অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अझोर्स

अझोर्स

अझोर्स

उत्तर अटलांटिक महासागरातील द्वीपसमूह. क्षेत्रफळ २,३३५ चौ. किमी; लोकसंख्या २,९१,००० (१९७०). पोर्तुगालच्या पश्चिमेस सु. १,२०० किमी. अंतरावरील बेटे. ३६ ५०’ उ. ते ३९ ४४’ उ. व २५ प. ते ३१ १६’ प. यांमध्ये ही बेटे दक्षिणोत्तर २०९ किमी. व पूर्वपश्चिम ४८२ किमी. पसरलेली आहेत.

या द्वीपसमूहात एकूण नऊ प्रमुख बेटे असून ती निसर्गतःच तीन गटांत विभागली गेली आहेत. तर्सेईरा, ग्रस्योझा, पीकू, फयाल व सेंट जॉर्ज ही मध्यवर्ती असून सेंट मायकेल व सेंट मेरी ही आग्नेयीस तर कोर्व्हू व फ्लोरेस ही बेटे वायव्येस आहेत. ही बेटे ज्वालामुखीक्रियेने बनलेली असून ती अटलांटिक महासागराच्या अटलांटिक रिज् या सागरी डोंगररांगेच्या पाण्याबाहेर आलेल्या भागांपैकी आहेत. १५२२ मध्ये झालेल्या भूकंपाने सेंट मायकेलची राजधानी गडप झाली होती. १९२६ मध्येही भूकंपाचा धक्का जाणवला होता. सर्व बेटे डोंगरकड्यांनी युक्त असून सेंट मेरी बेट सोडल्यास सर्वत्र लाव्हा रसापासून बनलेल्या टेकड्या, औषधी पाण्याचे झरे, गेशर्स, सरोवरे इ. आढळतात. किनाऱ्‍यालगतचा भाग उभ्या चढणीचा व दुर्गम आहे. पीकू आल्टो शिखर ३,०१९ मी. उंच आहे.

झोर्सचे हवामान समशीतोष्ण असून पावसाचे प्रमाण विशेष नाही. हिवाळ्यात वादळे व नौकानयन धोक्याचे असते. शेवाळे, गवत व खुरटी झुडपे ह्या येथील वनस्पती; परंतु एकोणिसाव्या शतकापासून निलगिरी, ताड, एल्म, बोर्दोपाइन, पॉपलर, चेस्टनट इत्यादींची लागवड केलेली आहे. शेती हा प्रमुख धंदा; त्यात फळबागांचे प्रमाण अधिक असून अननस, केळी, संत्री, सफरचंद, अंजीर, मेडलर, जर्दाळू, द्राक्षे या फळांची निर्मिती होते. शेतीप्रमाणेच मासेमारी, दूधदुभते, हस्तकला व भरतकाम हेही व्यवसाय येथे चालतात. हस्तकलावस्तू, डबाबंद अननस, मासे, दारू व स्पर्मऑईल (स्पर्म माशाचे तेल) या वस्तू येथून निर्यात होतात; तर कापड, कोळसा, यंत्रे, मोटारी व पेट्रोलियम यांची आयात केली जाते. पूर्वी पोर्तुगालशीच व्यापार चाले. पण आज इंग्लंड, अमेरिका, पश्चिम जर्मनी यांच्याशीही अझोर्सचा व्यापार चालतो.

चौदाव्या शतकापासून या बेटांचे अस्तित्व इटालियन नकाशावर दर्शविलेले दिसते. द्योगो द सिल्व्हस याने १४२७ मध्ये यांचा शोध लावला. १४३२ पासून पोर्तुगालने येथे वसाहत सुरू केली. फ्लेमिश लोकांनी या चुकीच्या बातमीमुळे काही काळ या बेटांना ‘फ्लेमिंग बेटे’ असेही संबोधले जात असे. १५८० ते १६४० दरम्यान ही बेटे स्पेनच्या ताब्यात होती. सध्या ही बेटे पाँता देल्गादा, अँग्रा दू ईरू-ईझ्मू व हॉर्ता असे पोर्तुगालचे तीन प्रांत म्हणून ओळखली जातात. ही बेटे वेस्ट इंडीजच्या सागरी मार्गावर असल्यामुळे त्यांना पूर्वीपासूनच महत्त्व मिळाले. यूरोप-अमेरिका यांना जोडणारी केबल या बेटांवरून जाते. लिस्बनशी टपाल व मालवाहतूक नियमितपणे चालू आहे. १९३९ पासून हवाई वाहतूकही सुरू आहे. दोन्ही महायुद्धांत दोस्तांचे विमाळतळ या बेटांवर होते व आजही लाझिश व तर्सेईरा येथे महत्त्वाचे लष्करी विमानतळ आहेत.

 

डिसूझा, आ. रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate