অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बल्गेरिया

बल्गेरिया : (‘नरॉदना रिपुब्लिक बल्गारीय’ म्हणजे बल्गेरिया प्रजासत्ताक). आग्नेय यूरोपच्या बाल्कन द्विपकल्पातील एक राष्ट्र. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४१º१४’ उ. ते ४४º१२’ उ. व २२º२१’ पू. ते २८º३७’ पू. आहे. देशाचा आकार साधारणतः चौकोनी असून त्याची पूर्व-पश्र्चिम लांबी सु. ४५० किमी. व दक्षिणोत्तर रूंदी २७५ किमी. आहे. क्षेत्रफळ १,१०,९१२ चौ. किमी. व लोकसंख्या ८७,६१,००० (१९७६). बल्गेरियाच्या उत्तरेस रूमानिया, पश्र्चिमेस यूगोस्लाव्हिया, दक्षिणेस ग्रीस, तुर्कस्तान आणि पूर्वेस काळा समुद्र आहे. उत्तरेस डॅन्यूब नदीने तयार केलेली नैसर्गिक सीमा बल्गेरियाला लाभलेली आहे. सोफिया (लो. ९,६५,७२८ — १९७५) ही देशांची राजधानी.

भूवर्णन

बल्गेरियाचा बराचसा भूभाग डोंगराळ असून निम्म्यापेक्षा अधिक प्रदेश ३०० मी. हून जास्त उंचीचा आहे. स्थूलमानाने या देशाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे डॅन्यूब नदीचे खोरे, बाल्कन पर्वत, थ्रेसचे मैदान (मरित्स मैदान) व रॉडॉपी पर्वत असे चार प्राकृतिक विभाग पाडता येतात. डॅन्यूब खोऱ्यात उत्तरेस डॅन्यूबपासून दक्षिणेस बाल्कन पर्वतापर्यंतचा सुपीक मंचवजा प्रदेश मोडतो. हे खोरे सस. पासून सरासरी सु. १२५ मी. उंच असून त्याचा उतार डॅन्यूब नदीकडे आहे. या भागात चुनखडी, चिकणमाती व काही ठिकाणी लोएस मृदा आढळते. डॅन्यूबच्या उत्तरवाहिनी उपनद्यांनी या प्रदेशाचे जलोत्सारण केले जाते. ईस्कर ही एकच नदी दक्षिणेकडील पीरीन पर्वतात उगम पावून सोफियाचा मैदानी विभाग व बाल्कन पर्वत ओलांडून डॅन्यूबला मिळते. बाल्कन पर्वतात तिने खोल निदरी तयार केली आहे. या भूभागात अनेक उपनद्यांच्या खो‍ऱ्यांनी नैसर्गिक विविधता आणली आहे. या विभागाच्या पूर्वेस ल्यूडगोरी आणि दोब्रुदझोन्स्को पठारी प्रदेश आहे.

बाल्कन पर्वतश्रेणी देशाच्या साधारणतः मध्यातून पश्र्चिमेस यूगोस्लाव्हियापासून पूर्वेस काळ्या समुद्रापर्यंत पसरली असून तीमुळे देशाचे दक्षिणोत्तर असे साधारणतः दोन समान भाग झाले आहेत. स्टारा प्लानिना (जुना पर्वत) या नावाने प्रसिद्ध असलेली ही रांग जटिल अशा कार्पेथियन पर्वताचाच भाग आहे. तृतीय कालखंडात निर्माण झालेल्या या रांगेत प्रामुख्याने चुनखडी व पुरातन स्फटिकी अश्मांचा समावेश आहे. या भागाची सस. पासून उंची ७५० मी. ते २,५०० मी. पर्यंत आढळते. त्यातील बॉटेफ (रांगेतील अत्युच्च शिखर) व व्हेझेन या पर्वतशिखरांची उंची अनुक्रमे २,३७७ मी. व २,१९८ मी. आहे. या श्रेणीमध्ये शिपका (१,३३४ मी.), ईस्कर आणि इतर काही खिंडी आहेत.

बाल्कन पर्वतामुळे देशातील दक्षिणोत्तर दळणवळणात बराच अडथळा येतो. तथापि जंगल उत्पादने, चराऊ कुरणे त्याचप्रमाणे कोळसा, तांबे, शिसे, जस्त इ. खनिजांसाठी ही पर्वतश्रेणी महत्त्वाची आहे. गाब्रॉव्हॉ, कांटेल व ट्रयाव्हुना ही इतिहासप्रसिद्ध शहरे या भागातच आहेत. बाल्कन पर्वताच्या दक्षिणेस त्याला ,मांतर अशा स्त्रेड्ना व सूरनेना या तुटक पर्वतरांगा असून त्यांच्या दरम्यान रोजेस दरी (टुंजा दरी) आहे. ती अत्तर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

थ्रेसचे मैदान उत्तरेस स्त्रेड्ना व सूरनेना पर्वतश्रेणी आणि दक्षिणेस रॉडॉपी पर्वतश्रेणी यांदरम्यान आहे. पर्वतनिर्मितीच्या वेळी हा भाग खचला होता. हे मैदान मरित्स व तिच्या उपनद्यांनी जलोत्सारित केले असून ते अत्यंत सुपीक आहे. फळे, भाजीपाला, गहू, मका, तंबाखू, तांदूळ इ, पिकांसाठी थ्रेसचे मैदान महत्त्वाचे असून प्लॉव्हदिव्ह व पाझार्जीक ही प्रसिद्ध शहरे याच भागात आहेत.

बल्गेरियाचा बहुतेक सर्व नैऋत्य भाग रॉडॉपी पर्वताने व्यापला असून देशातील त्याचप्रमाणे बाल्कन व्दीपकल्पावरील सर्वात उंच अशी ही पर्वतश्रेणी आहे. हिच्यातच पश्र्चिमेकडील पीरीन व रीला या पर्वतश्रेण्यांचा समावेश होतो. नैऋत्य सरहद्दीवर बेलॅसित्सा पर्वतश्रेणी आहे. म्यूसाला (स्टालिन) हे देशातील तसेच बाल्कन द्विपकल्पावरील सर्वोच्च शिखर (२,९२५ मी.) रीला पर्वतात आहे. यांशिवाय पीरीन पर्वतातील व्हीख्रेन (२,९१५ मी.). रॉडॉपी पर्वतातील पेरेलिक (२,१९१ मी.) ही प्रमुख शिखरे असून ती बर्फाच्छादित असतात. वैज्ञानिक दृष्टया रॉडॉपी पर्वताला महत्त्व आहे; कारण तृतीयक कालखंडात कार्पेथियन पर्वत निर्माण होत असताना त्याला या पर्वताने प्रतिकार केला व त्यामुळे कार्पेथियन पर्वतवलय निर्माण झाले. रॉडॉपी खंडप्राय पर्वतामध्ये पठाराची भूदृश्ये आढळतात. अग्निजन्य व रूपांतरित खडकांपासून तयार झालेल्या या भागात काही ठिकाणी ज्वालामुखीनिर्मित अश्मही दिसतात. पश्र्चिम रॉडॉपी हा भाग जास्त उंचीचा व कमी झिजलेला, तर पूर्व रॉडॉपी भाग कमी उंचीचा व सौम्य स्वरूपाचा, असा फरक दिसून येतो. जंगले व खनिज संपत्तीच्या दृष्टीने या पर्वतरांगा समृद्ध असल्या, तरी हा भाग विरळ वस्तीचा व मागासलेला आहे. या श्रेणीतील स्त्रूमा व मेस्ता (नेस्तॉस) ह्या प्रमुख नद्या होत.

मृदा

बल्गेरियात सु. २० प्रकारच्या मृदा आढळतात. डॅन्यूबच्या मंच प्रदेशात लोएस, चेर्नोसेम प्रकारची सुपीक मृदा, मरित्स खोऱ्यात तपकिरी रंगाची मृदा, तर पर्वतीय प्रदेशात तपकिरी व करडी पॉडझॉल यांची मिश्रित व पर्वतीय शाद्वल मृदा आढळते. नद्यांच्या खोर्यांचत व काही किनारी प्रदेशांत जलोढीय मृदा आढळतात.

खनिजे

ऊर्जा उत्पादनात कोळसा व जलशक्तीचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत आहे. कोळसा हे देशातील प्रमुख खनिज असून लिग्नाइट प्रकारच्या कोळशाचे मोठे साठे अधिक आहेत. त्यासाठी स्त्रूमा खोऱ्यातील पेर्नीक द्रोणी व मरित्स खोरे विशेष प्रसिद्ध आहे. दगडी कोळसा स्त्रूमा प्लानिना प्रदेशात अनेक लहानलहान खाणींमध्ये सापडतो. पण तो उत्पादनास अवघड व अनिश्र्चित असल्याने देशातील वाढत्या उद्योगधंद्यांसाठी लागणारा दगडी कोळसा परदेशांतून (विशेषतः रशियातून) आणावा लागतो. शिसे, जस्त, तांबे व मँगॅनीज या खनिजांचे भरपूर साठे देशात आहेत. शिसे व जस्त स्टारा प्लानिनाच्या पश्र्चिम भागात व काही अंशी पूर्व रॉडॉपीत आढळतात. रूडॉझेम, कुर्डझाली, प्लॉव्हदिव्ह ही शहरे शिसे व जस्त शुद्धीकरणासाठी प्रसिद्ध आहेत. तांबे हे मुख्यत्वे बुर्गास आणि मंगल हे वार्ना या शहरांच्या परिसरांत आढळते.

नद्या

डॅन्यूव व मरित्स या प्रमुख नद्यांबरोबरच ईस्कर, स्त्रूमा, आर्डा, टुंजा, यांत्रा या नद्याही महत्त्वाच्या आहेत. देशातील ५७% जलवाहन काळ्या समुद्रात, तर ४३% जलवाहन इजीअन समुद्रात होते. उत्तरेतील नद्यांना वसंत ऋतूत, तर दक्षिणेतील नद्यांना हिवाळ्यात अधिक पाणी असते. देशाच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणाऱ्या डॅन्यूब नदीचा बल्गेरियात असणारा काठ-प्रदेश तटासारखा असून नदीच्या पाण्याचा उपयोग व्हावा तितका होत नाही. देशाच्या ईशान्य भागातील डोब्रूजा पठारामुळे डॅन्यूबचा प्रवाह उत्तरेकडील वळून त्या नदीचा त्रिभुज प्रदेश व काळ्या समुद्रास मिळणारे मुख रूमानियात गेले आहे. जलवाहतुकीबरोबरच जलसिंचन व मासेमारीसाठी डॅन्यूबचा उपयोग केसा जातो.

व्हीदिन, लॉम, स्टारा, ऑर्याखॉव्हॉ, निकॉपॉल, स्व्हीश्टॉफ व रूसे ही बल्गेरियातील या नदीवरील प्रमुख बंदरे आहेत. ईस्कर, ऑसुम, यांत्रा ह्या डॅन्यूबच्या प्रमुख उपनद्या होत. मरित्स ही देशातील दुसरी महत्त्वाची पूर्ववाहिनी नदी असून तिच्या खोऱ्यात देशाचा सु. एक-तृतीयांश भूप्रदेश मोडतो. सभोवतालच्या पर्वतीय प्रदेशात उगम पावून व ग्रीस-तुर्कस्तान सरहद्दीवरून काही अंतर वाहत जाऊन ती शेवटी दक्षिणेस इजीअन समुद्रास मिळते. टुंजा ही तिची प्रधान उपनदी आहे. स्त्रूमा व मेस्ता ह्या नैऋत्य बल्गेरियातील प्रमुख दक्षिणवाहिनी नद्या आहेत. काळ्या समुद्राचा सु. २५० किमी.चा किनारा बल्गेरियाला लाभला असून वार्ना व बुर्गास ही त्यावरील प्रमुख बंदरे आहेत. किनारी हिमानीय, संरचनात्मक व कार्स्ट प्रकारची अनेक सरोवरे, त्याचप्रमाणे अनेक औषधी पाण्याचे झरे देशात आढळतात.

हवामान

भूमध्य सागरी व समशीतोष्ण खंडीय असे दोन्ही प्रकारचे हवामान देशात प्रदेशपरत्वे आढळते. साधारणतः उत्तर व पश्र्चिम भागांत उन्हाळे (जुलैचे तापमान २२ºते २४ºसे.) व हिवाळे (जाने. तपमान -३ºते ३ºसे.) तीव्र स्वरूपाचे असतात. समशीतोष्ण हवामानाच्या भागात वार्षिक पर्जन्यमान सु. ५० ते ६५ सेंमी. असून पाऊस उन्हाळ्यात पडतो. काळ्या समुद्राजवळच्या पट्ट्यात हवामान जरा सौम्य स्वरूपाचे असते.

बल्गेरियाच्या दक्षिण प्रदेशाचे हवामान खंडीय स्वरूपाचे असले, तरी पूर्व व अति-दक्षिण भागांत भूमध्य सागरी हवामान काही प्रमाणात आढळतो. उंचवट्याच्या प्रदेशात उष्णतामान बरेच कमी व पर्जन्यमान जास्त आढळते. पर्जन्याबरोबरच अनेकदा गडगडाटी वादळे व गारपीट होते. भूमध्य सागरी हवामानाचा प्रभाव असलेल्या दक्षिण भागात उन्हाळ्यात कधीकधी अवर्षणांना तोंड द्यावे लागते.

वनस्पती व प्राणी

देशात समशीतोष्ण कटिबंधीय अरण्ये व तृण कक्ष आणि भूमध्य सागरी कक्ष असे नैसर्गिक वनस्पती वर्गाचे दोन मुख्य प्रकार दिसून येतात. ईशान्येकडील डोब्रूजा पठारी भाग हा स्टेप गवताचा आहे. पश्र्चिम व मध्य भागांतील वनस्पती मुख्यत्वे स्थान व उंची यांवर अवलंबून असून त्यांचे भिन्न प्रकार आढळून येतात.

सखोल प्रदेशात स्टेप गवताळ भूमी, मध्यम उंचीच्या प्रदेशात पानझडी वृक्ष आणि उंच प्रदेशात सूचिपर्णी वृक्ष व अल्पाइन तृण प्रकार दिसून येतात. अरण्याखालील बराच बाग शेतीखाली आणला गेल्याने अरण्यप्रदेश देशाच्या एकूण क्षेत्राच्या एक-तृतीयांश झाला आहे. यातील सु. ५०% जंगल खुरट्या वनस्पतींचे व उरलेल्या अर्ध्यापैकी ७३% जंगल ओक, वीच, हॉर्नवीम इ. पानझडी वृक्षांनी व्यापलेले असून बाकीच्या उंच प्रदेशात सूचिपर्णी वृक्ष आढळतात. अगदी दक्षिणेकडील पट्ट्यात भूमध्य सागरी वनस्पती दिसून येतात. खुरट्या वनस्पतींच्या प्रदेशात मेंढपाळी चालते. सरकारने वनरोपणाच्या योजना हाती घेतल्या आहेत.

वाढत्या वनसंहाराबरोबर वन्य प्राण्यांची संख्या घटत आहे. तथापि अस्वले, रानडुकरे, एल्क, शॅमॉय, हरिणे, रानमांजरे, लांडगे इ. प्राणी कमीअधिक प्रमाणात जंगली भागात दिसून येतात. वेळोवेळी लांडग्यांचा सुळसुळाट होऊन त्यांचा मोठाच उपद्रव होतो.

इतिहास व राजकीय स्थिती

बल्गेरियाचा इतिहास इ. स. पाचव्या-सहाव्या शतकांपासूनच सुरू होतो. बायझंटिन साम्राज्याच्या अ-खेरीस बल्गर लोकांनी डॅन्यूब व थ्रेस नद्यांच्या खोऱ्यांत प्रवेश करून बऱ्याच मोठ्या भागावर आपला अंमल बसविला. सातव्या शतकात उत्तरे-कडील खाझआर जमातीचे त्यांचा पाडाव करून त्यांना मागे हटविले. नं-तरच्या गॉथ, तुर्की व इराणी टोळ्यांबरोबरच्या दीर्घ संघर्षकाळात बल्गर लोकांनी आपले स्थान उत्तरोत्तर बळकट केले.

इ. स. ७४३ ते १०१८ हा पहिला बल्गेरियन सत्ताकाल होय. या काळात क्रम (८०२-१४) व सिमे-ऑन (८९३-९२७) यांच्या कारकीर्दीमध्ये बल्गेरियन संस्कृतीचा पाया घालण्यात आला. या काळातच बल्गर जमात व स्थानिक स्लाव्ह जमा-ती यांत सांस्कृतिक एकात्मता निर्माण होऊन बल्गेरियन समाजाची पृ-थगात्मता सिद्ध झाली. बल्गेरियन भाषा-साहित्याला व्यवच्छेदन स्वरूप लाभले आणि सोफिया शहर हे विद्या-कलांचे केंद्र म्हणून विकसित झाले. याच कालखंडात ख्रिस्ती धर्माचाही सार्वत्रिक प्रसार झाला. यानंतरच्या कालखंडात (१०१९-११८५) बल्गेरियावर बायझंटिन साम्राज्याचा अंमल होता. त्यानंतरचा ११८६ ते १३९६ हा बल्गेरियन सत्तेचा दुसरा कालखंड होय. या कालखंडात पहिला ईव्हान आसेन (११९०-९५) याची कारकीर्द यशस्वी ठरली. राजकीय स्थैर्याबरोबरच देशाच्या सीमाही अधिक निश्र्चित झाल्या.

ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्चचा प्रभावही या कालखंडात वाढला; पण हा दुसरा कालखंड अंतर्गत सत्तास्पर्धा व परकीय जमातींची आक्रमणे यांमुळे फारसा प्रगतिपर ठरला नाही. १३९६ मध्ये या दुसऱ्या बल्गेरियन राजसत्तेचा शेवट झाला. यानंतरच्या सु. पाच शतकांच्या दीर्घ कालखंडात (१३९६-१८७८) बल्गेरिया तुर्कस्तानच्या ऑटोमन साम्राज्याच्या अंमलाखाली होता. देशाच्या इतिहासातील हा अवनतीचा कालखंड होय. या काळात भाषा, चालीरीती, वेशभूषा यांसारख्या अनेक घटकांवर मुस्लिम संस्कृतीचा फार मोठा ठसा उमटला. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चनेही स्थानिक बल्गेरियन चर्चचा पाडाव केला आणि बल्गेरियन भाषा, लिपी, साहित्य इत्यादींचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला.

तुर्की राजवटीत बल्गेरियन लोकांच्या जमिनी हिरावून घेण्यात आल्या. पारतंत्र्याच्या या दीर्घ काळात बल्गेरियन राष्ट्र आणि संस्कृती यांची सर्वतोपरी गळचेपी करण्यात आली. तथापि एकोणिसाव्या शतकाच्या आपल्या राष्ट्रीय व सांस्कृतिक अस्मितेची तीव्र जाणीव बल्गेरियन समाजाला होऊ लागली. तुर्की साम्राज्यविरोधी अनेक आंदोलने वेळोवेळी करण्यात आली. परिणामतः १८७८ साली बल्गेरियाला एक राष्ट्र म्हणून स्वतंत्रता लाभली. उत्तरोत्तर निष्प्रभ होत गेलेली तुर्की साम्राज्यसत्ता आणि ब्रिटन व रशिया यांमधील संघर्ष हीदेखील बल्गेरियाच्या स्वंतत्रतेस कारणीभूत ठरली. १८७८ ते १९४३ हा बल्गेरियन सत्तेचा तिसरा कालखंड होय. या काळात राजेशाहीचा उदय झाला. तिसऱ्या बोरिसच्या कारकीर्दीत (१९१८-४३) देशात राजकीय स्थैर्य निर्माण झाले. मॅसिडोनिया (आधुनिक नाव) व थ्रेसचे खोरे हे संलग्न प्रदेश मिळविण्याच्या कामी तिसऱ्या बोरिसला बरेच यश मिळाले. दुसऱ्या महायुद्धकाळात बोरिसने हिटलरची बाजू घेऊन मुलूख, विशेषतः यूगोस्लाव्हियातील, मिळविला. जर्मनीच्या पराभवानंतर मात्र इतर पूर्व यूरोपीय राष्ट्रांप्रमाणेच बल्गेरियावरही रशियाचा प्रभाव राहिला. १९४६ पासून येथे रशियाच्या संमतीने प्रजासत्ताक स्थापन करण्यात आले. बल्गेरियात कम्युनिस्ट राजवट प्रस्थापित करण्यात कॉलारॉफ व डिमीट्रॉफ या दोघांचे नेतृत्व कारणीभूत ठरले

बोरिस १९४३ मध्ये मरण पावला. त्याचा मुलगा दुसरा सिमेऑ गादीवर आला. सप्टेंबर १९४४ मध्ये फादरलँड फ्रंट या डाव्या आघाडीने रशियन मदतीने सत्ता हस्तगत केली. या नव्या सत्ताधारी आघाडीची सूत्रे किमॉन गेऑर्गीव्ह याच्या हाती होती. सप्टेंबर १९४६ मध्ये लोकमत घेऊन बल्गेरियातील राजेशाही नष्ट करण्यात आली आणि प्रजासत्ताकाची घोषणा करण्यात आली. नंतर सार्वत्रिक निवडणुका होऊन गेऑर्गी डिमीट्रॉफ हा बल्गेरियाचा पंतप्रधान व कम्युनिस्ट पक्षाचा पहिला सचिव बनला. सर्व विरोधी पक्ष विसर्जित करण्यात येऊन रशियन धर्तीवरील नवे संविधान डिसेंबर १९४७ मध्ये स्वीकारण्यात आले. त्यानंतर व्हासिल कॉलारॉफ (१९४९-५०) आणि त्यानंतर व्हल्को चेर्व्हेन्को हे पंतप्रधान झाले. टॉडॉर झिव्हकॉफ हा १९५४ मध्ये पक्षाचा पहिला सचिव आणि १९६२ मध्ये पंतप्रधान झाला.

१९६५ मध्ये अवचित सत्तांतराचा झालेला प्रयत्न अयशस्वी ठरला. मे १९७१ मध्ये नवीन संविधान स्वीकारण्यात आले, त्यानुसार झिव्हकॉफने पंतप्रधानपद सोडले व ‘स्टेट कौन्सिल’ चा तो अध्यक्ष बनला. १९७६ मध्ये त्याची या पदी फेरनिवड झाली. मे १९७७ मध्ये वोरिस व्हेलचेव्ह या केंद्रीय समितीच्या (सेंट्रल कमिटी) सचिवाची पक्षीय संघटनेतून हकालपट्टी करण्यात येऊन या कमिटीची पुनर्रचना करण्यात आली. एप्रिल १९७८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाची राष्ट्रीय परिषद भरविण्यात आली आणि १९७७ मधील असमाधानकारक आर्थिक कामगिरीच्या सबबीवर तीन मंत्र्यांना काढून टाकण्यात आले. जुलै १९७८ मध्ये केंद्रीय समितीच्या मंत्रालयातील सदस्यसंख्या वाढवून ती आठ करण्यात आली आणि सप्टेंबर १९७८ मध्ये पक्ष शुद्धीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. १९७१ पासून पश्र्चिम यूरोपीय देशांशी बल्गेरियाचे संबंध सुधारत आहेत. ग्रीसबरोबर आर्थिक व तांत्रिक क्षेत्रांत सहकार्य वाढत आहे. ग्रीसमधील बंदरांचा वापर करण्याच्या सवलतीही बल्गेरियाला मिळाल्या आहेत. तथापि मॅसिडोनियाच्या प्रश्नावर त्याचे यूगोस्लाव्हियाशी मतभेद झाल्याचे दिसून येते.

बल्गेरियात १९७१ च्या संविधानानुसार ४०० सदस्यांची राष्ट्रीय विधानसभा असून तिच्या सदस्यांची मुदत पाच वर्षांची असते. सार्वत्रिक, प्रौढ मतदानाने त्यांची निवड होते. हे सदस्य स्टेट कौन्सिलमधील सदस्यांची निवड करतात. राष्ट्रप्रमुख पदाची (हेड ऑफ स्टेट) तरतूद संविधानात नाही. तथापि स्टेट कौन्सिलचा अध्यक्ष राष्ट्रप्रमुखाची म्हणून मानली गेलेली कामे करतो. मंत्रिमंडळाची निवड विधानसभा करते व ते या सभेला जबाबदार असते.

‘फादगलँड फ्रंट’ ही आघाडी बल्गेरियन कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली असून खरी राजकीय सत्ता या पक्षाच्याच हाती आहे. वरील आघाडी निवडणुकीसाठी मान्य केलेल्या उमेदवारांची यादी प्रसृत करते. ‘पार्टी काँग्रेस’ ही कम्युनिस्ट पक्षाची सर्वोच्च शाखा असून तिची बैठक दर पाच वर्षांनी बोलविली जाते. तीच केंद्रीय समितीमधील सदस्यांची निवड करते. केंद्रीय समितीची पक्षीय कार्यावर देखरेख असते. ही समिती ‘पोलिटिकल ब्यूरो’ च्या सदस्यांची निवड करते. १९७८ साली या ब्यूरोत ११ सदस्य व चार उमेदवार-सदस्य होते. त्यांचे काम केंद्रीय समितीला धोरणविषयक मार्गदर्शक करण्याचे आहे. देशातील २७ प्रांत व ३ शहरे यांच्या स्थानिक प्रशासनासाठी प्रत्येकी एकेक लोकपरिषद (पीपल्स कौन्सिल) असते. त्यातील सदस्यांची मुदत अडीच वर्षाची आहे.

न्यायव्यवस्था

१९७१ च्या संविधानानुसार देशातील न्यायाधीशांचीही निवडणूक होते. त्यांना परत बोलविण्याचा अधिकार लोकांना असतो. सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत असा अधिकार राष्ट्रीय विधानसभेला आहे. कनिष्ठ न्यायालयात व्यावसायिक न्यायाधीश व सर्वसामान्य असेसर असतात. देशात एक सर्वोच्च न्यायालय, २८ प्रांतिक न्यायालये, १०५ प्रादेशिक न्यायालये असून किरकोळ गुन्ह्यांसाठी ‘कॉम्रेड’ न्यायालयेही आहेत. नवी कुटुंबासंहिता व दंडसंहिता १९६८ मध्ये संमत करण्यात आली.

दंडसंहितेत मृत्युदंडाची तरतूद आहे. राष्ट्रीय विधानसभा ‘प्रॉसिक्यूटर जनरल’ ची निवड पाच वर्षासाठी करते. शासकीय खाती, शासनाधिकारी व नागरिक हे कायद्याचे काटेकोर पालन करतात किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी त्यावर असते. इतर प्रॉसिक्यूटरची नेमणूक करण्याचे वा त्यांना काढून टाकण्याचे अधिकार त्यास असतात. प्रॉसिक्यूटरचे पद व दर्जा स्वतंत्र असून शासन व न्यायसंस्था यांच्यावर तो अवलंबून नसतो.

संरक्षण

बल्गेरिया हा वॉर्सा करारातील सदस्य आहे. देशात लष्करी शिक्षण सक्तीचे आहे (भूसेनेत व वायुसेनेत प्रत्येकी २ वर्षे आणि नौसेनेत ३ वर्षे). भूसेनेचे बळ १,१५,००० होते (१९७८). तीत ८ मोटर व ५ रणगाडा विभाग आहेत. देशात तीन भूसेना कमांड किंवा भूसैनिकी विभाग आहेत. रणगाड्यांची संख्या २,२५० होती. सुरक्षा पोलीस दलाची संख्या ४५,००० होती (१९७५). नौसेनेत २ पाणबुड्या, २ फ्रिगेट, ३ कॉर्व्हेट (युद्धनौका), ४ क्षेपणास्त्रयुक्त बोटी, ६ गस्तीच्या बोटी, १० पाणतीर बोटी, ३ सर्वेक्षण जहाजे इ. सामग्री आढळते. १९७८ मधील नौसेनेचे बळ १०,००० होते. नौसेनेतील सर्व बोटी आणि शस्त्रास्त्रे ही रशियन बनावटीची आहेत.

बल्गेरियन वायुसेनेत रशियन बनावटीची २५० लढाऊ विमाने आहेत. वायुसेना बळ २५,००० होते (१९७८). रशियन बनावटीची भूपृष्ठ ते अवकाश (सरफेस टू एअर) क्षेपणास्त्रेही वायुसेनेत आहेत. वायुसेनेत अत्याधुनिक पद्धतीच्या १९ स्व्कॉड्रन असून त्यांशिवाय वाहतुकीसाठी स्वतंत्र विमान विभाग आहेत. हेलिकॉप्टर आणि प्रशिक्षण विमान विभागही आहेत. यांशिवाय देशाच्या संरक्षण यंत्रणेत साहाय्यक सैनिकी दल (३९,०००) असून त्यातच सीमादलाचा अंतर्भाव होतो.देशात ऐच्छिक स्वरूपाची लोकसेना असून तिची संख्या १,५०,००० होती (१९७८). १९७८ च्या अर्थसंकल्पात संरक्षणविषयक तरतूद ५१.८ कोटी लेन्हा होती.

आर्थिक स्थिती

दुसऱ्या महायुद्धापूर्वी बल्गेरियाची अर्थव्यवस्था शेतीप्रधान होती. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात शेतीचा वाटा ६५% तर उद्योगांचा केवळ १५ % होता. १९४७ नंतर मात्र देशाची अर्थव्यवस्था उद्योगप्रधान बनली व वरील प्रमाण अनुक्रमे सु. १७ % व ६५ % असे बनले. रशियाच्या धर्तीवर उद्योग व व्यापाराचे राष्ट्रीयीकरण, सामूहिक शेती व पंचवार्षिक योजना इ. पद्धतींच्या अवलंबनामुळे हा बदल घडून आला. सहाव्या पंचवार्षिक योजनेत (१९७१ — ७५) अभियांत्रिकी, धातुकर्म, इलेक्ट्रॉनिकी, जहाजबांधणी व रसायन उद्योग यांच्या विकासावर अधिक भर देण्यात आला. या काळातील राष्ट्रीय उत्पन्नाचा वार्षिक सरासरी विकासदर ८ % होता. सातव्या पंचवार्षिक योजनाकाळात (१९७६ — ८०) राष्ट्रीय उत्पन्नात ९ %, औद्योगिक उत्पादनात २०% वाढ घडवून आणण्याचा संकल्प होता.

कृषी

देशातील ४१ % जमीन शेतायोग्य असून एकूण लोकसंख्येच्या ३० % लोक शेतीव्यवसायात गुंतले आहेत. बरीचशी जमीन सुपीक आहे. दुसऱ्या महायुद्धापूर्वी देशातील पारंपारिक पद्धतीने चालणाऱ्या शेतीचे चित्र निराशाजनक होते. नंतर मात्र शेतीतील अतिरिक्त लोकसंख्या उद्योगाकडे वळविणे, शेतीच्या कमी उत्पाकतेवर मात करणे व विपणनयोग्य शेतमालात वाढ करणे, अशी तीन उद्दीष्टे निश्र्चित करण्यात आली. त्यांना अनुसरून नवीन जमीन सुधारणा कायद्यान्वये शेतीचे सामूहिकीकरण व सरकारीकरण करून आधुनिक यंत्रसामग्रीचा व खतांचा वापर करण्यात येऊ लागला. त्यामुळे दर एकरी व दर माणशी शेती उत्पादनात वाढ झाली. परंतु पश्र्चिम यूरोपीय देशांच्या तुलनेने ही वाढ कमीच आहे.

१९५८ पर्यंत शेतीचे सामूहिकीकरण पूर्ण झाले. येथील सामूहिक शेती व ग्राहक सहकारी संस्थांच्या कार्यात ‘युनायटेड सेंट्रल को-ऑपरेटिव्ह युनियन’ ही संस्था सहकार्य देते. खाजगी शेतांचा आकार ०.५ हेक्टरपर्यंत (पर्वतीय भागात एक हेक्टर) असून १९७६ मध्ये अशा खाजगी शेतीत एकूण ५,७१,१०० हेक्टर क्षेत्र होते. त्याच वर्षी देशात ८९ सामूहिक शेते; ५७ सरकारी शेते; ६६ यंत्र व ट्रॅक्टर केंद्रे; ९६,८३१ ट्रॅक्टर व १७,७०५ मळणी-कापणी यंत्रे होती. सामूहिक व सरकारी शेतजमिनीचे ‘कृषि-औद्योगिक प्रकल्पा’ त रूपांतर करण्यात येत आहे. अशा १७० प्रकल्पांत ४२,५०,८२१ हे. शेती होती. ११,४७,००० हे, क्षेत्र जलसिंचनाखाली होते (१९७६).

गहू, मका, बीट, बार्ली, राय, कापूस, तंबाखू व फळे ही येथील प्रमुख पिके असून ती प्रामुख्याने डॅन्यूब व मरित्स नद्यांच्या सखल मैदानी प्रदेशांत घेतली जातात. दक्षिण भागात कापूस, तंबाखू व फळांचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते. द्राक्षे व मद्य यांच्या निर्यातीत बल्गेरिया अग्रेसर आहे. १९७६ मधील कृषी व इतर उत्पादनाची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती. (उत्पादन हजार टनांमध्ये) : गहू २,३९६; राय २४; मका १,९४५; बार्ली ९०७; तांदूळ ४०; सूर्यफूल ३३६; सरकी न काढलेला कापूस ३; तंबाखू १३३; टोमॅटो ६०३; बटाटे ३१८ (१९७५); द्राक्षे ८२५; मांस ७७४; लोकर २६; साखर ३६२ यांशिलाय अंडी १,३०८ द. ल. व दूध १,३८३ द. ल. विटर. गुलाब पुष्प उत्पादनासाठी बल्गेरिया प्रसिद्ध आहे. येथील गुलाब तेलाचे (अत्तराचे) वार्षिक उत्पादन १,२०० किग्रॅ. असून जगात अत्तर पुरविणारा हा प्रमुख देश आहे. या तेलाचा उपयोग सुगंधी द्रव्ये बनविण्यासाठी केला जातो.

पुरेशा चराऊ कुरणांच्या व चाऱ्याच्या अभावामुळे पशुपालनाचा विशेष विकास झालेला आढळत नाही. १९७७ मध्ये देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते : घोडे १,२७,७९१; गुरे १७,२१,६९१ पैकी ६,४९,०१८ दुभत्या गाई; मेंढ्या ९७,२३,४७५; डुकरे ३४,५६,२२९; कोंबड्या ३,९५,०४,२९९ व मधमाश्यांची पोळी ७,०२,१५१. कुक्कुटपालन व्यवसायाच्या विकासाकडेही अधिक लक्ष देण्यात येत आहे.

उद्योग

इंधन व शक्तिसाधनांचा तुटवडा बल्गेरियाच्या औद्योगिक विकासातील प्रमुख अडथळा आहे. खनिजांचे नवीव साठे शोधण्याचे प्रयत्न चालू असून खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यात काही प्रमाणात यशही मिळाले आहे. खनिज तेल प्रामुख्याने काळ्या समुद्राच्या किनारी प्रदेशात सापडले आहे. १९७६ मध्ये अशुद्ध तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन अनुक्रमे १७,००० टन व ३७ द. ल. घ. मी. होते. खनिज तेलशुद्धीकरणासाठी बुर्गास (वार्षिक क्षमता ५० लक्ष टन) व डॉल्-नी डब्नीक (७० लक्ष टन) ही केंद्रे प्रसिद्ध आहेत.

कोळसा हे देशातील शक्तिनिर्मितीचे प्रमुख साधन असून त्याचे साठे पूर्व मरित्स खोऱ्यात अधिक आढळतात. देशात उपलब्ध असलेल्या लिग्नाइट (तपकिरी) कोळशाचेच अधिक प्रमाणावर उत्पादन घेऊन त्याचा शक्तिनिर्मितीसाठी उपयोग करण्यावर अधिक भर आहे. त्यासाठी रशियातूनही कोळसा आयात केला जातो.

बल्गेरियातील पहिले अणुशक्तिकेंद्र सप्टेंबर १९७४ मध्ये कॉझलॉडूई येथे रशियन अभियंत्यांनी बाधून पूर्ण केले असून १९८० पर्यंत त्याची क्षमता १,७६० मेवॉ.पर्यंत वाढविण्याची योजना होती. डॅन्यूब नदीवरील तूर्नृमॅगूरेले-निकॉपॉल येथे रूमानिया-बल्गेरिया यांचे संयुक्त जलविद्युत् केंद्र बांधण्यात येत आहे. हिवाळ्यात गोठणारे पाणी व उन्हाळ्यातील अवर्षणे अशी प्रतिकूल परिस्थिती असूनही बल्गेरियातील एकूण वीजनिर्मितीपैकी एक-तृतीयांश जलविद्युत् शक्ती आहे. रूमानिया व यूगोस्लाव्हियातूनही विद्युत्-शक्ती आयात केली जाते. १९७६ मध्ये देशात २७,७४२ द. ल. किवॉ. तास विद्युत्-शक्ती निर्माण झाली.

बल्गेरियाचे १९७५ मध्ये झालेले खनिज पदार्थांचे उत्पादन पुढीलप्रमाणे आहे (उत्पादन हजार मे. टनांत) : दगडी कोळसा २७,८४५ (पैकी अँथ्रासाइट ११८; लिग्नाइट २१,०६०); लोहखनिज ७७५; तांबे ५५; शिसे ११०; जस्त ८०; मँगॅनीज १०; शुद्ध मीठ ८९; तंतुमय अँस्बेस्टस ०.७; गंधक ६.७ (१९७३).

देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सु. एक-तृतीयांश क्षेत्र (३८,०७,००० हेक्टर) जंगलाखाली असून त्यापैकी तीन-चतुर्थांश क्षेत्र पानझडी अरण्याखाली व बाकीचे सूचिपर्णी अरण्याखाली आहे (१९७६). अरण्यप्रदेश प्रामुख्याने रीला, रॉडॉपी, पीरीन व बाल्कन पर्वतांच्या उतारांवर आढळतात. १९७६ मध्ये ६०,१५७ हे. क्षेत्रात नव्याने वनरोपण करण्यात आले व ८६,४५,००० घ. मी. लाकूडतोड झाली.

मासेसारीच्या दृष्टीने काळा समुद्र महत्त्वाचा आहे. देशात आधुनिक पद्धतीच्या ५० मासेमारी बोटी असून त्यांपैकी २० बोटी महासागरात मासेमारी करणाऱ्या आहेत. १९७६ मध्ये १,६०,४०० मे. टन मासे पकडण्यात आले.

दुसऱ्या महायुद्धपूर्व काळात उद्योगधंद्यांचा विकास अत्यल्प झालेला होता. नंतर मात्र खाणकाम व निर्मितिउद्योगांचे राष्ट्रीयीकरण करून रशिया, चेकोस्लोव्हाकिया व पूर्व जर्मनीच्या सहकार्याने औद्योगिक विकासावर अधिक भर देण्यात आला. सर्व उद्योगांचे राष्ट्रीयीकरण १९४७ मध्ये करण्यात आले. १९४७ पूर्वी बरेचसे निर्मितिउद्योग कृषि-उत्पादनावर आधारित होते. उदा., साखर आणि मद्यनिर्मिती, गुलाबापासून तेल काढणे, तंबाखू प्रक्रिया, पीठ व कापड गिरण्या इत्यादी. नंतर मात्र अभियांत्रिकी, रसायने, यंत्रे व धातुकर्म उद्योगांचा विकसा वेगाने झाला.

सोफिया, बुर्गास व वार्ना ही प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत. मळणी यंत्रे, ट्रॅक्टर, पाण्याची एंजिने, ट्रॅक इत्यादींची येथून निर्यात केली जाते. रेडिओ, प्रशीतके व धुलाई यंत्रे इ. वस्तूंची निर्मिती येथे होत असली, तरी काही प्रमाणात त्यांची आयातही केली जाते. रसायन उद्योगात नायट्रोजन व फॉस्फेट खते, रंग, प्लॅस्टिके, रंजक, औषधे, रबर ही उत्पादने महत्त्वाची आहेत. वाढत्या शहरीकरणाबरोबरच विटा, कौले, सिमेंट, काच, कापड, कातडी वस्तू, अन्नप्रक्रिया इ. उद्योगांचाही विकास होत आहे. येथील फळे, भाजीपाला, फळांचे रस, मधुरस, मद्ये इ. पूर्व आणि पश्र्चिम यूरोपांतील बाजारपेठांतही जातात.

सहाव्या पंचवार्षिक योजना काळात (१९७१ - ७५) औद्योगिक उत्पादन ५५ टक्क्यांनी, निव्वळ वस्तु-उत्पादन ४६ टक्क्यांनी वाढले; तर गुंतवणुकीत प्रतिवर्षी ६.५ टक्क्यांनी वाढ झाली. या काळात रसायन व धातुकर्म उद्योगांचा विशेष विकास झाला. सातव्या पंचवार्षिक योजनेत (१९७६-८०) औद्योगिक उत्पादन ५५ टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे १९७७ पासून देशाच्या विकासदरात घट झालेली आढळते. १९७६ मध्ये काही प्रमुख औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांत) : कच्चे पोलाद २,४६०; कच्चे लोखंड १,६१२; सिमेंट ४,३६२; गंधकाम्ल ८५७; कोक १,४०८; कृत्रिम खते १,५३९; वेल्लित पोलाद २,७५६; भस्मी सोडा १,०४५; यांशिवाय सुती कापडाचे ३५९ द. ल. मी. व रेशीम कापडाचे ३१ द. ल. मी. उत्पादन झाले.

व्यापार

व्यापार संघटनेचे १९७६ मध्ये ३३,२३,६०० सभासद होते. १९६८ पासून कामगारांचा कामाचा आठवडा ५ दिवसांचा (४२.५ तासांचा) आहे. १९७३ मध्ये किमान मासिक वेतन ८० लेव्हा ठरविण्यात आले असून १९७६ चे, शेतकरी वगळता, मासिक सरासरी वेतन १४८ लेव्हा होते. पुरूषांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, तर स्त्रियांचे ५५ वर्षे आहे. कामगाराची एकूण संख्या (शेतकरी वगळता) ३८,८६,८३७ (पैकी स्त्रिया १९,४७,८५७) होती. त्यांपैकी १३,१०,१४१ कामगार औद्योगिक क्षेत्रात; तर ३,१२,६७२ बांधकामावर आणि ९,६४,७६८ शेती व जंगलांत काम करणारे होते.

बल्गेरिया १९४९ पासून ‘कौन्सिल फॉर म्युच्युअल इकॉनॉमिक असिस्टन्स’ (कॉमेकॉन) या साम्यवादी राष्ट्रांच्या सार्वजनिक बाजार संघटनेचा सभासद आहे. बल्गेरियाचा परदेशांशी होणारा व्यापार शासनाच्या ताब्यात आहे. बल्गेरियाचा ७९% व्यापार साम्यवादी राष्ट्रांशी होत असून त्यापैकी ५४% व्यापार एकट्या रशियाशी चालतो. इतर राष्ट्रांपैकी बल्गेरियाकडून जास्तीत जास्त निर्यात होणाऱ्या देशांत लिबियाचा, तर बल्गेरियाला जास्तीत जास्त निर्यात करणाऱ्या देशांत प. जर्मनीचा प्रथम क्रमांक लागतो.

बल्गेरिया प्रामुख्याने अन्न उत्पादने, ओली व सुकी फळे, भाजीपाला, तंबाखू, मद्ये, अत्तरे, अलोह धातू, ओतीव लोखंड, चामड्याच्या वस्तू, कापड, यंत्रे इत्यादींची निर्यात; तर यंत्रे, तेल, नैसर्गिक वायू, पोलाद, सेल्यूलोज, लाकूड इ. मालाची आयात करतो. १९७७ मध्ये बल्गेरियाने एकूण ६,०१६ द. ल. लेव्हा किंमतीची आयात व ६,००१ द. ल. लेव्हा किंमतीची निर्यात केली. १३ मे १९४७ रोजी बल्गेरियाग्रेट ब्रिटन यांदरम्यान आर्थिक, वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक दहा वर्षांच्या सहकार्याचा करारा झालेला आहे.

बल्गेरियातील बँकांचे राष्ट्रीयीकरण १९४७ मध्ये, तर समग्र बँकिंग व्यवहाराची पुनर्रचना १९६९ मध्ये करण्यात आली. ‘नॅशनल बँक’ह्या देशाच्या मध्यवर्ती बँकेशिवाय ‘फॉरिन ट्रेड बँक’ व ‘स्टेट सेव्हिंग्ज बँक’ या देशातील प्रमुख बँका आहेत. ८.१ द. ल. ठेवीदारांनी एकूण ६,४०४ द. ल. लेव्हा बचत केली (१९७६). ठेवीवरील व्याजाचा दर १ ते ३% पर्यंत आहे. ‘लेव्ह’ (अनेकवचनी लेव्हा) हे येथील चलन असून एका लेव्हचे १०० स्टाटिन्की होतात. नवीन एक लेव्हबरोबर जुने दहा लेव्हा असून हे नवीन चलन १ जानेवारी १९६२ पासून सुरू करण्यात आले. मे १९५२ पासून लेव्ह हे चलन रशियाच्या रूबल या चलनाशी जोडण्यात आले असून १ रशियन रूबल = १.३० लेव्हा होतात. ऑक्टोबर १९७८ मध्ये अधिकृत विनिमय दर पुढीलप्रमाणे होता : १ पौंड = १.७० लेव्हा; १ अमेरिकी डॉलर = ०.९६ लेव्हा. १९७७ चा बल्गेरियाचा महसूल जमा ९,४९८ द. ल. लेव्हा व खर्च ९,४७७ द. ल. लेव्हा होता.

वाहतूक व दळणवळण

वाहतूक व दळणवळणाचा बल्गेरियात विशेष विकास झालेला आढळत नाही. दोहोंचेही पूर्णतः राष्ट्रीयीकरण झालेले आहे. १९७६ मधील रस्त्यांची एकूण लांबी ३१,४०४ किमी. (पैकी ६.६८६ किमी. रस्ते पहिल्या दर्जाचे) असून माल व प्रवासी वाहतूक अनुक्रमे ७६५ द. ल. टन व १,८५२ द. ल. झाली. एकूण ७,६२६ किमी. लोहमार्गांपैकी १,४२५ किमी. मार्गांचे विद्युतीकरण झाले असून १०२ द. ल. प्रवासी व ७७ द. ल. टन मालवाहतूक झाली. ‘बाल्कन’ या बल्गेरियन हवाई वाहतूक कंपनीद्वारे अंतर्गत व परदेशांशी हवाई वाहतूक चालते. १९७२ मध्ये बाल्कनकडे २३४ विमाने होती. १९७६ मध्ये हवाई मार्गांने २.१ द. ल. प्रवासी व २१,८६३ टन मालवाहतूक झाली.

बंदरे, जहाजवाहतूक व जहाजबांधणी ही कार्ये ‘बल्गेरियन युनायटेड शिपिंग अँड शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन’ पाहते. डॅन्यूब नदीचा अंतर्गत आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी उपयोग होत असून रूसे व लॉम ही तीवरली प्रमुख बंदरे होत. बुर्गास व वार्ना ही काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रमुख बंदरे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर दळणवळणाच्या साधनांचा विसाक वेगाने झाला असला, तरी म्हणावा तेवढा विकास अद्याप आढळत नाही. १९७६ मध्ये देशात २,७४३ डाकघरे; ८,५२,८५८ दूरध्वनी; ४२ प्रक्षेपणे केंद्रे; १४ दूरचित्रवाणी केंद्रे; २,२५,९२,०९७ रेडिओ संच आणि १५,४६,०२० दूरचित्रवाणी संच होते. १९७५ मध्ये १४ दैनिके आणि ४८४ नियतकालिके प्रसिद्ध होत होती.

लोक व समाजजीवन

बल्गर व स्लाव्ह अशा मूळच्या दोन जमातींपासून बल्गेरियन समाज बनला. यांपैकी बल्गर जमात काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील स्टेप प्रदेशात राहणारी एक आशियाई जमात होय. सातव्या शतकात बल्गर लोकांनी डॅन्यूब नदी ओलांडून दक्षिणेस विद्यमान बल्गेरियाकडे स्थलांतर केले. तत्पूर्वीच पाचव्या व सहाव्या शतकांत येथे येऊन स्थायिक झालेल्या स्लाव्ह लोकांवर बल्गरांनी प्रभुत्व मिळवून पहिल्या बल्गेरियन राज्याची स्थापना केली.

या बल्गर लोकांवरूनच ‘बल्गेरिया’ हे नाव रूढ झाले. बल्गेरियन समाजावर बायझंटिन व तुर्की संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. वांशिक दृष्टया इतर बाल्कन राष्ट्रांपेक्षा बल्गेरिया अधिक एकजिनसौ असून १९७६ मध्ये ८५.५ % लोक बल्गेरियन व ८.६ % तुर्की होते. उर्वरित लोकांत जिप्सी (२.६ %), ग्रीक (०.१ %), आर्मेनियन (०.३ %), मॅसिडोनियन (२.५ %), रशियन (०.१४ %), रामानियन, ज्यू इत्यादींचा समावेश होतो. बल्गेरियन समाज अद्यापही ग्रामीण आणि कृषिप्रधान असून त्यावरील ‘ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च’ चा पगडा कम्युनिस्ट पक्षाच्या प्रयत्नांमुळे होत चालला आहे.

१९७६ मध्ये देशात ३,७२० चर्च, ५०० चॅपेल आणि २० मठ होते. चर्चचा १७ % निधी राज्यांकडून पुरविला जातो. चर्चकडून शैक्षणिक संस्थांऐवजी धार्मिक पाठशाळा चालविण्याचे व युवक संघटना उभारणयाचे कार्य केले जाते.

बल्गेरियाची एकूण लोकसंख्या ८.७६ द. ल. (१९७६) असून तीपैकी ४.४ द. ल. पुरूष आहेत. नागरी लोकसंख्या ५.१ द. ल. असून दर चौ. किमी. स. लोकसंख्या सरासरी घनता ७९.२ भरते. १९७६ मधील नोंदणीकृत जन्म १,४४,९२९; मृत्युसंख्या ८८,३४८; विवाह ७३,३६२; घटस्फोट ११,३११. दर हजारी स्थूल जन्मप्रमाण, मृत्युप्रमाण आणि बालमृत्युप्रमाण अनुक्रमे १६.५; १०.१ व २३.५ असून लोकसंख्यावाढीचे प्रमाण प्रतिवर्षी ६.४% आहे. १९७७ मधील पुरूषांचे सरासरी आयुर्मान ६९ व स्त्रियांचे ७४ वर्षे होते.

बल्गेरियन समाजात छोटे किसान व मेंढपाळ यांची बहुसंख्य कुटुंबे आहेत. पूर्वी या एकजिनसी समाजात आर्थिक आणि सामाजिक विषमता फारशी आढळून येत नसे. राजेशाही व तिच्याशी एकनिष्ठ असणारा कृषिप्रधान ग्रामीण समाद यांवरच बल्गेरियाची राष्ट्रीयता अधिष्ठित होती. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र ही व्यवस्था बदलू लागली. नव्या कम्युनिस्ट राजवटीत खाजगी जमिनीचे राष्ट्रीयीकरण होऊन सहकारी शेती सुरू झाली. यामुळे शेतीचा विकास घडून आला, पण त्याचबरोबर पारंपरिक किसानवर्गाचे स्थान बदलले. औद्योगिकीकरणावर दिलेला भर व वाढते नागरीकरण यांमुळे नवा कामगारवर्ग निर्माण झाला. विद्यमान बल्गेरियन समाजात कम्युनिस्ट पक्षप्रणीत जडणघडण दिसून येते.

आवालवृद्धांसाठी वेगवेगळे वयोगट केलेले असून त्यांत सर्व नागरिकांचा समावेश असतो. पक्षाचे सदस्यत्व मिळविण्याची नागरिकांमध्ये चढाओढ असते. कामगारांना संपाचा हक्क नाही. कामगारांचे प्रश्र्न देशातील १५ कमागार संघटनांच्या सल्ल्याने सोडविले जातात. स्त्री कामगारांना विशेष उत्तेजन दिले जाते. देशातील महिला कामगार संघटना महत्त्वाची मानली जाते.

निवृत्तिवेतन, वैद्यकीय मार्गदर्शन व मदत, बेरोजगारांना मदत, कामगार गृहे यांसारख्या कल्याणकारी योजना शासनातर्फे व कामगार संघटनांतर्फे हाती घेतलेल्या असून त्यामुळे देशाची खूपच प्रगती झालेली आहे. १९७६ पासून लोकांना निवृत्तिवेतन देण्यात येऊ लागले. १९५१ पासून सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा सर्वांसाठी मोफत आहेत. स्त्रियांना प्रसूतिपूर्व व नंतरही पुरेशी रजा देण्यात येते. १९७६ मध्ये देशात १८५ रूग्णालये (पैकी १६ मनोरूग्णालये व व्यसनग्रस्तांची उपचार केंद्रे), ६८,६७७ खाटा; १९,३१२ डॉक्टर आणि ३,९०१ दंतवैद्य होते.

शिक्षण

शिक्षणात उल्लेखनीय प्रगती झालेली असून तांत्रिक शिक्षणावर व कार्यानुभवावर अधिक भर दिला जातो. देशातील निरक्षरता जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. उच्च शिक्षणासाठी गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना अनुदान दिले जाते, सार्वजनिक वाचनालयांची वाढही बऱ्याच प्रमाणात झाली आहे. वाङ्-मय, कला व विज्ञान या क्षेत्रांतील व्यक्तींना शासकीय उत्तेजन मोठ्या प्रमाणावर मिळते. वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक प्रकाशने शासनाच्या मदतीने प्रसिद्ध करण्यात येऊन केवळ नाममात्र किंमतीत लोकांना उपलब्ध केली जातात. १९७३-७४ पासून ७ ते १६ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत आहे. १९७६-७७ मध्ये ७.२६३ बालकमंदिरांत ३,९४,८७८ मुले व २५,९०० शिक्षक तसेच ९०१ पूर्वप्राथमिक शाळा; २,४०१ प्राथमिक शाळा, ६१ पूर्वाध्ययन शाळा (इयत्ता ५ वी ते ८ वी); १३२ माध्यमिक शाळा (९ वी ते ११ वी) व १८९ पूर्व-माध्यमिक शाळा (पहिली ते ११ वी) होत्या. यांशिवाय ५ व्यवसायविषयक तंत्रशाळांत ८३ शिक्षक व ४,१९० विद्यार्थी; ३१३ तंत्रमहाविद्यालयांत ९,४७६ शिक्षक व १,४५,५३९ विद्यार्थी; ४५ उच्च माध्यमिक संस्था २६ उच्च शिक्षण संस्था व ३ विद्यापीठे होती.

चित्रपट, रंगभूमी, दूरचित्रवाणी या बहुजन माध्यमांतून मनो-रंजनाबरोबरच राजकीय स्वरूपाचाप्रचारही करण्यात येतो. देशात एकूण ३६ नाट्यगृहे, ७ संगीतिकागृहे व ३,५७९ चित्रपटगृहे होती (१९७६). सॉ-कर हा येथील लोकप्रिय खेळ आहे

भाषा-साहित्य

बल्गेपियन ही इंडो-यूरोपियन कुटुंबाच्या स्लाव्हिक गटाची दक्षिणेकडील शाखा. इ. स. नवव्या शतकापासून ह्या भाषेत साहित्यनिर्मिती सुरू झाली. आरंभीचे बल्गेरियन साहित्य धार्मिक आहे. १३९६ ते १८७८ ह्या कालखंडात बल्गेरिया तुर्कांच्या सत्तेखाली असल्यामुळे बल्गेरियन साहित्याचा प्रवाह कुंठित झाला. तथापि अठराव्या शतकापासून राष्ट्रवादाच्या प्रेरणेतून ह्या कुंठित प्रवाहाला पुन्हा ओघ प्राप्त करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले. ह्या संदर्भात फादर पाइसी (१७२२-९८), पेटको स्लाव्हिकोव्ह (१८२७-९५), ल्यूबेन काराव्हेलोव्ह (१८३४-७९), गेओर्गी साव्हा रकॉव्हस्की (१८२१-६७) आणि ख्रिस्त्यो बोटेव्ह (१८४८-७६) हे साहित्यिक विशेष उल्लेखनीय होत.

स्वातंत्र्योत्तर काळात इव्हान व्हाझॉव्ह (१८५०-१९२१), झखारी स्टोयानॉव्ह (१८५१-८९), पेंचो स्लाव्हिकोव्ह (१८६६-१९१२), पेटको टोडोरोव्ह (१८७९-१९१६), अंतोन स्ट्राशिमिरॉव्ह (१८७२-१९३७), एलिन-पेलिन (१८७७-१९४९) ह्यांसारख्या साहित्यिकांनी बल्गेरियन साहित्य समृद्ध करण्यास हातभार लावला.

डिमिटर डिमॉव्ह, एमिल्यन स्टानेव्ह, डिमिटर टालेव्ह, ऑ-र्लिन व्हास्सिलेव्ह हे स्वातंत्र्योत्तर काळातील अन्य उल्लेखनीय बल्गेरि-यन साहित्यिक.

महत्त्वाची स्थळे

सोफिया हे देशाच्या राजधानीचे ठिकाण (लोकसंख्या ९,६५,७२८-१९७६) औद्योगिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टया महत्त्वाचे आहे. प्लॉव्हदिव्ह (३,०९,२४२) हे प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र आहे. काळ्या समुद्रकिनाऱ्यावरील वार्ना (२,५१,५८८) हे बंदर औद्योगिक (देशातील सर्वांत मोठ्या कापडगिरण्यांपैकी एक येथे आहे) व व्यापारी दृष्टया महत्त्वाचे असून तेथे नौसेनेचा तळही आहे. उन्हाळी विश्रामकेंद्र म्हणून वार्नास आंतरराष्ट्रीय ख्याती लाभली आहे.

डॅन्यूब नदीवरील रूसे (१,६३,०१२) व काळ्या समुद्राच्या बुर्गास आखातावरील बुर्गास बंदर (१,२६,५००) ही औद्योगिक दृष्टया प्रगत आहेत. स्टारा झागॉरा (१,२२,२००) हे बाल्कन पर्वताच्या दक्षिणेकडील गुलाब वाटिकांच्या प्रदेशात वसलेले शहर अत्तर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यांशिवाय प्लेव्हेन (१,०८,१८०), स्लीव्हेन (९०,०००), गाब्रॉव्हॉ (९०,०००), पेर्नीक (८७,४३२), टॉल्बूखिन (८६,१८४), शूमेन (८४,३२१), यांबोल (७५,८६१), खास्कॉव्हॉ (७५,०३१), पाझार्जीक (६७,९११) ही देशातील इतर प्रमुख शहरे आहेत. काळ्या समुद्राचा किनारा, उंच-उंच पर्वतरांगा व गिरिशिखरे ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. वार्ना शहराजवळील स्टँड गोल्डन व नेसबूरजवळील सनी बीच हे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय आहेत. देशात पर्यटन व्यवसायाच्या विकासावर भर देण्यात भर देण्यात येत आहे. ‘बाल्कन टूरिस्ट’ ही शासकीय पर्यटनसंस्था देशातील पर्यटनव्यवस्था पाहते. १९७७ मध्ये एकूण ४५ लक्ष पर्यटकांनी बल्गेरियाला भेट दिली.

 

लेखक - वसंत चौधरी / अ. र कुलकर्णी

संदर्भ : 1. Dobrin, B. Bulgarian Economic Development Since World War II, New York, 1973.

2. Feiwel, G. R. Growth and Reforms In Centrally Planned Economies : The Lessons of the Bulgarian Experience, New York, 1977.

3. Todorov, N. and others, Bulgaria : Historical and Geographical Outline, Sofia, 1965.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate