অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोवा, दमण, दीव

गोवा, दमण, दीव

पोर्तुगीजांच्या सत्तेतून १९६१ मध्ये मुक्त झालेले भारताचे भाग. लोकसंख्या ८,५७,७७१ (१९७१). पैकी गोवा ७,९५,१२०; दमण ३८,७३९; दीव २३,९१२. क्षेत्रफळ ३,८१३ चौ. किमी. पैकी गोवा ३,७०१ चौ.किमी., दमण ७२ चौ. किमी., दीव ४० चौ. किमी. आता हे भाग उपराज्यपालद्वारा केंद्रशासित आहेत. यांपैकी गोवा प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांच्या दरम्यान १४° ५३’ उ. ते १५° ४८’ उ. व ७३° ४५’ पू. ते ७४° २४’ पू. यांमध्ये आहे. त्याच किनाऱ्यावर गुजरातच्या दक्षिणेस दमण २०° २५’ उ. व ७२° ५३’ पू. वर आणि दीव बेट सौराष्ट्र द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला २०° ४३’ उ. व ७१° २’ पू .वर आहे.

गोव्याच्या उत्तरेस महाराष्ट्र, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक आणि पश्चिमेस अरबी समुद्र आहे. दमणच्या पश्चिमेस खंबायतचे आखात व बाकी तीन दिशांना गुजरात राज्याचा प्रदेश आहे. दीव बेट पूर्व, दक्षिण व पश्चिम दिशांना अरबी समुद्राने वेढलेले असून त्याच्या उत्तरेस एका मोठ्या दलदलीतून जाणाऱ्या अरुंद खाडीपलीकडे दीवमध्येच समाविष्ट असलेला गोगोला हा थोडा भूभाग व सिंबोर उपसागरातील पाणीकोटा बेट आहे. त्याच्याभोवती गुजरातचा जुनागढ जिल्हा आहे.

गोव्याचा १०५ किमी. समुद्रकिनारा मच्छिमारी नौकांस आसरा म्हणून उपयोगी पडणाऱ्या अनेक खाड्या व पांढऱ्याशुभ्र वाळूच्या अनेक सुंदर पुळणी यांनी युक्त आहे.

भूरचना

दक्षिणोत्तर सु. १०५ किमी. व पूर्वपश्चिम सु. ६० किमी. लांबीरुंदीचा गोव्याचा भूप्रदेश कोकणपट्टीचा दक्षिण भाग होय. सह्याद्री आणि समुद्र यांच्या दरम्यानची ही डोंगराळ भूमी पश्चिमेकडे उतरत गेली आहे. ईशान्येपासून आग्नेयीपर्यंतच्या सीमेवरील सह्याद्रीचे अनेक फाटे पश्चिमेकडे आले आहेत. उत्तरेकडील सत्तरीच्या पर्वतभागात सोंसोगड (१,१८६ मी.), क्षत्रियांची माउली किंवा कातलांची माउली (१,१२६ मी.), वाघेरी (१,०८५ मी.) व मोरलेगड (१,०५४ मी.) ही शिखरे उल्लेखनीय आहेत. त्यांखेरीज सिद्धनाथ, चंद्रनाथ, दुधसागर, मोरपिर्ल या डोंगरांवरील सृष्टिसौंदर्य आकर्षक आहे.

सह्याद्रीत उगम पावून समुद्राला मिळणाऱ्या अनेक लहानलहान नद्यांपैकी उत्तर सीमेची आरोंदा अथवा तेरेखोल, चापोरा अथवा कोळवली, बाग, मांडवी, जुवारी किंवा अघशी (अघनाशिनी), साळ, तळपण व गालजीबाग या प्रमुख आहेत. त्यातल्या सर्वात लांब सु. ६२ किमी.

मांडवी व जुवारी आहेत. बाग नदी तर अवघी १·५ किमी. आहे. मांडवी व जुवारी आणि त्यांच्या उपनद्या यांमुळे गोव्याच्या उत्तर भागात सर्वत्र अनेक बेटे बनलेली आहेत, जलमार्ग उपलब्ध झाले आहेत आणि उत्कृष्ट बंदरे निर्माण झाली आहेत. दमणाच्या उत्तर सीमेला भगवान नदी, दक्षिण सीमेला काळू नदी व मध्य भागाला दमणगंगा असून तिच्या मुखाशी दोन्ही तीरांवर वसलेले दमण समोरच्या समुद्रात वाळूचा बांध पडल्यामुळे एक सामान्य बंदर झाले आहे.

हा प्रदेश सपाट आहे. दीव बेट पूर्वपश्चिम सु. ११ किमी. व दक्षिणोत्तर सरासरी ३ किमी. रुंदीचे असून त्याच्यावर मधूनमधून सु. ३१ मी. उंचीच्या टेकड्या आहेत. याच्या दक्षिण किनाऱ्याला सिकताश्म खडकाचा एक कडा असून त्याच्या पायथ्याशी समुद्राचे पाणी खोल आहे. गोवा प्रदेशातील मृदा बव्हंशी जांभ्या खडकापासून झालेली आहे.

पूर्वभागात केवळ त्याच जातीची माती असली तरी नद्यांच्या काठी नदीगाळ, किनाऱ्याच्या आत रेतीमिश्रित गाळ आणि किनाऱ्याला रेताड व खार जमिनी किंवा दलदली आहेत. दमण भागातील ओलसर रेतीमिश्रित गाळजमीन सुपीक आहे. दीव बेटावर मात्र निकृष्ट मृदा आहेत. खनिजांचे बाबतीत गोवा संपन्न आहे. येथे लोहधातुक मँगॅनीज आणि चुनखडी विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. दमण व दीवमध्ये खनिजे उपलब्ध नाहीत.

गोवा प्रदेशात ८ नद्यांखेरीज ९ उपनद्या, ७ तळी व ४ कालवे असून मडकईची नदी कुंभारजुव्याचा कालवा; मांडवी व जुवारी नद्यांना जोडून गोवा तालुक्याला तिसवाडी किंवा इलहास बेट बनवतो. हा खरोखर ११ बेटांचा द्वीपसमूहच आहे. शिवाय गोव्यातील नद्यांत इतर २१ बेटे असून समुद्रात ४ आहेत. अंजदीव हे बेट कारवार (उ. कानडा) च्या जवळ आहे.

हवामान

गोव्याचे हवामान सामान्यतः उष्ण व आर्द्र आहे. जून ते सप्टेंबर नैर्ऋत्य मान्सूनचा पाऊस जोरदार पडतो. तो पश्चिम भागातील १०० मी. पेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात २८० ते ३५० सेंमी. असतो, तर पूर्वेच्या डोंगराळ प्रदेशात ५०० ते ७५० सेंमी.पर्यंतही जातो. तपमान पश्चिम भागात सामान्यतः २२° ते ३२° से. असते. पूर्व भागात मात्र किमान व कमाल तपमानांतील अंतर बरेच जास्त असते. पर्जन्योत्तर काळात गोव्याची हवा सुखद असते.

पणजी येथील फेब्रुवारी, मे, जुलै व नोव्हेंबर महिन्यांचे सरासरी तपमान अनुक्रमे २४·३° से., २९·८° से., २६·४° से. व २७·६° से. असते. याच महिन्यांतील सरासरी पर्जन्यमान अनुक्रमे ० सेंमी., १·७६ सेंमी., ८९·२१ सेंमी. व २·०४ सेंमी. आणि वार्षिक सरासरी पर्जन्यमान २३१·४ सेंमी. असते.

दमणचे हवामान समशीतोष्ण असून पाऊस १५० ते २०० सेंमी. पडतो. दीव बेटावर हवा पावसाळ्यात दमट व एरवी कोरडी असते. पाऊस सु. १०० सेंमी.पर्यंत पडतो. गोव्यात २८·४% भूमी वनाच्छादित आहे. या १,०५१ चौ. किमी. क्षेत्रात सु. चतुर्थांश भाग पूर्वेच्या बाजूस खोल दऱ्यात व उभ्या डोंगर उतारांवर विखुरलेला आर्द्र, सदाहरित वृक्षांचा असून बाकीचा पानझडी वृक्षांचा आहे. शिसव, चंदन, देवदार, खैर, बाभूळ, वेळू आणि अनेक खाद्य व औषधी वन्य वनस्पती गोव्याच्या जंगलांत आहेत.

लागवडीची झाडे नारळी, पोफळी, आंबा, फणस, काजू, कोकम, जांभूळ, ओटंब अशी असून पपनस, अननस व इतर फळझाडांची जोपासनाही बऱ्याच प्रमाणात होते. वन्य पशूंत वाघ, चित्ते, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, हरिण, चितळ, माकड, मुंगुस व ससा यांचा समावेश होतो.

ओक, शा. नि.

इतिहास

महाभारताच्या ‘भीष्मपर्वा’त (अध्याय ९) आणि स्कंदपुराणात (सह्याद्री खंड) गोमंत, तर सुतसंहितेत गोवापुरी ही नावे आढळतात. पुरातनकाळी येथे गोधनाची विपुलता असल्यामुळे हे नाव पडले, ही एक व्युत्पत्ती. या प्रदेशात आर्य संस्कृती आणणाऱ्या परशुरामाने गौ (= बाण) सोडला, तो येथपर्यंत पोहोचला. त्या बाणाचा अंत जिथे झाला, तो प्रदेश गौमान्त – गोमन्त ही दुसरी व्युत्पत्ती. राज्यकर्त्या कदंबांची राजधानी गोपकपट्टण (थोरले गोवे) होती.

. स. पू. तिसऱ्या व दुसऱ्या शतकांत या प्रदेशात मौर्यांचा अंमल होता. त्यानंतर तो सातवाहनांनी जिंकला होता की नाही, हे अनिश्चित आहे. अर्बेली (साखळी महाल) येथील गुहेत सापडलेल्या शिलालेखांवरून इ. स. पहिल्या शतकात येथे एक मोठे शहर व व्यापारी केंद्र असावे असे दिसते. अंत्रूज (फोंडा) महालातील दोन ताम्रपटांप्रमाणे चंद्रपूर (चांदर) येथे चौथ्या शतकात देवराज राज्य करीत होता असे ठरते. परंतु हा कोणत्या घराण्यातील होता याचा बोध होत नाही. त्या शतकातच गोव्यात बनवासी येथे कदंबांची सत्ता सुरू झाली.

पाचव्या शतकात कदंब बादामीच्या चालुक्यांचे मांडलिक बनले, तरी त्यामुळे त्यांची गोमंतकावरील सत्ता नष्ट झाली नाही. पण गोव्याच्या प्रदेशात बादामी चालुक्यांची कित्येक ताम्रशासने मिळाली आहेत. आठव्या शतकाच्या मध्यात राष्ट्रकूटांचे मांडलिक शिलाहार केंपें महालातील बाळ्‌ळीहून या प्रदेशात काही भागावर राज्य करीत होते. चालुक्यांशी विवाहसंबंध जोडून जयकेशी कदंबाने आपली सत्ता वाढवली. कदंबांच्या सत्तेचा काळ हा गोव्यातील भरभराटीचा काळ. या घराण्यातील पहिला व दुसरा गूहल्लदेव, पहिला आणि दुसरा जयकेशी, विजयादित्य हे विशेष पराक्रमी होते.

सबंध कोकणपट्टीवर त्यांचा दबदबा होता. कदंब राजांनी आपली राजधानी चांदरहून गोपकपट्टण येथे हलवली. याच बंदरातून परदेशांशी व्यापार चाले. दरबारात उच्च स्थानी नेमलेल्या सदन या अरबाच्या साहाय्याने दुसऱ्या जयकेशीने गोपकपट्टणात अनेक सुधारणा केल्या. पश्चिम किनाऱ्यावर प्रबळ आरमार स्थापन केले. तथापि अरबांनी धर्मवेडापायी हिंदू संस्कृतीचा नाशही पुष्कळ केला. बाराव्या शतकात आपले प्रभुत्व टिकविण्यासाठी कदंबांना होयसळांशी संघर्ष करावा लागला.

तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी कदंबाना मांडलिक बनवून गोमंतक आपल्या सत्तेखाली आणला. सिंघण यादवाच्या पदरी असलेल्या गोव्यातील भतग्रामच्या मायिदेवाने मोडकळीस आलेली कदंबांची सत्ता सावरण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी झाला नाही. गोव्यात यादवांची सत्ता १०१ वर्षे होती. त्यांनी गोव्याच्या वैभवात मोलाची भर घातली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate