अनेक दिशांनी जातात व दलदली माजतात.

कोसीचे प्रवाह विशेषतः उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे सरकतात. २०० वर्षांपूर्वी ती पूर्णियाजवळून वाहत होती. विसाव्या शतकातच कोसीचे पात्र गेल्या ७० वर्षांत सु. ११२ किमी. पश्चिमेस सरकले आहे. अचानक येणाऱ्या पुराचे पाणी २४ तासांत १० मी. पर्यंतही चढते. यामुळे उत्तर बिहारचा सपाट प्रदेश – दरभंगा, सहरसा व पूर्णिया जिल्हे-जलमय होऊन हाहाकार ओढवतो. नदीने आणून टाकलेल्या वाळूखाली शेते, घरे, गावे, झाडे गडप होतात. या उत्पातामुळेच या नदीला ‘ बिहारची अश्रूंची नदी’ हे सार्थ नाव मिळाले आहे. घुगरी नदी व इतर अनेक प्रवाह तिला मिळतात. सहरसा व मोंघीर जिल्ह्यांतून आग्नेय व पूर्व दिशांनी जाऊन पूर्णिया जिल्ह्यातील कारगोलजवळ कोसी नदी गंगेस मिळते. कोसीच्या खालच्या भागात लहान नौकांची थोडी ये – जा चालते. परंतु त्यांनाही वाटाड्या लागतो.

कोसी नदी

कोसीचे विध्वंसक स्वरूप लक्षात घेऊन भारत सरकारने नेपाळ सरकारच्या सहकार्याने कोसी प्रकल्प आखला आहे. पूरनियंत्रण, नदीकाठांचे संरक्षण, शेतीला पाणीपुरवठा, जलविद्युत् उत्पादन, वाहतूक हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत. त्यासाठी २२८ मी. उंचीचे धरण, दोन बंधारे, नदीकाठी बांध, पूर्व आणि पश्चिम बाजूंचे कालवे, वीज उत्पादन गृहे ही कामे व्हावयाची आहेत.

नेपाळातील हनुमाननगरच्या उत्तरेस ५ किमी. वरील बंधारा व पूल, पूर्व व पश्चिम नदीकाठचे २४० किमी. बांध ही कामे पुरी होऊन नेपाळच्या राजांच्या हस्ते २४ एप्रिल १९६५ रोजी त्यांचे उद्‍घाटन झाले.

या बांधामुळे बिहार व नेपाळमधील २०,७२० चौ. किमी. प्रदेश पूरमुक्त झाला व नेपाळातील ०·६१ लक्ष हे. आणि बिहारमधील २·०२ लक्ष हे. लागवडीखालील शेतजमीन वारंवार पाण्याखाली बुडण्यापासून बचावली. पूर्वेकडील कालवे पुरे होत आले आहेत व पश्चिमेकडील कालव्यांचे काम हाती घेतले आहे.

२० मेगॅवॉटचे कोसी विद्युत्‌गृह पूर्व कोसी कालव्यावर पुरे झाले आहे (१९७०). त्याची अर्धी वीज नेपाळला मिळेल. या प्रकल्पामुळे दरभंगा जिल्ह्यातील ३·१२ लाख हे., सहरसा व पूर्णिया जिल्ह्यांतील ५·६८ लाख हे. व नेपाळच्या सप्तारी जिल्ह्यातील १२,१२० हे. जमिनीस पाणीपुरवठा होणार आहे. दोन्ही देशांतील उद्योगधंद्यांस वीज पुरविली जाणार आहे. प्रकल्प पुरा होता होता ही अश्रूंची नदी फुलांची नदी बनत आहे.

 

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate