অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मध्य आफ्रिका प्रजासत्ताक

मध्य आफ्रिका प्रजासत्ताक

आफ्रिका खंडाच्या मध्यभागी असलेला एक स्वतंत्र देश. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २ १६’ उ. ते ११ २०’ उ. व १४ २०’ पू. ते २७ ४५’ पू. यांदरम्यान. क्षेत्रफळ ६,२४,९७७ चौ. किमी. लोकसंख्या २४,८०,००० (१९८२). हा देश भूवेष्टित असून त्याच्या उत्तरेस चॅड, पश्चिमेस कॅमेरून, दक्षिणेस काँगो प्रजासत्ताक (ब्रॅझाव्हिल) व झाईरे (काँगो लोकसत्ताक गणतंत्र) आणि पूर्वेस सूदान हे देश आहेत.

बांगी (लोकसंख्या ७,०८,९७८-१९८०) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

बांगी-शारी या नावाने ओळखला जाणारा हा देश पूर्वी फ्रेंचांच्या विषुववृत्तीय आफ्रिकी वसाहतीचा एक भाग होता. १९५८ मध्ये याचे ‘मध्य आफ्रिका प्रजासत्ताक असे नामकरण झाले व त्याच नावाने १९६० मध्ये हा एक स्वतंत्र देश निर्माण झाला.

भूवर्णन

मध्य आफ्रिका प्रजासत्ताक हा समुद्रसपाटीपासून ६०० ते ९०० मीटर उंचीचा ऊर्मिल पठारी प्रदेश आहे. हा पठारी प्रदेश म्हणजे उत्तरेकडे चॅड सरोवराला मिळणाऱ्या नदीप्रणाली व दक्षिणेकडे ऊबांगी (काँगोची उपनदी) नदीप्रणाली याचा प्रमुख जलविभाजक आहे. सर्वांत जास्त उंचीचे गिरिपिंड देशाच्या पूर्व व पश्चिम सरहद्दीदरम्यान असलेले आढळतात.

मासिफ दू तोंडाऊ या पूर्वेकडील गिरिपिंडाचा उतार दक्षिणेकडे आहे. या गिरिपिंडाच्या वायव्येस मासिफ देस वोंगोस पर्वतश्रेणी असून तिची उंची १,४०० मीटरपर्यंत आढळते. या गिरिपिंडाच्या उत्तरेस ९०० मी. पेक्षा अधिक उचीचे एकाकी असे पर्वतगट आढळतात. त्यांत अबाउरासेन, दार चाला व माँगो (१,३७० मी.) ह्या प्रमूख पर्वतश्रेण्या आहेत. एन्‍गाउओ (१,०५५ मी.), जेबेल वाडा (१,२२६ मी.), एन्‍गाया (१,३६० मी.), टिंगा (१,३४८ मी.) ही या भागातील प्रमुख शिखरे आहेत.दक्षिणेस अवशिष्ट खडक आढळत असून ते ‘कागस’ या स्थानिक नावाने ओळखले जातात.

काही ठिकाणी जांभा मृदेच्या मैदानातून ते वर आलेले दिसतात. या पूर्वेकडील भागातून चिंको व एम्‍बारी  या नद्या वाहतात. या भागात पट्टिताश्म व स्फटिक खडक तसेच वालुकाश्माची व अधुनमधुन ग्रॅनाइटी टेकाडे आढळतात. याच प्रदेशाच्या उत्तर भागातील वालुकाश्म खडकांचे अपक्षरण झाले असून त्यांच्या खाली रूपांतरित व ग्रॅनाइटी खडकांचे थर आढळतात. आग्‍नेय भागात प्राचीन ग्रॅनाइटी खडकांचे थर असून त्यांच्यावर वालुकाश्मांचे आडवे थर आहेत. पश्चिमेस कारे (यादे) ही १,२०० मी. उंचीची ग्रॅनाइटी पर्वतश्रेणी असून पूर्वेकडील वालुकाश्मयुक्त पठारी प्रदेशाकडे तिची उंची कमी होत जाते. येथेही एकाकी असे कागस आढळतात.

देशातून अनेक लहानमोठ्या नद्या वाहतात. देशाच्या साधारण मध्यावर असलेल्या जलविभाजकामुळे उत्तरवाहिनी व दक्षिणवाहिनी अशा दोन नदीप्रणाली निर्माण झाल्या आहेत. देशाच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या बऱ्याच उत्तरवाहिनी नद्या चॅड सरोवराला मिळणाऱ्या शारी या प्रमुख नदीच्या उपनद्या आहेत, तर दक्षिणेकडील बहुतेकदक्षिणवाहिनी नद्या ऊबांगी  (काँगोची उपनदी) नदीच्या उपनद्या आहेत.

ऊबांगी नदीचा बराचसा प्रवाह झाईरे या देशाच्या सरहद्दीवरून वाहतो. बोमू (माबोमू) ही ऊबांगीची प्रमुख उपनदी  आहे. चिंको व एम्‍बारी या पूर्वेकडील गिरिपिंडातील मुख्य नद्या असून त्यांचा खालचा प्रवाह जलवाहतुकीस उपयुक्त आहे. परंतु डोंगराळ भूप्रदेशामुळे उगमाकडील प्रवाहातून जलवाहतूक होऊ शकत नाही. ऊबांगी नदी मात्र जलवाहतुकीच्या दृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. पावसाळ्यात बराचसा आग्‍नेय भाग जलमग्‍न होतो.

हिरे, युरेनियम, लोहधातुक ही प्रमुख खनिजे असून निकेल, मँगॅनीज, कोबाल्ट, कथिल,तांबे, चिनी माती, चुनखडक, जस्त यांचेही साठे सापडले आहेत. पूर्वी सोन्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळत होते. देशातील जमीन विशेष सुपीक असलेली आढळत नाही.

हवामान देशाचे हवामान उष्णकटिबंधीय प्रकारचे आहे. मात्र भूप्रदेशाच्या उंचीमुळे ते विषुववृत्तीय प्रदेशाइतके उष्ण नसते. देशाच्या उत्तरेकडे उप-सहारा, तर दक्षिणेकडे विषुववृत्तीय प्रकारच्या हवामानाचा प्रदेश असल्यामुळे या दोन्ही प्रकारच्या हवामानाची संक्रमणीय स्थिती येथे आढळते. दक्षिण भागात उष्ण व दमट प्रकारचे हवामान असून तेथील उंचप्रदेशाचे हवामान थंड असते. येथे नेहमी झंझावात अनुभवास येतात.

उत्तर भागात वाळूची किंवा धुळीची वादळे निर्माण होतात. उत्तर भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२७ सेंमी., तर दक्षिण भागात ते १९० सेंमी.पेक्षाही अधिक आढळते. ईशान्य भागात मात्र ते ८० सेंमी. इतके कमी असते. वार्षिक सरासरी तापमान २७ से. असते. जून ते नोव्हेंबर येथे आर्द्र ऋतू, तर नोव्हेंबर ते जून कोरड्या ऋतूचा काळ मानला जातो.

आर्द्र ऋतूच्या काळात दररोज गडगडाटी वादळे होऊन जोरदार पर्जन्य वृष्टी होते. सकाळी धुकेही आढळते. जास्तीत जास्त पर्जन्य ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांत पडतो. याच काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासूनही येथे पाऊस पडतो. या काळात येथील तापमान १९ ते ३० से. इतके असते.

कोरड्या ऋतूच्या काळात येथे ईशान्य व्यापारी वारे वा ‘हरमॅटन’ वारे वाहतात. हवा कोरडी असते आणि तापमान १८ ते ४० से. यांदरम्यान असते. दिवस उबदार व रात्री  थंड अशी वातावरणाची स्थिती असते. आकाश निरभ्र व क्वचित तुरळक ढग आढळतात. कोरडे धुके अनुभवास येते.

वनस्पती व प्राणी

देशाचा बराचसा भाग सॅव्हाना गवताळ प्रदेशात समाविष्ट होतो. त्यामुळे उत्तर भाग वृक्षविरहित असून येथे सॅव्हाना प्रकारचे गवत आढळते. मात्र दक्षिणेकडील नद्यांच्या खोऱ्यांत, विशेषत: नैऋत्य भागात, विषुववृत्तीय दाट वर्षारण्ये आहेत. यांत मॉहॉगनी, ओविची, लिंब हे वृक्ष महत्त्वाचे आहेत.

लोबाये विभागातही  वनस्पतींचे दाट आच्छादन असून तेथून कॉफी, कोको, रबर, पाम व इमारती लाकूड ही उत्पादने मिळतात. ईशान्य भागातील निमओसाड प्रदेशात मात्र गवत व तुरळक वनस्पती आढळतात.

देशात विविध प्रकारचे वन्य प्राणी आढळतात. दाट जंगलांमध्ये गोरिला, चिपँझी, माकडे, मोठमोठ्या खारी; सॅव्हाना प्रदेशात विविध प्रकारचे मृग, रेडे, हत्ती, सिंह, तरस, तर नद्यांमध्ये टिलापियासारखे  मासे, पाणघोडा, मगरी, सुसरी, गेंडे हे प्राणी आढळतात. पक्षीसुध्दा विविध प्रकारचे व भरपूर आहेत. त्यांशिवाय अनेक प्रकारचे साप, वटवाघळे, कीटक व फुलपाखरे आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था

देशाच्या प्राचीन इतिहासाविषयीचे पुरावे विशेष उपलब्ध नाहीत. चौदाव्या ते सतराव्या शतकांच्या कालावधीत काँगो विभागातील बरेचसे स्थलांतरित ऊबांगी नदीच्या खोऱ्याकडे येऊ लागले. एकोणीसाव्या शतकापर्यंत येथे लोकवस्ती फारच विरळ होती.

या लोकसंख्येत वांतू भाषा बोलणाऱ्यांचे लहानलहान गट होते. ते चॅड व सूदान या देशांमधून येऊन येथे स्थायिक झाले. यांपैकी अनेक लोकांना गुलाम म्हणून नेण्यात आले. गुलामांच्या व्यापारात आपण विकले जाऊ नये म्हणून आफ्रिकेच्या वेगवेगळ्या भागांतून, विशेषत: पश्चिमेकडील किनारी प्रदेशातून, उत्तरेकडून व नाईल खोऱ्यातून वेगवेगळ्या गटांचे लोक येथे येऊन स्थायिक झाले.

१८०५ ते १८३० या काळात सूदान व चॅडमधून आलेल्या बाया जमातीच्या लोकांनी शारी व लोगोन नद्यांच्या मैदानी प्रदेशात, तर काँगोमधून आलेल्या मांदजिआ जमातीच्या लोकांनी ऊबांगी व शारी नद्यांदरम्यान वसाहती केल्या. याच काळात सांप्रतच्या सोमालीलँडच्या भागातून आलेले बंद लोक आउदा व बांबारी शहरांजवळ तसेच चिंको व एम्‍बारी नद्यांकाठी स्थायिक झाले. १८६० मध्ये मात्र गुलामांच्या व्यापाऱ्यांच्या भीतीतने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होऊन स्थलांतरित लोक येथील दाट जंगलामध्ये आश्रयाला आले.

कोणिसाव्य शतकाच्या उत्तरार्धात फ्रेंचांनी आपल्या आफ्रिकेतील राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्‍न केला. दक्षिणेस काँगोमधील ब्रॅझाव्हिलपासून उत्तरेस चॅड सरोवरापर्यंतच्या प्रदेशाचे फ्रेंचांनी समन्वेषण केले. त्यातूनच हा प्रदेश फ्रेंचांच्या ताब्यात आला. त्यांनीच १८८९ मध्ये ऊबांगी नदीच्या तीरावर बांगी शहर बसविले.

या लोकांनी १९१० मध्ये येथील प्रदेशाला ऊबांगी-शारी हे नाव देऊन तेथे आपली वसाहत स्थापन केली व गाबाँ, काँगो, चॅड, ऊबांगी-शारी यांचे मिळून एक संयुक्त राज्य बनवून त्यास‘फ्रेंच विषुववृत्तीय आफ्रिका’ असे नाव देण्यात आले. याच वेळी येथील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विकासाकडे लक्ष देण्यात आले. परंतु याला आफ्रिकनांकडून फार मोठा विरोध झाला.

हिल्या महायुध्दकाळात या भागातूनच जर्मन कॅमेरूनच्या प्रदेशावर हल्ला करण्यात आला. दुसऱ्या महायुध्दात यूरोपमध्ये फ्रेंचांचा पराभव झाल्यानंतर ह्या प्रदेशाने ‘फ्री फ्रेंच’ सैन्यास मदत केली. दोन महायुध्दांदरम्यानच्या काळात गव्हर्नर लँबलिन याच्या नेतृत्वाखाली राज्यात बऱ्याच चांगल्या मोटाररस्त्यांची बांधणी करण्यात आली. युध्दोत्तर काळात फ्रेंच वसाहतकऱ्यांच्या धोरणात बदल झाला.

दरम्यान विरोधी राजकीय गटांमध्ये जोम आला. १९५८ मध्ये फ्रेंच प्रजासत्ताकाने जनरल द गॉल ह्यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेल्या योजणेप्रमाणे ह्या प्रदेशात सार्वमत घेण्यात आले व ह्या प्रदेशास फ्रेंच कम्यूनिटीच्या अंतर्गत स्वायत्तता मिळाली. त्याचवेळी प्रदेशाचे ऊबांगी शारी हे नाव बदलून त्याल ‘मध्य आफ्रिका प्रजासत्ताक’ असे नाव देण्यात आले व बोगांडा हा त्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला. मार्च १९५९ मध्ये बोगांडाच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर डेव्हिड डाको याच्याकडे सत्ता आली.

हा प्रदेश १३ ऑगस्ट १९६० रोजी पूर्णपणे स्वतंत्र होऊन २० सप्टेंबर १९६० रोजी त्याला संयुक्त राष्ट्रांचे सभासदत्व मिळाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या बहुतेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तसेच इतरही संघटनामध्ये ह्या प्रजासत्ताकास स्थान मिळाले.

१९६० ते १९६६ या काळात डाकोच्या नेतृत्वाखाली  या नवनिर्मित देशाचा आर्थिक विकास होण्याऐवजी  भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे ३१ डिसेंबर १९६६ व १ जानेवारी १९६७ रोजी सैन्याने उठाव करून अध्यक्ष डाको याचे सरकार उलथून पाडले व कर्नल झान्-बेदेल बोकासा या लष्करी अधिकाऱ्याने सत्ता आपल्या हाती घेतली.

बोकासाच्या कारकीर्दीत फ्रान्सबरोबरचे संबंध बिघडले व त्यांत अनेकदा सामंजस्यही निर्माण झाले. त्याने आफ्रिका   खंडांतर्गत देशांशी, विशेषत: शेजारील देशांशी, असलेल्या संबंधाना विशेष प्राधान्य दिले. तथापि फ्रेंच भाषिक देशांशीच या देशाचे संबंध अधिक असलेले आढळतात. बोकासाच्या कारकीर्दीत अनेक राजकीय स्थित्यंतरे झाली.

ध्य आफ्रिका प्रजासत्ताकाची घटना १६ फेब्रुवारी १९५९ मध्ये घोषित करण्यात आली; १९६४ पर्यंत तिच्यात पाच वेळा दुरूस्त्या करण्यात आल्या. १९६६ मध्ये ती घटना कर्नल बोकासा याने रद्द करून राष्ट्राध्यक्षाला सर्व बाबतींत विशेष अधिकार देणारा घटनात्मक कायदा केला.

१९७२ मध्ये बोकासा तहहयात राष्ट्राध्यक्ष बनला. १९७६ मध्ये त्याने मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाचे मध्य आफ्रिका साम्राज्यात रूपांतर करून नवीन राज्यघटना तयार केली. बोकासा हा या साम्राज्याचा सार्वभौम राजा बनला व डाको हा त्याचा सल्लागार झाला.

१९७८ मध्ये बोकासाने आपले अधिकार आणखी वाढविले व मंत्रिमंडळ बरखास्त करून हेन्‍री मेइदाऊ याला पंतप्रधान केले, तसेच नवीन मंत्रिमंडळाची स्थापना केली. याचा देशात जोरदार निषेध होऊ लागला. बोकासा लिबियात असताना डेव्हिड डाको याने फ्रान्सच्या मदतीने देशात उठाव घडवून आणून बोकासाला अधिकारावरून दूर केले (१९७९) व पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून सत्ता आपल्या हाती घेतली आणि साम्राज्याचे पुन्हा प्रजासत्ताकात रूपांतर केले. त्याने हेन्‍री मेइदाऊ याची उपराष्ट्राध्यक्षपदी नेमणूक केली. परंतु मोठ्या प्रमाणावरील अंतर्गत विरोधामुळे त्याची सत्ता फार काळ टिकली नाही.

फेब्रुवारी १९८१ मध्ये नवीन राज्यघटना अस्तित्वात आली. या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाच्या नेतृत्वाखाली बहुपक्षीय मंत्रिपरिषद काम करील व राष्ट्रध्यक्ष आणि राष्ट्रीय संसद पाच वर्षांसाठी सार्वत्रिक मतदान पध्दतीने निवडण्यात येईल, अशी तरतूद होती. तीनुसार मार्चमध्ये निवडणुका होऊन बोझांगा हा प्रंतप्रधान झाला. दरम्यान बांगी येथील सिनेमागृहावर झालेल्या बाँब हल्ल्यामुळे राजकीय तणाव खूपच वाढला.

शेवटी एक सप्टेंबर१९८१ रोजी सेनाप्रमुख जनरल आंद्रे कोलिंग्बा याने लष्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष डाको याला पदभ्रष्ट केले व सत्ता आपल्या हाती घेतली. त्याने सर्व मंत्रिमंडळही लष्करी अधिकाऱ्यांचेच बनविले. अशा प्रकारे देशात लष्करी राजवट येऊन लोकशाही संपुष्टात आली.

१ सप्टेंबर १९८१ पासून जनरल आंद्रे कोलिंम्बा याच्या हातीच राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आहेत. तेव्हापासून सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली आहे.

न्यायदानासाठी बांगी येथे सर्वोच्च न्यायालय, एक फौजदारी व सात दिवाणी न्यायालये आहेत.

देशात १९६१ मध्ये राष्ट्रीय सेनेची उभारणी करण्यात आली असून यातील सर्व पुरूषांना तसेच नागरी सेवेतील सर्व स्त्री-पुरूष कर्मचाऱ्यांना लष्करी नोकरी सक्तीची आहे.

जुलै १९८१ मध्ये २,३८५ पुरूषांचे सशस्र दल व ३,००० पुरूषांची सैनिकी सम-संघटना (पॅरामिलिटरी) होती. फ्रान्सशी झालेल्या संरक्षण करारानुसार अजूनही व्वार येथे बंदोबस्तासाठी १,२०० लोकांची दुर्गरक्षक सेना ठेवण्यातआलीआहे.

चौधरी,वसंत

आर्थिक स्थिती

देशातील एकूण लोकसंख्येच्या सु. ८५ टक्के लोक शेतीव्यवसायात गुंतलेले असून शेतीपासूनचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील वाटा सु ५०% आहे. बरीचशी निर्वाह शेती असून कॉफी व लाकूड हीच प्रमुख निर्यातीची पिके होत. सेवा उद्योगांचा बराचसा विकास झाला असला, तरी देशात औद्योगिकीकरण बेताचेच आहे. खाणकाम-विशेषत: हिऱ्यांचे उत्पादन-हा निर्यात उत्पन्नाचा मोठा आधार आहे.

देशाच्या स्वातंत्र्यापासून (१३ ऑगस्ट १९६०) येथील अर्थव्यवस्थेच्या विकासाचे तीन टप्पे पडतात :१९६५ पर्यत अध्यक्ष डाको याच्या पहिल्या सरकारच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्था खचत गेली. विशेषत: कापूस उत्पादनाने खालचे टोक गाठले. याचकाळात शासकीय खर्चात भरमसाठ वाढ झाली, पण त्याचवेळी भांडवल गुंतवणुकीचे प्रमाण काही वाढले नाही. फ्रान्सकडून या देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी देण्यात येत असलेली उपदानांची मदत त्या देशाने बंद केल्यामुळे देशात सर्वत्र विरोधी प्रतिकिया उमटल्या; हा पहिला टप्पा होय.

दुसऱ्या टप्प्यात १९६६ मध्ये प्रारंभीच सैन्याने सत्ता आपल्या हाती घेतली. अध्यक्ष बोकासाच्या नव्या सरकारने कृषिव्यवसायाला प्रगतीच्या मार्गावर आणण्यासाठी, तसेच ग्रामीण विकासाला चालना देण्याकरिता अनेक उपाययोजना कार्यवाहीत आणल्या. त्यांचा उपयोग १९७० पर्यंत चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून आले;त्याचाच परिणाम म्हणून १९६७ ते १९७० या काळात स्थूल राष्ट्रीय उत्पादन ४,०३० कोटी फ्रँक सीएफ्एवरून ५,०४० कोटी फ्रँक सीएफ्एवर गेले. तिसरा टप्पा १९७० पासून सुरू झाला.

महत्त्वाच्या निर्यात पिकांच्या उत्पादनात हवामानाच्या घटकांमुळे झालेली घट, हिऱ्यांच्या उद्योगात आलेल्या अडचणी, शासनापुढे ठाकलेल्या तीव्र स्वरूपाच्या वित्तीय समस्या, अर्थव्यवस्थेचे सुयोग्य मार्गदर्शन करण्याच्या प्रयत्‍नात कुशल मनुष्यशक्तीचा अभाव, वाईट शासकीय कारभार इ. ठळक वैशिष्ट्यांनी हा काळ गाजला. याचाच परिणाम १९७६-७९ या तीन वर्षात आर्थिक कुंठितता निर्माण होण्यात झाला. १९७३ चा दुष्काळ, १९७५ मध्ये जागतिक बाजारपेठांत कॉफी, कापूस व लाकूड यांच्या किंमतींत आलेली प्रचंड घट, यांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेपुढे आणखीच जटिल समस्या वाढल्या; १९७७-७८ मध्ये हिरे, हस्तिदंत, लाकूड व तंबाखू यांच्या निर्यातीला मात्र धक्का लागला नाही.

१९७९-८० मध्ये पुन्हा डाको शासनाच्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेला फ्रान्सकडून आर्थिक उपदानांचे साहाय्य तसेच १९८० मध्ये ४० लक्ष एसडीआर एवढे कर्ज आंतरराष्ट्रीय चलन निधीकडून घ्यावे लागले; पुन्हा १९८१ मध्ये व्यापाराचा असमतोल सावरण्यासाठी निधीकडून ९० लक्ष एसडी आरचे कर्ज घ्यावे लागले.

सप्टेंबर १९८१ मध्ये पुन्हा लष्कराने आर्थिक र्‍हास सावरण्यासाठी आपल्या हाती सत्ता घेतली. घटणारे उत्पादन तसेच ढासळणारा व्यापारशेष सावरण्यासाठी जनरल आंद्रे कोलिंग्बा याच्या नव्या शासनाने निधीबरोबर १०० लक्ष एसडीआर कर्जाचा करार केला.

त्याच सुमारास सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात कपात-त्याच्या परिणामी मुलकी सेवा, लष्कर व पोलीसदल यांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसेच त्यांच्या संख्येत कपात-अंमलात आणली गेली (१९८२). मार्च १९८२ मध्ये यामुळे विरोधी पक्षनेता अँगे पटासे याने अवचित सत्तांतराचा प्रयत्‍न केला.

१९८२ च्या अखेरीस अगोदर कार्यवाहीत आणल्या गेलेल्या काटकसर उपाययोजनांचा अनुकूल परिणाम व्यापारशेषाची घट थांबविण्यात आणि देशांतर्गत उत्पादनवाढीत झाल्याचे दिसून आले.

कृषी

देशाच्या कामकरी लोकसंख्येचा फार मोठा भाग शेतीत गुंतलेला असून एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये शेतीचा हिस्सा बराच मोठा आहे. ही शेती देशाच्या नैऋत्य भागातील उष्ण कटिबंधीय पर्जन्यवनप्रदेशात तसेच सॅव्हाना व वायव्येकडील प्रदेशात एकवटलेली आहे.

अंतर्गत सेवनासाठी अन्नधान्यपिकांचे, प्रमुख्याने टॅपिओका, मका, तृणधान्य, भुईमूग व भात यांचे उत्पादन घेतले जाते. कापूस व कॉफी ही दोन महत्त्वाची नगदी निर्यात पिके होत.

प्रदेशीय पातळीवर देशाच्या ग्रामीण भागांचा विकास करण्याच्या उद्देशाने १९६४ मध्ये प्रादेशिक विकास कार्यालये स्थापण्यात आली. १९७० मध्ये शेतीमालासाठी राज्य व्यापार मंडळ स्थापन करण्यात आले; परंतु १९७४ मध्ये ते अयशस्वी ठरल्याने बंद करण्यात आले.१९८२ मध्ये कॉफी, कापूस, तंबाखू व पाम तेल यांच्या विकासाकरिता मंडळे स्थापण्यात आली.

कापसाच्या उत्पादनात वाढ व्हावी म्हणून रस्ते, साठवणव्यवस्था इत्यादींसारख्या अध:संरचनांमध्ये सुधारणा, खते, कीटकनाशके आणि तांत्रिक साहाय्य यांमध्ये वाढ करण्यात आली. कापूस उत्पादकांना वाढीव किंमत देण्यात आली; तथापि कापसाची निर्यात अपेक्षेइतकी वाढू शकली नाही. १९८०-८१ मध्ये ती २९,६०० टन एवढी होती.

कॉफीचे उत्पादन पूर्वी यूरोपियनांच्या मालकीच्या मोठ्या मळ्यांमधून केले जाई; तथापि हळूहळू लहान आकाराचे आफ्रिकनांचे मळे संख्येने वाढले. कॉफी उत्पादनात फेरबदल मोठे असत. १९६४-६५ मधील १२,६०० टनांचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर हीच आकडेवारी पुढे शासनाला टिकविता आली नाही.

दुष्काळामुळे १९७१-७२ व १९७२-७३ या वर्षी अनुक्रमे ५,८०० टन व ८,९६० टन एवढेच कॉफी उत्पादन झाले. १९७४-७७ या काळात उत्पादनाची सरासरी सु.१२००० टन राहिली. परंतु १९७७-७८ मधील कॉफी उत्पादन अवघे ९,००० टन झाले.

अद्यापिही कॉफीचे पीक मोठाले मळे व लहान कौटुंबिक शेते यांमधून घेतले जाते. तथापि कॉफीच्या जागतिक बाजारपेठांतील कमीजास्त होणाऱ्या किंमतींवर अर्थव्यवस्था अवलंबून असते. १९७६ व १९७७ मध्ये जागतिक कॉफिच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने एकूण निर्यातमूल्यामध्ये कॉफीचा हिस्सा अनुक्रमे ३४ व ६८ टक्के एवढा वाढला.

१९७८ मध्ये वाहतूकसाधनांमध्ये उद्‍भवलेल्या अडचणी, कॉफी उत्पादकांमधील अनुत्साह व प्रतिकूल जागतिक बाजारपेठीय किंमती या सर्वाच्या परिणामी केवळ १०,२३४ टन कॉफीची निर्यात (मूल्य सु. ४८१ कोटी फ्रँक सीएफ्ए-गतवर्षीच्या जवळजवळ निम्मी रक्कम) साध्य झाली. यावर उपाय म्हणून १९७८-८१ या काळात कॉफीच्या

उत्पादनवाढीकरिता एक नवीन विकास योजना आखण्यात आली. कौटुंबिक शेतीमधून सु. १५,००० टन कॉफी उत्पादन करण्याचे ठरविण्यात आले. याकरिता २५० कोटी फ्रँक सीएफ्ए निर्धारित करण्यात आले.

रासायनिक खते, जंतुनाशके, कृषिविस्तारकार्यक्रमाचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देणारे अधिकारी यांकरिता हा पैसा खर्चावयाची योजना होती. तथापि वाहतूक व विपणन समस्या, उत्पादकांची उदासीनता, उत्पादकांच्या दृष्टीने त्यांना मिळणारी कमी किंमत, जुनी कॉफीची झाडे इ. विविध प्रतिकूल घटकांमुळे विकासयोजना अपेक्षित उद्दिष्ट व यश गाठू शकली नाही.

१९७९-८० व १९८०८१ या दोन वर्षात कॉफी उत्पादन अनुक्रमे १०,९०० टन व १३,६०० टन झाले; तथापि १९८०-८१ मध्ये निर्यात केवळ ७,५०० टन एवढीच झाली. १९८२ मध्ये कॉफी उत्पादन पुन्हा वाढण्याची लक्षणे दिसू लागली (१७,००० टन). १९८१ मध्ये प्रमुख शेतमालाचे उत्पादन असे होते (आकडे हजार मे. टनांत) : भात १५, मका ४०, बाजरी व ज्वारी ५०; टॅपिओका १,०२१; भूईमूग १२५; तीळ ११; सरकी १४, संत्री, लिंबे १३; केळी ८२; कॉफी १७; तंबाखू १; कापूस (रूई) ८.

पशुधन

-उद्योगाची वाढ तशी नवीनच आहे. हवामान व त्से त्से माश्यांचे प्राबल्य यांमुळे या उद्योगाचा अधिक विकास होऊ शकत नाही. गुरांच्या कळपसंख्येत वाढ, विपणन पध्दतीत सुधारणा इ. गोष्टींच्या योगे विकास प्रयत्‍न चालू आहेत. गुरांचे खाटीकखाने व पशुधन उत्पादनांचे कारखाने उभारण्यात येत आहेत.

१९८१ मध्ये पशुधन पुढीलप्रमाणे होते (आकडे हजारांत): गुरे १,२७२; बकऱ्या ९५१; मेंढ्या ८६; डुकरे १३५; कोंबड्या १,६००; बदके ६. पशुधनपदार्थ पुढीलप्रमाणे (आकडे मे. टनांत): गोमांस २३,०००; इतर मांस १८,०००; गाईचे दूध ४,०००; गुरांची कातडी ३,६६५; कोंबड्यांची अंडी १,०१४; मध ६,५००. मत्स्योत्पादन बव्हंशी नद्यांमधून होत असते. गोड्या पाण्यांतील मासे उत्पादन १९७८-८० यांदरम्यान प्रतिवर्षी १३,०००मे.टन याप्रमाणे होत राहिले.

जंगलसंपत्ती

देशाची मोठी जंगलसंपत्ती अद्यापही अपुरे रस्ते व किनाऱ्यापर्यंत सवलतीच्या दराने वाहतूक करणाऱ्या  साधनांचा अभाव यांमुळे अर्धसमुपयोजितच राहिली आहे. १९४७ पासून मात्र लाकूडतोडीला प्रारंभ झाला असून त्या उद्योगाचा विस्तारही १९६८ पासून मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे.

देशातील जंगलसंपत्ती समृध्द असून तीमध्ये मॅहॉगनी, ओबीची, लिंब यांसारख्या कठीण लाकूड असलेल्या वृक्षांचा समावेश होतो. औद्योगिक उपयोगांसाठीच्या लाकडी ओंडक्यांचे उत्पादन १९६३ मधील २.४९ लक्ष घमी. वरून १९७४ मध्ये ८.४६ लक्ष घमी.वर गेले, तथापि १९७५ मध्ये ते ५ लक्ष घमी.पर्यंत घसरले. लाकूड कापण्याच्या गिरण्या नव्याने उभारण्यात येऊ लागल्या. त्याच वर्षी लाकडाची निर्यात पूर्णपणे थांबली. जागतिक मागणी जसजशी वाढू लागली, तसतसे उत्पादनही वाढत गेले.

१९७६ मध्ये उत्पादन ३.२० लक्ष घमी. झाले; १९७७ मध्ये ओंडक्यांची निर्यात १.२३ लक्ष घमी. झाली. तथापि पुढल्याच वर्षी ती ८७,५०० घमी. पर्यंत खाली घसरली. निर्यातीसाठी कापीव लाकूड, प्लायवूड व ब्‍लॉकबोर्ड यांच्या उत्पादनाबाबत देशाच्या मर्यादा स्पष्ट आहेत. १९८१ साली लाकडाचे उत्पादन ३.४० लक्ष घमी.पर्यंत झाले, तथापि त्यांपैकी सु. ५०% उत्पादन निर्यात करण्यात आले.

खनिज संपत्ती

डामोरा येथे लोहधातुकाचे सु. ५ लक्ष टनांचे साठे असून त्याचे उत्पादन बोनाली धबधब्यापासून मिळणाऱ्या जलविद्युतशक्तीच्या साहाय्याने करण्यात येते. बांगीच्या पूर्वेस ४८० किमी. वरील वाकूमा शहराच्या परिसरात युरेनियमच्या धातुकाचे सु. ८,००० टन साठे १९६९ मध्ये सापडले; प्रतिवर्षी ५०० टन युरेनियम धातुकाचे समुपयोजन करण्याची योजना शासनाने फ्रेंच अणुउर्जा प्राधिकरण व अलुसूसी ही खाजगी फ्रेंच कंपनी यांच्या सहकार्याने आखली असून तिची कार्यवाही १९८१-१९९० या दशकात केली जाणार आहे.

निकेल, कोबाल्ट यांच्या धातुकांचे साठे तसेच बाबूआ येथे पारा, फातुमा व बांगी येथे चुनखडी, बोबोसा येथे चॉकचे साठे, मँगॅनीजच्या धातुकाचे बाउर-एन्-गॅम येथे, तर तांब्याच्या धातुकाचे साठे एन्‍गाडे येथे आढळले आहेत; चिनी मातीचेही साठे देशात असल्याचे आढळले आहे. देशाच्या पश्चिम भागातील, गाळाच्या साठ्यांमध्ये हिरे सापडतात. हिऱ्यांचे साठे बांगीच्या पश्चिमेस, ब्रीआच्या उत्तरेस व बेरबेराती या गावाजवळ आढळले आहेत.

१९६० च्या पुढे हिऱ्यांच्या उत्पादनात जलद वाढ झाली; १९६० मधील ७०,००० कॅरटवरून १९६८ मधील ६.०९ लक्ष कॅरटवर त्यांचे उत्पादन गेले. १९६९-७१ या काळात हे उत्पादन ५.३५ लक्ष कॅरेटवरून ४.६८ लक्ष कॅरेटपर्यंत घसरले. १९६० पर्यंत परदेशी कंपन्यांच्याच ताब्यात हिऱ्यांच्या उत्पादनाचा उद्योग होता.

१९६९ पर्यंत हळूहळू शासनाने परदेशी कंपन्यांचे या उद्योगातील वर्चस्व कमी केले आणि १९७० पासून हिऱ्यांच्या उत्पादनाचा उद्योग हा आफ्रिकनांच्याकडे (सु.४५,००० स्थानिक लोक) गेला. काँगो प्रजासत्ताकाकडे चालू राहिलेल्या हिऱ्यांच्या चोरट्या व्यापारामुळे मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाचे मोठ्या प्रमाणात महसूल उत्पन्न बुडू लागले; तथापि १९७२ मध्ये शासनाने घेतलेल्या काही खबरदारीच्या उपायांमुळे हिरे उत्पादनात ५.२४ लक्ष कॅरटपर्यंत लक्षणीय सुधारणा दिसून आली.

१९७७ मध्ये परिस्थिती अशीच राहिली, परंतु जागतिक बाजारपेठांमध्ये हिऱ्यांच्या किंमतींत झालेली वाढ लक्षात घेता, त्या वर्षी हिऱ्यांची निर्यांत कॉफीच्या निर्यांतीपेक्षा अधिक होऊन (६१० कोटी फ्रँक सीएफ्ए)निर्यातीमध्ये हिऱ्यांचे अग्रस्थान राहिले. १९७९ मध्ये हिऱ्यांचे उत्पादन ३ लक्ष कॅरेट झाले, तथापि पुढच्याच वर्षी ते २.५ लक्षांवर घसरले. हिऱ्यांच्या उत्पादन उद्योगावर चोरटा व्यापार व करचुकवेगिरी  या दोन कारणांचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.

१९७६ पासून मर्यादित प्रमाणात खाणकंपन्यांना हिऱ्यांच्या उत्पादन उद्योगात सहभागी करून घेण्याची मुभा शासनाने दिली आहे. देशातच हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. १९८० मध्ये रत्‍नांमध्ये जडावकाम करावयाचे हिरे व औद्योगिक हिरे यांचे उत्पादन अनुक्रमे १.८० लक्ष कॅरट व ९९ हजार कॅरट एवढे होते, तर १९८१ मधील एकूण उत्पादन ३.०४ लक्ष कॅरट झाले.

शक्तीसाधने

१९६६-७१ या अवधीत वीजउत्पादन २५० लक्ष किंवॉ. ता. वरून ४७० लक्ष किवॉ. ता. वर गेले आणि १९८० च्या सुमारास ते ६४० लक्ष किवॉ. ता. झाले. एकूण वीजउत्पादनापैकी ९०% ही जलविद्युत असून ती एम्‍बाली धबधब्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बाउआली येथील दोन विद्युत् निर्मितीकेंद्रांपासून मिळते. विजेच्या वितरणामध्ये अडचणी आहेत. याशिवाय नऊ औष्णिक वीजउत्पादनकेंद्रे असून ११,००० किवॉ. क्षमतेचे बांगी विद्युतनिर्मितीकेंद्र हे सर्वात मोठे आहे.

उद्योग

शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तसेच काही उपभोग्य वस्तुउद्योग एवढ्यांपुरतेच येथील औद्योगिकीकरण सीमित आहे.  १९६४-६७ या कालावधीत औद्योगिक उलाढाल २४० कोटी फ्रँक सीएफ्एवरून ६९० कोटींवर म्हणजे जवळजवळ तिप्पट झाली. १९७० मध्ये औद्योगिक उलाढाल १,०००कोटी फ्रँक सीएफ्एची  झाली . त्यानंतर मात्र औद्योगिक प्रगतीचा वेग मंदावलेला दिसतो.

प्राथमिक वस्तूंच्या प्रक्रियाउद्योगात तेलगिरणी, (भुईमूग, सरकी, तीळ इत्यादींवर प्रक्रिया ), पीठगिरणी, खाटीकखाना, सिगारेट निर्मितिकारखाना व आसवनी यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो. दरवर्षी ५०० लक्ष सिगारेटींचे उत्पादन करणारा कारखाना १९७७ मध्ये, तर सीत्रॉएन मोटारगाडीची जुळणी करणारा कारखाना १९८० मध्ये चालू करण्यात आला.

कापडउद्योग व कातडी वस्तूंचे निर्मितिउद्योग हे मिळून प्रामुख्याने औद्योगिक क्षेत्र बनले आहे. कापूस वटणी २१ कारखान्यांतून चालू आहे. सूतकताई, विणाई व रंगाई या सर्व क्रिया एकत्रितपणे करणारी देशातील सर्वात मोठी कापडगिरणी बंद होण्याच्या मार्गावर असताना ती शासनाने १९७६ च्या प्रारंभी आपल्या ताब्यात घेतली. तयार कपडे बनविणाऱ्या अनेक गिरण्या असून पादत्राणांचेही कारखाने आहेत.

यांशिवाय अनेक लहान प्रमाणावरील कारखान्यांतून साबण, रंग औद्योगिक वायू, विटा, सायकली, घरगुती वापराची भांडी इत्यादींची निर्मिती करण्यात येते. अनेक नियोजित औद्योगिक प्रकल्पांमध्ये प्लायवुड व हलका पुठ्ठा कारखाना, मोठी कापडगिरणी, वीट आणि सिमेंट कारखाना, तसेच अन्नप्रक्रिया करणारे विविध कारखाने इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.

३,००० टनांवरून २०,००० टन सरकीचे तेलशुध्दीकरणक्षमता असलेला एक नवा कारखाना बांबारी येथे उभारण्यात येत आहे. साबण, खाद्यतेले, प्लॅस्टिकच्या बाटल्या, शीतपेये, फोम रबर वस्तू, अत्तरे व बॅटऱ्या यांसारख्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या स्थानिक वा देशी उद्योगधंद्यांना संरक्षण देण्याकरिता अनेक उपाययोजना १९८२ मध्ये कार्यवाहीत आणल्या गेल्या.

१९७९ मध्ये काही निवडक उद्योगांचे पुढीलप्रमाणे उत्पादन झाले: बीर २.१६ लक्ष हेक्टोलिटर; शीत पेये ३६,००० हेलि.; सुती कापड ३० लक्ष चौ. मी. व ब्‍लँकेटे ४१,००० (१९७८); पादत्राणे ४.०९ लक्ष जोड्या; रेडिओ संच ११,००० (१९७७); मोटारसायकली ५,००० सायकली ४,०००.देशात १९७१ मध्ये श्रमबलाची आकडेवारी पुढीलप्रमाणे होती : शेती, जंगले व खाणकाम ४.७५ लक्ष; निर्मितिउद्योग व बांधकाम ५२,०००; व्यापार वाहतूक व इतर सेवा ३२,०००; प्रशासन ७,५००; बेकार ४३,५००. ‘जनरल युनियन ऑफ सेंट्रल आफ्रिकन वर्कर्स’ (युजीटीसी) ही देशातील एकमेव कामगार संघटना आहे.

१९६४ मध्ये स्थापण्यात आलेल्या या संघटनेचे १०७० च्या पुढील काळात सु.५५,००० सभासद होते. मे १९८१ मध्ये या संघटनेवर व तिच्या कार्यावर शासनाने बंदी घातली. शेतमजूर व त्यांसारख्या व्यवसायांतील कामगारांकरिता ४२ तासांचा, तर बिगर शेतीव्यवसायांतील कामगारांना ४० तासांचा कामाचा आठवडा असतो. कामगार व मालक यांचे समान प्रतिनिधी असलेले श्रम न्यायाधिकरण औद्योगिक कलहांचे निरसन करते. सल्लागारी श्रम आयोग सांघिक कलहामध्ये हस्तक्षेप करून मार्ग सुचवितात.

अर्थकारण, व्यापार

‘सेंट्रल बँक ऑफ द इक्वेटोरिअल स्टेट्स अँड कॅमेरून’ ही देशातील प्रमुख बँक आहे. मध्य आफ्रिका प्रजासत्ताक हा ‘फ्रँक विभागा’चा सदस्य असल्याने या प्रमुख बँकेच्या संचालक मंडळावर फ्रेंच शासनाचे काही प्रतिनिधी असतात. इतर बँकांमध्ये ‘नॅशनल डेव्हलपमेंट बँक ऑफ द सेंट्रल आफ्रिकन रिपब्‍लिक’, ‘बँकिंग युनियन ऑफ द सेंट्रल आफ्रिका’, ‘इंटरनॅशनल बँक फॉर वेस्ट आफ्रिका’ इत्यादींचा समावेश होतो.

फ्रँक सीएफ्ए हे देशाचे अधिकृत चलन असून त्याचे १०० सेंटिम होतात. १, २, ५, १०, २५, ५०, आणि १०० फ्रँक सीएफ्एची नाणी व १००, ५००, १,००० ५,००० व १०,००० फ्रँक सीएफ्एच्या कागदी नोटा प्रचारात आहेत ३१ मार्च १९८३ रोजी १ फ्रेंच फ्रँक = ५० फ्रँक सीएफ्ए; १ स्टर्लिंग पौंड =५३९.२५ फ्रँक सीएफ्ए आणि १ अमेरिकन डॉलर =३६३.५ फ्रँक सीएफ्ए म्हणजेच १,००० फ्रँक सीएफ्ए =१.८५४ स्टर्लिंग पौंड =२.७५१ डॉलर असा विदेश विनिमय दर होता. मालमत्ता व उत्पन्न यांवर कर आकारण्यात येतात. नागरी भागापेक्षा ग्रामीण भागातील लोकांवर अधिक प्रमाणात कर आकारले जातात. १९७८-८२ या सर्व वर्षांचे अर्थसंकल्प तुटीचे होते.

१९८३ च्या अर्थसंकल्पातही ७६० कोटी फ्रँक सीएफ्एची तूट अपेक्षित होती.

कॅमेरून,चॅड, काँगो प्रजासत्ताक व गावाँ या देशांनी स्थापिलेल्या जकात संघाचा मध्य आफ्रिका प्रजासत्ताक सदस्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळात फ्रेंच शासनाने व खाजगी फ्रेंच कंपन्यांनी या देशात मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक केली. विदेशी उपक्रमाच्या अथवा उद्योगाच्या स्थापनेमुळे स्थानिक लोकांचा आर्थिक लाभ व्हावयास हवा, तसेच देशातच कच्च्या मालाची प्रक्रिया होणे आवश्यक आहे, या दोन अटींवर विदेशी  खाजगी  गुंतवणुकीस प्रोत्साहन दिले जाते.

ध्य आफ्रिका प्रजासत्ताकाचा व्यापारशेष नेहमी तुटीचाच राहिला आहे. हिरे, कापूस, लाकूड, कॉफी आणि तंबाखू हे पदार्थ निर्यात व्यापारात समाविष्ट होत असून १९७० पासून व्यापारस्वरूप बदलत चालल्याचे दिसते. कॉफी व कापूस यांच्या तुलनेने हिरे व लाकूड यांच्या निर्यातीस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

अद्यापही निर्यांत व्यापारात फ्रान्सचे अग्रस्थान असून (१९७८-५०%), बेल्जियम (२४%), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (७%), इझ्राएल (४%), इटली, ग्रेट ब्रिटन हे देश येतात. आय़ात व्यापारात प्रामुख्याने मोटारगाड्या, रसायने व औषधे, पेये, खनिज तेल उत्पादने, आधारधातू व त्यांची उत्पादने, रबर आणि प्लॅस्टिके, कागद, सुती कापड व वस्त्रे, यंत्रसामग्री यांचा अंतर्भाव असून या आयातवस्तू फ्रान्स, प. जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्स व इटली या देशांतून खरीदल्या जातात.

मध्य आफ्रिका प्रजासत्ताकाच्या स्वातंत्र्यापासूनच फ्रान्स त्या देशाला अर्थसाहाय्य करीत आला आहे, तथापि अलीकडच्या काळात ‘युरोपीय विकास निधी’ द्वाराही किंमत स्थिर ठेवणे, उत्पादकता वाढविणे, अर्थव्यवस्था विविधांगी करणे वगैरेंसाठी आर्थिक व तांत्रिक साहाय्य त्या देशाला उपलब्ध झाले आहे.

नरल कोलिंग्मा शासनाने त्रैवार्षिक योजना १९८३ पासून कार्यान्वित करण्याचे ठरविले. कृषी, वाहतूक अध:संरचना यांचा विकास इत्यादींसाठी या योजनेत ३,१३० कोटी फ्रँक सीएफ्ए निर्धारित करण्यात आले आहेत.

वाहतूक व संदेशवहन

देशांतर्गत वाहतूक नदी, रस्ता व हवाई मार्ग यांद्वारे करण्यात येते. ऊबांगी नदी ५९५ किमी. पर्यंत नौवहनसुलभ असून उत्तरेकडील केम्बे या गावापर्यंत नदीतून बोटीने जाता येते. शारी व लोगोन या नदीसंहती काही प्रमाणातच नौवहनयोग्य आहेत. उन्हाळ्यामध्ये मात्र त्यांमधून वाहतूक करणे दुरापास्त असते.

ऊबांगीच्या अनेक उपनद्या, विशेषत: लोबाये व सँग्गा, अल्पकाळ नौवहनसुलभ आहेत. बांगी हे देशातील प्रमुख नदीबंदर असून त्याला सु. ३०४ मी. लांबीचे धक्के बांधलेले आहेत. प्रतिवर्षी या बंदरातून सु. २.६४ लक्ष टन मालाची हाताळणी करण्यात येते. सँग्गा नदीवरील सॅलो हे बंदरही महत्त्वाचे आहे. सॅलोच्या वरच्या बाजूस नोला येथे लाकडाच्या वाहतुकीसाठी एक नवीनच बंदर बांधण्यात येत आहे.

देशातीलप्रमुख केंद्रे व गावे रस्त्यांनी एकमेकांशी जोडलेली आहेत. दुसऱ्या  महायुध्दकाळातच बांगी-फोर्ट-आर्चम्बाल्ट हा प्रमुख मार्ग तयार करण्यात आला. पूर्व-पश्चिम मार्गाने बांगी हे शहर बेरबेराती आणि कॅमेरूनशी जोडलेले आहे. बांगीपासून जाणारे आठ प्रमुख मार्ग डांबरी व पक्के आहेत. एकूण २२,००० किमी. लांबीच्या रस्त्यांपैकी ६,००० किमी. रस्ते सर्वऋतुक्षम आहेत. ट्रान्स-आफ्रिकन लागोस-मोंबासा ह्या महामार्गापैकी मध्य आफ्रिका प्रजासत्ताकातून जाणाऱ्या भागाचे बांधकाम चालू आहे.

सध्या देशात लोहमार्ग अस्तित्वात नसला, तरी बांगी व याऊंदे (कॅमेरून) ही दोन शहरे  जोडणारा लोहमार्ग बांधण्याची व पुढे हा लोहमार्ग दूआला (कॅमरून) बंदरापर्यंत नेण्याची (ट्रान्स-कॅमेरून लोहमार्गाला जोडण्याची) योजना आहे. त्याचप्रमाणे सूदानमधील डारफूर प्रांत मध्य आफ्रिका प्रजासत्ताकातील व्हाकागा प्रांत लोहमार्गाने जोडण्याचीही योजना आहे. १९७४ मध्ये देशात ११,४५० मोटारगाड्या व ३,००० मालमोटारी होत्या. प्रमुख विमानतळ बांगी, बेरबेराती व ब्यार येथे असून अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी ३७ लहान विमानतळ आहेत.

बांगीजवळील एम्‍पोको येथे आंतरराष्ट्रीय जेट विमानतळ आहे. ‘एअर आफ्रिक’ ही  आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी असून तीमध्ये शासनाचे ७% भाग भांडवल आहे. ‘एअर सेंट्राफ्रिक’ या पूर्वीच्या अंतर्गत विमान कंपनी ऐवजी  ‘इंटर-आर्सीए’ या १९८० मध्ये स्थापण्यात आलेल्या नव्या विमानकंपनीकडे मोठ्या प्रमाणात अंतर्गत हवाई वाहतूक सेवा सोपविण्यात आली आहे.

१९७४ मध्ये बीम्बो येथे १०० किवॉ. क्षमतेचा प्रक्षेपक उभारण्यात येऊन दूरचित्रवाणी प्रक्षेपण कार्यान्वित झाले. देशात ५,००० दूरध्वनी (१९७३), सु. ४०० दूरचित्रवाणी संच (१९७९) व सु. ८०,००० रेडिओ संच होते (१९८१).

शिकार, मासेमारी, धबधब्यांचे निसर्गसौंदर्य आणि वन्य पशूंच्या विविध जाती ही प्रमुख पर्यटक आकर्षणे होत. १९७४ मध्ये सु. ४,०७७ विदेशी पर्यटकांनी देशाला भेट दिली.

गद्रे, बि. रा.

लोक व समाजजीवन

या देशातील बहुतेक रहिवाशांच्या वसाहती एकोणिसाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या आढळतात. सुमारे दोनशे वर्षापूर्वी गुलामांचा व्यापार चालत असे. अरब व यूरोपीय लोक येथील लोकांचा गुलाम म्हणून व्यापार करीत, तेव्हा या

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate