অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गणेशन् शिवाजी

गणेशन् शिवाजी

(१ ऑक्टोबर १९२८–२१ जुलै २००१). तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते. मूळचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या गणेशन्. वयाच्या सोळाव्या वर्षी गणेशन् यांनी छ. शिवाजी महाराजांची वठवलेली अप्रतिम भूमिका पाहून ई. व्ही. रामस्वामी नायकर यांनी त्यांना शिवाजी गणेशन् असे कौतुकाने संबोधले व नंतर याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. शिवाजी गणेशन् यांचा जन्म तमिळनाडूमधील विलुपुरम (जि. दक्षिण अर्काट) ह्या छोट्या गावात एका गरीब परंतु देशभक्त कुटुंबात झाला. त्यांच्या जन्मदिवशीच त्यांच्या वडिलांना अटक झाली होती. स्वातंत्र्यप्रेमाचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. लहानपणापासूनच रंगभूमी व अभिनय यांकडे त्यांचा ओढा होता. कट्टबोम्मन ह्या वीर-नायकाच्या चरित्रावर आधारित नाटकामुळे ते विलक्षण प्रभावित झाले होते. लहानपणी तमिळ रंगभूमीवर त्यांनी लहानसहान पौराणिक भूमिका केल्या. वयाच्या बाराव्या वर्षी नाटकात काम करण्यासाठी त्यांनी घर सोडले आणि गावोगावी जाऊन खेळ करणाऱ्या नाटककंपनीत ते दाखल झाले. तिथे त्यांना चिन्नई पोन्नुस्वामी हे गुरू भेटले. त्यांनी गुरू-शिष्य परंपरेनुसार शिवाजी गणेशन् यांना अभिनयाचे उकृष्ट प्रशिक्षण दिले. नृत्य, गायन, श्लोकपठण, अभिनय हे सर्व त्यांच्याकडून करवून घेतले.

पुढे १९५० साली चित्रपटवितरक पी. ए. पेरुमल ह्यांनी शिवाजी गणेशन् ह्यांना तमिळ चित्रपटसृष्टीत आणले. १९५२ साली प्रदर्शित झालेल्या त्यांच्या पराशक्ती या चित्रपटाने तमिळ चित्रपटांच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. त्यानंतर विविध प्रकारच्या चित्रपटीय भूमिकांचा त्यांच्यावर वर्षाव झाला. १९५२ साली त्यांचा विवाह कमला ह्यांच्याशी झाला. त्यांचा संसार आणि चित्रपटातील कारकीर्द दोहोंचीही सुरुवात तेव्हापासून झाली. पराशक्तीतील त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आणि तमिळ चित्रपटसृष्टीत शिवाजी गणेशन् ह्यांच्या अजोड अभिनयाचे पर्व सुरू झाले. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये वीरपांड्य कट्टबोम्मन, कपलोट्टी तमिळन, ओट्टीवर उरवू, तिल्लाना मोहनाम्बाळ मनोहारा, सरस्वती सबथम, आलेयमणी, तिरबेर पार, मनगेर तिलकम, रंगून राधा, मोटर सुंदरम पिल्लै, थेवर मगन, नानगल चिनै मरुमुगळ्, व्हिएटनाम विड इ. चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिजात अभिनयाचा ठसा जनमानसावर उमटवला. पद्मिनी, बी. सरोजादेवी, पी. भानुमती, सावकार जानकी, के. आर. विजया, सावित्री, देविका इ. अभिनेत्रींबरोबरचे त्यांचे चित्रपट गाजले. ‘नडिगार तिलकम’ म्हणजे ‘कलावंतांचा मुकुटमणी’ हे गौरवास्पद बिरुद रसिकांनी त्यांना बहाल केले. नवरसांचा परिपोष घडवणाऱ्या नवरात्री ह्या चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका सादर केल्या.

त्यांची १९८२ साली राज्यसभेवर नेमणूक झाली.१९८४ साली त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार लाभला. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च बहुमानाचा ‘ दादासाहेब फाळके पुरस्कार’ त्यांना १९९७ मध्ये प्राप्त झाला. संवेदनशील, सरळमार्गी व्यक्तिरेखांच्या त्याचप्रमाणे प्रामाणिक एकनिष्ठ सेवकाच्या तसेच जिवलग मित्राच्या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. ऐतिहासिक-पौराणिक व्यक्तिरेखा त्यांच्या अभिनयसामर्थ्याच्या निदर्शक आहेत. त्यांच्या तेजस्वी चित्रपटीय कारकीर्दीचे भागीदार म्हणून दिग्दर्शक बी. आर. पंथलु, भीम सिंग, संगीतकार एम. एस. विश्वनाथन, सुप्रसिध्द गीतलेखक कन्नदासन, संवादलेखक एम. करुणानिधी इत्यादींचा उल्लेख करावा लागेल.

सांस्कृतिक राजदूत म्हणून १९६२ साली त्यांना अमेरिकेत बोलवण्यात आले. त्यांचा देव मगन हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी सुचविण्यात आला होता. शिवाजी गणेशन यांनी २४७ हून अधिक चित्रपटांतून भूमिका केल्या. खाजगी जीवनात मात्र एक साधा माणूस म्हणूनच ते ओळखले जात.

मिळ चित्रपटांतील दिमाखदार कारकीर्द सांभाळून आपल्या शिवाजी नाटक मंडळीतर्फे उत्कृष्ट तमिळ नाटके सादर करण्याची परंपरा त्यांनी जपली. कलांचे आश्रयदाते तसेच समाजबांधवांच्या उत्कर्षासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणून शिवाजी गणेशन यांचा लौकिक होता.

ते फक्त अभिनय करत नसून भूमिका जगतात’, असा सार्थ गौरवोद्गार त्यांच्याबद्दल काढला जातो. दिग्दर्शकांच्या सर्व सूचना पाळणारे ते विनम्र कलाकार आहेत. महान कलावंत, प्रेमळ मित्र, जबाबदार व्यावसायिक आणि कौटुंबिक परिवारात रमणारे मातृभक्त अशी त्यांची विविध रूपे होती. तमिळ चित्रपट तथा रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. चेन्नई येथे त्यांचे निधन झाले.


लेखक : सुलभा तेरणीकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate