অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्रीस

ग्रीस

(हेलास किंवा एलास). यूरोपच्या बाल्कन द्वीपकल्पातील दक्षिणेचा प्राचीन देश; क्षेत्रफळ १,३१,९८६ चौ.किमी. लोकसंख्या ८७,६८,६४१ (१९७१). विस्तार ३४० ४८’ ०२’’ उ. ते ४१० ४४’ ५९’’ उ. आणि १९० २२’ ४१’’ पू. ते २९० ३८’ २७’’ पू. यादरम्यान. याच्या दक्षिणेस भूमध्य, पूर्वेस इजीअन व पश्चिमेस आयोनियन समुद्र असून वायव्येस अल्बेनिया, उत्तरेस यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया आणि ईशान्येस व पूर्वेस तुर्कस्तान आहे.

याचा सु. २५,२o५ चौ.किमी. भाग बेटांनी व्यापलेला असून त्यांत सिक्लाडीझ, डोडेकानीझ, स्पॉरडीझ व आयोनियन हे द्वीपसमूह व क्रीट (८,३३१ चौ.किमी.), यूबीआ, लेझ्बॉस, रोड्झ, कीऑस, सेफालोनिया, कॉर्फ्यू व सेमॉस ही मोठी बेटे समाविष्ट आहेत. अथेन्स ही राजधानी असून ग्रेटर अथेन्सची लोकसंख्या २५,४o,२४१ (१९७१) आहे.

भूवर्णन

डोंगराळ प्रदेश, दंतुर किनारा व त्याभोवती असंख्य बेटे हे ग्रीसचे वैशिष्ट्य आहे. पिंडस, ऑलिंपस इ. पर्वतरांगा आणि त्यांची ऑलिंपस २,९७२ मी. व इतर २,४६o मी. पर्यंत उंचीची शिखरे विख्यात असून सर्वत्र पसरलेल्या पर्वतराजींमधून बिओशियातील सपाट्या किंवा आर्केदीआतील खोरी यांसारखे बंदिस्त खोलगट भाग आहेत. सलग मैदानी मुलूख फक्त थेसाली, मॅसिडोनिया आणि थ्रेस या प्रांतांत आढळतो.

पश्चिम ग्रीसमध्ये पिंडस पर्वत किनाऱ्याला समांतर असल्याने तो किनारा काहीसा एकसंध व सलग आहे. उलट पूर्वभागात डोंगरांच्या रांगा किनाऱ्याशी काटकोन करीत असल्याने हा किनारा इतका ठिकठिकाणी तुटलेला व बेटांनी वेढलेला आहे, की असा किनारा यूरोपमध्ये अन्यत्र कोठेही नाही. सर्व महत्त्वाची बंदरे याच किनाऱ्याला आहेत आणि या बाजूच्या इजीअन समुद्रात यूरोप-आशिया दरम्यान सु. २,ooo बेटे विखुरलेली आहेत. थेसाली आणि मॅसिडोनियाचे काही भाग वगळल्यास ग्रीसचा कोणताही प्रदेश समुद्रापासून ११२ किमी. हून दूर नाही.

देशाचे नैसर्गिक विभाग थ्रेस, मॅसिडोनिया, ईपायरस, थेसाली, मध्य ग्रीस, पेलोपनीसस आणि बेटे हे आहेत. ईशान्येकडील थ्रेस आणि उत्तरेचा मॅसिडोनिया हे जवळजवळ सर्वस्वी डोंगराळ प्रदेश; त्यातून अल्बेनिया, यूगोस्लाव्हिया व बल्गेरियात जाणाऱ्या डोंगराच्या रांगांत वार्दर, स्त्रूमा, नेस्तॉस व मरित्स या चार मोठ्या नद्यांची खोरी आहेत. या नद्यांच्या मुखांशी विस्तृत सपाट प्रदेश आहेत.

मुख्य बंदरे तुर्कस्तानच्या सीमेपाशी ॲलेक्झँड्रूपलिस, इजीअनच्या उत्तर किनाऱ्याच्या मध्यावर कव्हाल आणि वार्दर नदीमुखाशी बाल्कन पार्श्वप्रदेशातील मालवाहतुकीचे महाद्वार सलॉनिक (थेसालोनायकी) ही होत. ईपायरस विभाग पिंडस पर्वताच्या पश्चिमेला आहे. ईपायरसच्या आयोनियन किनाऱ्यावर अनेक लहान लहान सपाट भूभाग आणि अंतर्भागात योआनीना भोवतालच्यासारखे काही पर्वतवेष्टित सुपीक खोलगट भूभाग आहेत. तथापि बहुतेक प्रदेश खडकाळ, रस्ते फार थोडे व देशाच्या इतर भागाला जोडणारे लोहमार्गही नाहीत. थेसाली हा पर्वतवेष्टित प्रदेश देशाच्या पूर्वमध्य विभागात इजीअन समुद्राकाठी येतो. पिंडस पर्वताने ईपायरसपासून आणि ऑलिंपस पर्वताने थ्रेसपासून थेसाली विभक्त केला आहे.

मॅसिडोनियाप्रमाणेच सुपीक व विस्तृत अशा थेसालीच्या मैदानी प्रदेशात देशातल्या अन्य कोणत्याही भागापेक्षा अधिक प्रमाणात शेती चालते. पिनीअस नदीवरचे लारीस हे प्रदेशातले प्रमुख शहर आणि व्हॉलॉस हे मुख्य बंदर आहे. थेसाली आणि ईपायरसच्या दक्षिणेस आणि कॉरिंथ आखाताच्या उत्तरेस मध्य ग्रीस हा विभाग आहे. ग्रीसची राजधानी अथेन्स व तिचे बंदर पायरिअस या विभागात आहे. थीब्झ, लेव्हादीअ आणि लेमीअ यांची सपाट भूमी चिंचोळ्या पर्वतराजींनी विलग झालेली असून छोट्या घाटरस्त्यांनी जोडलेली आहे. देशातील या प्रदेशाची हवा सर्वांत कोरडी आहे.

दक्षिणेचा पेलोपनीसस प्रदेश पूवी ५-६ किमी. रुंदीच्या कॉरिंथ संयोगभूमीने मुख्य भूमीला जोडलेला होता, तो १८९३ साली कॉरींथचा कालवा पुरा झाल्यावर वेगळा होऊन मोठे बेट बनला. आर्थिक दृष्ट्या यातील सर्वांत निर्मितिक्षम भाग ईशान्येस आहे. प्रदेशाचा पूर्वभाग खडबडीत दगडगोट्यांचा आणि तुरळक उथळ मातीचा असून दक्षिणेतील मेसीन भूशिरभाग मात्र सौम्य हवामानाचा आहे. याचे पट्रॅस हे बंदर वायव्येस आहे.

ग्रीस बेटांपैकी सर्वांत दाट वस्ती आयोनियन बेटांवर आहे. त्यांचे हवामान सौम्य व सागरी आहे. बेटांच्या मध्यवर्ती स्थानामुळे लोकांना दर्यावर्दी व व्यापारी जीवनाची प्रेरणा मिळते. क्रीट हे सर्वांत मोठे ८,३३१ चौ. किमी.; २५६ किमी. लांब व ९ ते ५६ किमी. रुंद असून त्याची लोकसंख्या ४,५६,६४२ (१९७१) आहे. कँडिया व कानीया ही क्रीटची दोन प्रमुख शहरे असून भूमी डोंगराळ व खडकाळ, ओबडधोबड पर्वतांचे उंच कडे सरळ समुद्रात तुटलेले, तर कुठे दोन उंच डोंगररांगांमध्ये लहान सपाट गाळजमिनी, शिखरे बहुधा हिमाच्छादित असे क्रीटचे एकंदर दृश्य भव्य व कठोर निसर्गाचे आहे.

बहुतेक इजीअन बेटे अन्नाबाबत स्वावलंबी नाहीत. पुष्कळसे रहिवासी समुद्रावर मच्छीमारी करून किंवा खलाशी म्हणून उपजीविका करतात; इतर निर्वाहासाठी मुख्य भूमीकडे किंवा परदेशी स्थलांतर करतात. देशातील केवळ चतुर्थांश भूमी शेतीच्या उपयोगी, षष्ठांश वनभूमी आणि बाकीची खडकाळ आहे. खोलगट प्रदेशात व नदीमुखांपाशी गाळमाती, उंचीवर चुनखडीमिश्रित, काही भागात ज्वालामुखीजन्य शिलारसावशेषांची व काही बेटांवर जीर्ण सिकता शिलांची माती आहे.

प्राचीन काळात लॉरियम भागातील चांदी, शिसे व जस्त यांच्या धातुकांनी अथेन्सला वैभव मिळवून दिले होते. तुर्की अंमलात खनिजांची उपेक्षा झाली. एकोणिसाव्या शतकात ग्रीसने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर सहज सापडणाऱ्या खनिजांचे थोडे बहुत उत्पादन झाले, तथापि खनिज संपत्तीची पद्धतशीर पाहणी झाली नव्हती. १९५१ साली ग्रीसच्या प्रदेशाची भूवैज्ञानिक दृष्ट्या शास्त्रीय पाहणी करण्यास सुरुवात झाली.

ज्ञात खनिजांचे साठे : सिक्लायडीझ, मध्य ग्रीस व क्रीटमध्ये लोहधातुक; यूबीआ व मध्य उत्तर ग्रीसमध्ये क्रोमाइट; मध्य ग्रीस, यूबीआ व आमॉर्गस (सिक्लाडीझ) मध्ये बॉक्साइट; नॅक्सॉस (सिक्लाडीझ) मध्ये लोह पायराइट व एमेरी; मीलॉसमध्ये बॅराइट; मध्य ग्रीस व थर्मासमध्ये शिसे आणि जस्त; यूबीआ व लेझ्बॉसमध्ये मॅग्नेसाइट; मीलॉस व नीसिरॉसमध्ये गंधक; उत्तर ग्रीस व कीऑसमध्ये अँटिमनी व मँगॅनीज आणि यूबीआ, पेलोपनीसस व टॉलेमेइसमध्ये लिग्नाइट कोळसा.

अमेरिकन तंत्रज्ञांच्या साहाय्याने मेसीना, झँटी, कार्दीत्सा चिक्कला आणि थ्रेस या विभागांत खाणी चालू करण्यासारखी तेलक्षेत्रे आढळली आहेत. कमीजास्त प्रमाणात ॲस्बेस्टॉस, संगमरवर, चुनखडी, तांबे व सोने ही खनिजेही ग्रीसमध्ये आहेत.

नद्या, सरोवरे, समुद्र वगैरे

मर्यादित क्षेत्रफळ व अनियमित पर्जन्य या कारणांनी ग्रीसमधील लहानलहान नद्यांच्या पाण्याची शाश्वती नसते. त्यातल्यात्यात जास्त पाणी वर्षभर असणाऱ्या नद्या वार्दर व स्त्रूमा असून त्यांच्या पाणलोटांची विस्तीर्ण क्षेत्रे मध्य बाल्कन प्रदेशात आणि मुखाकडचे भाग तेवढे ग्रीसमध्ये आहेत.

इजीअन समुद्राला ग्रीसमधून मिळणाऱ्या इतर नद्या नेस्तॉस, आलीआक्‌मॉन, पिनीअस व स्पेर्खीऑस, पेलोपनीससमधील सर्वात मोटी नदी युरोतस, कॉर्फ्यू बेटावर मेगॉसी आणि आयोनियन समुद्राला मिळणाऱ्या ॲकिलोअस, आराख्थॉस आणि थीअमिस. चुनखडी प्रदेशातून वाहणारे प्रवाह प्रसंगी विवरांतून लुप्त होतात आणि पाऊस जास्त झाल्यास काही दिवस तळ्यांच्या रूपाने टिकतात.

पर्वतप्रदेशात कित्येक लहान सरोवरे आहेत. उत्तरेखेरीज तिन्ही दिशांना समुद्राने वेढलेल्या या देशाला क्षेत्रफळाच्या मानाने सर्वांत जास्त किनारा लाभला आहे आणि स्त्रूमा, सलॉनिक, कॉरिंथ, मेसीनीया, कीपारिसीया, पागासे, वानित्सा अशा अनेक आखातांनी त्याला विविधता आणली आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate