অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वराहगिरी वेंकट गिरी

वराहगिरी वेंकट गिरी

वराहगिरी वेंकट गिरी : (१० ऑगस्ट १८९४ - २३ जून १९८० ) भारताचे चौथे राष्ट्रपती. बेऱ्हमपूर [ब्रह्मपूर (ओरिसा)] येथील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. प्राथमिक शिक्षण बेऱ्हमपूर येथे झाल्यावर डब्लिन विद्यापीठात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले. बार अ‍ॅट लॉ झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. पुढे ते काँग्रेसचे सभासद झाले आणि होमरूल चळवळीत सहभागी झाले. कामगार संघटनेचे सचिव व ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. (१९२६; १९४२) जिनीव्हा येथील आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत भारताच्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित होते (१९२७). १९३१ मध्ये त्यांनी गोलमेज परिषदेत भाग घेतला. १९३४ ते ३७ या दरम्यान मध्यवर्ती विधिमंडळात त्यांनी कामगारांचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी ते कामगार, उद्योगधंदे, सहकार व वाणिज्य यांचे मद्रास इलाख्यात मंत्री होते (१९३७ — ३९). हंगामी हिंदुस्थान सरकारचे परराष्ट्रवकील म्हणून त्यांनी सीलोनमध्ये (श्रीलंकेत) दोन वर्षे काम केले आणि त्यानंतर ते कामगारमंत्री झाले. १९५७ — ६७ च्या दरम्यान त्यांनी राज्यपाल म्हणून उत्तर प्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांत काम केले आणि त्यानंतर ते भारताचे उपराष्ट्रपती (१९६७ — ६९) आणि पुढे राष्ट्रपती (१९६९ — ७४) झाले.

त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर काम केले असून कामगारांच्या हितासाठी ते प्रथमपासून झटत आहेत. एक निस्पृह कामगार नेता म्हणून त्यांची आज जगभर प्रसिद्धी आहे. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सामोपचाराने आणि सुलभतेने हाताळले; एवढेच नव्हे तर तत्संबंधीचे विचार त्यांनी इंडस्ट्रियल रिलेशन्स (१९५५), लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री (१९५८), जॉब्ज फॉर अवर मिलियन्स (१९६०) वगैरे पुस्तकांद्वारे मांडले. या सर्व कार्याबद्दल बनारस, आंध्र वगैरे विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट ही पदवी दिलीच; पण भारत सरकारनेही त्यांच्या कार्याचा उचित गौरव त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन केला (१९७५). सध्या ते बंगलोरला राहतात.

 

संदर्भ : Bhargava, G. S. V. V. Giri, Bombay, 1969.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate