অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इटली

इटली

यूरोपच्या दक्षिणेकडील, आल्प्सपासून भूमध्य समुद्रात शिरलेले, बुटासह पायाच्या आकाराचे प्रजासत्ताक राष्ट्र. मुख्य द्वीपकल्पाशिवाय यात सार्डिनिया (२४,०८० चौ. किमी.) व सिसिली (२५,७४८ चौ. किमी.) या मोठ्या आणि एल्बा, जील्यो, इस्किया, काप्री, लिथारी, पांतेल्लेरीया, लँपडूसा इ. सु. ७० लहान बेटांचा समावेश होतो. हा देश यूरोप व आफ्रिका यांना जवळजवळ जोडणारा दुवाच आहे (सिसिली ते आफ्रिका अंतर १४५ किमी.). त्याच्यामुळे भूमध्य समुद्राचे दोन भाग पडतात. याचे अक्षांश ३६० ३८' उ. ते ४७० ५ उ. आणि रेखांश ६० ३३' पू. ते १८० ३१'पू. असून क्षेत्रफळ ३,०१,१९५ चौ. किमी. व लोकसंख्या ५,४०,२५,२११ (१९७१) आहे.

देशाची जास्तीत जास्त लांबी १,१४२ किमी. असून आल्प्सकडे जास्तीत जास्त रुंदी ५६३ किमी. व दक्षिणेकडे कमीत कमी ३२ किमी. आहे. इटलीच्या सरहद्दी वायव्येकडे फ्रान्स, उत्तरेकडे स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि ईशान्येकडे यूगोस्लाव्हिया यांच्याशी संलग्न आहेत. बेटे सोडून देशाची सागरी सरहद्द सु. ४,३०० किमी. असून द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडे लिग्यूरियन व टिरीनियन, दक्षिणेकडे आयोनियन व पूर्वकडे एड्रिअ‍ॅटिक समुद्र आहेत.

सिसिली हे नैऋत्येकडील बेट ३२ किमी. लांब व ३ ते १६ किमी. रुंद अशा मेसिना सामुद्रधुनीने वेगळे झालेले आहे. सार्डिनिया रोमच्या पश्चिमेस सु. २४० किमी. व सिसिलीच्या वायव्येस ३२० किमी. आहे. देशाच्या भौगोलिक सीमांत सान मारीनो या छोट्याशा (६१ चौ. किमी.) प्रजासत्ताकाचा व व्हॅटिकन (०.४ चौ. किमी.) या सार्वभौम धर्मपीठाचाही समावेश होतो. इटलीची राजधानी रोम आहे.

भूवर्णन

उत्तरेकडे आल्प्स, त्याच्या दक्षिणेस पो नदीचे खोरे आणि त्याच्याही दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पाठीच्या कण्यासारखा पसरलेला अ‍ॅपेनाइन्स व त्याच्या दोन्ही बाजूच्या किनारपट्ट्या असे इटलीचे सर्वसाधारण स्वरूप सांगता येईल.

उत्तरेकडील आल्प्स तृतीययुगीन घडामोडीत वलीकरणाने बनलेला अर्वाचीन पर्वत असल्याने त्यात उंच शिखरे, खोल दऱ्या, खिंडी, सरोवरे व हिमानी क्रियेचे अवशेष आढळतात. येथील आल्प्सचे तीन सारखे भाग पडतात : पीडमाँट, लाँबर्ड व व्हिनीशियन आल्प्स, जेनोआच्या पश्चिमेकडील कादीबोना खिंडीपासूनन स्विस सरहद्दीवरील सिंप्लॉन खिंडीपर्यंत पसरलेल्या पीडमाँट आल्प्समध्ये तुटलेले कडे व अवघ्या २५ किमी. मध्ये २,७५० मीटरपर्यंत गेलेली सुळक्यासारखी शिखरे आहेत.

सेंट बर्नार्ड व माँ सनी या महत्त्वाच्या खिंडी याच भागात आहेत. काळ्या शिस्टमध्ये अधूनमधून ४,००० - ५,००० मी. उंचीचे ग्रान पारादीसो, माँटे रोझा व माँ ब्लां यांसारखे स्फटिकी गिरिपिंड आढळतात. येथील माँट वीझोपासून पो नदीचा उगम होतो. सिंप्लॉन खिंडीपासून ऑस्ट्रियन सरहद्दीजवळील रेझिया खिंडीपर्यंत पसरलेला लाँबर्ड आल्प्स रुंद असून दक्षिणोत्तर गेलेल्या अनेक दऱ्या तेथे आढळतात. आल्प्सवरून आलेल्या हिमनद्यांमुळे या दऱ्यांतून माद्‌जोरे, लूगानो, कॉमो, ईझेओ, गार्दा यांसारखी निसर्गरम्य सरोवरे बनली आहेत व या दऱ्यांतून दळणवळणाचे मार्गही गेले आहेत. हा भाग जलविद्युत्‌निर्मितीसही उपयुक्त झाला आहे. व्हिनीशियन आल्प्स ईशान्येकडे कांपॉरॉसॉ (तार्वीस्यो) खिंडीपर्यंत पसरला असून त्याची उंची २,४००-३,३०० मी. पर्यंतच आहे. त्याची रुंदी मात्र जास्त असून तो दळणवळणास सोयीचा आहे. यातील ब्रेनर खिंडीची उंची फक्त १,४३० मी. आहे. इटली-ऑस्ट्रिया-युगोस्लाव्हिया यांमधील कार्स्ट भूमिस्वरूपाचा पट्टा येथूनच सुरू होतो. सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी विविध रंगछटांनी चमकणारे, ३,३०० मीटरपर्यंतच उंचीचे परंतु अनेक रेखीव सुळक्यांनी युक्त असल्यामुळे प्रवाशांचे एक आकर्षण ठरलेले डोलोमाइट डोंगरही येथेच आढळतात.

पो नदीचे खोरे पश्चिमेकडे अरुंद व पूर्वेकडे रुंद होत गेले असून देशाचा १७ टक्के भाग या खोऱ्याने व्यापला आहे. प्राचीन काळची ही एड्रिअ‍ॅटिकची द्रोणी आल्प्समधील दगडधोंड्यांनी व गाळाने भरून येऊन हा सखल प्रदेश बनला आहे. आद्या, ओल्यो, तीचीनो,सेझ्या, त्रेब्या, तारो, तानारो या पोच्या उपनद्या; आदीजे, ब्रटो, प्यावे वगैरे या खोऱ्यातील नद्या व आल्प्समधून वाहणारे असंख्य झरे ह्यांमुळे हे एक अत्यंत समृद्ध मैदान बनले आहे. यालाच लाँबर्डीचे मैदान असेही म्हणतात. पूर्व किनाऱ्यावर गाळ साचल्यामुळे कोमाक्यो व इतर बरीच खारकच्छे बनली आहेत.

द्वीपकल्पाच्या मध्यातून वायव्य-आग्नेय दिशेने गेलेली अ‍ॅपेनाइन्स पर्वतश्रेणी तृतीययुगीन काळातील घडामोडीत बनलेली आहे. त्याच काळात टिरीनियन समुद्राचा भाग खचून द्वीपकल्पीय इटली, सिसिली, सार्डिनिया, कॉर्सिका हा भागच तेवढा शिल्लक राहिला. शास्त्रज्ञांच्या मते ही घडामोड अद्याप अपूर्ण असल्याने येथे मुख्य भूमीवरील व्हेसूव्हिअस (१,१७५ मी.), सिसिलीमधील एटना (३,२७५ मी.) व स्ट्राँबोली बेटावरील स्ट्राँबोली (९२६ मी.) ह्यांसारखे जागृत ज्वालामुखी असून येथे जपानखालोखाल भूकंप होतात. अ‍ॅपेनाइन्सचे उत्तर, दक्षिण व मध्य असे तीन विभाग असून त्याचे पोटभाग स्थानिक नावांनी प्रसिद्ध आहेत. हा सु. १,२९० किमी. लांब व ३०-१३६ किमी. रुंद असून यावरील बराच भाग पठारी आहे. मध्य भागात यावर त्राझिमेअनो व ज्वालामुखी विवरांत पाणी साचून वनलेली बोल्सेना, ब्रात्‌चानो, वीको, नेमी, आल्बानो इ. सरोवरे निर्माण झाली आहेत. माँटे कोर्नो (२,९२० मी.) हे अ‍ॅपेनाइन्समधील सर्वोच्च शिखर होय. अ‍ॅपेनाइन्सवरून पूर्वेकडे अनेक लहान नद्यानाले; तर आर्नो, टायबर, लीरी वोलतूर्नो,गारील्यानो या काही मोठ्या नद्या पश्चिमेकडे वाहतात. या नद्यांनी समृद्ध खोरी तयार केली आहेत. बोक्केता, लाचीझा, ला फूता,जोंवी, पेस्कारा, स्केर्दजा यांसारख्या तेरा महत्त्वाच्या खिंडी अ‍ॅपेनाइन्समध्ये असल्याने दळणवळण सुकर झाले आहे.

इटलीचा वायव्य किनारा डोंगराळ, तीव्र चढउताराचा व चिंचोळा असून, आल्प्समुळे व भूमध्यसामुद्रिक हवामानामुळे तो रिव्हिएरा नावाने हौशी प्रवाशांचे आकर्षण ठरला आहे. पश्चिम किनाऱ्यावरील टस्कनी, रोम, नेपल्स येथील नदीखोऱ्यांचा प्रदेश सुपीक मैदानी आहे. पूर्वेकडील किनारा अरुंद व चुनखडकाचा बनलेला आहे. सिसिली बेट बहुतांशी डोंगराळ व पठारी आहे. सार्डिनियाचा नैऋत्य भाग सोडल्यास इतर प्रदेशही डोंगराळ आहे.

द्वीपकल्पावरील टायबर, आर्नो इ. मोठ्या नद्या वगळल्यास इतर नद्यांना उन्हाळ्यात नाममात्र पाणी असते; तर पावसाळ्यात मात्र त्या पुराचा धोका निर्माण करतात. उत्तरेकडील पो नदीला आल्प्स पर्वतावरून हिमजलाचा फायदा मिळत असल्याने तिला वर्षभर भरपूर पाणी असते. पो नदीच्या मुखाच्या दक्षिणेकडील एड्रिअ‍ॅटिक समुद्रकिनारा बराचसा सरळ आहे आणि त्यावर अँकोना,ब्रिंडझी, बारी अशी थोडी बंदरे आहेत त्या मानाने पश्चिम किनाऱ्यावर जेनोआ स्पेत्स्या, लेगहॉर्न, सालेर्नो, नेपल्स यांसारखी प्रसिद्ध बंदरे आहेत. दक्षिणेकडे टॅरँटोच्या आखातावर असलेले त्याच नावाचे बंदर संरक्षित व नैसर्गिक आहे; सार्डिनियामध्ये काल्यारी व सिसिलीमध्ये पालेर्मो ही महत्त्वाची बंदरे आहेत.

नदी खोऱ्यातील गाळाच्या जमिनी व लाव्हारसाने निर्माण झालेल्या जमिनी अव्वल दर्जाच्या आहेत. डोंगराळ प्रदेश व दक्षिणेकडील जमिनीतील चुनखडीचा अंश यांमुळे इटलीतील बरीच जमीन हलक्या दर्जाची आहे. जमिनीची धूप हा येथील महत्त्वाचा प्रश्न आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate