অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

नैर्ऋत आशियातील भूमिवेष्टित देश. लोकसंख्या अंदाजे १,७५,००,००० (१९७१). क्षेत्रफळ ६,५०,००० चौ. किमी. उ. अक्षांश २९० ते ३८० ३५’ व पू. रेखांश ६०० ५०’ ते ७१० ५०’. ईशान्येकडील वाखानचा अरुंद पट्टा ७५० पू. रेखांशापर्यंत आहे. देशाच्या उत्तरेस रशिया, ईशान्येस चीन, पूर्वेस भारत व पाकिस्तान, दक्षिणेस पाकिस्तान व पश्चिमेस इराण हे देश आहेत. अफगाणिस्तानची पूर्वपश्चिम लांबी सु. १२४० किमी. व दक्षिणोत्तर लांबी सु. ५६० किमी. आहे.

भूवर्णन

हा देश पर्वतमय असून त्याची समुद्रसपाटीपासूनची सर्वसाधारण उंची १,२२० मी. आहे. येथील हिंदुकुशाची सुरुवात वाखानमधील छोटे पामीर येथून होते. ७,३०० मी. पासून उंचीने कमी होत होत हा पर्वत नैर्ऋकडे ९६० किमी. पर्यंत पसरत जातो. कोह-ई-बाबा (५,१५० मी.), बंद-ई-बायान (३,७४९ मी.), सफेद कोह (३,१७० मी.) व पारोपामिसस (३,५९६ मी.) ही त्याच्या रांगांची नावे होत. मध्यवर्ती डोंगराळ भागाला हजाराजात म्हणतात. तेथून भूभाग व नद्या ईशान्येशिवाय सर्व बाजूंनी उतरत जातात. देशाच्या दक्षिणेस दश्त-इ-मार्गो व रेगिस्तान आणि नैर्ऋत्येस खाश हे ओसाड प्रदेश आहेत.

हेलमंड ही येथील सर्वांत मोठी नदी.

हजाराजातहून दक्षिणेकडे वाहत जाऊन तेथील रुक्ष प्रदेशाचे ती दश्त-इ-मार्गो व रेगिस्तान असे दोन भाग करते आणि नंतर पश्चिमेकडील सेस्तानमधील अंतर्गत खोलगट प्रदेशातील दलदलीकडे जाते. रेगिस्तानच्या उत्तरेकडील अनेक नद्यांचे पाणी घेऊन येणारी अर्घंदाब ही हेलमंडची प्रमुख उपनदी आहे.

हजाराजातहून खाश रूद व फरह रूद या नद्या नैर्ऋत्येकडे, हरी रूद पश्चिमेकडे, मुर्घाब वायव्येकडे, कुंडुझ उत्तरेकडे, कोकचा ईशान्येकडे व काबूल नदी पूर्वेकडे वाहते. लोगर, पंजशीर व कुनार या काबूलच्या उपनद्या होत. काबूलप्रमाणेच कुर्रम, टोची, गुमल याही पूर्वेकडे वाहत जाऊन पाकिस्तानात सिंधूला मिळतात. त्यांनी तयार केलेल्या खैबर, कुर्रम, टोची व गुमल या खिंडींतून पाकिस्तानात उतरता येते.

मध्य आशियातील अमुदर्याच्या उगमाकडील काही प्रवाह अफगाणिस्तानातून येतात. हिचा ५६० किमी. चा भाग व तिच्या उगमाकडील प्रवाह असलेल्या पांज व पामीर या उपनद्या रशिया व अफगाणिस्तान या देशांमधील सरहद्दीवरच आहेत. अफगाणिस्तानच्या पश्चिम सरहद्दीवर नमकसार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. आग्नेयीस सेस्तान किंवा हामून-इ-हेलमंड व गौड-इ-झीरे ही सरोवरे आहेत. हजाराजातमध्ये दश्त-इ-नाबर व आब-इ-इस्ताद ही सरोवरे आहेत.

दीर्घ व कडक उन्हाळा आणि अतिशीत हिवाळा हे येथील हवामानाचे खास वैशिष्ट्य. रात्रीच्या व दिवसाच्या तपमानात बराच फरक असतो. उन्हाळ्यात सेस्तान व उत्तरेकडील अमुदर्या नदीच्या सखल (४५० मी.) प्रदेशात पारा ५३.३० से. इतका चढतो. त्यातच ताशी २०० किमी. वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळाने उन्हाळा असह्य होतो. उंच पठारावर असल्याने काबूल-जलालाबाद भागाचे तपमान मात्र ३२० से. पेक्षा क्वचितच वर जाते.

हिवाळ्यात काही ठिकाणी पारा -१८० से. पर्यंत तर हिंदुकुशाच्या भागात तो -२६० से. इतका उतरतो. उत्तरेकडून व पश्चिमेकडून झोंबणारे थंड वारे वाहतात. १,५५० मी. पेक्षा जास्त उंचीच्या प्रदेशात हिमवृष्टी होते. ९३० ते १,२४० मी. उंचीपर्यंतच्या प्रदेशात हिवाळा सुखकारक असतो. पाऊस मुख्यत: हिवाळ्यात व वसंत ऋतूत येतो. मध्यवर्ती उंच भागात तो २५ ते ३० सेंमी., बराचसा हिमरूपाने, तर दक्षिणेकडील वैराण प्रदेशात ५ सेंमी. पर्यंत पडतो.

येथील जमीन निरनिराळ्या प्रकारची आहे. पर्वतमय प्रदेशातील दऱ्याखोऱ्यांमधील रेताडचिकणमातीची, पूर्वेकडील काळीभोर, हिंदुकुशाच्या दक्षिणेकडील क्षारयुक्त व उत्तरेकडील मुख्यत: रेताड व लुकण मातीची आहे.

येथे खनिज संपत्ती विपुल व विविध प्रकारची आहे. परंतु भौगोलिक अलगपणा, दळणवळणाची अपुरी साधने, निर्यातीची कमी शक्यता व औद्योगिक मागासलेपणा यांमुळे केवळ स्थानिक गरजेपुरताच हिचा वापर केला जात आहे. शिसे, लोखंड, तांबे, क्रोमियम, जस्त या धातूंच्या खनिजांचे व सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम क्लोरेट, बेरिलियम, क्रोमाइट, गंधक, अभ्रक, अ‍ॅस्बेस्टस, भांड्यांची माती व संगमरवर यांचे साठे हिंदुकुशाच्या उत्तरेला, काबूलनजीक आणि कंदाहारच्या उत्तरेला असल्याचे आढळले आहे.

बामियानच्या उत्तरेला हिंदुकुशामध्ये कारकर व इशपुश्त या ठिकाणी दगडी कोळशांच्या खाणी आहेत. दार-इ-सुफ येथे कोळशाचे विपुल साठे आहेत; परंतु तेथे अद्यापि उत्पादन होत नाही. तालिकन येथील सैंधवाच्या खाणींतून व निरनिराळ्या ठिकाणच्या खाऱ्या पाण्याच्या झऱ्यांपासून मिठाचे उत्पादन होते.

अफगाणिस्तानमध्ये पेट्रोलियमचे भरपूर साठे दिसून आले आहेत. मझर-इ-शरीफ प्रांतातील सार-इ-पूल येथे तेलाच्या दोन विहिरी सापडल्या आहेत. अमुदर्या नदीच्या गाळात सोने सापडते; कंदाहार प्रांतात सोने आणि हजाराजात व पंजशिर भागात चांदीचे साठे सापडले आहेत. परंतु आर्थिक दृष्ट्या ते किफायतशीर नाहीत. बदखशान प्रांतात नीलमणी पुरातन काळापासून काढले जातात.

उंचीप्रमाणे मैदानी प्रदेशातील स्टेप्स प्रकारच्या गवतापासून उंच पर्वतीय भागातील अल्पाईन कुरणांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गवत आढळते. देवदार, चीड, स्प्रूस, पाईन, ज्युनिपर, यू, हॅझल, अक्रोड, बदाम, पिस्ता, ऑलिव्ह, तुती, गूजबेरी, जर्दाळू, विलो, पॉप्लर, अ‍ॅश ही झाडे आढळतात. अनेक प्रकारचे गुलाब, रंगीबेरंगी फुलांच्या वेली, तसेच लिंबू, द्राक्षे इत्यादींमुळे प्रदेश शोभिवंत दिसतो. सतापा, मंजिष्ठ इ. औषधी वनस्पतीही होतात. रुक्ष भागात अकेशिया, बोरी, बाभळी, तसेच हिंग देणारी झाडे आढळतात. भूछत्र व तत्सम वनस्पती खाण्या-साठीही वापरतात. अरण्ये फक्त पूर्वेकडील नुरिस्तानमध्ये व सफेदकोहच्या भागात आहेत.

लांडगा, कोल्हा, तरस, रानटी कुत्रा, रानमांजर, चित्ता, रानमेंढी, रानबोकड, मुंगुस, चिचुंद्री, जर्बोआ, अनेक प्रकारचे ससे इ. प्राणी येथे आहेत. अरण्यात अस्वल व अमुदर्याच्या भागात मंगोलियन वाघही आहेत. महोका, हंस, बदक, काणुक, पाणकोळी, कुनाल, तितर, हळदी, मॅगपाय, बुलबुल, लावा, भांडक, चिमणी इ. पक्षी आढळतात. मासे विशेष महत्त्वाचे नाहीत; तथापि माहसीर, ट्राउट इ. प्रकार आढळतात.

दिवाकर, प्र. वि.

इतिहास

इ.स.पू. ४००० च्या सुमारास हिंदुकुशाच्या उत्तरेस शेतकऱ्यांची वस्ती होती असे पुरातत्त्वशास्त्रज्ञांचे मत आहे. इ.स.पू. २००० च्या सुमारास आर्यांच्या एका शाखेने बाल्ख येथे वस्ती केली व दुसऱ्या शाखा इराण व सिंधू खोऱ्याकडे गेल्या. वैदिक वाङ्मयात अफगाणिस्तानबाबत बरेच उल्लेख आढळतात.

ऋग्वेदात ‘पक्थ’ या जमातीचा जो निर्देश आहे तो पठाणांचा असावा. या देशास ‘कापिषी’ व तेथे होणाऱ्या मद्यास ‘कापिषायनी’ असे पाणिनीने म्हटले आहे. काबूलच्या उत्तरेस ८० किमी. वर असलेले वेग्राम हेच प्राचीन कापिषी नगर असावे, असे तेथील शिलालेखावरून दिसते. प्राचीन ग्रीक व रोमन भूगोलवेत्ते यास‘कापिसेन’ म्हणत. ह्युएनत्संग हा यास किआ-पिशे नाव देतो. ग्रीक भूगोलवेत्ता स्ट्रेबो अफगाणिस्तानला‘अरियाना’ असे म्हणतो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate