অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिन्स्क

मिन्स्क

मिन्स्क

रशियाच्या बेलोरशियन सोव्हिएट समाजवादी प्रजासत्ताकाची आणि याच नावाच्या प्रांताची (ओब्लास्ट) राजधानी. लोकसंख्या १४,४२,००० (१९८४). हे मिन्स्क डोंगररांगांच्या पायथ्याशी एका प्रेक्षणीय कोंदणात स्व्हीस्लच नदीकाठावर मॉस्कोच्या नैर्ऋत्येस ७५६ किमी. वर वसलेले आहे.

शहराचा प्रथम उल्लेख १०८७ मधील आढळतो. नॉर्वे-स्वीडन ते ग्रीस या जुन्या महत्त्वाच्या मार्गावर हे व्यापारी गाव वसल्यामुळे तद्देशीय भाषेतील ‘मिन्स्क' (देवघेव) हे सूचक नाव त्याला पडले असावे. बाराव्या शतकात मिन्स्क हे एका लहान संस्थानाची राजधानी होते.

मिन्स्क प्रदेश पूर्व यूरोपातील राजनैतिक भ्रंश पट्‌ट्याचा महत्त्वाचा भाग असल्याचे इतिहासकाळात पूर्व व पश्चिमेकडून वारंवार झालेल्या आक्रमणांवरून दिसून येते. उत्तरेतील लिथ्युएनिया राष्ट्राने चौदाव्या शतकात हा प्रदेश जिंकला. १५६९ मध्ये या भागावर पोलंडचे वर्चस्व होते.

पोलंडच्या दुसऱ्या विभाजनात (१७७३) मिन्स्क प्रदेश रशियाने बळकाविला (१९१८); पण जर्मनीच्या पराभवानंतर हा भाग रशियाकडे परत करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीकडून येथील प्रदेश जवळजवळ उद्‌ध्वस्त झाला आणि जर्मनीच्या पराभवानंतर सोव्हिएट रशियाने आपला अंमल पुन्हा येथे बसविला.

राजकीय दृष्ट्या हे शहर रशियाचे पश्चिमेकडील द्वारच होय. मध्य व पश्चिम यूरोपकडे जाणारे मुख्य लोहमार्ग व रस्ते मिन्स्कमधून जातात; त्याबरोबरच लेनिनग्राड आणि इतर बाल्टिक समुद्रावरची शहरे, मॉस्को आणि युक्रेन प्रांतास जोडणारे दक्षिणोत्तर मार्गही याच शहरामधून जातात.

मोटारी, मालवाहू गाड्या, ट्रॅक्टर, सायकली, घड्याळे, यांत्रिक उपकरणे, गोलक धारवे, संगणकयंत्रे, रेडिओ आणि दूरचित्रवाणी संच, औषधे इ. निर्मितीउद्योगांविषयी मिन्स्क प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे चिनी मातीच्या वस्तू, चर्मवस्तू, लाकडी वस्तू, कौले, प्रक्रिया केलेली पेये व खाद्यपदार्थ यांचे उत्पादनही बरेच होते.

सांस्कृतिक दृष्ट्या मिन्स्क शहर बेलोरशिया प्रजासत्ताकाचे केंद्र मानले जाते. नृत्य व नाट्यगृहे, क्रीडांगणे आणि मोठे वाचनालय शहरात असून, बेलोरशियन विज्ञान मंडळाचे मुख्य कार्यालय येथेच आहे. येथे बेलोरशियन राज्य विद्यापीठ, लेनिन विद्यापीठ, वैद्यकीय महाविद्यालय व तंत्रनिकेतने आहेत.

मिन्स्क ओब्लास्ट परिसरातील नैसर्गिक वायू, चिकणमाती, चुनखडक, डांबर इ. उद्योगधंद्यांना उपयोगी पडतात; तसेच वन्य भागात मिळणाऱ्या लाकडापासून प्लायवुडचे उत्पादन बऱ्याच प्रमाणात होते. फ्लॅक्स धाग्याचे पीकही बरेच येत असल्याने, त्यावर आधारलेले गोणपाट व कापड विणण्याचे कारखाने आढळतात.

 

देशपांडे, चं. धुं.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate