অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्वातेमाला

ग्वातेमाला

मध्य अमेरिकेतील सर्वांत जास्त लोकसंख्येचे उत्तरेकडील गणतंत्र. क्षेत्रफळ १,०८,८८९ चौ. किमी.; लोकसंख्या ५३,४७,७८७ (१९७१ अंदाज). १३ ४२' उ. ते १७ ४९' उ. व ८८ १०' प. ते ९२ ३०' प. याच्या पश्चिमेस व उत्तरेस मेक्सिको, पूर्वेस ब्रिटिश हाँडुरस, कॅरिबियन समुद्रावरील हाँडुरस आखात व हाँडुरस.

आग्नेयीस एल् साल्वादोर आणि दक्षिणेस पॅसिफिक महासागर आहे. याला कॅरिबियनवर ११२ किमी. व पॅसिफिकवर ३५२ किमी. किनारा आहे. ग्वातेमाला सिटी ही राजधानी आहे.

भूवर्णन

पॅसिफिक किनारपट्टी सु. ८ किमी. रुंद, वाळूचे दांडे व खारकच्छ यांनी युक्त आहे. तिच्यामागे १,००० ते २,५०० मी. उंचीचे पठार आहे. त्यावर मेक्सिकोच्या सीएरा माद्रेचे फाटे आलेले असून ताहूमूल्को (४,२२० मी.), ताकाना (४,०९३ मी.), आकातानांगो (३,९७६ मी.) आणि आग्वा, आतीत्लान, सांता मारीया, फ्यूगो इ. तिसांहून अधिक ज्वालामुखी आहेत. त्यांतील शेवटचे दोन जागृत आहेत. त्यांच्या दरम्यान ज्वालामुखी राखेने भरलेल्या अनेक सुपीक द्रोणी असून अशाच एका द्रोणीत आतीत्लान हे रम्य सरोवर आहे.

या देशात वारंवार तीव्र भूकंप होतात. फेब्रुवारी १९७६ च्या प्रचंड भूकंपात येथे फारच हानी झाली. मध्यवर्ती उंच प्रदेशात कॅरिबियनकडे वाहणाऱ्या नद्यांनी खोल दऱ्या कोरून काढल्या आहेत. ऊसूमासीन्ता नदी मेक्सिकोच्या सीमेवरून वाहते. पोलोचीक नदी ईसाबाल सरोवरास मिळते आणि त्यातून निघणारी दुलसे, दक्षिणेकडील मोताग्वा व उत्तरेकडील सार्सतून या नद्या कॅरिबियनला मिळतात. डोंगराळ व पठारी प्रदेशाने देशाचा सु. दोन तृतीयांश भाग व्यापलेला असून तेथेच सर्वांत जास्त लोकवस्ती आहे.

ईसाबाल सरोवराजवळचा व मोताग्वाच्या मुखाजवळचा सखल प्रदेश प्वेर्तो बार्योस या प्रमुख बंदरामुळेच फक्त महत्त्वाचा आहे. पश्चिमेकडील उंच डोंगरापासून पॅसिफिककडे अनेक छोटे वेगवान प्रवाह जातात. हा डोंगरउतार आणि उत्तरेकडील डोंगरउतार हे शेतीच्या, विशेषतः मळ्यांच्या, दृष्टीने महत्त्वाचे आहेत. उत्तर उतारापलीकडे पेतेन मैदानी प्रदेश हा चुनखडी मंच, विवरे व भूमिगत प्रवाहमार्ग यांनी युक्त आहे. त्यात पेतेन-ईत्सा हे सरोवर, ऊसूमासीन्ताच्या काही उपनद्या व ईशान्यवाहिनी आसूल नदी आहे.

ग्वातेमालाच्या किनारी सखल भागात सरासरी २५ से. ते ३० सें., मध्यवर्ती डोंगराळ भागात सु. २० से. व पर्वतीय भागात १५ से. तपमान असते. पॅसिफिक आणि बाजूच्या उतारावार व डोंगरावर ५०० सेंमी. पर्यंत मोसमी प्रकारचा पाऊस मे ते ऑक्टोबरपर्यंत पडतो. सखल भागात तो कमी पडतो. पठारावर सु. ११० सेंमी. पाऊस पडतो. मोताग्वाच्या मध्यखोऱ्यात पर्जन्यछायाभागात पाऊस कमी पडतो.

कॅरिबियनकडील भागात बारमहा पाऊस असतो. उत्तरेकडील पेतेन प्रदेश उष्ण व आर्द्र हवेचा आहे. त्याच्या दक्षिण भागात २२५ सेंमी. आणि उत्तर भागात १५० सेंमी.पर्यंत पाऊस पडतो. ग्वातेमाला हा सदावासंतिक हवामानाचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मधूनमधून चक्रीवादळेही येतात.

पूर्वेकडील व उत्तरेकडील सखल भागात उष्ण कटिबंधीय दाट वर्षावने आहेत. त्यांत मॉहॉगनी, सीडार, रबर, वाल्सा व इतर कठीण लाकडाचे वृक्ष आहेत. पेतेन भागात काही ठिकाणी सॅव्हाना गवत आढळते. पॅसिफिक सखल भागात व खालच्या उतारावर पानझडी वृक्षाची अरण्ये व काही ठिकाणी सॅव्हाना गवत आहे.

उंचावर ओक, सायप्रस व पाइन वृक्ष आढळतात. आता उंच भागात उंच गवत दिसते. मोताग्वाच्या मध्य खोऱ्यात मरुप्रदेशीय वनस्पती आहेत.ग्वातेमालाच्या भूमीचा ४५% भाग अरण्यांनी व्यापलेला असून त्यापासून लाकूड, अर्क, तेले, डिंक, रंग इ. उत्पन्ने मिळतात. अमेरिकेत च्युइंगमसाठी मुख्य द्रव्य म्हणून वापले जाणारे चिकल येथे मोठ्या प्रमाणात गोळा केले जाते.

र्मडिलो, अस्वल, कायोट, हरिण, खोकड, जॅगुअर, टॅपिर, माकडे, ऑसेलॉट, प्यूमा, मानटी इ. वन्य प्राणी येथे आहेत. इग्वाना, बुशमास्टर, रॅटलस्नेक इ. सरपटणारे प्राणी व सु. ९०० जातीचे पक्षी आहेत. सुंदर मोरपंखी रंगाचा केसाल हा ग्वातेमालाचा पवित्र राष्ट्रीय पक्षी आहे. तो प्रेम व स्वातंत्र्य यांचे प्रतीक असून देशाच्या राजचिन्हात त्याचा समावेश आहे. समुद्रांत व नद्यांत कोळंबी, स्नॅपर, ट्यूना व इतर मासे भरपूर आहेत.

इतिहास

कोलंबसापूर्वी अनेक शतके येथे माया लोकांचे साम्राज्य होते. त्यांची संस्कृती विकसित होती. बाराव्या शतकात त्यांचे अनेक गट होऊन विस्कळितपणा आला. १५२१ मध्ये कोर्तेझने पेद्रो द आल्वारादो याला ग्वातेमालावर पाठविले. त्याला एकजूट प्रतिकार झाला नाही. स्पॅनिशांनी १५२४ ते १५५० पर्यंत संपूर्ण देश जिंकला.

सुपीक जमिनी त्यांनी वाटून घेऊन त्यांवर जित जमातींना गुलाम म्हणून राबविले. तद्देशियांशी गोऱ्यांचा संकर होऊन लादिनो हा मेस्टिझो मिश्रवंशीय वर्ग अस्तित्वात आला व कारभार त्याचे हाती आला. १८२१ मध्ये मध्य अमेरिकेतील स्पॅनिश वसाहतींनी स्वातंत्र्य पुकारले.

१८२३ पर्यंत त्या मेक्सिकन साम्राज्यात होत्या; नंतर त्यांचे मध्य अमेरिका संयुक्त राज्य गणतंत्र स्थापन झाले; ते १८३८ मध्ये मोडले व १८३९ मध्ये ग्वातेमाला गणतंत्र स्थापन झाले. तेव्हापासून काही अपवादकाल सोडून तेथे हुकूमशहांचीच कारकीर्द चालू होती. राफाएल काररेरा हा जुलमी, धर्मवेडा परंतु कुशल प्रशासक होता (१८३८-६५). रस्ते बांधणी, शेतीस प्रोत्साहन व स्थिर शासन हे त्याचे विशेष होते.

१८७३ ते १८८५ ची सुधारणावादी बार्‌यॉस हुकूमशहाची कारकीर्द चर्चसत्ताविरोधी होती. १८९८ ते १९२० ची काब्रेराची कारकीर्द प्रथम सुधारणावादी परंतु नंतर सत्तालोलुपतेची झाली. त्याच्या कारकीर्दीत जर्मन कॉफीमळेवाले प्रभावी झाली व युनायटेड फ्रूट कंपनीला सवलती मिळाल्या. ऊबीको कास्तान्येदा १९३१ ते १९४४ पर्यंत सत्ताधीश होता. डिसेंबर १९४४ च्या निवडणुकीत आरेव्हालो हा शिक्षणप्रेमी निवडून आला.

नवीन सुधारणा, शिक्षण, आरोग्य, मजूर संघटना, कल्याणयोजना आणि राजकीय स्वातंत्र्य हे त्याच्या कारकीर्दीचे विशेष होत. नंतरचा आरबेंझ गुथमान कम्युनिस्ट प्रवृत्तीचा होता. मळेवाल्यांच्या जमिनी त्याने भूमिहीनांस दिल्या, त्याच्या शेतीसुधारणांमुळे लष्करही बिथरले. अखेर अमेरिकेच्या पाठिंब्याने लष्कराने उठाव केला. १९५४ मध्ये आरबेंझने धोरण फिरविले; परंतु बेदिली अनावर होऊन १९५७ मध्ये त्याचा वध झाला.

१९५८ मध्ये जनरल मिगेल यडीगोरास फ्वेंतेस अध्यक्ष निवडला गेला. त्याने शासन प्रबळ केले; परंतु १९६३ मध्ये पुन्हा लष्करी उठाव होऊन तो हद्दपार झाला. नंतरच्या कर्नल आझुर्दिआने काहीशी सुव्यवस्था आणली. १९६६ मध्ये डॉ. मेंडेझ माँतेनेग्रो हा अध्यक्ष म्हणून निवडून आला.

लष्कराने कम्युनिस्टांना दडपले, तरी त्यांचे गनिमी उठाव चालू राहिले व दोन्ही बाजूंनी हत्याकांड चालू राहिले. गनिमांनी जर्मन व अमेरिकन वकिलांना ठार केले. १९७० मध्ये कर्नल कार्लोस आराना ओसोरिओ निवडून येऊन जुलै १९७० पासून त्यांची कारकीर्द सुरू झाली आहे. तथापि बंडाळीचे उद्रेक चालूच आहेत.

राजकीय स्थिती

ग्वातेमाला हे प्रातिनिधिक, लोकशाही गणतंत्र आहे. सध्या १९६६ च्या संविधानाप्रमाणे राज्यव्यवस्था आहे. ती १९३६, ४५, ६५ च्या संविधानांच्या मूलतत्त्वांवर आधारलेली आहे. अध्यक्ष चार वर्षांसाठी प्रत्यक्ष मतदानाने निवडलेला असून तोच शासनप्रमुख व सेनाप्रमुखही असतो. तो देशातच जन्मलेला आणि निदान ४० वर्षे वयाचा असावा लागतो. तो पुन्हा निवडून येऊ शकत नाही. तो मंत्रिमंडळ, लष्करी अधिकारी व देशाच्या ३२ शासकीय विभागांचे गव्हर्नर नेमतो. उपाध्यक्षही लोकांनी निवडलेला असून तो १४ सदस्यांच्या कौन्सिल ऑफ स्टेटचा अध्यक्ष असतो.

हे कौन्सिल अध्यक्षाला व काँग्रेसला (लोकसभेला) साहाय्य देते. प्रत्येक शासकीय विभागाचे दोन प्रतिनिधी लोकसभेवर निवडून येतात. १८ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांस मताधिकार आहे. साक्षरांस मतदान सक्तीचे आहे. निरक्षरांस नगरपालिकेशिवाय इतर कोणत्याही राजकीय अधिकारपदावर जाता येत नाही.

नगरपालिकेचे अधिकारी लोकांनी निवडलेले असतात. सार्वजनिक अधिकारपदावरील अधिकाऱ्यास त्या पदावर येण्यापूर्वीची व ते पद सोडल्यानंतरची आपली सर्व मालमत्ता जाहीर करावी लागते. संविधानाप्रमाणे ग्वातेमालात नागरिकांस शिक्षण, धर्म, प्रवास इ. सर्व प्रकारचे स्वातंत्र्य आहे; परंतु लष्करी हुकूमशहांच्या दीर्घकालीन सत्तेमुळे संविधानाच्या तरतुदी पुष्कळदा कागदावरच राहिलेल्या आहेत. ग्वातेमाला संयुक्त राष्ट्रांचा व त्यांच्या अनेक संस्थांचा सभासद आहे.

मध्य अमेरिका सामाईक बाजारपेठेचा तो महत्त्वाचा घटक आहे. अनेक शेतीविषयक आंतरराष्ट्रीय संघटनांचा तो सभासद आहे. १९५८ मध्ये ग्वातेमाला व हाँडुरस यांच्यात आर्थिक व वाहतुकविषयक बाबतींत करार झाला आहे. मध्य अमेरिकेच्या औद्योगिक संशोधन संस्थेचे कार्यालय ग्वातेमाला सिटी येथे आहे. ब्रिटिश हाँडुरस हा आपलाच प्रदेश आहे, असा ग्वातेमालाचा दावा असून त्या मुद्यावर त्याने ब्रिटनशी सतत मागणी चालू ठेवली आहे व १९६३ मध्ये यासाठी ब्रिटनशी संबंधही तोडले आहेत.

र्वोच्च न्यायालय, सहा अपील न्यायालये, २८ प्राथमिक न्यायालये व बाकी नगरपालिका न्यायालये अशी न्यायव्यवस्था आहे. खास बाबींसाठी वेगळी न्यायालये असतात. सर्वोच्च व अपील न्यायालयांच्या न्यायाधीशांची निवड लोकसभा चार वर्षासाठी करते. ते देशातच जन्मलेले असावे लागतात. सामान्य न्यायालयांचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय नेमते.

१८ ते ५० वर्षे वयाच्या पुरुषांस दोन वर्षे सैनिकी सेवा आवश्यक आहे. सु. ८,६०० सैनिकांचे सेनादल, १०० लोकांचे वायुदल आणि छोटेसे आरमार आहे. २,५०० चे राष्ट्रीय पोलीसदल आहे. लष्करी शिक्षणासाठी शाळा आहे. एल साल्वादोर, हाँडुरस, निकाराग्वा, कोस्टा रीका यांच्याशी ग्वातेमालाचा सामुदायिक संरक्षणकरार आहे. सैन्य शासनात सक्रिय भाग घेते.

आर्थिक स्थिती

ग्वातेमालाची अर्थव्यवस्था एकदोन पदार्थाच्या निर्यातीवर अवलंबून राहत आली आहे. वसाहतकाळात नीळ व कॉकिनील यांची निर्यात होई. ॲनिलीन रंग निघाल्यावर कोको व गवती चहा तेल, सिट्रोनेला तेल यांसारखी अर्कतेले आणि त्यानंतर कॉफी व केळी यांची निर्यात होऊ लागली. आता कापसाचा क्रम केळ्यांच्या वर आहे. ग्वातेमाला कृषिप्रधान देश आहे. ६६% जमीन लागवडीस किंवा चराईस उपयोगी आहे. परंतु १९६९ मध्ये यापैकी निम्मीच उपयोगात होती.

निर्यातक्षम मळे-उत्पादनाखेरीज बाकीची निर्वाहशेतीच आहे. मका, घेवडे, तांदूळ, ऊस, गहू, तंबाखू, मिरच्या, भाजीपाला, फळे यांचे उत्पन्न येते. अंतर्गत बाजारपेठ फार थोडी आहे. पश्चिमेकडे २,८०० मी. उंचीपर्यंत मका होतो. तथापि शेते लहान व उत्पादन अपुरे असते.

मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात अफाट शेतजमिनी, स्पॅनिशवंशीय अल्पसंख्य व युनायटेड फ्रूट कंपनी यांच्याकडे असून त्यांवर भूमिहीन इंडियन शेतमजूर 'प्यून' म्हणून राबतात. कॉफीचे सु. १२,००० मळे आहेत. परंतु ८०% पीक १,५०० मोठ्या मळ्यांतून येते. तेथे ४,२६,००० मजूर काम करतात. अलीकडे यातील काही जमिनी शासनाने घेतल्या आहेत. लहान शेतकऱ्यांच्या साहाय्यार्थ जमीन वाटप व सहकारी शेती यांवर शासनाचा अधिक भर आहे.

द्योगधंदे अद्याप अप्रगत आहेत. कोळसा व तेल यांची शक्ती महाग पडते व जलविद्युत् अद्याप अविकसित आहे. १९६८ मध्ये ४१.१ कोटी किंवॉ. तास विद्युत् निर्माण झाली. साखरशुद्धी व मद्ये हे प्रमुख उद्योग आहेत. पेये, मेणबत्त्या, सिमेंट, रसायने, अन्नप्रक्रिया, घरगुती लाकडी सामान, आगपेट्या, साखर मळी, रबरी वस्तू, पादत्राणे, खांडसरी साखर, कापड, कपडे हे छोटे उद्योग आहेत.

अलीकडे वीजयंत्रे, धातुफर्निचर, विरघळणारी कॉफी, पाश्चरीकृत दूध, प्लॅस्टिक, प्लायवूड, ॲल्युमिनियम, टायर हे लघुउद्योग आहेत. एक शासकीय साखर कारखाना आहे. इंडियनांनी हाती बनविलेल्या खास कौशल्याच्या लोकरी आणि कातडी वस्तू पर्यटक विकत घेतात व काही निर्यातही होतात. आठवड्याचे बाजार, जत्रा येथेच बहुतेक अंतर्गत व्यापार होतो.

१९७०-७१ मध्ये देशात १४,५०,०० गुरे; ५,१०,००० मेंढ्या; ८,००,००० डुकरे; १,४५,००० घोडे; १६,००० शेळ्या; ९७,००,००० कोंबड्या होत्या. १९६८ मध्ये ३६० लक्ष अंडी मिळाली.

शिसे, जस्त, क्रोम, चांदी निर्यात होतात. कोळसा, लोखंड, सोने, तांबे, क्वार्ट्‌झ, संगमरवर, मँगॅनीज, गंधक, युरेनियम, टंग्स्टन, अभ्रक, मीठ, अँटिमनी ही खनिजे मिळण्याजोगी आहेत. उत्तरेकडील जंगलप्रदेशात खनिज तेल मिळण्याजोगे आहे व ईशान्य भागात आणि ईसाबाल सरोवराजवळ निकेल सापडले आहे.

१९६४ मध्ये ६५.६% मजूर शेतीवर; ११.३% उद्योगधंद्यात; ११.३% नोकरीत; ६.२% व्यापारात; २.१% वाहतूक व दळणवळण; २.६% बांधकामात; ०.१% खाणीत व बाकीचे इतर व्यवसायांत होते. मजुरांच्या संघटना १९४४ पासून अस्तित्वात आल्या. ८ तासांचा दिवस व ४८ तासांचा आठवडा मान्य आहे; परंतु सु. निम्म्या विभागात याची अंमलबजावणी तुटपुंजी आहे. तथापि अलीकडे कामगार कल्याणाच्या योजना आखल्या जात आहेत.

ग्वातेमालाच्या राष्ट्रीय पक्षाचे केसाल हेच नाव त्याच चलनाचेही आहे. १ केसाल= १ अमेरिकन डॉलर= १ सेंट्रल अमेरिकन पेसो आणि २.३६ केसाल=१ पौंड स्टर्लिंग असा एप्रिल १९७४ चा अधिकृत विनिमय-दर होता. बांको दे ग्वातेमाला ही देशाची प्रमुख मध्यवर्ती बँक असून शेती विकासाकरिता व लघुउद्योग विकासाकरिता दोन बँका आहेत. परदेशी बँकांसह एकूण ११ बॅंका आहेत.

१९७२ च्या परदेशी व्यापारात ३२.९८ के. कोटीची आयात व ३३.५८ के. कोटीची निर्यात झाली. १९६९ मध्ये ३४% आयात अमेरिकेकडून, १३% एल् साल्वादोरकडून, १०% प. जर्मनीकडून, १०% जपानकडून व बाकीची इतर देशांकडून झाली. निर्यातीपैकी २८% अमेरिकेला, १८% एल् साल्वादोरला, १०% प. जर्मनीला, ८% जपानला, ७% कोस्टा रीकाला, ७% हाँडुरसला व ५% निकाराग्वाला झाली. निर्यातीच्या ३४% कॉफी, ९% कापूस, ७% केळी होती. त्याशिवाय चिकल, सिट्रोनेला व गवती चहा तेल, वाख कोकोफळे, साखर, मांस, जस्त, शिसे इत्यादींचीही निर्यात होते.

ग्वातेमालात वाहतुकीच्या सोयी फार कमी आहेत. १९६९ मध्ये ८२६ किमी. लोहमार्ग आणि सु. १२,००० किमी. रस्ते होते. प्वेर्तो बार्योस ते ग्वातेमाला सिटीवरून सान होसे, पॅन अमेरिकन तसेच पॅसिफिक कोस्ट महामार्गाचे विभाग ग्वातेमालातून जातात. अटलांटिक किनाऱ्यावर प्वेर्तो बार्योस व सांतो टोमास दे कास्टीया व पॅसिफिक किनाऱ्यावर सान होसे व चांपेरीको ही प्रमुख बंदरे आहेत.

व्हिएटीका ही शासकीय विमानकंपनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक करते. जानेवारी १९७० मध्ये देशात ४०,००० दूरध्वनी; २,५०,००० रेडिओ व ७२,००० दूरचित्रवाणी यंत्रे होती. देशात ३ दूरचित्रवाणी केंद्रे व ७० प्रक्षेपण केंद्रे आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/24/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate