অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मारी

मारी

मारी

रशियाच्या तुर्कमेन प्रजासत्ताकातील मारी ओब्‍लास्टची राजधानी व ऐतिहासिक शहर. लोकसंख्या ८१,००० (१९८३). हे काराकुम वाळवंटात मुरगाव नदीवर मुरगाव मरूद्यानात वसले वसले असून ते अश्काबादच्या पूर्वेस २८८ किमी. वर आहे. ट्रान्स-कॅस्पियन (क्रॅस्नोव्हॉट्‌स्क-ताश्कंद) या लोहमार्गावरील हे एक महत्त्वाचे प्रस्थानक असून काराकुम वाळवंटाच्या आग्नेय भागातून जाणारा काराकुम कालवा या शहराजवळूनच जातो.

मारी या अर्वाचीन शहराच्या पूर्वेस ३० किमी. वर प्राचीन म्येर्फ शहराचे भग्नावशेष आढळतात. म्येर्फची स्थापना अलेक्झांडर द ग्रेट याने इ. स. पू. चौथ्या शतकात केली. इ. स. पू. २६१ मध्ये पहिला अटायओकस याने ‘अटिओचिया मार्जिअना’ या नावाने या नगराची पुनर्बांधणी केली. इ. स. चवथ्या व पाचव्या शतकांत येथे ख्रिश्चन नेस्टोरियन धर्मगुरूचे धर्मपीठ होते.

खोरासानच्या अरब सत्ताधाऱ्यांच्या कारकीर्दीत (इ. स. ६५१ ते ८२१) म्येर्फची भरभराट झाली. याच काळात ते शहर इस्लाम धर्माच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. सेल्जुक साम्राज्याचा शेवटचा सुलतान संडझार याच्या कारकीर्दीत हे तुर्की साम्राज्याच्या राजधानीचे शहर होते.

(१११८–५७). याच काळात हे उत्कर्षाच्या शिखरावर पोहोचले. परंतु १२२१ मध्ये मोगलांनी ते उद्‌ध्वस्त केले. त्यामुळे तेथील राजवाडे, ग्रंथालये, स्‍नानगृहे इत्यादींचा संपूर्ण नाश झाला. त्यानंतर हळूहळू शहराची पुनर्रचना होत असतानाच १७९० मध्ये बूखारांनी ते पुन्हा उद्‌ध्वस्त केले.

रशियाने हा प्रदेश १८८४ मध्ये जिंकून घेतला. मध्य आशियाई मुस्लिम कलेचा नमुना म्हणून येथील अवशिष्ट कबरी, मशिदी, किल्ले व सुंदर स्मारके यांचे जतन करण्यात आले. याच शतकात ‘म्येर्फ’ नावाने सांप्रतच्या शहराची स्थापना करण्यात आली व त्यानंतर १९३७ मध्ये या शहराचे ‘मारी’ असे नामांतर करण्यात आले.

मारी हे कापूस उत्पादक प्रदेशाचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. याच्या आसमंतात प्रामुख्याने कापूस व लोकर यांचे उत्पादन व्यवसाय चालत असून येथून कापूस, लोकर, अन्नधान्ये, चामडी इत्यादींचा व्यापार चालतो.

मारी हे कापडनिर्मितीचेही प्रमुख केंद्र असून येथे कापूस पिंजणे, लोकर स्वच्छ करणे, धातुकाम, अन्नप्रक्रिया, सतरंज्या तयार करणे, लोकरीच्या वस्तू बनविणे, ग्राहकोपयोगी वस्तू-उद्योग, खाद्यपदार्थ बनविणे इ. उद्योगधंदे चालतात. इंधनासाठी वायू वापरून वीजनिर्मिती करणारे मोठे केंद्र व प्‍लॅस्टिकच्या वस्तू बनविण्याचा उद्योगधंदाही येथे १९७० मध्ये कार्यान्वित झाला आहे.

 

अनपट, रा. ल.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate