অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बर्मिंगहॅम १

बर्मिंगहॅम १

बर्मिंगहॅम - १

ग्रेट ब्रिटनच्या वॉरिकशर परगण्यातील प्रमुख औद्योगिक शहर. लोकसंख्या १०,०३,५०० (१९७४). वेस्ट मिडलँड्सच्या नव्या मेट्रपॉलिटन काउंटीचा (१९७४) भाग असलेले हे शहर जलमार्ग, लोहमार्ग व सडका यांचे मुख्य केंद्र असून ॲव्हॉन, ट्रेंट व सेव्हर्न या नद्यांनी वेढलेल्या मिडलँड्स पठारावर वसलेले आहे. इंग्लंडच्या लिव्हरफूल, मँचेस्टर, लंडन या प्रमुख बंदरांपासून बर्मिंगहॅम जवळजवळ सारख्याच अंतरावर वसलेले आहे. शहराच्या वायव्येस असलेल्या ‘ब्लॅक कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टॅफर्डशर येथील कोळसा व लोखंड यांच्या विपुल साठ्यांमुळे जगातील प्रमुख औद्योगिक शहरांत याची गणना केली जाते. बर्मिंगहॅम कालव्याने हे शहर स्टॅफर्डशरशी जोडलेले आहे.

या शहराच्या प्रथमोल्लेख डोम्स डे बुक या नोंदणी पुस्तकात आढळतो. नॉर्मन लोकांच्या आगमनापूर्वी हे अस्तित्वात होते. ११६६ ते १२९५ या काळात याला अनेक व्यापारी सनदा मिळाल्या असल्या, तरी पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत हे छोटेसे खेडेगावच होते. पंधराव्या शतकापासून लोकरी व कातडी वस्तूंच्या व्यापार येथे चाले. १७५० मध्ये हे धार्मिक, राजकीय चळवळींचे तसेच शास्त्रीय संशोधनाचे केंद्र बनले. त्याच सुमारास कारखान्यांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची वाहतूक सुलभतेने करण्यासाठी येथे कालवे व लोहमार्ग मोठ्या प्रमाणावर बांधण्यात आले. १८३२ च्या अधिनियमानुसार शहराला सनदी हक्क मिळाले व तेथे नगरपालिका स्थपण्यात आली (१८३८). तथापि या शहराचा ताबा सरदार-उमरावांकडेच होता. १८८१ च्या संसदीय कायद्यामुळे या शहराची व्यवस्था नगरपरिषदेकडे (टाउन कौन्सिल) सोपविण्यात आली. १८८३ मध्ये बर्मिंगहॅम एकत्रीकरण कायदा संमत होऊन यास शहराचा दर्जा प्राप्त झाला (१८८९). याच सुमारास जोसेफ प्रीस्टली यांनी चार्ल्स डार्विन, जेम्सवॅट इ. प्रसिद्ध व्यक्तींच्या सहकार्याने ‘लूनार सोसायटी’ ची येथे स्थापना केली.

वाफेच्या एंजिनाचा शोध व कोळसा-लोखंड यांच्या समृद्ध खाणी यांमुळे शहराचे औद्योगिक महत्व वाढले. जलमार्ग व लोहमार्ग यांच्या विपुलतेमुळे व्यापारात वाढ झाली. जोसेफ चेंबरलिन या महापौराच्या कारकीर्दीत पाणीपुरवठा, नगररचना, गॅस वितरण इ. विविध सुधारणा झाल्या. स्वतःची बँक (स्था. १९१६) असलेली ही इंग्लंडमधील एकमेव नगरपालिका होय. नगरनियोजन (१९११), एकेरी वाहतूक (१९३३), नगरपालिकेचा विमानतळ (१९३९) इ. योजना राबविणारे ग्रेट ब्रिटनमधील हे प्रवर्तक शहर ठरले. १८९१ व १९११ मध्ये शहराचा महानगरीय विस्तार करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात बाँबवर्षावाने उद्‌ध्वस्त झालेल्या या शहराचे रूप नव्यानव्या लाल दगडी इमारतींनी पूर्णतः बदलून टाकले  आहे.एके काळी सबंध जगाची यंत्रशाळा म्हणून विख्यात असलेल्या आणि सांप्रतही विविध १५०० 'उद्योगधंद्यांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर्मिंगहॅममध्ये ग्रेट ब्रिटनच्या उपभोक्ता उद्योगांचे व मध्यम प्रतीच्या उद्योगांचे केंद्रीकरण झाल्याचे आढळते. ब्रिटिश लेलँडचा ‘ऑस्टिन मॉरिस’ मोटारकारखाना, डनलॉप रबर टायर कारखाना, तसेच मोटारगाडीउद्योगाशी संबंधित अनेक सुट्या भागांचे कारखाने येथे आहेत. जगप्रसिद्ध कॅडबरी चॉकोलेट कारखाना बर्मिंगहॅमपासून सु. ६ किमी. वर असलेल्या आणि प्रारंभापासूनच औद्योगिक नगरनियोजनाचे प्रतीक ठरलेल्या ‘बोर्नव्हिल’ या गावी आहे. यांशिवाय या शहरात अभियांत्रिकी, लोखंडी सामान, हत्यारे, सायकली, मोटार-सायकली व त्यांचे सुटे भाग, विद्युत् उपकरणे, रसायने, रंग, बंदुका, रबरी व प्लॅस्टिक वस्तू, खेळणी इ. नानाविध उद्योग विकसित झालेले आहेत.

बर्मिंगहॅममधील प्रेक्षणीय वास्तूंत ॲस्टन ॲहॉल (स्था.    १६१८), टाउन हॉल (१८३४), अठराव्या शतकातील बरोक शैलीचे  सेंट फिलिप कॅथीड्रल,  एकोणिसाव्या  शतकातील  सेंट  चॅडचे  कॅथीड्रल,  कौन्सिल हाउस (१८६९), हॉल ऑफ मेमरी (१९२४) व सिव्हिक सेंटर (१९३९) यांचा प्रामुख्याने समावेश होतो. १९७० च्या पुढील काळात बर्मिंगहॅममध्ये बांधण्यात आलेल्या आधुनिक वास्तूंमध्ये ‘रोटंडा’ ही ८१ मी. उंचीची गोलाकार कार्यालयीन इमारत, १५० मी. उंचीचा ‘पोस्ट ऑफिस रेडिओटॉवर’, ८० लक्ष पौंड खर्च करून उभारलेले ‘बुल रिंग शॉपिंग सेंटर’ इत्यादींचा अंतर्भाव होतो. येथील सिटी लायब्ररीत शेक्सपिअरच्या ग्रंथांचा उत्तम संग्रह असून कलावोथी (रफाएलपूर्वीच्या चित्रसंग्रहासाठी प्रसिद्ध), वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहेत. येथे औद्योगिक आणि शास्त्रीय संग्रहालयेदेखील आहेत. १७६८ पासून येथे वार्षिक संगीत महोत्सव साजरा केला जातो. येथे अनेक सिंफनी ऑर्केस्ट्रा आहेत. दोन रंगमंच, एक संगीत सभागृह, कलावीथी, चित्रपटगृह, कलामंदिर इत्यादींनी युक्त असे ‘द मिडलँड्स आर्टस सेंटर फॉर यंग पीपल’ हे कलाकेंद्र सु. ६ हे क्षेत्रात बांधण्यात येत आहे. आधुनिक सुविधायुक्त राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र (९०,००० चौ. मी. क्षेत्र) १९७६ मध्ये उभारण्यात आले.

शहरात विविध शैक्षणिक सोयी असून बर्मिंगहॅम विद्यापीठही (स्था. १९००) प्रसिद्ध आहे. सहाव्या एडवर्डने स्थापिलेले ग्रामर स्कूल (१५५२), ‘बार्बर इन्स्टिटयूट ऑफ फाइन आर्टस’ सारख्या अनेक संस्थाही येथे आहेत. कॉलेज ऑफ अँडव्हान्सड टेक्नॉलॉजीला विद्यापीठाचा दर्जा देऊन त्याचे नामांतर ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲस्टन’ असे करण्यात आले (१९६५). ऑक्सिजन वायूचा संशोधक जोसेफ प्रीस्टली याचे वास्तव्य काही काळ शहरी होते.

 

 

लेखक - सुलभा कापडी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate