অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इराक

इराक

नैर्ऋ‌त्य आशियातील एक अरब प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ४,३७,२२२ चौ. किमी.; लोकसंख्या १,००,७४,१६९ (१९७० अंदाजे). २९० उ. ते ३७० ५० उ. व ३९ पू. ते ४८ पू. जास्तीतजास्त लांबी १,२०० किमी. व रुंदी ७६८ किमी. टायग्रिस आणि युफ्रेटीस या दोन नद्यांमधील प्रदेश (दोआब) म्हणून इराकला पूर्वी मेसोपोटेमिया’   हे नाव होते. यातच फार प्राचीन काळी अ‍ॅसिरिया व बॅबिलोनिया ही राज्ये होती.

इराकच्या उत्तरेस तुर्कस्तान, पश्चिमेस सिरिया व जॉर्डन, दक्षिणेस सौदी अरेबिया, एक अशासित प्रदेश, कुवेत व इराणचे आखात आणि पूर्वेस इराण आहे. जॉर्डन व सौदी अरेबिया यांच्याशी इराकच्या सरहद्दी निश्चित नाहीत. इराण व इराक यांच्यामधील सरहद्द ४०० किमी. असून इराकला सु. ६४ किमी. समुद्रकिनारा मिळाला आहे. बगदाद ही इराकची राजधानी आहे.

भूवर्णन

इराक हा सखल द्रोणसदृश प्रदेश आहे. पूर्व, उत्तर व पश्चिम दिशांकडे भव्य झॅग्रॉस व अ‍ॅनातोलियन वली-पर्वतश्रेणी आहेत. झॅग्रॉस पर्वतश्रेणी अपनती-वलनाकार असून ती वायव्य-आग्‍नेय अशी गेलेली आहे. बगदादच्या उत्तरेस ती क्रमाक्रमाने उंचावत गेलेली  असून, काही ठिकाणी ३,०४८ मी. हूनही अधिक उंचीची शिखरे आढळतात. अगदी पूर्वेकडील उंच पर्वतराजींच्या प्रदेशास इराकी कुर्दिस्तान हे नाव तेथे राहणाऱ्या कुर्द टोळ्यांवरून पडले आहे. टायग्रिस व युफ्रेटीस या नदीखोर्‍यांच्या पश्चिमेकडील बाजूस ही भूमी हळूहळू उंचावत गेली असून, तिचे रूपांतर अ‍ॅनातोलिया पठारात झालेले आहे.

हे पठार जुरासिक व क्रिटेशस आणि आदिनूतन-मध्य-नूतन काळांतील खडकांनी बनलेले असून इराकमध्ये त्याची कमाल उंची सु. ९१४ मी. आहे. काही ठिकाणी या पठारावर कडे निर्माण झालेले दिसतात. या कड्यांवरूनच या देशाला ‘इराक’  (अरबी शब्द इराक =कडा) हे नाव पडले असावे, असे काहींचे मत आहे. भौगोलिक दृष्ट्या इराकचे चार प्रमुख विभाग पडतात :

(१) युफ्रेटीस व टायग्रिस ह्या दोन नद्यांमधील सखल प्रदेश;

(२) अपर इराक : या दोन नद्यांच्या वेगवेगळ्या खोर्‍यांतील प्रदेश;

(३) अ‍ॅसिरिया व इराकी कुर्दिस्तान आणि

(४) पश्चिमी वाळवंटी प्रदेश.

सखल प्रदेश

हा प्रदेश रामादी व बगदाद ह्यांमधील उंच कड्यांपासून सुरू होऊन ५६० किमी. लांब इराणच्या आखातापर्यंत विस्तारत जातो. बगदादपासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे अनुक्रमे टायग्रिस व युफ्रेटीस ह्या नद्या वाहतात. टायग्रिस तुर्कस्तानात उगम पावते व तेथून ती इराकमध्ये वहात येते. तिच्या मुख्य प्रवाहाचा विलक्षण वेग आणि धोक्याची अनेक वळणे यांमुळे या नदीतून नौकानयन करणे अतिशय अवघड असते. बगदाद ते कूट हे अंतर खुष्कीच्या मार्गाने जेवढे आहे, त्याच्या दुप्पट (३३९ किमी.) टायग्रिस नदीमार्गाने होते. कूटच्या पुढे टायग्रिसचा प्रवाह पुष्कळच सरळ बनतो व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलसिंचन शेती शक्य होते. गेल्या पंधराशे वर्षांत टायग्रिसने आपला मार्ग अनेक वेळा बदलला आहे; अमराहच्या पुढे दक्षिणेस, टायग्रिस नदीचा प्रवाह अनेक कालवे व दलदलीचे प्रदेश ह्यांमध्ये पूर्व-पश्चिम विखुरला जातो.

युफ्रे टीसचाही उगम तुर्कस्तानात होऊन ती प्रथम सिरियातून व नंतर इराकमधून वाहते. तिचा प्रवाह रामादीपासून १३७ ते २७४ मी. रुंद अशा पात्रातून वाहत जातो व त्यावेळी पात्राची खोली ०.९ मी. ते २.१३ मी. एवढीच असते. युफ्रेटीसची लांबी २,३५० किमी. असून टायग्रिसप्रमाणे तिच्यावरही नैसर्गिक पूरतट आढळतात. सॅमॅवापासून नासिरियापर्यंतचा युफ्रेटीसचा प्रवाह रेखीव पात्रातून वाहतो. नासिरियाच्या पुढे मात्र तिचे अनेक उपनद्या व कालवे यांमध्ये रूपांतर होते; सरतेशेवटी हे सर्व पाणी लेक हामार या बोरू व वेत यांनी भरलेल्या पाणथळीस जाऊन मिळते. युफ्रेटीस व टायग्रिस या दोन्ही नद्यांचा कुर्ना येथे संगम होतो; तेथून पुढे वाहणाऱ्यानदीला शट अल् अरब हे नाव मिळाले आहे. तिची लांबी १८५ किमी. आहे.

बगदादच्या वरपर्यंतच्या प्रदेशात दोन्ही नद्या रेखीव पात्रातून वाहतात. बगदादच्या खाली मात्र त्या सपाट मैदानात अनेक वळणे घेऊन वाहतात. दोन्ही नद्यांचा मार्ग अचानक बदलतो. या नद्यांनीच निर्माण केलेले पूरतट पूर आला म्हणजे भंगतात आणि शेकडो किमी. प्रदेश जलमय होतो.

अखेरीस नदी पुन्हा नवीन पूरतट निर्माण करून वाहू लागते. अशा तर्‍हेने पूर्णपणे वा अर्धवट सोडलेले जुने नदीमार्ग हे मेसोपोटेमियाच्या सखल प्रदेशाचे एक मोठेच वैशिष्ट्य समजले याते. याबरोबरच दलदलीचे प्रदेश, सरोवरे व वालुकाभित्ती ठिकठिकाणी निर्माण होतात.

टायग्रिस जरी युफ्रेटीसपेक्षा निरुंद असली, तरी तिचा प्रवाह अधिक जलद आहे व ती अधिक पाणी वाहून नेते. वसंत ऋतूत बर्फ वितळल्यामुळे दोन्ही नद्यांचे पाणी वाढू लागते; टायग्रिसचे व युफ्रेटीसचे पाणी अनुक्रमे एप्रिल व मे महिन्यांत कमाल मर्यादेपर्यंत वाढते. साधारणपणे पुराचे पाणी ३.६५ ते ६.९ मी. पर्यंत चढते; ९.७५ मी. पर्यंतही ते चढल्याची नोंद आहे. यामुळे विस्तीर्ण प्रदेश नेहमीच जलमय होतो, पूरतट कोसळतात आणि खेडी व रस्ते पुन्हा उंच पातळीवर बांधावे लागतात.

अपर इराक

ह्यामध्ये टायग्रिस व युफ्रेटीस नद्यांची खोरी व त्या खोर्‍यांमधील आग्‍नेयीच्या बाजूने पसरलेले एक मोठे मैदान येते. इराकमध्ये शिरताना युफ्रेटीसने १६ त १८ किमी. रुंदीचे सपाट खोरे बनविलेले असून उपनद्यांच्या अभावामुळे पात्राचे दोन्ही काठ उंच आहेत. युफ्रेटीस ज्या खडकाळ प्रदेशांतून वाहते तेथे नदीत अनेक धबधबे व द्रुतवाह निर्माण झालेले आहेत.

युफ्रेटीसच्या पूर्वेकडील प्रदेश अधिक मोकळा आहे. टायग्रिस इराकमध्ये शिरताना बरीच अनियमित वळणे घेते. काही काही ठिकाणी तिचा प्रवाह वायव्य-आग्‍नेय वाहतो. तर बर्‍याच ठिकाणी तो दक्षिणेकडे अरुंद घळीमधून वाहतो. म्हणूनच अपर टायग्रिसच्या प्रदेशांच्या स्वरूपात बराच बदल झालेला जाणवतो. ती आग्‍नेयीकडे वाहू लागली म्हणजे तिच्या पश्चिमेकडील काठावर उंच चढणीचे डोंगर, तर पूर्वेकडील बाजूस विस्तीर्ण मोकळा प्रदेश, असे दृश्य दिसते.

तिक्रितपासून दक्षिणेकडे टायग्रिस सपाट मैदानावरून वाहते.

युफ्रेटीस व टायग्रिस या नद्यांमध्ये व उत्तरेकडे जेबेल सिंजार पर्वताने वेढलेला अल् जाझिरा हा अनेक चढउतार असलेल्या स्टेपीचा, लहान घड्या असलेला व झाकलेल्या अपवाह-द्रोणीचा प्रदेश आहे. हा पुढे सिरिया व जॉर्डनमध्येही जातो. ह्यांमधील सर्वांत मोठी अपवाह-द्रोणी वाडी अल् थार्थार ही असून ती पूर्वी चराऊ कुरणासाठी वापरात होती; आता ती टायग्रिस पूर नियंत्रण प्रकल्पाचाच एक भाग बनलेली आहे.

३अ‍ॅसिरिया व इराकी कुर्दिस्तान

पूर्वेकडून टायग्रिसच्या समोरील बाजूने तुर्कस्तानची सरहद्द आणि टायग्रिसच्या दियाला उपनदीचे खोरे यांच्यामधील प्रदेश आयताकृती असून तो नदीच्या पातळीपासून पूर्वेकडील बाजूस वरवर चढत गेलेला आहे.

जेबेल हॅमरिन हा सु. ४८८ मी. उंच असून त्याच्या पाठीमागे चढउतार असलेली नदीद्रोणी, वलित पठारे व कमीअधिक उंचीचे डोंगर असून, ते पुढे झॅग्रॉस पर्वतश्रेणीत मिळून जातात. पश्चिमेकडील कमीअधिक उंचीचा भाग हा ग्रेट झॅब व लिटल्‌ झॅब ह्या नद्यांच्या खोर्‍यांनी तुटलेला असून तोच प्राचीन अॅसिरियाचा प्रदेश होय. त्याच्याही पूर्वेस उत्तुंग पर्वतांची व कड्यांची रांग वायव्य-आग्‍नेय दिशेला गेलेली आहे.

मोसूलच्या मैदानातून प्रामुख्याने ग्रेट झॅब ही नदी वाहते. या मैदानात २१३ मी. ते ६०९ मी. उंचीचे अनियमित डोंगराळ प्रदेश आढळतात. या मैदानातील अतिशय सुपीक जमिनीमुळे हा प्रदेश प्राचीन अ‍ॅसिरियाचे धान्याचे प्रमुख कोठार समजले जात होते. याच प्रदेशात निनेव्ह, निमरूद व खोर्साबाद ही राजधान्यांची शहरे होऊन गेली. या प्रदेशात पिकणारा गहू हा सर्व इराकमध्ये सर्वोत्कृष्ट समजला जातो.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate