অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बर्लिन

बर्लिन

बर्लिन

दुसऱ्या महायुद्धपूर्व जर्मनीची इतिहासप्रसिद्ध राजधानी. हे शहर बाल्टिक समुद्रकिनाऱ्यापासून दक्षिणेस १७७ किमी. स्प्री नदीकाठी वसले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर बर्लिनचे विभाजन होऊन पू. बर्लिन (क्षेत्रफळ ४०३ चौ. किमी.) हे पू. जर्मनीची राजधानी व प. बर्लिन (४८० चो. किमी.) प. जर्मनीचे अकरावे राज्य बनले. संपूर्ण बर्लिन शहर हे भौगोलिक दृष्टया पूर्व जर्मनीतच आहे. लोकसंख्या अनुक्रमे ११,१८,१४२ व १९,२६,८२६ (१९७७).

 

१. ब्रांडेनबुर्क गेट : पूर्व-पश्र्चिम बर्लिनची सरहद्द. २. प. बर्लिनमधील न्यू मेमोरियल चर्च३. बर्लिन भिंत ४. फ्रँकफुर्ट गेट स्क्केअर, पू. बर्लिन.

इ. स. १३०७ साली बर्लिन व कोल्न ही खेडी एकत्र झाली आणि तेव्हापासून या शहराचा इतिहास सुरू झाला. पुढे हॅन्सिअँटिक लीगच्या सदस्यत्वामुळे त्याचे महत्त्व वाढले. होहेंझॉलर्न घराण्याच्या दुसऱ्या फ्रीड्रिखने (कार. १४४०-७०) बर्लिनचा स्वायत्त दर्जा काढून टाकला. १४८६ पासून ब्रांडेनबुर्कच्या अधिपतीची राजधानी येथे होती. तीस वर्षाच्या युद्धात (१६१८०४८) बर्लिनची बरीच हानी झाली. तथापि फ्रीड्रीख विल्यमने (कार. १६४८८) शहराचे पुनरूज्जीवन केले. सतराव्या शतकाच्या अखेरीपासून प्रशियाची राजधानी म्हणून बर्लिनचा सर्वांगीण विकास होऊ लागला. पहिल्या फ्रीड्रिख विल्यमच्या कारकीर्दीत (१७१३-४०) अंटरडेन लिंडेन या मार्गाचे रूंदीकरण होऊन प्रसिद्ध ब्रांडेनबुर्क गेट (१७८९१), चॅरिटी रूग्णालय (१७२६) इ. भव्य वास्तू उभ्या राहिल्या. फ्रिड्रिख द ग्रेटच्या कारकीर्दीत (१७४०-८६) ऑपेरा हाउस, सेंट हेट्व्हिख्-सकिर्ख, प्रिन्स हेन्री पॅलेस यांसारख्या भव्य इमारती उभारण्यात आल्या.

सप्तवार्षिक युद्धात बर्लिनचा ताबा ऑस्ट्रिया (१७५७) व रशिया (१७६०) यांच्याकडे होता. नेपोलियनच्या काळात ह्या शहरावर अत्यल्प काळ (१८०६-०८) फ्रेंचाची सत्ता होती. त्यानंतर मात्र बर्लिन हे जर्मन राष्ट्रवादाचा मानबिंदू ठरले व व्हिएन्नाचे प्रतिस्पर्धी शहर म्हणून वेहाने विकसित झाले. फ्रीड्रिख विल्यम विद्यापीठाची (विद्यमान नाव हंबोल्ट विद्यापीठ) येथे स्थापना (१८१०) होऊन अलेक्झांडर हंबोल्ट, हेगेल, फिक्टे, लीओपोल्ट फोन रांके यांसारखे थोर विचारवंत त्याकडे ओढले गेले. काळातच कार्ल फ्रीड्रिख शिंगकेल (१७८१-१८४१) या प्रख्यात वास्तुविशारदाने रॉयल थिएटर, रॉयल पॅलेस, कॅसल ब्रिज, ओल्ड म्यूझीयम, तसेच अनेक राजवाडे व चर्चवास्तू उभारून शहराच्या भव्यतेत व सौंदर्यात भर घातली. चौथ्या फ्रीड्रिखच्या कारकीर्दीत (१८४०-६१) बर्लिन हे जर्मनीतील लोहमार्गाचे केंद्रस्थान बनले व त्याच्या औद्योगिक विकासास चालना मिळाली. १८७१ पासून बर्लिन जर्मन साम्राज्याची राजधानी बनले.⇨बर्लिन काँग्रेसमुळे (१८७८) शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्वही वाढले.

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला व ९ नोव्हेंबर १९१८ रोजी जर्मन प्रजासत्ताकाची स्थापना झाली. बर्लिन हीच त्याची राजधानी होती. युद्धोत्तर काळात कम्युनिस्टांचे बंड (१९१९), त्याविरूद्ध परंपरावाद्यांचा मोर्चा (१९२०) यांसारख्या घटना येथे घडल्या. १९२० मध्ये बर्लिनच्या परिसरातील आठ शहरे, ५९ खेडी व काही मिळकतींचा बर्लिन शहरात समावेश करण्यात आला. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याचे २० जिल्ह्यांत विभाजन करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात (१९३९-४५) जर्मनीच्या पराभवानंतर ⇨ याल्टा परिषदेतील करारान्वये ग्रेट ब्रिटन, अमेरिकेची सुंयक्त संस्थाने, फ्रान्स व रशिया यांनी हे शहर विभागून घेतले व बर्लिन नियामक समिती स्थापन केली. या समितीतून रशिया जून १९४८ मध्ये बाहेर पडला. ३० नोव्हेंबर १९४८ रोजी बर्लिनचे पूर्व व पश्र्चिम असे विभाजन करण्यात येऊन पूर्व व पश्र्चिम अस विभाजन करण्यात येऊन पूर्व बर्लिन रशियाकडे व पश्र्चिम बर्लिन अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्या अखत्यारीत राहिले. रशियाने बर्लिनची नाकेबंदी (२४ जून १९४८-११ मे १९४९) केली. परंतु अमेरिकेच्या खंबीर धोरणामुळे अखेर रशियाने नाकेबंदी उठविली. १९५३ मध्ये रशियाव्याप्त बर्लिन भागात कम्युनिस्ट शासनाविरूद्ध दंगे झाले. परिणामतः प. जर्मनीकडे मोठ्या संख्येने लोक स्थलांतर करू लागले. पू. जर्मनीने ऑगस्ट १९६१ मध्ये ब्रांडेनबुर्क गेटपासून दक्षिणोत्तर अशी ४७ किमी. लांबीची भिंत उभारली. हीच ‘बर्लिन भिंत’ होय. या भिंतीमधील बारा दरवाजांतून ये-जा करण्यास परवाने देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्यामुळे निर्माण झालेला पेचप्रसंग सोडविण्याच्या हेतूने अमेरिका, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स व रशिया यांमध्ये सप्टेंबर १९७० मध्ये एक करार करण्यात आला.

प. बर्लिनचा कारभार मात्र १९५० च्या नागरी संविधानानुसार पाहिला जातो. प्रतिनिधिगृहासाठी चार वर्षांच्या मुदतीने लोकप्रतिनिधी निवडले जातात. त्यांतून विधिमंडळाचे (सीनेट) सदस्य तसेच महापौर यांची निवड होते. या शहराच्या संसदेतील प्रतिनिधींना देशाच्या संसदेत मतदानाचा हक्क नसतो. पू. बर्लिन ही पू. जर्मनीची १९४९ पासून राजधानी असून तेथील कारभार महापौर, त्याचे तीन साहाय्यक व १४ सदस्यांच्या कार्यकारी मंडळातर्फे चालतो. सदस्य निवडण्याचा अधिकार नागरिकांना नाही.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी बर्लिनमध्ये विद्युत् उपकरणे, लोखंड-पो-लाद, औषधे-रसायने, कापड इ. उद्योगांचा विकास झालेला होता. तथापि दुसरे महायुद्ध व बर्लिनची फाळणी यांचा पूर्व बर्लिनवर विपरीत परिणाम झाला. मात्र विद्युत् उपकरणे, यंत्रसामग्री, अनेकविध उपभोग्य वस्तू, रसायने इ. उद्योगांमुळे प. बर्लिन पूर्वीप्रमाणेच विकसित झाले. तथापि पूर्व बर्लिनचा औद्योगिक विकास पूर्वीइतका झालेला नाही. परंतु तेथेही विद्युत् उपकरणे, अन्नप्रक्रिया, रसायने इ. उद्योग प्रगत अवस्थेत आहेत.

अखंड बर्लिनला एक प्रमुख अंतर्गत बंदर म्हणून प्राप्त झालेले होते. विस्तृत लोहमार्ग, राजरस्ते, हवाई मार्ग, उत्कृष्ट कालवे इत्यादींमुळे या विशाल शहरातील दळणवळण सुलभ होते. विभाजनानंतरच्या काळात प. बर्लिनमध्ये सर्वाधिक वाहतूक हवाई मार्गाने होत असते. पू. बर्लिनच्या तुलनेने येथे लोहमार्ग व रस्ते यांमार्फत वाहतूक कमी प्रमाणात होते. प. बर्लिनमधील तेगेल, टेम्पेलाइफ व गटागेप्ट हे विमानतळ जागतिक कीर्तीचे आहेत. पू. बर्लिनमध्ये लोहमार्गांनी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून शॉनफेल्ड येथील विमानतळ आंतरराष्ट्रीय वाहतुकीत अग्रगण्य आहे. अंतर्गत बंदर म्हणून यूरोपात बर्लिनला जे स्थान पूर्वी प्राप्त झालेले होते, ते आता राहिलेले नाही. प. बर्लिन येथे एक दूरचित्रवाणी केंद्र व दोन नभोवाणी केंद्रे आहेत.

विभाजनामुळे पुष्कळशा ऐतिहासिक वास्तू पू. बर्लिनमध्ये गेल्या असल्या, तरी आधुनिक वास्तुशिल्पांत प. बर्लिन आघाडीवर आहे. ‘क्यूफ्यूरस्टेंडम’ हा पू. बर्लिनमधील प्रसिद्ध मार्ग अद्ययावत दुकाने व चित्रपटगृहे इत्यादींनी नटलेला आहे. याच्या कडेलाच प्रसिद्ध कैसर विल्यम मेमोरियल चर्च आहे. या मार्गाच्या ईशान्येस २५५ हे. व्याप्तीचे टीर्गार्टन हे उद्यान असून या उद्यानातच जगप्रसिद्ध काँग्रेस हॉल (१९५७) आहे. या उद्यानातून प्रसिद्ध ‘जून-१७’ हा मार्ग जातो. १९५७ मध्ये येथे आंतरराष्ट्रीय वास्तु-प्रदर्शन भरले होते. त्यावेळी या उद्यानाच्या उत्तरेस आल्व्हार आल्तॉ, वॉल्टर ग्रोपिअस (१८८३-१९६९), ओस्कार नीमाइअर (१९०७- ) यांसारख्या जागतिक कीर्तीच्या वास्तुविशारदांनी निर्मिलेल्या वास्तूंमुळे प्रसिद्धीस आलेला ‘हॅन्स डिस्ट्रिक्ट’ आहे. क्यूफ्यूरस्टेंडम रस्त्याच्या नैऋत्येस असलेला ‘दालेम डिस्ट्रिक्ट’ हा भाग प. बर्लिनचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखला जातो. येथील दालेम म्यूझीयम विख्यात असून तेथे डच चित्रकार ⇨ रेम्ब्रँटच्या चित्रांचा संग्रह आहे. तद्वत दालेम संशोधन संस्था ही ओटो हान व फ्रिट्झ स्ट्रासमान यांच्या युरेनियम अणुसंशोधनामुळे प्रसिद्ध आहे. या रस्त्याच्या आग्नेयीस शनबेर्क डिस्ट्रिक्ट असून तेथील केनेडी प्लाझामध्ये ‘नगर भवन’ तसेच शॉर्लाटन्बुर्क राजवाडा आहे. सरोवरे व जंगलांसाठी प्रसिद्ध असलेला ग्य्रूनव्हाल्ट हा प्रदेश हाफेल नदीकाठी आहे. याच्याजवळ १९३६ च्या ऑलिंपिक सामान्यांसाठी बांधण्यात आलेले भव्य ऑलिंपिक क्रीडागृह आहे. येथील १६ मजली इमरत प्रसिद्ध असून फुंकटर्म हा रेडिओ मनोराही (उंची १५० मी.) उल्लेखनीय आहे.

अनेक इतिहासप्रसिद्ध वास्तू पू. बर्लिनमध्ये आहेत. उदा., व्रांडेन-बुर्क गेट (१७९१). या गेटपासून पूर्वेकडे जाणारा अंटर डेन लिंडेन हा प्रमुख मार्ग होय. या रस्त्याच्या कडेलाच हंवोल्ट विद्यापीठ, राष्ट्रीय ग्रंथालय, ऑपेरा हाउस इत्यादींच्या इतिहासप्रसिद्ध वास्तू आहेत. या रस्त्याच्या उत्तरेस प्रसिद्ध पर्गमम म्यूझीयम असून दक्षिणेकडे नाझी. सरकारचे कार्यालय ‘व्हिल्हेल्मश्ट्रसे’ आहे. या रस्त्याच्या पूर्वेस ‘मार्क्स एंजेल्स प्लाझा’ हा चौक असून तेथे नवीन शासकीय इमारती व चर्च आहेत. नगर भवन, मॅरिअनकिर्के चर्च, ३५७ मी. उंचीचा दूरचित्रवाणी मनोरा, आधुनिक इमारती, भव्य उपाहारगृहे इत्यादींमुळे ‘अलेक्झांडर प्लाझा’ हा चौक गजबजलेला असतो. रशियन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध असलेला कार्ल मार्क्स अँली (जुने नाव स्टालिन अँली) व फ्रँकफर्टर अँली हा विभाग उल्लेखनीय आहे. फ्रीड्रिख्सफेल्ट भागातील प्राणिसंग्रहालय प्रेक्षणीय आहे. प्रमुख विहारस्थळ म्हणून म्यूगल्सी विभाग प्रसिद्ध आहे.

प. बर्लिनमधील फ्री युनिव्हर्सिटी प्रसिद्ध आहे. तसेच अकॅडेमी ऑफ क्रिएटिव्ह आर्ट, अकॅडेमी ऑफ म्यूझिक, तांत्रिक विद्यापीठ इ. शैक्षणिक संस्था उल्लेखनीय आहेत. हंबोल्ट विद्यापीठ पूर्व बर्लिनमध्ये असून स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स तसेच इतर विषयांच्या काही अकादमी येथे आहेत. प. बर्लिनमधून नऊ, तर पू. बर्लिनमधून पाच दैनिके प्रकाशित होतात. संगीत, कला इत्यादींच्या क्षेत्रांतही बर्लिनने आपले वेगळेच स्थान निर्माण केलेल आहे. ‘प्रशियन स्टेट ऑपेरा’ (१७५०) हा यूरोपमधील उत्कृष्ट ऑपेरा समजला जातो. बर्लिनचे हे महत्त्व अद्यापही टिकून आहे. नाट्यक्षेत्रातही बर्लिन आघाडीवर असून, पू. बर्लिनमधील बर्लिनर अँन्-साम्बल, जर्मन थिएटर, श्लॉसपार्क थिएटर, थिएटर आम क्यूरफ्यूरस्टेंडम प्रसिद्ध आहेत. तसेच प. बर्लिनमधील ‘बर्लिन फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्रा’ उल्लेखनीय आहे. बर्लिनमध्ये अनेक ग्रंथालये आहेत. येथील संग्रहालयांतून व कलावीथींतून नव्या प्रकारच्या कलाकृतींचे दर्शन घडते. पू. बर्लिनमधील ओल्ड (आल्सेस) म्यूझीयम, न्यू म्यूझीयम, पर्गमम म्यूझीयम, तर प. बर्लिनमधील न्यू नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, दालेम म्यूझीयम प्रसिद्ध आहेत.

इतिहासाची नसली, तरी निसर्गाची बर्लिनवर कृपा आहे. जर्मन लोकांच्या अस्मितेचे हे शहर प्रतीक आहे. जगातील सुंदर, प्रगत, ज्ञानकलाविषयक अशा शहरांत बलिनची गणना होते. पर्यटकांचे ते एक मोठे आकर्षण आहे.

 

लेखक - मो. शा. शहाणे / ना. स. गाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate