অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्जिअर्स

अल्जिअर्स

अल्जिअर्स

: अल्जीरिया देशाची राजधानी. अक्षांश २६० ४७' उ. रेखांश ३०४' पू. लोकसंख्या १८,३९,००० (१९७०). हे आफ्रिकेच्या उत्तरेस भूमध्यसमुद्र-किनाऱ्यावर, किनाऱ्याशी समांतर असलेल्या पूर्वपश्चिम साहेल टेकड्यांच्या उतारावर वसलेले उत्कृष्ट बंदर आहे. येथील सरासरी तपमान १८० से. व मुख्यतः हिवाळ्यात पडणारा पाऊस ६८ सेंमी. आहे. हे फिनिशियनांनी स्थापिले. रोमनांनी वापरले व त्यांच्या पाडावानंतर नष्ट झाले.‘ आयकोसिम’ हे त्याचे पूर्वीचे नाव होय. ते दहाव्या शतकात मूर लोकांनी पुनः वसविले, तुर्कांच्या अमलाखाली वाढले व बर्बर चाचे लोकांचे आश्रयस्थान बनले. तुर्की अमदानीत खैर एद्दिन याने १५२९ मध्ये त्या वेळच्या मुख्य शहरापासून‘ पेनान’ किंवा‘ अल्‌ जाझिरा’ या लहानशा बेटापर्यंत धक्का बांधून गलबतांवर माल चढविण्या-उतरविण्याची सोय केली. हल्ली या बेटावर एक दीपस्तंभ आहे. १८३० मध्ये हे फ्रेंचांनी घेतले. जुन्या गावात कसबा हा बालेकिल्ला असून बंदराची अत्याधुनिक पद्धतीने सुधारणा झालेली आहे. दुसऱ्या महायुद्धात दोस्तांच्या सैन्याचे व आरमाराचे हे एक महत्त्वाचे केंद्र होते. १९६२ मध्ये अल्जीरिया स्वतंत्र झाला; तत्पूर्वी फ्रेंच दहशतवाद्यांनी या शहराची फार नासधूस केली. अल्जिअर्समधून मद्य, फळे, लोहधातुक, फॉस्फेट, ऑलिव्ह, बटाटे, भाजीपाला इ. निर्यात होतात; वाहने, पेट्रोलियमच्या वस्तू, गहू, सुती कापड, कॉफी, साखर इ. आयात होतात. येथे सिमेंट व धातुकामाचे उद्योग, अत्तरे, तंबाखू, आटा इत्यादींचे कारखाने असून मच्छीमारी व पर्यटण यांकरिता शहराची प्रसिद्धी आहे. दळणवळणाचे हे प्रमुख केंद्र असून देशाचे व्यापारी व सांस्कृतिक केंद्र समजले जाते. अल्जिअर्स विद्यापीठ, त्याची इस्लामी अभ्यासशाखा व आण्विक संशोधन-संस्था, तसेच पाश्चर इन्स्टिट्यूट, प्राचीन राष्ट्रीय ग्रंथालय, वेधशाळा, सूर्याच्या उष्णतेपासून ३,३१५० से. तपमान निर्माण करणारी सौरभट्टी, प्राचीन मशिदी, राजवाडे, आधुनिक उंच उंच इमारती इ. नव्याजुन्या गोष्टींचे मजेदार मिश्रण येथे पाहावयास मिळते.

 

कुमठेकर, ज. ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate