অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अडसर राज्य

अडसर राज्य

अडसर राज्य

(बफर स्टेट). भौगोलिक दृष्ट्या दोन प्रबळ शत्रुराष्ट्रांच्या मध्ये असलेले निर्बल, छोटे आणि स्वायत्त वा स्वतंत्र राज्य. हे इंग्रजीमध्ये बफर स्टेट या संज्ञेने ओळखले जाते.

बोटी धक्क्यास लागताना त्यांचा आघात सहन व्हावा, म्हणून रबराच्या कड्या वा दोरखंडाची वेटोळी धक्क्यावर टांगून ठेवीत, तीच कल्पना अशी आघातशोषक अडसर राज्ये पूर्वी निर्माण करण्यात व टिकविण्यात होती. साधारणत: दोन बलवत्तर राज्यांच्या सीमा एकमेकींस भिडलेल्या असल्यास संघर्ष होण्याचा संभव असे तो टाळण्याकरिता अशा राज्यांची पूर्वी आवश्यकता असे.

अडसर राज्यांचा मूळ हेतू लगतच्या प्रबळ राज्याकडून होणाऱ्‍या आकस्मिक आक्रमणास तात्कालिक अडसर घालणे हा होता; कारण शत्रूस प्रथम या छोट्या राज्याच्या प्रदेशातून जावे लागे. अशा अडसर राज्यांना दोन्ही प्रबळ शेजाऱ्‍यांकडून संरक्षणाची हमी असे.

पहिल्या महायुद्धात फ्रान्सला जर्मनीविरूद्ध बेल्जियमचा असा उपयोग झाला. अडसर राज्यांची काही ठळक उदाहरणे : जर्मनी व फ्रान्स यांमधील बेल्जियम व हॉलंड; जर्मनी व ऑस्ट्रिया यांमधील चेकोस्लोव्हाकिया; दुसऱ्‍या महायुद्धापूर्वी हिंदुस्थान व रशिया यांमधील अफगाणिस्तान; चीन व हिंदुस्थान यांमधील भूतान आणि ब्रिटिशांकित मलाया व फ्रेंचांकित इंडोचायना यामधील थायलंड.

ज्या काळात सैन्याच्या हालचाली पायदळ व घोडदळ ह्यांनी मर्यादित होत्या, त्या काळात अशा राज्यांना अनन्यसाधारण महत्त्व असे. परंतु आधुनिक युगातील युद्धपद्धतीच्या यांत्रिकीकरणाबरोबर विमाने, प्रक्षेपणास्त्रे, आदींच्या वापरामुळे अशा राज्यांना आता अर्थ उरलेला नाही. त्यामुळे एकोणिसाव्या शतकातील अडसर राज्य विसाव्या शतकात अंकित राष्ट्राची जागा घेऊ पहात आहे.


शहाणे, मो. ज्ञा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate