অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑस्ट्रिया

ऑस्ट्रिया

मध्ययूरोपातील प्रजासत्ताक राष्ट्र. ४६° २२' उ. ते ४९° १' उ. व ९° २२' पू. ते १७° १०' पू.; दक्षिणोत्तर अंतर पूर्वेकडे सु. २९५ किमी., पश्चिमेकडे फक्त ६४ किमी.; पूर्व-पश्चिम जास्तीत जास्त अंतर सु. ५८० किमी.; क्षेत्रफळ सु. ८३,८४९ चौ. किमी.; लोकसंख्या ७४,४३,८०९ (१९७१). राजधानी व्हिएन्ना.

देशाच्या सरहद्दीची लांबी सु. २,६२७ किमी. असून उत्तरेस पश्चिम जर्मनी व चेकोस्लोव्हाकिया, पूर्वेस चेकोस्लोव्हाकिया व हंगेरी, दक्षिणेस यूगोस्लाव्हिया व इटली आणि पश्चिमेस लिख्टेनश्टाइन व स्वित्झर्लंड हे देश आहेत. या देशाला सागरी सरहद्द नाही.

भूवर्णन

यूरोपात स्वित्झर्लंडच्या खालोखाल डोंगराळ देश म्हणून ऑस्ट्रियाची गणना होते. या देशाचा पश्चिम व दक्षिण भाग बव्हंशी आल्प्स पर्वताच्या पूर्वेकडील श्रेणींनी व्यापलेला आहे. या भागाची सर्वसाधारण उंची ९०० मी. पेक्षा अधिक असून पूर्वेकडे व ईशान्येकडे ती कमी होत जाऊन तो भाग टेकड्यांचा बनलेला आहे. व्हिएन्नाजवळचा सखल प्रदेश सु. ९६ किमी. लांब व ३२ किमी. रुंद आहे.

आग्नेय भागात बरेच ऊन पाण्याचे व खनिजयुक्त झरे आहेत. ग्रोस ग्लॉकनेर हे होए टाऊअर्न डोंगराचे शिखर (३,७९८ मी.) सर्वांत जास्त उंच आहे, तर पूर्व सरहद्दीजवळ नॉइझीडलर हे सरोवर फक्त ११५ मी. उंचीवर आहे. ब्रेनर, झेमेरिंग, आर्लबर्ग, श्प्लुगेन इ. अनेक खिंडींमुळे वाहतूक सुलभ झाली आहे.

डॅन्यूब नदीकाठचा चिंचोळा भाग व पूर्व सरहद्दीजवळचा हंगेरिअन मैदानाकडील सखल प्रदेश, डॅन्यूबच्या उत्तरेकडील बोहीमियाच्या पठाराचा प्रदेश व दक्षिणेकडील पूर्व आल्प्स पर्वतीय भाग, असे ऑस्ट्रियाचे स्वाभाविक विभाग पडतात.

डॅन्यूब ही मध्य यूरोपातील प्रसिद्ध पूर्ववाहिनी नदी जर्मनीमध्ये उगम पावून जर्मनी, ऑस्ट्रिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, यूगोस्लाव्हिया व रुमानिया या देशांतून वाहात जाऊन काळ्या समुद्रास मिळते. ही नदी ऑस्ट्रियात ३४७ किमी. वाहते. ती वायव्य भागातून प्रवेश करते व उत्तर भागातून जाऊन व्हिएन्नामार्गे पूर्वेस चेकोस्लोव्हाकियात शिरते. तिला पर्वतीय भागातून इन, एन्स, झाल्त्साक, मूर्त्स, लेख, राबॉ, मूर, द्रावा इ. उपनद्या येऊन मिळतात. पश्चिम सरहद्दीवर थोड्या अंतरापुरती र्हा,ईन नदी वाहते. हिमानी क्रियेमुळे बनलेली सु. २०० सरोवरे या देशात आहेत. त्यांत पूर्व सरहद्दीवरील नॉइझीडलर हे सर्वांत मोठे आहे.

अर्वाचीन युगामधील घडणीमुळे व हिमानी क्रियांमुळे या देशात विविध प्रकारचे खडक व खनिजे भूपृष्ठानजीक आढळतात. डॅन्यूब नदीच्या बाजूस चुनखडीचे खडक तसेच ईशान्येस बोहीमियाचे पठाराच्या पायथ्यानजीक खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळतात. आल्प्स पर्वत व हंगेरीच्या मैदानाची सरहद्द येथे दगडी कोळसा मिळतो.

मॅग्नेसाइट, ग्रॅफाइट यांचे उत्पादन सर्वांत अधिक होत असून शिसे, जस्त, तांबे आणि मीठ यांचे उत्पादन त्या खालोखाल आहे. यूरोपात रुमानियाच्या खालोखाल या देशाचे खनिज तेलाचे उत्पादन आहे आणि औद्योगिक प्रगतीच्या दृष्टीने खनिज संपत्तीचा व शक्तिसाधनांचा पुरवठा भरपूर आहे. त्यात जलविद्युत् पुरवठ्याचा भाग मोठा असून त्यात वाढ होण्यास अद्याप वाव आहे.

हवामान

ऑस्ट्रिया अटलांटिक महासागरापासून ८०० किमी. पेक्षा अधिक दूर असल्यामुळे व दक्षिणेकडे पर्वतमय प्रदेश असल्यामुळे त्याचे हवामान खंडातर्गत स्वरुपाचे आहे. उन्हाळा व हिवाळा यांच्या तपमानांत बराच फरक आढळतो. जानेवारीचे सरासरी तपमान - १३° से. पर्यंत व जुलैचे १८° से. पर्यंत असते. याशिवाय भूरचना व उंची यांचा परिणाम स्थानिक हवामानावर झालेला दिसतो. पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांचाही परिणाम जाणवतो. वृष्टीचे प्रमाण उन्हाळ्यात वाढते व हिवाळ्यात कमी आणि हिमस्वरुपात असते. वृष्टीमध्ये प्रदेशाच्या उंचीप्रमाणे झालेली वाढ स्पष्ट दिसते.

पश्चिमेकडील पर्वतीय भागांत वृष्टी भरपूर, तर पूर्वेकडे ती सरासरी ५० ते ७५ सेंमी. पर्यंत होते. ६०० मी. उंचीवरील प्रदेश जानेवारीत व फेब्रुवारीत हिमाच्छादित असतात. भूमध्यसामुद्रिक हवामानाची छटा इटलीकडील सरहद्दीच्या बाजूस थोडीशी आढळते. तसेच तिकडून येणारे फॉनसारखे वारे दऱ्याखोऱ्यांतील तपमान उबदार करण्यास मदत करतात. द्राक्षाच्या बागायतीस त्यांची चांगलीच मदत होते. पुष्कळ ठिकाणी तपमानाची विपरीतता म्हणजे दरीच्या तळाशी थंड हवा व उतारावर उबदार हवा दिसून येते.

वनस्पती

देशाच्या एकूण क्षेत्राच्या ३७% क्षेत्र अरण्यांनी व्यापलेले असून त्यापैकी ८४% भाग सूचिपर्णी वृक्षांचा, विशेषतः स्प्रूसचा आहे. त्याखालोखाल बीचचे रुंदपर्णी वृक्ष आहेत. पर्वतांच्या पायथ्यापासून वरपर्यंत वेगवेगळे वृक्ष आढळतात. पायथ्यापासून १,२०० मी. पर्यंत बीच, बर्च आणि ओक यांसारखे रुंदपर्णी पानझडी वृक्ष, तर त्यापेक्षा जास्त उंचीवर फर आणि स्प्रूस यांसारखे सूचिपर्णी वृक्ष आढळतात.

एकंदरीने मिश्र अरण्यांच्या या प्रदेशात सूचिपर्णी वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. उंचीप्रमाणे पानझडी वृक्षांकडून सूचिपर्णीकडे व नंतर लहान झुडपांपासून अगदी खुरट्या गवतापर्यंत वनस्पति प्रकार आढळतात. अगदी उंचावर टंड्रासारखी वनस्पती आहे. ऑस्ट्रियामध्येही ठराविक उंचीवर असणाऱ्या कुरणांचा मेंढपाळीच्या स्थलांतरित व्यवसायास फार उपयोग होतो. पर्वताच्या दक्षिणाभिमुखी बाजूवर सूर्यप्रकाश अधिक मिळत असल्यामुळे उत्तराभिमुखी बाजूपेक्षा तेथे वनस्पतीचे आच्छादन जास्त असते. व्हिएन्नाच्या आसपासचा भाग स्टेप प्रकारचा आहे. उत्तम प्रकारचे नरम लाकूड पुरविणाऱ्या देशांत कॅनडा, स्वीडन व फिनलंड यानंतर ऑस्ट्रियाचा क्रमांक लागतो.

प्राणी

आल्प्स पर्वतीय भागांत अस्वल, शामॉय हरिण व रानबकरे यांसारखे प्राणी आहेत. आयबेक्स व मॉर्माट दुर्मिळ होत आहेत. डॅन्यूब नदीच्या व सरोवरांच्या काठी कॉर्‌मोरंट, हेरॉन, करकोचे, बगळे, बदके, टार्मिगन हे पक्षी आढळतात; परंतु सोनेरी गरुड नामशेष झाला आहे. शिकारीवर कडक निर्बंध असले, तरी एकूण प्राण्यांची संख्या कमी झालेली आहे. सरोवरांतूनदेखील मासे मोठ्या प्रमाणावर मिळत नाहीत. गुरे व मेंढ्या हे पाळीव प्राणी मात्र भरपूर आहेत.

इतिहास

यूरोपच्या चौरस्त्यावरील या देशाचे व डॅन्यूब खोऱ्याच्या तोंडाशी व्हिएन्नाचे स्थान आणि प्रदेश डोंगराळ असला तरी अनेक खिंडींतून शेजारच्या देशांशी होणारे सुलभ दळणवळण, यांमुळे प्राचीन काळापासून या देशाला यूरोपात महत्त्वाचे स्थान आहे. इसवी सनाच्या सुरुवातीस रोमनांनी हा देश जिंकला, तेव्हा तेथे केल्ट व सुएबी लोकांची वस्ती होती. पाचव्या शतकानंतर हूण, ऑस्ट्रोगॉथ, लोंबार्ड व बव्हेरियन यांनी येथील रोमन प्रांत उद्ध्वस्त केले. सातव्या शतकाच्या सुरुवातीस स्लाव्ह लोकांनी हल्लीचा स्टिरिया, लोअर ऑस्ट्रिया व कॅरिंथिया हे भाग व्यापले. ७८८ मध्ये शार्लमेनने हा देश जिंकला. त्याने पूर्वेकडील प्रदेशाचा बंदोबस्त केला व वसाहतीस उत्तेजन दिले. ख्रिस्ती धर्मप्रसारास जोर चढला. शार्लमेननंतर पूर्वभाग मोरेव्हियन व नंतर मग्यार लोकांकडे गेला.

पहिला ऑटो याने तो ९५५ मध्ये जिंकून बव्हेरियाला जोडला. ९७६ मध्ये तो लीओपोल्ड ऑफ बॅबेनबर्गकडे आला. हा पहिल्या ऑस्ट्रियन घराण्याचा संस्थापक होय. पुढे पहिला फ्रीड्रिख याने या प्रदेशाला 'डची' चा दर्जा दिला. ११९२ मध्ये स्टिरियाही बॅबेनबर्गकडे आला.

अकराव्या व बाराव्या शतकांत ऑस्ट्रियात सरंजामशाही सर्वांत प्रबल झाली व त्याच काळात डॅन्यूब नदीचे व्यापारी महत्त्व वाढून तिच्या काठी अनेक शहरे उदयास आली. बॅबेनबर्गनंतर बोहीमियाच्या राजाने लोअर व अपर ऑस्ट्रिया, स्टिरिया, कॅरिंथिया व कार्निओला हे भाग घेतले. तेव्हा जर्मन राज्यप्रमुखांनी १२७२ मध्ये हॅप्सबर्गच्या रुडॉल्फला राजा निवडले. रुडॉल्फने वरील सर्व प्रदेश परत जिंकून घेतले.

येथपासून हॅप्सबर्ग घराण्याचा प्रभाव यूरोपवर प्रस्थापित झाला. पुढे पवित्र रोमन साम्राज्याचे राज्यकर्तेही याच घराण्यातून निवडले जाऊ लागले. तथापि राजकीय अस्थिरता नेहमीच असे. सोळाव्या शतकातील व्यापारी क्रांतीमुळे जुने व्यापारी मार्ग आणि टायरोल, कॅरिंथिया येथील सोन्याचांदीच्या खाणी यांचे महत्त्व कमी झाले. कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथीयांचे वर्चस्वाचे प्रयत्न वाढले.

टायरोलमध्ये प्रॉटेस्टंटांच्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांच्या लढ्याने थोडे अंग धरले, परंतु तो लढा चिरडण्यात आला. दुसरा फर्डिनँड याच्या कारकीर्दीत प्रॉटेस्टंटविरोधी धोरणामुळे 'तीस वर्षांच्या युद्धा' ला एक कारण मिळाले. राज्यसत्ता व कॅथलिक धर्मसत्ता एक होऊन राज्यसत्ता नष्ट होईपर्यंत ती युती टिकली. बोहीमिया व मोरेव्हिया हे ऑस्ट्रियाचेच भाग बनले आणि वेस्टफेलियाच्या तहानंतर पवित्र रोमन साम्राज्य नाममात्र राहून हॅप्सबर्ग साम्राज्य प्रबळ झाले.

स्पेनचा सहावा चार्ल्‌स याने आपली मुलगी माराया टेरीसा हिच्यासाठी हॅप्सबर्गचा प्रदेश मिळविला. तिचा नवरा पहिला फ्रान्सिस हा १७४५ मध्ये बादशहा झाला. परंतु खरी सत्ता मारायाच्या हाती होती. प्रशियाचा दुसरा फ्रीड्रिख याच्याशी तिचा दीर्घकाळ लढा झाला. जर्मन भूमीच्या स्वामित्वासाठी ऑस्ट्रियन वारसा युद्ध व सप्तवार्षिक युद्ध ही लढली गेली. मारायाने पूर्वेकडील साम्राज्य वाढविले. सरदारांचे महत्त्व कमी करुन त्यांना नोकरशाहीत गुंतविले आणि केंद्रसत्ता बळकट केली. तिच्यानंतर तिच्या मुलाने तिचेच धोरण पुढे चालविले.

इतस्ततः विखुरलेल्या आपल्या प्रदेशांचे केंद्रीकरण व जर्मनीकरण करण्यास सार्वत्रिक विरोध झाला. त्याच्यानंतर ऑस्ट्रियातील उच्च वर्गाचे लोक सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या वरचढ होऊ लागले. अठराव्या शतकात ऑस्ट्रियात संगीत व वास्तुकला यांची चांगली प्रगती झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस आधुनिक ऑस्ट्रियन साहित्याचा उदय झाला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate