অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इथिओपिया

इथिओपिया

पूर्वीचे नाव अ‍ॅबिसिनिया व तद्देशीय आम्हारिक भाषेतील यइत्योप्या निगुसा नगस्त मंगुइस्त. ईशान्य आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक राष्ट्र. ३० ३०' उ. ते १८० उ. व ३३० पू. ते ४८० पू.; क्षेत्रफळ १२, २१, ९०० चौ. किमी.; लोकसंख्या २,४३,१९,००० (१९७१ अंदाज). याच्या उत्तरेस व पश्चिमेस सूदान, दक्षिणेस केन्या, आग्‍नेयीस व पूर्वेस सोमाली प्रजासत्ताक व आफार्झ अँड ईसाझ (पूर्वीचे फ्रेंच सोमालीलँड) आणि ईशान्येस तांबडा समुद्र आहे. दक्षिणोत्तर व पूर्व पश्चिम अंतर प्रत्येकी सु. १,४५० किमी. असून १,२४० किमी. लांबीची तांबड्या समुद्राची किनारपट्टी देशाला लाभलेली आहे. अदिस अबाबा ही राजधानी आहे.

भूवर्णन

इथिओपिया म्हणजे एक मोठा थोरला डोंगराळ व पठारी जटिल प्रदेश आहे. आफ्रिकेतील प्रसिद्ध खचदरीने त्याचे दोन भाग केले आहेत. खचदरीच्या पश्चिमेकडील भागात येथील सर्वांत उंच पर्वतशिखरे आहेत. डोंगराळ प्रदेशाची सामान्य उंची सु. २,४०० मी. असून काही भाग ३, ९०० मी. उंचीचे आहेत. आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे रास दाशान (४,६२० मी.) तसेच आबूना योसेफ (४,१९२ मी.), बातु (४,३०८ मी.), चिलालो (४, १३४ मी.), गुना (४, २०१ मी.) ही यांवरील काही उंच व रम्य शिखरे होत. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा डोंगराळ प्रदेश वलीकरण आणि विभंग झालेल्या स्फटिकी खडकांचा असून त्यांवर स्तरित खडक, चुनखडक, वालुकाश्म आणि लाव्हापासून बनलेले खूप जाडीचे खडक यांचे थर आहेत. हा प्रदेश अलीकडील मध्यनूतन कालखंडात निर्माण झालेला असल्याने अद्यापही येथे स्थिरता आलेली नाही; येथे अनेक ज्वालामुखी असून नेहमी भूकंप होतात; नद्यांच्या निदऱ्यांवरून प्रदेश उंचावत जात असल्याचे पुरावे मिळतात. अनेक ठिकाणी उष्णोदकाचे झरे व सरोवरे आढळतात.

येथील खचदरी अरबस्तानापासून दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या खचदरीचाच भाग असून तिचा तळ समुद्रसपाटीपासून सु. १,५०० मी. उंच आहे. ही खचदरी नैर्ऋ‌त्येकडे अरुंद असून ईशान्येकडे रुंद आणि अधिक खचलेली आहे. हा एक मोठा त्रिकोणी प्रदेश असून त्यात आवाश नदीचा अंतर्गत जलवाहनचा प्रदेश आणि दानाकिलचे रुक्ष मैदान यांचा समावेश होतो. यातील कोबारसिंक हा भाग समुद्रसपाटीपेक्षा खोल आहे. या सखल प्रदेशाच्या उत्तरेस तांबड्या समुद्रालगत अफार आल्प्स नावाची लहान पर्वतराजी आहे. खचदरीच्या पूर्वेकडील पर्वतराजी सरासरी ३,००० मी. उंच असून ती आग्‍नेयीकडील सोमालीच्या सखल प्रदेशाकडे उतरत गेली आहे. खचदरीच्या पश्चिमेकडील पर्वतराजीचा सूदानकडील डोंगरपायथा व मैदानी प्रदेश अरुंद आहे.

इथिओपियाच्या डोंगराळ पठारी प्रदेशात अनेक लहानमोठ्या नद्या आहेत. आब्बाय (नील नाईल), टकझे (आतबारा), बारो (सोबॅत) या इथिओपियाच्या डोंगराळ प्रदेशातून निघून नाईलला मिळणाऱ्या प्रमुख नद्या होत. नील नाईलचा उगम देशातील सर्वांत मोठ्या ताना सरोवरात होतो. हिच्यावर अनेक धबधबे असून इथिओपियातील इस्सात हा धबधबा प्रसिद्ध आहे. हिला जामा, मुगेर, गुडेर इ. अनेक उपनद्या मिळाल्या आहेत.

या नदीवर बांधलेल्या पुलामुळे इथिओपियाचे गोजम व शीबा प्रांत जोडले आहेत. दक्षिणेकडील रूडॉल्फ सरोवराला मिळणारी ओमो ही प्रमुख नदी असून पूर्वेकडे वाहणाऱ्या जूबा व शिबेली या प्रमुख नद्या होत. उत्तरेकडे वाहणाऱ्या आवाश नदीवर मोठे धरण बांधण्याचे काम चालू आहे. सु. ५,८०० चौ. किमी. क्षेत्रफळ व १४ मी. खोल असलेल्या ताना सरोवराशिवाय येथे आब्बाय, चामो इ. अनेक सरोवरे आहेत.

भूप्रदेशाच्या उंचसखलपणावर येथील हवामान अवलंबून असते. २,४०० – ३,००० मी. उंचीच्या मध्यवर्ती डोंगराळ पठारी प्रदेशाचेहवामान सम व सौम्य असून सरासरी तपमान १६से. असते. १,८०० ते २,४०० मी. उंचीवरील भागात सरासरी तपमान २२ से. तर समुद्रसपाटी, वाळवंटी प्रदेश येथील तपमान २६ से. पेक्षा जास्त असते. या सखल, उंच व अतिउंच भागांना इथिओपियात अनुक्रमे डेगा, वोइना-डेगा आणि कोल्ला अशी नावे आहेत. या तीन विभागांत अनुक्रमे ५० सेंमी. पेक्षा कमी, ५० – १५० सेंमी. आणि १२५–१७५ सेंमी. पाऊस पडतो. पाऊस मुख्यतः जून-सप्टेंबर मध्ये पडतो. त्यानंतरच्या कोरड्या ऋतूत मार्च-एप्रिलमध्ये थोडा पाऊस पडतो. अतिउंच भागात काही वेळा हिमवृष्टी होते, तर दानाकिलच्या भागात कित्येक वेळा पाऊस पडतच नाही.

भरपूर पाऊस व समशीतोष्ण किंवा थंड हवामान असलेल्या डोंगराळ व पठारी प्रदेशांत आफ्रो-आल्पाई जातीच्या, ज्यूनिपर प्रकारच्या टिड किंवा झिग्बा, कूसो, लोबेलिया, सेनेचिओ इ. अनेक वनस्पती आढळतात. जास्त पाऊस व जास्त तपमानाच्या भागात करारो, सिसा, टुकूर, इंचेट, सोंबो इ. रुंदपर्णी झाडे आढळतात. यातील काफा प्रांतात कॉफीची झाडे नैसर्गिक रीत्या उगवतात व त्या प्रांतावरूनच या झाडास कॉफी नाव पडले आहे. नैर्ऋ‌त्य भागात बांबूंची बने असून उत्तरेकडे तसेच डोंगरपायथ्याशी बाभळीच्या जातीची झाडे आढळतात. सखल मैदानी प्रदेशात सॅव्हाना गवत उगवते. पठारी प्रदेशात निलगिरीची मुद्दाम लागवड व वाढ केली आहे.

श्चिमेकडील सखल भागात हत्ती व गेंडे आढळतात. नद्या व सरोवरे येथे हिप्पो, सुसरी, मॉनीटर, ऑटर हे प्राणी आढळतात. दक्षिण, नैर्ऋ‌त्य आणि ओगाडेन भागात सिंह आहेत. डोंगराळ भागात चित्ता, तरस, कोल्हा, लांडगा, सिवेट, वानर, बॅजर आदी विविध प्राणी आढळतात.

गवताळ भागात जिराफ, झेब्रा आणि विविध जातीची हरणे आहेत. गरूड, गिधाड, ससाणा, बदक, भांडक, शहामृग वगैरे अनेक जातीचे पक्षी येथे असून मराबू, पोपट, जय वगैरे पक्षी सुंदर पिसाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अजगर, नाग, पफअ‍ॅडर इ. सर्पाच्या अनेक जाती असून हिवताप पसरविणारे डास, टोळ, चित्रविचित्र फुलपाखरे भरपूर आहेत. सिमेन चिलालो पर्वतविभागात आणि आवाश खोऱ्यात अभयारण्ये राखलेली आहेत. तेथे दुर्मिळ प्राणी व पक्षी यांचे मुद्दाम संरक्षण केले आहे. त्यांपैकी न्याला हरिण व वॉलिया आयबेक्स हे फक्त इथिओपियातच सापडतात.

इतिहास

ओमो नदीच्या खोऱ्यात सु. २५ लक्ष वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. इ. स. पू. ३००० पासून इथिओपियाविषयी माहिती मिळते. इथिओपियास पुरातन काळी पूंट लोकांचा देश म्हणून संबोधित असत.

ईजिप्त व इथिओपिया यांचा संबंध अनेक शतके टिकून होता. त्यानंतरची माहिती मत्शाफा नेगास्त (राजांचा ग्रंथ) व केब्रा नेगास्त (राजवैभवाचा ग्रंथ) यांमध्ये सापडते. जेरूसलेमचा राजा सॉलोमन व शीबाची (इथिओपियाचा भाग) राणी मेकेडा यांच्या प्रेमप्रकरणाचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे.

सॉलोमन राजापासून मेकेडा राणीला एक पुत्ररत्‍न प्राप्त झाले होते. त्याचे नाव (पहिला) मेनेलिक (इ. स. पू. सु. ९७५ – ९५०). त्याच्यापासून आजतागायत सॉलोमन घराणे (मधला काही काळ सोडल्यास) राज्य करीत आहे. पहिल्या मेनेलिकपासून सॉलोमन घराण्यास सुरुवात होऊन २५९ राजांनी राज्य केल्यानंतर ९२७ ते १२६० पर्यंत यात खंड पडला. या खंडित कालात ‘झाग्वे’ राजघराण्यातील अकरा राजांनी ३३३ वर्षे राज्य केले. १२६० मध्ये येकुनो आम्‍लाक राजाने पुन्हा सॉलोमन घराण्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्यानंतर आजतागायत ६५ राजांनी राज्य केले. हल्लीचे बादशहा हायली सेलॅसी हे सहासष्टावे होत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate