অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नानकिंग

नानकिंग

चीनच्या जिआंगसू प्रांताची व चीनची पूर्वीची राजधानी. लोकसंख्या सु. २३ लाख (१९७०). चीनचे राजकीय, साहित्यिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून विख्यात असलेले हे पुरातन शहर यांगत्सी नदीच्या दक्षिण तीरावर शांघायच्या पश्चिमेस सु. २७२ किमी. असून ते शांघाय– तिन्‌त्सिन व वूहूकडे जाणाऱ्या लोहमार्गांचे प्रस्थानक आहे. उत्तरेकडे याचे श्याग्‌वान हे उपयुक्त बंदर असून येथे दोन विमानतळ आहेत. नदीच्या उत्तर तीरावर पूको हे उपनगर व लोहमार्ग प्रस्थानक आहे. नानकिंग १२५ ते ४६० मी. उंचीच्या टेकड्यांनी वेढलेले असून त्याच्याभोवती सु. ३२ किमी. ची पडीक तटबंदी आहे. आता त्याचा विस्तार त्याबाहेरही सु. बारा पटींनी वाढला आहे. नानकिंग (अर्थ: दक्षिण राजधानी) चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात वसविले गेले. तेव्हापासून पंधराव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थकापर्यंत ते चीनची राजधानी होते. इ. स. पू. आठव्या शतकातही त्याच्या जागी जिनलिंग हे शहर होते.

नानकिंग अनेक नावांनी वेगवेगळ्या काळात ज्ञात होते. १८४२ नंतर ते पाश्चात्यांच्या व्यापारास खुले झाले. ताइपिंग बंडाळीत १८५३ ते १८६४ पर्यंत ते बंडखोरांकडे होते. १९१२ मध्ये ते डॉ. सन- यत्-सेनच्या पहिल्या चिनी प्रजासत्त्ताकाची राजधानी झाले. नंतर राजधानी बदलली. पुन्हा १९२८ मध्ये चँग कै-शेकने येथे आपली राजधानी केली. १९३७ मध्ये जपान्यांनी नानकिंग घेऊन केलेले अत्याचार नानकिंगवरील बलात्कार म्हणून प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या महायुद्धात राजधानी चुंगकिंगला गेली. १९४५ मध्ये नानकिंग येथेच जपानी सैन्य शरण आले. १९४९ मध्ये कम्युनिस्टांनी शहर घेतले व राजधानी पीकिंगला नेली.नानकिंगच्या आसमंतात गहू, तांदूळ, घेवडे, वाटाणे, भुईमूग, कापूस इ. पिके होतात. येथील परंपरागत उद्योग रेशमी व सुती कापड, सॅटिन व नानकीन नावाचे टिकाऊ कापड हे होत. १९४९ नंतर कम्युनिस्ट राजवटीत अवजड उद्योग, स्वयंस्फुरक दिवे, रेडिओ, दूरध्वनी, चित्रपटप्रक्षेपक, कॅमेरे, सूक्ष्मदर्शक, विद्यूत्- जनित्रे, सिमेंट, खते, रासायनिक पदार्थ इत्यादींचे कारखाने निघाले. नानकिंग येथे विद्यापीठ, आठ उच्च शिक्षण संस्था, शास्त्रीय संशोधन संस्था, त्सुचिनशानवरील (जांभळा पर्वत) वेधशाळा इ. संस्था आहेत. नानकिंगमध्ये मिंगराजाचे थडगे व डॉ. सन-यत्-सेनची भव्य समाधी असून देवालये, सरोवरे, मनोरे, क्रीडागृह इ. अनेक प्रेक्षणीय गोष्टी आहेत.

 

 

लेखक -ओक, द. ह.

स्त्रोत -मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate