অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विनायक महादेव दांडेकर

विनायक महादेव दांडेकर

विनायक महादेव दांडेकर - (६ जुलै १९२० –३१ ऑगस्ट १९९५ ). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ. जन्म सातारा येथे एका गरीब कुटुंबात. शिक्षण नागपूर, पुणे व कलकत्ता येथे. सांख्यिकीतील कलकत्ता विद्यापीठाची एम्. ए. ही पदवी. १९४५ मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नी सौ. कुमुदिनी याही अर्थशास्त्रज्ञ आहेत. दांडेकर हे पुणे येथील ‘गोखले अर्थशास्त्र संस्थे’चे संचालक आणि लोणावळे येथील ‘इंडियन स्कूल ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’या संस्थेचे संस्थापक–संचालक आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समित्यांवर त्यांनी तज्ञ सल्लागार म्हणून कामगिरी केली आहे. ‘इंडियन सोसायटी ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स’ (१९६७) व ‘इंडियन इकॉनॉमिक असोसिएशन’ (१९७३) या संस्थांच्या अधिवेशनांच्या अध्यक्षपदांचा मानही त्यांना लाभला आहे. आर्थिक विषयावरील संशोधनाबरोबरच अर्थशास्त्र व संख्याशास्त्राचे अध्यापनही ते विद्यापीठ पातळीवरून करतात. मराठी भाषेतून ते प्रभावी वक्तृत्वही करतात.

प्रा. दांडेकर यांनी आर्थिक विषयांवर १५ संशोधनपर ग्रंथ व सु. ९० निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांचा मूळ अभ्यासविषय संख्याशास्त्र हा असल्यामुळे त्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनाला नेमकेपणा व ठामपणा आला आहे. दांडेकरांचे बहुतांशी लेखन इंग्रजीतून झालेले असले, तरी त्यांनी मराठीतूनही महत्त्वाचे लेखन केले आहे. भारतातील दारिद्र्य व गावरहाटी हे त्यांचे प्रमुख अर्थग्रंथ. यांशिवाय अर्थ शास्त्रीय विषयांवर त्यांनी अनेक लेख मराठीतून लिहिले आहेत. शेती, सहकार, अन्नधान्ये, लोकसंख्या, छोटे उद्योगधंदे, भारताची आर्थिक परिस्थिती, शेतीविषयक कायदे इ. त्यांच्या संशोधनपर लेखनाचे विषय होत. सामान्य वाचकाला समजेल असे लेखन सामाजिक शास्त्रज्ञांनी मराठीतून अत्यल्प प्रमाणात केलेले आहे. दांडेकरांचे लेखनही अल्प असले, तरी ते सुबोध आहे. ‘गोमाता की गोधन?’, ‘भारतीय बुद्धिमंतांची निर्यात’, ‘ललाटरी’ (सरकारी सोडती) इ. त्यांचे लेख गाजलेले आहेत.

दांडेकरांची लेखणी स्वभावतःच विवादपटू आहे. उपहास, उपरोध, व्याजोक्ती, ऊनोक्ती यांचा वापर ते त्यांच्या लोकप्रिय लेखनात करतात. त्यामुळे त्यांचे लेखन नुसतेच आक्रमक न होता शैलीदार, आकर्षक व आर्जवीही होते. विवाद्य विषयांवर लिहिताना त्यांची लेखणी विशेष खुलते. सर्वसामान्य वाचकांसाठी लिहिलेल्या त्यांच्या लेखांत शास्त्रीय परिभाषेचा अनावश्यक वापर तर नाहीच, उलट ते लेख सुगम, सोपे व स्पष्ट आहेत. ‘गरिबी हटाव : पण कशी?’, ‘भिक्षापात्र अवलंबिणे’, ‘शेतजमीन धारणेवरील कमाल मर्यादेच्या निमित्ताने’, ‘शेतीस पाणी : पाटाने की उपसा करून?’, ‘सेक्युलॅरिझम : अन्वय आणि अर्थ’,‘पारतंत्र्याचा नवा आविष्कार’, ‘भारतीय शेतीपुढील जुन्या व नव्या समाजवादी समस्या’, ‘भारतीय शेती व नियोजन’ (२६ व्या अखिल भारतीय कृषिअर्थशास्त्र परिषदेतील अध्यक्षीय भाषण), ‘अन्न आणि स्वातंत्र्य’ असे सु. ५४ (भाषांतरित धरून) लेख त्यांनी मराठीतून लिहिले आहेत.पॉव्हर्टी इन इंडिया (सहलेखक : डॉ. नीलकंठ रथ) हा त्यांचा आर्थिक विषयावरील इंग्रजीमधील एक महत्त्वाचा व गाजलेला ग्रंथ. त्याचा मराठी अनुवाद भारतातील दारिद्र्य (१९७३) ह्या शीर्षकाने पुण्याच्या समाज प्रबोधन संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

अल्प राष्ट्रीय उत्पन्न आणि त्याचे विषम विभाजन, विकासाचा मंद वेग व विकासापासून होणाऱ्या मर्यादित फायद्यांचे विषम प्रमाणात वाटप, हे या ग्रंथातील प्रतिपाद्य मुद्दे आहेत. या प्रश्नांची व्याप्ती, त्यांचे वाढते गांभीर्य व त्यांतून निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीवरील उपाय यांची चर्चा या ग्रंथात केलेली आहे. विवाद्य आर्थिक प्रश्नांवर समतोल लेखन करणे हे जबाबदारीचे काम आहे. ते नुसतेच लोकप्रिय किंवा नुसतेच परखड असून चालत नाही. त्याचा विधायक उपयोग होण्यासाठी जो समतोल साधावा लागतो, तो दांडेकरांनी साधला आहे. निर्भयता हेही त्यांच्या लेखनाचे व भूमिकेचे एक वैशिष्ट्य आहे. त्यांची भूमिका केवळ टीकाकाराची नसून समाजशिक्षकाचीही असल्यामुळे तिला एक वेगळे वजन प्राप्त होते.

 

लेखक- बाळ गाडगीळ

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 3/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate