অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्लादियाखाँ

अल्लादियाखाँ

अल्लादियाखाँ : (१० ऑगस्ट १८५५—१६ मार्च १९४६). कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक. खाँसाहेबांच्या घराण्याचे मूळ पुरुष नाथ विश्वंभर. मूळचे हे घराणे शांडिल्यगोत्री आद्यगौड ब्राह्मणांचे. पण दिल्लीजवळील अनूप-संस्थानाच्या आपल्या आश्रयदात्या अशा एका हिंदू अधिपतीला दिल्लीपती मुसलमान बादशहाच्या कैदेतून सोडविण्याच्या मोबदल्यात या घराण्यातील एक पूर्वज मुसलमान झाले. खाँसाहेबांचा जन्म जयपूर संस्थानामधील एका छोट्याशा जहागिरीच्या उनियारा या गावी झाला. खाँसाहेबांचे पाळण्यातील नाव ‘गुलाम एहमद’ होते. परंतु त्यांच्या मातापित्यांच्या अनेक अपत्यांतील हे अपत्य वाचले, म्हणून त्यांना ‘अल्लादियाखाँ ’ (अल्लाने जगविलेले मूल) म्हणू लागले. खाँसाहेबांचे वडील ख्वाजा एहमदखाँ हे उनियारा व टोंक या दरबारचे नामांकित गायक होते. अल्लादियाखाँ चौदा-पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील टोंक येथे वृद्धापकाळी मृत्यू पावले. त्यामुळे त्यांचे शिक्षण चुलते जहांगीरखाँ यांच्याकडे झाले.

अल्लादियाखाँनी प्रथम चारपाच वर्षे धृपद-धमाराचे आणि नंतर सातआठ वर्षे ख्यालगायकीचे पराकाष्ठेच्या निष्ठेने शिक्षण घेतले. यानंतर खाँसाहेबांनी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश इ. प्रदेशांत व थेट नेपाळपर्यंत मुशाफिरी केली आणि संगीताच्या विविध रीतींचा अनुभव घेतला. याचा त्यांच्या गायकीला उत्तरकाली उपयोग झाला. पुढे ते आमलेटा संस्थानात असताना एकदा अतिगायनामुळे त्यांचा आवाज जो साफ बसला, तो जवळजवळ दोन वर्षांपर्यंत. त्यामुळे पूर्वीची आपली गायनशैली बदलून आपल्या पूर्वीपेक्षा जाड झालेल्या आवाजाला शोभेल, अशी स्वत:ची एक सर्वस्वी अभिनव व नमुनेदार गायकी त्यांनी निर्माण केली. १८९१च्या सुमारास खाँसाहेब दक्षिणाभिमुख होऊन प्रथम अहमदबाद व नंतर बडोदा, मुंबई करीत १८९५ साली कोल्हापुरास शाहूमहाराजांच्या आश्रयाला स्थायिक झाले, ते १९२२ मध्ये महाराजांचा अंतकाल होईपर्यंत. १९२२ पासून १९४६ पर्यंतची चोवीस वर्षे त्यांनी मुख्यत:  शिकविण्यात मुंबईस काढली. खाँसाहेब मूंबईस मृत्यू पावले. त्यांची कबर मुंबईला ठाकुरद्वारला रूपावाडी येथे असून कोल्हापुरास देवल क्लबसमोरच्या चौकात त्यांचा अर्धपुतळा आहे.

खाँसाहेबांच्या पूर्वी महाराष्ट्रात अनेकविध गायनशैली प्रचलित होत्या, पण त्यांतल्या कोणत्याही गायकीपेक्षा ही गायकी स्वतंत्र होती. मूळच्या धृपद-अंगामुळे येणारा बोझ, स्वररचनेचा पेचदारपणा, लयकारीचा बिकटपणा, अनेकविध रागांचा अनवटपणा अथवा मिश्रता, चिजांचे नावीन्य, अचाट दमसास, त्यामुळे येणारा एकसंघ अतूटपणा आणि गोळीबंद गमक-अंगाचे प्राधान्य ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये होती. त्यांचा प्रत्येक स्वर लयकारीने झेलला जात असे; आणि त्यांच्या तानेची मांडणी तर विलक्षण व अनपेक्षित असे. त्यामुळे त्यांची गायकी ऐकण्यापूर्वी श्रोत्यांच्या बौद्धिक पूर्वतयारीची नितांत अपेक्षा असे. त्यांच्या तनाइतीतले एक वैशिष्ट्य म्हणजे रागाच्या जीवस्वराला मध्येच दिला जाणारा अतिशय मोहक झोल किंवा दुसऱ्या एखाद्या स्वरावर होणारा ठेहराव व तेथून अत्यंत अनपेक्षितपणाने तानेचा समेपर्यंत अवसानाने होणारा प्रवास. त्यांच्या एकंदर गायकीमध्ये चीज, आलाप, तान, बोलताना इ. अंगे एकापुढे एक पृथक ठेवलेली न वाटता ती एकमेकांमध्ये बेमालूमपणे एकजीव होऊन जात आणि चिजेला अथवा रागाला पूर्णोद्गाराचे स्वरूप येई.

खाँसाहेबांचा स्वभाव निगर्वी, गुणग्राहक आणि वृत्ती अलिप्तपणाची होती. खाँसाहेबांनी आपल्या वडिलांचे—एहमदजींचे—नाव गोवून बऱ्याच सुंदर चिजा बांधलेल्या आहेत. त्यांच्या मुलांपैकी दोन मुलगे मंजीखाँ आणि भुर्जीखाँ हेही गुणी गायक व शिक्षक होते. खाँसाहेबांना दहाबारा हजार चिजा मुखोद्गत होत्या. या दृष्टीने ते एक ‘कोठीवाले’ गायक होते. खाँसाहेबांच्या शिष्यशाखेत त्यांचे बंधू हैदरखाँ आणि दोन मुलगे यांच्या व्यतिरिक्त केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, तानीबाई, गोविंदबुवा शाळिग्राम, नथ्थनखाँ, लीलावती शिरगांवकर, गुलूभाई जसदनवाला, मोहनराव पालेकर इ. सुविख्यात कलावंतमंडळी आहेत.

 

लेखक - अरविंद मंगरूळकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate