অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अल्जीरिया

अल्जीरिया

आकारमानाने आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्र. क्षेत्रफळ २३,८१,७४३ चौ. किमी. लोकसंख्या १,३५,४७,००० (१९७०). विस्तार दक्षिणोत्तर अंदाजे २,०९२ किमी. म्हणजे १९° ते ३७° उ. अक्षांश व पूर्वपश्चिम अंदाजे २,४१४ किमी. म्हणजे ८°३०' प. ते १२°२०' पू. रेखांश. देशाला उत्तरेकडे सु. १,०४६ किमी. लांब भूमध्यसागराची किनारपट्टी असून पूर्वेकडे ट्युनिशिया व लिबिया, पश्चिमेकडे मोरोक्को व दक्षिणेकडे नायजर, माली, मॉरिटेनिया व स्पॅनिश सहारा हे देश आहे.

भूवर्णन

अल्जीरियाचे दोन स्पष्ट भाग पडतात : उत्तरेकडील अ‍ॅटलास पर्वताचा व दक्षिणेकडील विस्तीर्ण सहारा मरुभूमीचा. अ‍ॅटलासच्या रांगा किनाऱ्याला समांतर आहेत. त्यांत उत्तरेकडील टेल अ‍ॅटलास व त्याच्या शाखा आणि दक्षिणेकडील सहारा अ‍ॅटलास यांच्यामध्ये सु. १,००० मी. उंचीचा पठारी प्रदेश असून त्यात शॉट अ‍ॅश शर्गी, शॉट एल् गार्बी इ. अनेक खारी सरोवरे (प्लाया) आहेत. ती उन्हाळ्यात जवळजवळ कोरडीच. हा अंतर्देशीय जलोत्सारणाचा प्रदेश आहे. उत्तरेकडील टेल अ‍ॅटलासच्या दोन रांगा असून त्यांची जास्तीत जास्त उंची २,३०८ मी. आहे. यांचे दक्षिणोत्तर फाटे सागरतटापर्यंत गेलेले असून त्यांच्या दरम्यान अल्जिअर्सजवळ मीतीजा मैदानासारखे सुपीक मैदानी प्रदेश आहेत. येथेच बहुतेक शेतीची जमीन व ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकवस्ती आहे. सागरतट बहुधा खडकाळ असून त्यावर सोयीस्कर बंदरे थोडीच आहेत. सहारान अ‍ॅटलास हा तुटक तुटक रांगांचा बनलेला असून त्याचे सर्वोच्च शिखर जेबेल चेलिया (सु. २,३३० मी.) ईशान्य भागात आहे. याच्या भोवतीचा प्रदेश उंच पर्वतशिखरे आणि खोल दऱ्‍या ह्यांनी युक्त आहे. सहारा मरुभूमीत अहॅग्गर व टूरॉक पठारांसारख्या स्फटिक-खडकांच्या प्रदेशात अनेक निद्रिस्त ज्वालामुखी आहेत. शेष मरुभूमीत स्थानांतरणशील वाळूच्या टेकड्या व ‘वाड्या’आहेत. अल्जीरियातील मुख्य नदी शेलीफ (६९० किमी.) व आणखी काही नद्या पठारी भागात उगम पावून पर्वतातून वाट काढून भूमध्यसमुद्राला जाऊन मिळतात. त्यांना फक्त हिवाळ्यातच भरपूर पाणी असते. उन्हाळ्यात त्या जवळजवळ कोरड्या पडतात. सहारातील नद्या स्वल्पायू व आंतरवाहिनी आहेत. पावसाचे दुर्भिक्ष्य आणि सच्छिद्र खडक यांमुळे पृष्ठभागावरून वाहणारे प्रवाह क्वचितच दिसतात. चुनखडकांच्या पठारी भागात काही ठिकाणी पृष्ठभागाखालील थरात पाणी आढळते.

अल्जीरिया खनिजसंपन्न असून फॉस्फरसविरहित लोखंड हे टेल व टींडूफ भागात, फॉस्फेट हे तेबेस पर्वत व इतरत्र आणि तेलखाणी एदजेले, हासी मसाउद, इलगासी, एनजेफ्त व मसीला येथे आहेत. नैसर्गिक वायूचेही प्रचंड साठे सापडले आहेत. याशिवाय शिसे, जास्त, तांबे, पारा, चांदी, अँटिमनी यांची खनिजे व संगमवरी दगड येथे सापडतात.

भूमध्यसागरी हवामान असलेल्या उत्तर तटावर उन्हाळ्यात २६·७° से. व हिवाळ्यात १०°-१२° से. तपमान असते. अंतर्भागात हीच सरासरी अनुक्रमे २६·७° से. व ३·९° से. ते ६·१° से. आहे. पूर्वपश्चिम पसरलेल्या अ‍ॅटलास पर्वतामुळे भूमध्यसागरी हवामान अल्जीरियाच्या उत्तर भागापुरतेच मर्यादित राहते. अ‍ॅटलासच्या दक्षिणेकडिल सहारा प्रदेश अत्यंत विषम हवामानाचा आहे. तेथे दिवसाचे कमाल तपमान ५७·७°से. असले तरी वाळूचे तपमान ७६·६° से. पर्यंत असते. रात्र त्या मानाने खूपच थंड असते. हवेतील आर्द्रतेमुळे उन्हाळ्यातसुद्धा रात्री दव पडते. भूमध्यसागरावरील आवर्तापासून हिवाळ्यात पाऊस मिळतो. तटवर्ती भागात पाऊस जास्त पडतो व दक्षिणेकडे कमी कमी होतो. किनाऱ्यावरील अल्जिअर्स व बोन शहरांदरम्यान ७६·२ सेंमी. पेक्षा अधिक व अ‍ॅटलासच्या दक्षिणेकडील बिस्क्रा येथे १७·८ सेंमी. वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे. सहारामध्ये पाऊस जवळजवळ नाहीच. क्वचित पडणाऱ्या जोरदार पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात माती वाहून जात असल्यामुळे एक समस्याच निर्माण झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला धुळीच्या ‘सिरोको’ उष्ण वाऱ्यांमुळे सहारासद‍ृश उष्णता व शुष्कता निर्माण होते.

येथील नैसर्गिक वनस्पती आफ्रिका खंडातील वनस्पतींपेक्षा वेगळ्या प्रकारच्या व यूरोपातील वनस्पतींना जवळच्या आहेत. वनस्पती प्रामुख्याने जलाभावसहिष्णू असून बुचाची झाडे व सदाहरित ओक वेगवेगळ्या उंचीवर व पावसाच्या भागांत सापडतात. याशिवाय ऑलिव्ह, अलेप्पो पाइन, सीडार, आरगन, थूया, ज्यूनिपर, देवदार, माकी झुडुपे, पठारावर अल्फाल्फा गवत व सरोवरांच्या भागात क्षारप्रिय वनस्पती उगवतात. मरुभूमीत मरुज वनस्पती विरळ असल्या, तरी येथील खजूर वृक्ष लोकांचा जीवनाधार आहे. येथील हत्ती, वाघ व सिंह लुप्त झाले असून अस्वल, लांडगा, ससा, कोल्हा, माकड, डुक्कर, हरिण, तरस हे प्राणी, तसेच स्‍नाइप, प्लोव्हर, करकोचा, गरुड, गिधाड, ससाणा हे पक्षी व यूरोपीय माशांच्या जाती येथे सापडतात. प्राणी बहुविध असले तरी विरळच आहेत.

इतिहास

अल्जीरियाचा इतिहास म्हणजे क्रमाक्रमाचे कार्थेजियन, रोमन, बायझंटिन, व्हँडॉल, अरब, तुर्क व फ्रेंचांच्या आक्रमणांचा इतिहास आहे. इ.स.पू. बाराव्या शतकातील फिनिशियन आधिपत्यापासून हा इतिहास सुरू होतो. इ.स.पू. आठव्या शतकात कार्थेजची सत्ता आली त्यामुळे प्यूनिक भाषा व संस्कृतीचा परिणाम झाला. इ.स.पू. १४६ मध्ये रोमची अधिसत्ता सुरू झाली. त्यांनी रोमनांची आवक वाढवून आदिवासींशी लग्ने केली आणि आपली वस्ती द‌ृढमूल केली. सु. ४०० वर्षांच्या रोमन काळात संपन्न शहरे, चांगले रस्ते, उत्कृष्ट साहित्य व कृषिविकास झाला. तथापि संपूर्ण अर्वाचीन अल्जीरियावर त्यांचे आधिपत्य नव्हते. दुसऱ्या शतकानंतर व्हँडॉल व त्यानंतर अल्पकाळ टिकलेल्या बायझंटिन साम्राज्यानंतर सातव्या शतकात अरबांचे आक्रमण झाले. त्यांच्यातील हिलाल व सालीम जातींनी शक्तीने व हिंसेने इस्लाम धर्म व अरबी भाषा यांचा येथे प्रसार केला. अरबांच्या अल्मोराविद व आल्‌मोहद या राजवंशांची कारकीर्द महत्त्वाची झाली; परंतु पुढे आपसातील भांडणामुळे हे साम्राज्य शक्तिहीन झाले व याची परिणती अराजकता पसरण्यात झाली. सोळाव्या शतकात स्पेन, पोर्तुगाल व तुर्कस्तान यांच्यात साम्राज्यस्थापनेसाठी चुरस सुरू झाली. १५०९ व १५१० मध्ये ओरान व अल्जिअर्स अनुक्रमे स्पेनच्या व पोर्तुगालच्या ताब्यात गेल्यामुळे अल्जीरियनांनी तुर्कस्तानची मदत घेतली, पण याचे पर्यवसान पारतंत्र्यात झाले. अल्जीरिया तुर्कस्तानचे मदत घेतली, पण याचे पर्यवसान पारतंत्र्यात झाले. अल्जीरिया तुर्कस्तानचे मांडलिक बनले व त्याला तुर्कस्तानला कर द्यावे लागले. याच्या मोबदल्यात तुर्कस्तानच्या सुलतानाने येथील प्रमुखाला ‘बेलीरबे’ ही उपाधी बहाल केली. याच काळात पेनान बेटाचा मुख्य भूमीशी संपर्क साधून आधुनिक अल्जियर्स बंदराची निर्मिती झाली. हे बंदर १८३० पर्यंत मुस्लिमांचे शक्तिशाली केंद्र होते. या काळात तुर्कस्तानच्या जुलमी शासनापासून स्वातंत्र्य मिळविण्याचे लोकांनी प्रयत्न केले. येथे असलेले तुर्कस्तानातील सैनिक हे खरे शासक असून त्यांनी देशाला बर्बर या समुद्री डाकू व ठगांचे केंद्र केले. हे बर्बर-टोळीवाले भूमध्यसमुद्रातून जा-ये करणाऱ्या ब्रिटिश, स्पॅनिश, फ्रेंच व इतर जहाजांना हैराण करीत. या चाचेगिरीवर उपाय म्हणून ब्रिटन व स्पेन ह्यांनी अल्जीरियावर आक्रमणे केली. परंतु ती असफल झाली. फ्रान्सने जून १८३० मध्ये ३७ हजार सैनिक आणून अवघ्या २१ दिवसांत अल्जीरियाचा कब्जा घेतला. अहमद बे व अबुल कादिर यांच्या नेतृत्वाखाली बराच काळ लढा चालल्यानंतर शेवटी १८४८ मध्ये समस्त देशावर आधिपत्य स्थापण्यात फ्रान्सला यश आले. फ्रेंचांनी येथे वसाहती करण्यास सुरुवात केली. १८५० ते ७१ पर्यंत काही कबायली लोकांनी व १८८१ आणि १९०१ मध्ये ओरान विभागातील लोकांनी फ्रेंचांविरुद्ध उठाव केला. परंतु तो टिकला नाही. या काळात फ्रेंचांनी अल्जीरियाच्या आर्थिक विकासाचे खूप प्रयत्न केले. पहिल्या महायुद्धात स्वातंत्र्याच्या हक्काची कल्पना उदयास आली व ती अमीर खालंदच्या १९२१ सालच्या स्वातंत्र्याच्या घोषणेत प्रगट झाली. अल्जीरियन राष्ट्रवादाच्या पुरस्काराला मेस्साली हाजची कामगार-संघटना, फेरहत अब्बास व फ्रेंच उदारमतवाद्यांच्या मागची जनशक्ती व उलेमांची संघटना ह्या तीन शक्तींची साथ होती. मेस्साली हाजच्या नेतृत्वाखाली १९२५ मध्ये स्वातंत्र्यासाठी राजकीय पक्षाची स्थापना झाली. या पक्षाने निरनिराळ्या नावांखाली विद्यार्थी-व कामगारसंघटना उभारल्या. शासनाकडून यांवर बंदी घालण्यात आल्यानंतर सैनिकी धर्तीवर कार्य करण्यात आले. १९३६ साली फेरहत अब्बासने दुसरा पक्ष स्थापला. दुसऱ्या महायुद्ध-काळात ब्रिटिश व अमेरिकन सैनिकांचे येथे तळ होते. द गॉलने अल्जिअर्स ही काही काळ फ्रेंच निर्वासित सरकारची राजधानी केली होती. महायुद्धानंतर लोकांनी पुन्हा स्वातंत्र्याची मागणी केली. १९४५ साली झालेल्या उठावाचा पराभव झाला. १९४६ साली दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण होऊन या संयुक्त पक्षाने त्याच वर्षी राष्ट्रीय सभेसाठी झालेल्या निवडणुकीत १५ पैकी ५ जागा जिंकल्या. १९४७ साली फ्रेंचांना व मुसलमानांना समान अधिकार मिळाले, तरी स्वातंत्र्यसंग्राम चालूच होता. १९५० साली पोलिसांकरवी पक्षांना दडपून टाकण्यात आले. १९४७ साली बेनबेलाच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याच्या उद्देशाने गुप्त संघटना उभारण्यात आली होती; १९५० साली तिलाही दडपण्यात आले. यानंतरच्या काळात बरेच नेते कैरोला गेले व तेथे त्यांनी प्रतिसरकारची स्थापना केली. देशात नवयुवकांनी राष्ट्रीय मुक्ती आघाडी पक्ष स्थापन केला. मेस्साली हाजशिवाय सर्वजण या पक्षाला मिळाले. या मुक्ती आघाडीने गनिमी युद्ध पुकारले. १९५४ साली अल्जीरियात उठाव झाला; परंतु तो दडपण्यात आला. १९५७ मध्ये अल्जीरियाच्या पाच नेत्यांना अटक झाली म्हणून पुन्हा उठाव झाला. १९५८ साली कैरो येथे स्वतंत्र अल्जीरियन सरकार स्थापन झाले. १९६१ मधील स्वयंनिर्णयाच्या प्रश्नाबाबत जनमतकौलात स्वातंत्र्यास अनुकूल मत स्पष्ट झाले असले तरी फ्रेंच लोकांच्या गुप्त संघटनांकडून घातपाती कृत्ये चालूच होती. या स्वातंत्र्यसंग्रामात कुटुंबामागे कमीतकमी एक तरी माणूस दगावला किंवा कैद झाला अगर धाकदपटशाला बळी पडला. अखेर राष्ट्रीय नेते व फ्रेंच सरकार यांमध्ये समझोता होऊन ३ जुलै १९६२ रोजी अल्जीरिया स्वतंत्र झाला. सप्टेंबर १९६२ मध्ये राष्ट्रीय सभेने फेरहत अब्बास यांना अध्यक्ष व बेनबेला यांना प्रधानमंत्री नेमले; पण एक वर्षानंतरच पुन्हा जनमतकौल होऊन बेनबेला अध्यक्ष झाले. १९ जून १९६५ ला लष्करी क्रांती होऊन बेनबेलाचे सरकार पदच्युत झाले आणि क्रांतिकारी मंडळाकडून पूर्वीचे उपाध्यक्ष व संरक्षणमंत्री बूमद्येन प्रधानमंत्री झाले व नंतर अध्यक्ष झाले.

राजकीय स्थिती

अल्जीरिया लोकतंत्रीय गणराज्य असले तरी स्वातंत्र्यानंतरच्या अल्पकाळात तेथे स्थिर सरकार स्थापन झाले नाही. २६ सप्टेंबर १९६२ मध्ये शेकडा ८० टक्के लोकांनी विधानसभेचे १९६ सदस्य निवडून दिले. यांपैकी ५६ यूरोपीय होते. १९६३ मध्ये सार्वमताने मान्य झालेल्या संविधानानुसार अल्जीरिया हे लोकशाही प्रजासत्ताक अरब आफ्रिकेचा व अरब जगताचा भाग असून इस्लाम हा त्याचा अधिकृत धर्म व अरबी ही अधिकृत भाषा आहे; प्रजासत्ताकाची मुख्य ध्येये राष्ट्रीय स्वातंत्र्याचा व ऐक्याचा सांभाळ आणि समाजवादी राज्याची रचना करणे आणि मानवी हक्कांचे संरक्षण करून शांततेसाठी झटणे अशी आहेत. ८ ऑक्टोबर १९६२ पासून अल्जीरिया हे संयुक्त राष्ट्रांचे सभासद झाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी १९५६ पासून देशाचे १५ विभाग, ८१ उपविभाग व १,५७८ कम्यून पाडण्यात आले आहेत. यांपैकी सहाराचे २ विभाग, ५ उपविभाग व ६३ कम्यून आहेत. अल्जिअर्स, कॉन्स्टँटीन व ओरान येथे अपील न्यायालये व प्रत्येक उपविभागात एक याप्रमाणे प्रथम श्रेणीची न्यायालये आहेत. यांशिवाय वाणिज्य- व शांति-न्यायालये असून त्यांना विस्तृत अधिकार आहेत. फ्रान्समधील संहितेचा आधार घेऊन दंडसंहिता निर्माण करण्यात आली आहे. देशातील सर्वोच्च न्यायालय म्हणजे, अपील उच्च न्यायालय व राज्यमंडळ ही होत. मुक्तिसेनेतून सैनिक भरती करून सेना उभारणयात येत आहे. अल्जीरियाची सेना ६०,००० आहे. ईजिप्तकडून काही जहाजे व रशियाकडून मिग जेट विमाने घेऊन नौसेना व वायुसेना यांच्या उभारणीला सुरुवात झाली. ईजिप्त प्रशिक्षणाची सोय करीत आहे. कोणत्याही प्रकारच्या बाँबफेकी विमानांना प्रतिकार करण्याच्या सिद्धतेत आफ्रिकेत ईजिप्तनंतर अल्जीरियाचा क्रमांक लागतो.

आर्थिक स्थिती

अल्जीरियात पशुपालन ल कृषी यांना महत्त्व आहे. देशातील २/३ लोकसंख्येचे उपजीविकेचे साधन जरी शेती असले, तरी देशाच्या एकूण उत्पन्नापैकी १/३ उत्पन्नच शेतीपासून मिळते. औद्योगिक उत्पादनापासून आणखी १/३ उत्पन्नाची भर पडते. अलीकडे खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पन्न महत्त्वाचे ठरत आहे. टेल ॲटलासच्या उत्तरेकडील भागात शेती व दक्षिणेकडे पशुपालन हे महत्त्वाचे उद्योग आहेत. एकूण जमिनीपैकी २·६ टक्के जमीन शेतीयोग्य असून ४ टक्के चराई व १·५ टक्के जंगलमय आहे. १९५७ साली देशाची अधिकांश उत्कृष्ट जमीन यूरोपीयांच्या ताब्यात होती. स्वातंत्र्यानंतर बरेच यूरोपीय जमीन सोडून गेले आहेत. शेतीची मुख्य समस्या मातीची धूप थांबविण्याची आहे. दर वर्षी एकरी १५ ते १८ घनमीटर माती जलविभाजक प्रदेशातून वाहून जाते व हे असेच चालू राहिले तर एका शतकात तेथून मातीचे आवरण नष्ट होण्याचा संभव आहे. यूरोपीय भागात शेती यांत्रिक व आधुनिक पद्धतीने व अरब भागात प्राचीन व निर्वाह-पद्धतीने करण्यात येत असे. मुख्य पिके गहू, बार्ली असून ओट, मका, बटाटे, तंबाखू, भाजी व ऑलिव्ह तेल यांचेही उत्पन्न महत्त्वाचे आहे. मद्य ही महत्त्वाची निर्यातवस्तू असून एके काळी याचे उत्पादन फ्रान्समधील एकून उत्पादनाच्या १/३ ते १/२ होते. वाळवंटातील मरूद्यानात खजुराचे उत्पादन उल्लेखनीय आहे. अल्जीरियाच्या बहुतेक भागात पाण्याचा अभाव जाणवतो. १९५८ साली १३ बांध-योजना आखून सु. १,५५,००० हेक्टर जागा ओलीत करण्यात आली. पाण्याच्या सोयी उपलब्ध करून पठार व मरुभूमीत पशुपालन-उद्योगाला, विशेषेकरून दूधदुभत्याला प्रोत्साहन दिले जात आहे. देशातील पशुधनापैकी ८३·३% शेळ्यामेंढ्या व ७% गुरे आहेत. १९६० साली ५,९०० टन लोकर उत्पन्न झाली. ग्रामीण उद्योगांपैकी गालीचे, मातीची भांडी व धातुकला यांसाठी अल्जीरिया जगप्रसिद्ध आहे. १९६८ साली १३·०५ लक्ष किवॉ. तास विद्युत्-उत्पादन झाले. देशात अल्पसा कोळसा आहे (१९६४ : ३५,००० टन उत्पादन). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्रचंड तेलसाठा सापडल्यामुळे देशाच्या

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate