অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इराण

इराण

पश्चिम आशियातील एक इस्लामी राष्ट्र. क्षेत्रफळ १६,४८,०००चौ. किमी. ; लोकसंख्या ३,०१,५१,२७५ (१९७१ अंदाज). सीमांची लांबी ४,४१८ किमी. विस्तार २५० उ. ते ४०० उ. आणि ४४० पू. ते ६३० पू. ; इराणच्या उत्तरेस रशिया वा कॅस्पियन समुद्र, पूर्वेस अफगाणिस्तान व पाकिस्तान, दक्षिणेस इराणचे व ओमानचे आखात आणि पश्चिमेस इराक व तुर्कस्तान हे देश आहेत. इराणच्या आखातातील हॉर्मझ, लाराक, किश्म, हेंगाम, फोरूर, क्वैस, हेंडोराबी, शेखसार, शेख शोएब, खार्क व खार्कू अशी अनेक बेटे इराणच्या मालकीची असून बहरीन बेटांवरही तो आपला ताबा सांगतो. १९३५ पासून हा देश पर्शियाऐवजी इराण म्हणून ओळखला जाऊ लागला.

भूवर्णन

इराणी पठाराचा पश्चिमेकडील दोन तृतीयांश भाग इराण देशाने व्यापला असून, हे पठार म्हणजे आल्प्स-हिमालय ह्या वलीकृत पर्वतश्रेणींचा एक महत्त्वाचा भाग समजले जाते. कुह-इ-दिनारमध्ये तसेच झॅग्रॉस पर्वतराजीत आढळणारे तांबड्या व हिरव्या रंगांचे शैल हे कॅंब्रियन युगातील मानतात. जुना तांबडा वालुकाश्म वायव्य, उत्तर व पूर्व इराणमध्ये पुष्कळ प्रमाणात सापडतो. टेथिस समुद्राखाली हा प्रदेश प्राचीन काळी असताना, ह्या वालुकाश्माचे जाड, काळ्या कार्बनयुक्त चुनखडीत रूपांतर झालेले होते. ट्रायासिक काळात सामुद्रीय अवसादन झाले होते. लोअर जुरासिक काळात झॅग्रॉसमध्ये मोठ्या प्रमाणात चुनखडीचे साठे उपलब्ध होते.

एल्बर्झ पर्वतातही लाव्हारसाचे उद्रेक झालेले होते. इराणमधील बाख्तियारी पर्वतसमूह, उंचावलेले आखातीय किनारे आणि भ्रंशरेखा, यांवरून मुख्य पर्वतराजी फ्लायोसीन युगातीलच दिसतात. फ्लायोसीन युगात आझरबैजान (कुह-ए-साबालान, कुह-ए-सहांद पर्वत), एल्बर्झ (डेमॅव्हेंड पर्वत), केरमान (कुह-ए-हाझारान, कुह-ए-लालेह झार पर्वत) व बलुचिस्तान (कुह-ए-ताफ्तान, कुह-ए-बाझमान) या ठिकाणी ज्वालामुखीक्रिया घडल्याचे आढळते. अजूनही इराणमध्ये भूकंप होतातच. पश्चिमेस व आग्‍नेयीस पर्वतराजी रुंदावलेल्या असून त्यांना झॅग्रॉस पर्वतश्रेणी असे संबोधतात. सरासरी २,४४० ते ३,०५० मी. पासून ३,६६० ते ३,९६० मी. पर्यंत उंच पर्वतशिखरे या श्रेणीत आढळतात.

उत्तरेकडील एल्बर्झ पर्वतराजीत डेमॅव्हेंड ५,६६२ मी. व आलम कूह ४,८३६ मी. ही सर्वोच्च शिखरे आहेत. अंतर्भागात मोठे पठार असून विस्तीर्ण दऱ्या तसेच घळ्या आहेत. पर्वतरांगा वायव्येकडून आग्‍नेयीकडे पसरलेल्या आहेत. पूर्वेकडे, उत्तर-दक्षिण असा एक मार्ग इराणी पठार व अफगाण-बलुची पठार ही एकमेकांपासून अलग करतो. वायव्येपासून आग्‍नेयीकडे दर्‍या व घळ्या यांची उंची १,२२०-१,८२० मी. पासून ४५६-३०० मी. इतकी खाली येते. झॅग्रॉस व एल्बर्झ पर्वतश्रेणी इंग्रजी ‘व्ही अक्षराप्रमाणे पसरलेल्या आहेत.

एल्बर्झ पर्वतश्रेणी व बलुचिस्तान यांमध्ये मोठी वाळवंटे आहेत. त्या भागाच्या वायव्येस-दश्त-इ-कावीर व आग्‍नेयीस दश्त-इ-लूत या दोन्ही वाळवंटांच्या दरम्यान अनेक मरूद्याने आहेत. त्यांपैकी ताबास हे सर्वांत प्रसिद्ध आहे. आरास, साफिद रूद, आत्रेक ह्या नद्या उत्तरेकडील पर्वतांतून, तर पश्चिमेकडील पर्वतांतून कारखेह, देझ, कारून व मांड ह्या नद्या उगम पावतात. अंतर्भागातून कारासू, रूद ए कूम, झायांदेह रूद, कोर, कालशूर ह्या नद्या उगम पावतात. हंगामी प्रवाहही पुष्कळ आहेत. कारून हीच काय ती वाहतुकीस योग्य (११२ किमी. पर्यंत) नदी आहे. इतर नद्या अतिशय उंचीवरून खाली वहात येत असल्यामुळे त्यांचा वाहतुकीस उपयोग नसला, तरी त्यांच्या जोरावर वीज निर्माण केली जाते. उर्मिया सरोवर, कॅस्पियन, इराणचे आखात व मध्य वाळवंट यांकडे नद्या वहात जातात.

इराणचे भूरचनेच्या दृष्टीने भाग

आझरबैजान

हा प्रदेश भ्रंशित भूमिखंड व खोरी ह्यांनी बनला आहे. खोऱ्यांतून वहात गेलेले पाणी पुढे उर्मिया ह्या उथळ व खाऱ्या सरोवरास जाऊन मिळते. बाकीचे पाणी आरास, लिटल् झॅब व किझिल उझुन ह्या नद्यांतून जाते. भौगोलिकदृष्ट्या आझरबैजानचा प्रदेश म्हणजे पूर्व अ‍ॅनातोलिया, ट्रान्स कॉकेशिया व इराणचा अंतर्भाग ह्यांमधील संक्रमणप्रदेश समजला जातो. एकेकाळी हा प्रदेश युद्धभूमीचे केंद्र होता. याच भागात कुह-ए-साबालान हे ज्वालामुखीशिखर (४,५७२ मी.) आहे. आझरबैजानमधील हिवाळे अतिशय कडक व हिमयुक्त, तर उन्हाळे उष्ण व शुष्क असतात. येथील पठारांवर उत्तम कुरणे असल्यामुळे तेथे भटक्या टोळ्यांचे-कुर्द व शाहसेवान-प्राबल्य आढळते. उर्मिया सरोवराच्या सभोवतालचे सपाट मैदानी प्रदेश जलसिंचित असून दाट लोकवस्तीचे आहेत. ताब्रीझ हे शहर उर्मियाच्या दलदली किनार्‍यापासून ५६ किमी. असून ते इराणचे दुसर्‍या क्रमांकाचे शहर, मोठी बाजारपेठ व मार्गकेंद्र आहे.

झॅग्रॉस पर्वत

हा जुरासिक काळातील आहे आझरबैजानच्या सरहद्दीपासून बंदर आब्बासच्या ईशान्येपर्यंत तो १,४०७ किमी. लांब पसरलेला असून, त्याची रुंदी ३२१ किमी. आहे. उत्तरेस ही पर्वतराजी फार उंच नसली, तरी देझ दरी व शीराझच्या ईशान्येपर्यंतच्या भागामध्ये तिची उंची ४,२६७ मी. असून पुढे ती दक्षिण फार्स व लुरिस्तानपर्यंत गेलेली आहे. हिवाळी हिमवर्षाव आणि विपुल झरे यांमुळे येथील नद्यांना बारमहा भरपूर पाणी असते.

बगदाद-तेहरान यांमधील केरमानशाह मार्गावर आणि बूशीर-शीराझ मार्गावर महत्त्वाची शहरे वसली आहेत. खोरामाबादमधून एक चांगला रस्ता जातो; ट्रान्स-इराणियन लोहमार्ग देझ घळईतून गेलेला आहे. नैर्ऋ‌त्य झॅग्रॉसच्या पायथ्याशी तेल सापडले असून लाली (कारून नदीवरील) आणि गख सारान यांमधील भागांत तेलउत्पादन होते.

मकरान

हा किनारीय प्रदेश मैदानी व काही ठिकाणी डोंगराळ असून ह्या डोंगराळ भागाचा एक फाटा बंदर आब्बासच्या पूर्वेस उत्तर-दक्षिण गेलेला आहे; तेथून तो पुढे पूर्वेस वळून नैर्ऋ‌त्य पाकिस्तानात जातो. हा प्रदेश अतिशय रुक्ष असून तेथे वनस्पती तुरळक आहेत. किनारीय मैदानी प्रदेशच लागवडीस आणतात. मासेमारी हा येथील एक प्रमुख व्यवसाय आहे; माशांची निर्यातही करतात. अंतर्भागातील दर्‍यांमधून खजुरीचे पीक काढतात.

उत्तर सीमा प्रदेश

यात एल्बर्झ पर्वत व खोरासानच्या सीमावर्ती पर्वतरांगा येतात. एल्बर्झ पर्वतराजी कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील किनार्‍यासभोवती तुटक वर्तुळाकार पसरली आहे. यांमधील कित्येक शिखरे ५,६०० मी. पर्यंत उंच आहेत. कॅस्पियनचा मैदानी प्रदेश सर्वत्र ८० किमी. रुंद असून तो दलदलीच्या खारकच्छ किनार्‍यापासून उंचावत गेला आहे. पूर्वीचे घनदाट अरण्य बरेचसे तोडण्यात आले आहे. येथील उष्ण व दमट हवामान भात, तंबाखू, कापूस, लिंबू जातीची फळे व चहा अशा विविध पिकांना अतिशय अनुकूल आहे.

हा इराणमधील सर्वाधिक लोकवस्तीचा प्रदेश आहे. पूर्वेकडे एल्बर्झ पर्वतराजी उंचीला कमी कमी होत जाऊन शेवटी  ५६ पू. येथे ती आग्‍नेयीला वळते. तेथून खोरासान पर्वतश्रेणी सुरू होते. तिच्यात कुह-इ-आलादाघ आणि कुह-इ-बिनालूद (३,४१३ मी.) तसेच कोपेतदा (३,०४८ मी.) ही पर्वतशिखरे आहेत. यांमधील विस्तीर्ण खोऱ्यांतून मोठ्या प्रमाणावर शेती करतात, तर उंच भागांचा उपयोग चराऊ कुरणांसाठी होतो. मेशेद हे शहर याच भागात वसले असून ते इराणचे एक धान्याचे कोठार त्याचप्रमाणे धार्मिक स्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे.

मध्य पठार

हा अल्पजल प्रदेश आहे. कूम शहराच्या पश्चिमेकडून येझ्द व केरमान ह्यांना ओलांडून सरहाद-ए-बालामध्ये घुसणाऱ्या पर्वतमालिकेला मध्य इराणी पर्वतश्रेणी म्हणतात. इतरही अशाच मोठ्या पर्वतश्रेणी आहेत. उदा., तब्बास-केरमान व कुहिस्तान-सरहाद. या पर्वतश्रेणी बलुचिस्तानच्या पर्वतराजीस मिळतात. दश्त-इ-लूत व दश्त-इ-कावीर ही दोन मोठी वाळवंटे या भागत असून त्यांनी ९८,४२० चौ. किमी. प्रदेश व्यापला आहे. हा प्रदेश ओसाड व निर्मनुष्य आहे. दश्त-इ-लूत हे वाळवंट खडकाळ आहे. दश्त-इ-कावीरमध्ये मिठाचे कणही बर्‍याच प्रमाणात आहेत. वायव्य भागात तेहरान, काझ्वीन, कूम, माहालात, इस्फाहान, नीशापूर यांसारखी अतिशय मोठी मरूद्याने आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate