অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्क्टिक प्रदेश

आर्क्टिक प्रदेश

आर्क्टिक प्रदेश

पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश. ध्रुवतारा ज्या पुंजात आहे त्याला पाश्चात्त्य खगोलशास्त्रात 'छोटे अस्वल' या अर्थाचे नाव आहे. ग्रीक भाषेत आर्कटॉस म्हणजे अस्वल; त्यावरून उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला 'आर्क्टिक' हे नाव पडले. काही लोक उत्तर-ध्रुववृत्त, ६६० ३०' उ. अक्षवृत्त, ही या प्रदेशाची मर्यादा मानतात. परंतु हवामान व जीवन या दृष्टींनी उत्तरेकडील तरुरेषा ही यापेक्षा अधिक समर्पक मर्यादा आहे. तिच्या आत ग्रीनलंड, स्पिट्स्‌बर्गेन व इतर ध्रुवीय बेटे, अलास्का, कॅनडा व सायबीरियाचा उत्तर भाग, लॅब्रॅडॉरचा किनारा आणि आईसलँड, नॉर्व, स्वीडन, फिनलंड व यूरोपीय रशिया यांचे उत्तर भाग हे प्रदेश येतात. यूरोपच्या उत्तर प्रदेशाचा अंतर्भाव काही लोकांच्या मते उपआर्क्टिकमध्ये होतो. ही तरुरेषा सामान्यतः उन्हाळ्यातील १०० सें. समतापरेषेला धरून आहे. आर्क्टिकच्या दक्षिणेस जेथे वर्षातून चार महिने तपमान १०० से. पेक्षा जास्त नसते, अशा प्रदेशाला उपआर्क्टिक म्हणतात.

आर्थिक व लष्करी दृष्ट्या हा भाग आर्क्टिक प्रदेशाचाच होय असे पुष्कळ भूगोलशास्त्रज्ञ मानतात. आर्क्टिक प्रदेशाची व्यवच्छेदक लक्षणे म्हणजे उन्हाळा व हिवाळा यांच्या तपमानातील फार मोठा फरक, उंच प्रदेश सतत बर्फाच्छादित असणे आणि सखल भागात गवत, लव्हाळे, बुटकी झुडपे आणि कायम गोठलेली जमीन ही होत. या जमिनीचा वरचा थर उन्हाळ्यात वितळतो, तेव्हा ती काळी आणि दलदलीची दिसते. आर्क्टिक भूप्रदेशाचा ६०% भाग कायम हिमाच्छादनाच्या बाहेर आहे. विसाव्या शतकात व विशेषत: दुसऱ्या महायुद्धानंतर आर्क्टिक व उपआर्क्टिक प्रदेशांचे आंतरराष्ट्रीय महत्त्व वाढत आहे आणि वातावरणाच्या जागतिक अभ्यासाच्या दृष्टीने या प्रदेशाला विशेष महत्त्व येऊ लागले आहे.

१९५७-५८ मधील आंतरराष्ट्रीय भूभौतिक पर्वाचा एक प्रमुख उपक्रम आर्क्टिक संशोधन हा होता. त्या काळात ३०० प्रायोगिक केंद्रांनी या प्रदेशाविषयीची महत्त्वाची माहिती मिळविली. १९५८ मध्ये नॉटिलस व स्केट या अमेरिकन पाणबुड्यांनी बर्फाखालून प्रवास करून उत्तर ध्रुव गाठून पलीकडे बाहेर येण्यात यश मिळविले. त्यानंतरही आंतरराष्ट्रीय सहकार्यांने या प्रदेशाचा अभ्यास चालू आहे. आर्क्टिक संशोधनाचा व विकासाचा सर्वात सधन कार्यक्रम रशियाचा आहे. आपापले सीमाप्रदेश व मार्ग यांच्या संरक्षणासाठी कॅनडा, अमेरिका व रशिया यांनी या प्रदेशात लष्करी तळ व प्रचंड रडारयंत्रणा उभारली आहे. त्यासाठी तेथील जमीन, वनस्पती व प्राणी यांचा शास्त्रज्ञांना विशेष बारकाईने अभ्यास करावा लागला आहे.

शोध

पृथ्वीच्या आकृतीबद्दल चुकीच्या समजुती व नौकानयनाच्या प्राथमिक पद्धती यांमुळे आर्क्टिक प्रदेशाविषयी चुकीच्या समजुती रूढ होत्या. पिथियस हा ग्रीक इ. स. पू. चौथ्या शतकात आइसलँडपर्यंत पोचला असावा. त्याला त्याने थूल म्हटले. आज थूल हे ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्यावरील ठिकाण आहे. आठव्या-नवव्या शतकात आयरिश भिक्षू आर्क्टिकपर्यंत गेले होते. नवव्या शतकात नॉर्वेतील व्हायकिंगांनी तेथे वस्ती केली; ९८२ च्या सुमारास ग्रीनलंडच्या दक्षिण किनाऱ्यावर त्यांनी वसाहती स्थापिल्या, ते स्पिट्‌स्‌बर्गेन व नॉव्हाया झीमल्यापर्यंतही पोचले असावे. सोळाव्या शतकात डचांनी व इंग्रजांनी पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढविण्यासाठी ‘नॉर्थ ईस्ट पॅसेज’ (ईशान्यमार्ग) शोधण्यास सुरुवात केली.

आफ्रिकेला किंवा दक्षिण अमेरिकेला वळसा घालून जाण्याचे मार्ग लांबचे, त्रासदायक व पोर्तुगीज आणि स्पॅनिश लोकांच्या हाती होते. खुष्कीचे त्याहूनही बिकट होते. १५५३ मध्ये सर ह्यू विलोबीचे पथक कोला द्वीपकल्पाजवळ नष्ट झाले. त्यापैकी रिचर्ड चॅन्सेलर आर्केंजलहून मॉस्कोपर्यंत आला. रशियन लोक पंधराव्या शतकातच नॉर्थ केपला वळसा घालून पश्चिम यूरोपला जात असत. १५५६ व १५८० तील अपयशानंतर इंग्रजांचे ईशान्यमार्गाबद्दलचे स्वारस्य संपले. १५६५ मध्ये आर्केंजलला व्यापारी ठाणे स्थापिलेला ब्रुनेल हा डच १५८४ मध्ये युगोर्स्की सामुद्रधुनीपर्यंतच पोचला.

१५९४ मध्ये विल्लेम बॅरेंट्सने नॉव्हाया झीमल्या संशोधिले. त्याने वेअर बेट व स्पिट्‌स्‌बर्गेनही शोधिले. आर्क्टिक प्रदेशात हिवाळा काढून परतताना बॅरेंट्स मरण पावला. रशियन कोसॅक सायबीरिया जिंकीत पॅसिफिकपर्यंत गेले होते. त्यांपैकी सायमन डेझनेव्ह १६४८ मध्ये बेरिंग सामुद्रधुनीतून गेला असावा. पीटर द ग्रेट याने संशोधनास प्रोत्साहन दिले. १७२५ ते ४२ च्या मोहिमेत सायबीरियाचा बराच किनारा नकाशिला गेला. या मोहिमेत बेरिंग हा डच संशोधक बेरिंग सामुद्रधुनीतून गेला. १७४१ मध्ये ले. चेल्युस्किन हा सायबीरियाच्या अतिउत्तर टोकापर्यंत गेला.

लॅपटेव्ह बंधूंनी तैमीर द्वीपकल्प ते कोलीमा नदीपर्यंतचा किनारा नकाशिला. १७७८ मध्ये कॅ. जेम्स कुकने बेरिंग सामुद्रधुनीचे अस्तित्व प्रत्यक्ष पाहून ठरविले. रँगेल याने १८२० ते २४ मध्ये उत्तर किनाऱ्याचा नकाशा पुरा केला. १७७० मध्ये ल्याखोव्ह या व्यापाऱ्याने न्यू सायबीरियन बेटे शोधिली. त्याने तेथपर्यंत कॅरिबू आलेले पाहिले. या बेटावर मोठमोठे हस्तिदंत सापडले. १८७२-७४ मध्ये फ्रान्झ जोझेफ बेटांचा शोध लागला. ईशान्यमार्गाने पहिले यशस्वी नौकानयन स्वीडिश वॅरन नॉर्डेन्स्कोल्ड याने केले. रशियन विल्किटस्की याने पूर्वेकडून पश्चिमेकडे हा मार्ग पार केला. १९१३ मध्ये त्याला सेव्हर्नाया झीमल्याचा शोध लागला. १९३२ मध्ये ‘सायबिर्याकोव्ह’ बर्फफोड्या नौकेने हा मार्ग एकाच ऋतूत पार केला. अमेरिकेच्या शोधामुळे ‘नॉर्थ वेस्ट पॅसेज’ (वायव्यमार्ग) च्या शोधास सुरुवात झाली. १५७६ मध्ये फ्रॉबिशर आर्क्टिकमध्ये गेला. जॉन डेव्हिस १५८५-८७ मध्ये ग्रीनलंडला व तेथून डिस्को बेटापर्यंत (७२० उ. अक्षांश) गेला. १६१० मध्ये हेन्‍री हडसन, हडसन व जेम्स उपसागरांपर्यंत गेला. १६१६ मध्ये बॅफिनने बॅफिन उपसागर संशोधिला. अठराव्या शतकात भूमीवरून अंतर्भागात जाण्याला महत्त्व आले व वायव्यमार्ग संशोधन मागे पडले.

एकोणिसाव्या शतकात ब्रिटिश सरकारच्या मोहिमा सुरू झाल्या. त्यात कॅनडाचे द्वीपसमूह व किनारा नकाशून झाला होता. १८४५ मध्ये निघालेली सर जॉन फ्रँक्लिनची मोहीम अपयशी ठरली. व्हिक्टोरिया सामुद्रधुनीपर्यंत गेल्यावर तो आपल्या लोकांसह बेपत्ता झाला. त्याला शोधून काढण्याचा प्रयत्न १२ वर्षे चालला होता; त्यात पुष्कळ भौगोलिक माहिती मिळाली. कमांडर रॉवर्ट माक्लुर हा अनेक जहाजांतून व क्वचित पायीसुद्धा १८५० ते १८५४ मध्ये वायव्यमार्ग पार करणारा पहिला नाविक ठरला. १९०३ ते १९०६ मध्ये सुप्रसिद्ध नॉर्वेजियन संशोधक रोआल आमुनसेन याने आपल्या ‘गोया’या छोट्याशा नौकेतून हा मार्ग पार केला. हा मार्ग एकाच नौकेतून पार करणारा तो पहिला नाविक होय.

१९४०-४२ मध्ये व १९४४ मध्ये लार्सन यानेही तो पश्चिमपूर्व व पूर्वपश्चिम दिशांनी पार केला. १९५४ मध्ये कॅनडाची बर्फफोडी नौका लॅब्रॅडॉर हिने तो खोल पाण्यातून ओलांडला. सप्टेंबर, १९६९ मध्ये अमेरिकेची व्यापारी बर्फफोडी नौका ‘मॅनहॅटन’ हिने हा मार्ग ओलांडला तेव्हा अलास्कामध्ये भरपूर तेल आहे व ते या मार्गाने शुद्ध करण्यासाठी आणता येईल, असे दिसून आले. आर्क्टिक प्रदेशाच्या संशोधनात व त्याच्या काही भागांचे नकाशे तयार करण्यात व्हेलमाशांचे शिकारी व केसाळ कातड्यांचे व्यापारी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. रशियन व ब्रिटिश व्यापाऱ्यांमधील तेढ अमेरिकेने १८६७ मध्ये रशियाकडून अलास्का विकत घेतला तेव्हा संपली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate