অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पनामा

पनामा

उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडांना जोडणाऱ्या संयोगभूमीवर पूर्व-पश्चिम पसरलेला एक छोटासा प्रजा सत्ताक देश. क्षेत्रफळ ७७,०९० चौ. किमी. पैकी १,४४० चौ. किमी. अ.सं.सं. च्या मालकीचे. लोकसंख्या १७,७१,३०० (१९७७). विस्तार ७° १५’ उ. ते ९° ३९’ उ. आणि ७७° १५’ प. ते ८३° ३०’ प. यांदरम्यान. याच्या पश्चिमेस कोस्टा रीका व पूर्वेस कोलंबिया हे देश असून, उत्तरेस कॅरिबियन समुद्राची ७६७ किमी. लांबीची किनारपट्टी व दक्षिणेस पॅसिफिक महासागराची १,२३४ किमी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे. याचा पूर्व-पश्चिम विस्तार सु. ७२० किमी. असून रूंदी ५० ते १८० किमी. आहे. या देशातून जगप्रसिद्ध पनामा कालवा जातो. पनामा सिटी हे राजधानीचे शहर आहे. दोन खंडाच्या मोक्याच्या जागी देश असल्याने याला जागतिक व लष्करी दृष्ट्या फार महत्त्व आहे.

भूवर्णन

देशाची भूपृष्ठरचना डोंगराळ व पर्वतीय असून दोन्ही किनाऱ्यांनजीक सखल प्रदेश आहे. मध्यातून पूर्व - पश्चिम जाणाऱ्या पर्वतरांगा आहेत. यातच पश्चिमेस चीरीकी (३,४७८ मी.) हे सर्वोच्च ज्वालामुखी शिखर आहे. देशाचा ८७% भाग ७०० मी. पेक्षा कमी उंचीचा, १०% भाग ७०० मी. ते १,५०० मी. मध्यम उंचीचा व फक्त३% अत्युच्च आहे. देशात ५०० पर्यंत नद्या असून बहुतेक कमी लांबीच्या आणि पॅसिफिकला मिळणाऱ्या आहेत. डॅरिएन प्रांतांतील पॅसिफिकला मिळणारी ट्वीरा ही नदी व्यापारी दृष्टीने उपयुक्त आहे. तसेच अटलांटिकच्या किनाऱ्यालगत वाहणारी चॅग्रेस ही नदी देशाच्या विकासाचा आधार होऊ शकेल. देशालगतच्या बेटांची संख्या १,६०० असून त्यांत कॅरिबियनमधील सान ब्लास द्वीपसमूह, पॅसिफिकमधील क्वीबा, पर्ल ही महत्त्वाची आहेत.

देशाचे हवामान उष्ण कटिंबधीय सागरी आहे. किनाऱ्यालगत सरासरी तपमान २७° से. व डोंगराळ भागात ते १०° ते १९° से. पर्यंत असते. आर्द्रता बऱ्याच काळपर्यंत ८०% पर्यंत असते. पर्जन्याचे प्रमाण कॅरिबियनच्या बाजूस ३०० सेंमी. पर्यंत, तर पॅसिफिकच्या बाजूला ते १६० सेंमी. पर्यंत आहे. सर्वसाधारणपणे पाऊस एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत पडतो. इतर काल कोरडा असतो.

खनिजसंपत्ती विविध व भरपूर असली, तरी फक्त सोने, चांदी व मँगॅनीज एवढीच खनिजे काढली जातात. चुनखडी भरपूर प्रमाणात उपलब्ध झाल्याने सिमेंटच्या उत्पादनात वाढ झाली आहे.

बहुतांशी पनामात दाट अरण्ये व अधूनमधून गवताळ प्रदेश आढळतात. कॅरिबियनच्या बाजूस सदाहरित वृक्षांचे आधिक्य आहे; तर पॅसिफिकच्या बाजूस पानझडी वृक्ष आढळतात. अरण्यांतून पक्षी, माकडे, हरिणे, चित्ते यांची संख्या बरीच आहे. पॅसिफिकची बाजू मासेमारीस अधिक अनुकूल आहे.

इतिहास व राज्यव्यवस्था

सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस म्हणजे स्पॅनिश लोकांच्या आगामनापूर्वी येथे इंडियन टोळ्यांची सत्ता विखुरलेली होती. कोलंबसचा साथीदार बास्तीदास १५०१ मध्ये येथे आला व १५०९ मध्ये स्पेनने कोलंबिया व पनामा भागांवर आपला गव्हर्नर नेमून हे आपल्या साम्राज्यात सामील केले. त्यानंतर १५१३ मध्ये बॅल्बोआने ही संयोगभूमी पार करून पॅसिफिकचा प्रथम शोध लावला. १५१९ मध्ये पनामा सिटी हे शहर राजधानी म्हणून वसविले. दक्षिण अमेरिकेतील संपत्ती स्पेनकडे नेण्यास पुढील तीन शतके या शहराचा फार उयोग झाला. सोळाव्या शतकात ड्रेक व सतराव्यात मॉर्गन या ब्रिटिश चाच्यांनी हे शहर लुटले. पनामा विभाग बृहत्‌कोलंबियात १८२१ मध्ये समाविष्ट झाला. १८८६ पर्यंत कोलंबियाचा एक भाग म्हणून पनामाने अंतर्गत स्वायत्तता उपभोगली, परंतु त्यानंतर पनामा कालवा खणण्यास अ.सं.स. कडून फूस मिळाल्याने १९०३ मध्ये पनामा कोलंबियातून फुटून निघून स्वतंत्र झाला. त्यानंतर पनामाने अ.सं.स्. ना कालवा खणण्यासाठी व त्याच्या दोन्ही अंगांस ८ किमी. ची भूमी कालवा विभाग म्हणून कायम भाडेपट्ट्याने वापरण्यास परवानगी दिली. १९१४ मध्ये कालव्यातून वाहतूक सुरू झाली. १९२४ मध्ये कोलंबियाने पनामाच्या स्वतंत्र अस्तित्वास मान्यता दिली. अ.सं.सं.नी पनामाच्या अंतर्गत कारभारात वारंवार ढवळाढवळ केली. कालव्यावरील स्वामित्वाच्या वादामुळे पनामा देश करार मोडण्यास उद्युक्त झाला. अ.सं.स. नी कालवा विभागावरील सत्ता सोडावी याबद्दल उभय देशांत १९७४ मध्ये एकवाक्यता झाली व १८ एप्रिल १९७८ च्या करारान्वये ३१ डिसेंबर १९९९ नंतर ही सत्ता पनामाला देण्याचे ठरले.

नवीन घटना १७७२ पासून अंमलात येऊन ५०५ सदस्यांची एक राष्ट्रीय सभा निवडणुकीने अस्तित्वात आली आहे. ही सभा राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीची निवड करते. राष्ट्रपतींच्या हाती संपूर्ण कार्यकारी सत्ता असते; तथापि ऑक्टोबर १९७२ पासून पुढील सहा वर्षांकरिता ही सत्ता सेनादलप्रमुखाच्या हाती सुपूर्त करण्यात आलेली आहे. १९६९ पासून येथे राजकीय पक्षांवर बंदी आहे. राजकीय ध्येयवादापेक्षा येथे व्यक्तिपूजेला अधिक वाव आहे.

देशांतर्गत सुव्यवस्थेसाठी ११,००० जवानांचे एक राष्ट्रीय संरक्षणदल आहे व त्याच्याच प्रमुखाच्या हाती सध्या राष्ट्रपतीची सत्ता आहे. बाह्य आक्रमणापासूनच्या संरक्षणाची जबाबदारी अ. सं. सं. वर आहे. पनामाची विभागणी नऊ प्रांत व इंडियनांसाठी राखीव तीन विभाग यांमध्ये झालेली आहे. प्रत्येक प्रांतावर राष्ट्रपतीच्या हुकुमाने गव्हर्नरची नेमणूक केली जाते. नऊ प्रांतांची विभागणी ६३ नगरपालिकाक्षेत्रांतून केलेली असून, त्यांचा कारभार लोकनियुक्त मंडळ व नगराध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे. राष्ट्राध्यक्षाच्या नियुक्तीनुसार दहा वर्षांसाठी नऊ न्यायाधीशांच्या एका सर्वोच्च न्यायालयाला न्यायनिवाड्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाला न्यायनिवाड्याचे संपूर्ण अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायाधीशांच्या नेमणुका केल्या जातात. देशाने देहांताची शिक्षा रद्द केलेली आहे. पनामा संयुक्त राष्ट्रांचा व अमेरिकन राष्ट्रसंघटनेचा (ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स) सदस्य आहे.

आर्थिक स्थिती

पनामाच्या आर्थिक स्थितीचा बव्हंशी भार कालव्याच्या भाड्यावर व त्या देशात नोंदलेल्या व्यापारी जहाजांच्या उत्पन्नावर निर्भर आहे. शेती उत्पादने व कोळंबी (मासळी) यांपासून सु. ५०% उत्पन्न मिळते. तांदूळ, मका, द्विदल धान्ये यांचे उत्पन्न देशाच्या गरजा भागविण्यापुरते असून केळी, कोको, कॉफी, नारळ, संत्री, टोमॅटो यांचे उत्पादन निर्यातीसाठी केले जाते. १९७४-७५ साली पुढीलप्रमाणे शेती उत्पादन झाले (आकडे हजार क्विंटलमध्ये) : घेवडे ८९.४; कॉफी ९९.३; मका १,३०८.७; तांदूळ ३,९३२.४; उस ३७,९७८. केळ्यांचे उत्पादन मळे पद्धतीने मोठ्या कंपन्या करतात. कोळंबीचा निर्यातीत तिसरा क्रमांक लागतो. अन्नपदार्थ, चिनीमातीची भांडी, तयार कपडे, सिगरेटी, हॅट, साबण, खाद्यतेले यांसारखे छोटे उद्योग येथे आढळतात. १९४८ मध्ये एक सिमेंटकारखाना व १९६२ मध्ये कोलोन येथे एक तेलशुद्धीकरण कारखाना सुरू झाला.

ऊर्जानिर्मितीच्या बाबतीत पनामाची प्रगती चांगली आहे. १९६८ मध्ये ४८५ द. ल. किंवॉ. ता. असलेले उत्पादन १९७४ मध्ये ९९२ द. ल. किंवॉ. ता. पर्यंत वाढले. पनामा सिटी व कोलोन यांना ५,२५,२०० घ. मी. गॅसचाही पुरवठा झाला.

देशात मध्यवर्ती बँक नाही; तथापि १९०४ साली स्थापन झालेली ‘बँको नॅशनल द पनामा’ ही व्यापारी बँक सर्व सरकारी व्यवहार सांभाळते. याशिवाय विविध देशांच्या ७५ बँका या देशात आर्थिक व्यवहार हाताळीत असतात. बॅल्बोआ ही सुवर्णमुद्रा कायदेशीर चलन असून देशाचे कागदी चलन नाही. डिसेंबर १९७६ मध्ये १ पौंड=१.६६ बॅल्बोआ व १ अमेरिकी डॉ. = १ बॅल्बोआ असा विनिमय दर होता.

पनामाचा विदेशीय व्यापार बहुतांशी अ.सं.सं.शी चालतो. त्यापाठोपाठ कोस्टा रीका, दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला, कोलंबिया व एक्वादोर हे देश येतात. अन्य देश म्हणजे फ्रान्स, प. जर्मनी, जपान, कॅनडा यांचाही आयात-निर्यातीत वाटा आहे. निर्यातीत प्रामुख्याने केळी, पेट्रोलियम पदार्थ, मासळी या गोष्टी असून, आयातीत उत्पादित वस्तू, खनिज तेल, यंत्रे, वाहतुकीची साधने, अन्नपदार्थ, रसायने या गोष्टी येतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate