অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माँटॅना

माँटॅना

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी सर्वांत उत्तरेकडील राज्य. विस्तार १०४° ते ११६° प. रेखांश आणि ४४° ३० ते ४९° उ. अक्षांश यांदरम्यान. लांबी पूर्व–पश्चिम ८६१ किमी. व उत्तर–दक्षिण ४४३ किमी. एकूण क्षेत्रफळ ३,८१,०८६ चौ. किमी. पैकी ४,२९३ चौ.किमी पाण्याखाली आहे.

लोकसंख्या ८,०१,००० (१९८२ अंदाज). माँटॅनाच्या उत्तरेला ब्रिटिश कोलंबिया, अॅल्बर्टा व सस्कॅचेवन हे कॅनडाचे प्रांत पूर्वेला नॉर्थ व साउथ डकोटा, दक्षिणेला वायोमिंग आणि नैर्ऋत्येस व पश्चिमेस आबडाहो ही राज्ये आहेत. राजधानी हेलेना (लोकसंख्या २३,९३८–१९८०).

भूवर्णन

माँटॅनो नावातील मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ 'पर्वतीय वा डोंगराळ प्रदेश' असा आहे. या भागात आलेल्या पहिल्या प्रवाशांना बर्फाच्छादित पर्वच्छादित पर्वतशिखरे सूर्यप्रकाशात चकाकताना दिसली, त्यांवरून या भागाला त्यांनी चमकणाऱ्या पर्वतांचा प्रदेश (लँड ऑफ शाइनिंग मौंटन्स) असे नाव दिले.

या पर्वतीय प्रदेशात सोन्याचांदीचे मोठे साठे आढल्यावरून राज्याला ‘खजिन्याचे राज्य’ (ट्रेझर स्टेट) असेही नाव पडले.

भूस्वरूपदृष्ट्या रॉकी पर्वतीय भाग व सपाटभूमी भाग (ग्रेट प्लेन्स) असे राज्याचे दोन प्रमुख भाग पडतात. (१) रॉकी पर्वतीय भाग : राज्याचा ४०% भाग (मध्य व पश्चिम भाग) हा पर्वतीय व डोंगराळ आहे. रॉकी पर्वताचा प्रमुख कटक हा उत्तरेकडील ग्लेसियर राष्ट्रीय उद्यानापासून दक्षिणेकडे 'यलोस्टोन' राष्ट्रीय उद्यानापर्यंत पसरत गेला आहे.

खंडीय विभाजक असणारी रॉकी पर्वतरांग सामान्यतः ग्लेसियर राष्ट्रीय उद्यानापासून आग्नेयीस व नंतर वायव्य माँटॅनामधून प्रथम पश्चिमेला व नंतर दक्षिणेला पसरत गेली असून ती आयडाहो राज्याला बिटररूट पर्वतश्रेणीशी सरहद्द बनली आहे. या रांगेपासूनच पुढे मिशन, स्वॉन यांसारख्या अत्यंत सुंदर लहानलहान पर्वतश्रेण्या विभागल्या असून त्यांच्यायोगे सुपीक नदीखोरी बनली आहेत.

रॉकी पर्वतरांगेपासून बिगबेल्ट व लिटलबेल्ट या पर्वतरांगा पूर्वेकडे पसरल्या असून त्यांच्या दक्षिण व पश्चिम दिशांना ब्रिजर, गॅलाटिन, मॅडिसन, टोबॅकोरूट, रूबी इ. पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. या प्रदेशात सु. ५० पर्वतरांगा असून उंच शिखरे दक्षिण-मध्य माँटॅनामध्ये आढळतात.

ग्रॅनाइट (३,९०१) मी. हे राज्यातील अत्युच्‍च शिखर होय. (२) सपाटभूमी भाग : माँटॅना राज्याचा सु. ६०% भाग या प्रांतातील मिसूरी पठारामध्ये मोडतो. हायवुड बेअर पॉ, बिग स्नोई, ज्यूडिथ, लिटल रॉकी यांसारख्या पर्वतरांगा या प्रांतात दिसून येतात.

मिसूरी व तिची उपनदी यलोस्टोन ह्या माँटॅनाच्या सर्वांत महत्त्वाच्या नद्या. या दोन्ही नद्या राज्याचा सु. ८४% प्रदेश निःसारित  करतात. पश्चिम माँटॅनामधून उगम पावलेल्या मिसूरीला थ्री फोर्क्स या शहरापाशी जेफर्सन, गॅलाटिन व मॅडिसन या नद्या मिळतात.

हेलेनाजवळून मिसूरी उत्तरेला ‘गेट्‌स ऑफ द मौंटन्स’ या अतिभव्य व खोल घळीतून वाहत जाऊन पूर्वेस वळते. तिच्यावरील फोर्ट पेक हे जगातील सर्वांत मोठे मातीचे धरण होय. नॉर्थ डकोटा राज्याच्या सरहद्दीवर मिसूरी नदी माँटॅना राज्यातून बाहेर पडते. तेथे यलोस्टोन नदी तिला मिळते.

राज्यातील मिसूरीच्या इतर महत्त्वाच्या उपनद्या म्हणजे मरिआस, मिल्क, सन व टेटन या होत. रॉकी पर्वताच्या पश्चिमेस क्लार्क फोर्क व कूटने या महत्त्वाच्या नद्या आहेत. बिटररूट, ब्लॅकफूट, फ्लॅटहेड व टॉम्सन या क्लार्क फोर्कच्या प्रमुख उपनद्या होत. या नद्या माँटॅनाचा सु. १४% प्रदेश निःसारित करतात. कूटने नदीवर लिबी धरण बांधण्यात आले आहे.

रॉकी पर्वतभागातच बहुतेक नैसर्गिक सरोवरे आढळत असून काही अत्यंत रमणीय सरोवरे ग्लेसियर राष्ट्रीय उद्यान भागात आहेत. राज्यातील सर्वांत मोठे नैसर्गिक सरोवर फ्लॅटहेड हे असून त्याचे क्षेत्रफळ सु. ५०० चौ.किमी आहे.

१९५९ मध्ये भूकंपामुळे मॅडिसन नदीत एक सबंध डोंगरमाथाच कोसळल्यामुळे एक नवीनच सरोवर निर्माण होऊन त्याला 'भूकंप सरोवर' असे नाव पडले. काही बहुद्देशी धरण प्रकल्पांमुळे निर्माण झालेली सरोवरे अशी : फोर्ट पेक सरोवर (क्षेत्रफळ ९९२ चौ.किमी.) कॅन्यन, फेरी सरोवर, साउथ फोर्क नदीवरील हंग्री हॉर्स व टायबर धरणांचे जलाशय, यलोटेल धरण व बिगहॉर्न सरोवर, तसेच कूटने नदीवरील लिबी धरण, कूकानूसा सरोवर इत्यादी.

हवामान

अलास्काला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतर्गत राज्याचा दर्जा मिळेपर्यंत, माँटॅना राज्य हे देशाची ‘शीतपेटी’ म्हणून ओळखले जात असे. २० जानेवारी १९५४ रोजी रॉजर्स पास येथे -५७° से. एवढे तापमान नोंदण्यात आले होते.

राज्याचा जुलै हा उबदार महिना (सरासरी तापमान सु. १८° से.) तर जानेवारी हा सर्वाधिक थंडीचा महिना (सरासरी तापमान सु. -९° से.) समजला जातो राज्याच्या पश्चिम भागात सरासरी पर्जन्य सु. ४६० मिमी., तर पूर्व भागात तो सु. ३३५ मिमी. असतो.

रॉकी पर्वतरांगेमुळे कधीकधी पूर्व व उत्तर माँटॅनाचे भाग चिनूक वाऱ्यामुळे उबदार बनतात. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांत प्रसंगोपात्त उद्‌भवणाऱ्या गार वादळांमुळे कापणी न केलेल्या पिकांचे बरेच नुकसान होते.

राज्याच्या उत्तर भागातील मृदा हिमनद्यांनी वाहून आणलेली चिकण माती , वाळू, रेती इत्यादींच्या मिश्रणांतून बनलेली आहे. नदीकाठच्या प्रदेशातील तसेच पश्चिमेकडील खोऱ्यामधील मृदा गाळाने समृद्ध झाली आहे.

रॉकी पर्वताच्या पूर्वेकडे विस्तृत गवताळ  प्रदेश तयार झाला आहे. ब्लू ग्रॅमा, नीडल अँड थ्रेड, ग्रीन नीडलग्रास, ब्लूबंच व्हीटग्रास, ब्लू ग्रास असे गवतांचे विविध प्रकार आढळतात.

राज्याचा सु. २५% भाग हा वनव्याप्त असून तो पर्वतमय भागात आढळतो. बहुतेक वृक्ष मऊ लाकडांचे कोनिफर असून राज्यात कठीण लाकडाची वृक्षवने आढळत नाहीत. डग्लस फर, लार्च, पाँडेरोझा पाइन, व्हाइट पाइन, लॉजपोल पाइन इ. वृक्ष प्रकारांचे व्यापारी उत्पादन होते. सीडार, सेजब्रश, कॅक्टस यांच्या अनेक जाती आढळतात. स्प्रूस हाही महत्त्वाचा वृक्षप्रकार आहे.

र्वतीय भागात सांबर, एल्क, खेचर, श्वेतपुच्छ हरिण, काळी अस्वले, मोठ्या शिंगांच्या हरिणांचे कळप प्रेअरीत स्वैरपणे  फिरताना आढळतात. सु. ३०० ते ४०० गव्यांचा कळप राष्ट्रीय गवा संरक्षित क्षेत्रात राखून ठेवण्यात आला आहे. मिंक, बीव्हर, चिचुंदरी यांची अल्प प्रमाणात फरसाठी शिकार केली जाते. हिंस्त्र पशूंमध्ये पर्वतीय सिंह, बॉबकॅट, कॉयॉट इत्यादींचा समावेश होता.

ग्राउझ, बदके, कृकणपक्षी, तितर, हंस इ. शिकारी पक्षी आहेत. राज्यात पक्ष्यांच्या सु. ३०० जाती आढळतात. यलोस्टोन, हेब्‌गन, रेडरॉक या सरोवर प्रदेशांत हंसपक्षी वस्ती करतात. माशांच्या सु. ७० जाती असून रूपेरी सामन, व्हाइट फिश, ट्राउट इ. माशांचे प्रकार आढळतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate