অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिसिसिपी

मिसिसिपी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक राज्य. क्षेत्रफळ १,२३,५१५ चौ. किमी. त्यांपैकी १,१८३ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांनी व्यापले आहे. हे राज्य देशाच्या आग्नेय भागात असून त्याची लोकसंख्या २५,२०,६३८ (१९८०) होती. याच्या दक्षिणेस व पश्चिंमेस लुइझिॲना, आर्‌कॅन्सॉ, उत्तरेस टेनेसी, पूर्वेस ॲलाबॅमा ही राज्ये असून आग्नेयीस मेक्सिकोचे आखात आहे. राज्याची संपूर्ण पश्चिम सरहद्द मिसिसिपी नदीने बनली असून जॅक्सन (लोकसंख्या २,०२,८९५–१९८०) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण व राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे.

भूवर्णन

मेक्सिकोच्या आखाताच्या किनारी प्रदेशात वसलेल्या या राज्याचा बहुतेक भूप्रदेश सस.पासून ९० मी. पर्यंत उंचीचा आढळतो. काही भाग लहानलहान टेकड्या व खडबडीत भूप्रदेशाने व्यापलेला आहे.

भूप्रदेशाची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाते. ईशान्य भागात वुडाल मौंटन हा सर्वांत उंच भाग असून याच भागात राज्यातील सर्वोच्च शिखर (२४६ मी.) आहे. याशिवाय ब्लॅक प्रेअरी पर्वतरांग, तसेच तिच्या पश्चिमेस पाँटटॉक रांग असून दक्षिण भागात फ्लॅटवुड नावाचा कमी उंचीचा रेतीमिश्रित गाळाचा पट्टा आहे. राज्याच्या पश्चिम भागात मिसिसिपी व यॅझू या नद्यांदरम्यान गाळयुक्त सुपीक प्रदेश आहे.

हा सु. १०५ किमी. रुंदीचा असून याच्या पूर्व भागात लोम, लोएस मातीच्या लहानलहान टेकड्या आढळतात. कापूस उत्पादक प्रदेश म्हणून हा भाग प्रसिद्ध आहे. दक्षिणेकडील सागरकिनारी प्रदेश विस्तृत पुळणी व कुरणांचा असून याच्या उत्तर भागात पिवळ्या पानांच्या पाइन वृक्षांचा पट्टा आहे. या भागात लाकूडकटाईचा व्यवसाय जोरात चालतो.

राज्यात उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या पश्चिमेकडील मिसिसिपी व पूर्वेकडील ॲलाबॅमा या दोनच प्रमुख नदीप्रणाली आहेत. त्या उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या पाँटटॉक रांगेने एकमेकींपासून वेगळ्या झाल्या आहेत. मिसिसिपी ही पश्चिम सरद्दीवरून वाहणारी राज्यातील प्रमुख नदी असून, यॅझू व बिग ब्लॅक या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. त्या राज्याच्या पश्चिम व वायव्य भागांचे जलवाहन करतात.

राज्याच्या ईशान्य कोपऱ्यातील सरहद्दीवरून टेनेसी नदी वाहत जाते. पर्ल नदी राज्याच्या मध्यपूर्व भागात उगम पावून प्रथम पश्चिमेस व नंतर जॅक्सन शहराजवळ दक्षिणेस वळते व पुढे लुइझिॲना आणि मिसिसिपी या राज्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखाताला मिळते.

या नदीमुळे राज्याच्या मध्यभागाचे जलवाहन होते. यांशिवाय टॅलाहॅची (यॅझूची उपनदी), दक्षिणेकडील पॅस्कगूला नदी, पूर्व भागातील टॉमबिग्बी इ. नद्या त्या त्या प्रदेशाचे जलवाहन करतात. राज्यात नैसर्गिक तलाव फार थोडे आहेत; परंतु यॅझू, पर्ल, टेनेसी इ. नद्यांवर बंधारे बांधून अनेक लहानमोठे जलाशय निर्माण करण्यात आले आहेत.

हवामान

समुद्रसान्निध्य व जलाशय यांमुळे राज्याच्या हवामानात स्थलपरत्वे फरक आढळतो. दक्षिण भागात हवामान उपोष्णकटिबंधीय आर्द्र असून उत्तर भागात ते उष्ण प्रकारचे आहे.

येथे हिवाळे सौम्य, तर उन्हाळे कडक असतात. राज्याचे वार्षिक सरासरी तापमान उत्तर भागात १६° से., तर दक्षिणेस किनारी भागात २०° से. असते.

उन्हाळ्यातील सरासरी तापमान २७° से. असते; परंतु दिवसा ते ३५° से. पर्यंत जाते. येथे वार्षिक सरासरी पर्जन्य १२७ सेंमी. पडतो. दक्षिण भागात पर्जन्यमान थोडे जास्त असते. हिवाळ्यात उत्तर भागात क्वचित बर्फ पडते.

वनस्पती व प्राणी

राज्यातील सु. ६०% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले असून त्यांत सु. १०० वनस्पतिप्रकार आढळतात. दक्षिण भागात पाइन वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. इतर भागांत कठीण लाकडाचे वेगवेगळे वृक्षप्रकार असून रानफुले, लहान झुडुपे व गवत सर्वत्र आढळते. जंगलांतील बहुतेक मोठे प्राणी शिकारीमुळे नामशेष होत आहेत.

हरणे, ससे, खारी इ. लहान प्राणी बरेच आहेत. तसेच इतर राज्यांतून येणाऱ्या वेगवेगळ्या पक्ष्यांचे प्रमाण बरेच आहे. जंगली टर्की सर्वत्र आढळतात. अंतर्गत जलाशयांत प्रामुख्याने बास, प्रोम, मार्जारमीन, कॅपी इ., तर किनारी भागात ऑयस्टर, कोळंबी इ. जलचर विपुल मिळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था

विद्यमान मिसिसिपी राज्याच्या प्रदेशात यूरोपीय वसाहतकारांच्या पूर्वी उत्तरेकडे चिकसॉ व मध्य विभागात चॉक्टॉ या इंडियन जमातींची वसती होती. विशेषतः नैर्ऋत्येकडील नॅचिझ ही मेक्सिकन इंडियनांशी संबंध असलेली जमात सांस्कृतिक दृष्ट्या विशेष प्रगत होती. डिसेंबर १५४० मध्ये एर्नांदो दे सोतो याने आपल्या संशोधन मोहिमेत येथे प्रवेश केला होता. मे १५४१ मध्ये मिसिसिपी नदीचा त्याला शोध लागला.

त्याच्या मागोमाग झाक मार्केत आणि ल्वी झॉल्ये हे फ्रेंच धर्मोपदेशक आणि समन्वेषक येथे आले. मिसिसिपी नदीखोऱ्याचा प्रदेश पुढे लुइझिॲना नावाने फ्रेंचांच्या सत्तेखाली आणण्यात आला. १६९९ पर्यंत संशोधक या भागात येत राहिले; परंतु कायमची अशी वसाहत तोपर्यंत स्थापन झाली नाही.

पुढे बिलक्सी उपसागराजवळ किल्ला बांधून फ्रेंच वसाहतकार स्थायिक झाले. मिसिसिपी प्रदेश फ्रेंचांच्या लुइझिॲना वसाहतीचा एक भाग बनला. १७१६ मध्ये नैर्ऋत्य भागात रोझल्या नावाचा किल्ला बांधण्यात आला व त्याच्या आसपास वसाहत वाढू लागली.

या प्रदेशात वसाहतकार आणण्यासाठी काही कंपन्याही स्थापन झाल्या. जॉन लॉ या स्कॉटिश माणसाची ‘फ्रेंच मिसिसिपी कंपनी’ त्यावेळी विशेष गाजली, परंतु तीनच वर्षात ती बंद पडली. ‘मिसिसिपी बबल्‌’ म्हणून तिचा निर्देश होतो.

१७६३ च्या पॅरिसच्या तहानंतर हा मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील फ्रेंच प्रदेश तसेच स्पेनच्या ताब्यातील पूर्व व पश्चिम फ्लॉरिडा हे विभागही ब्रिटिशांच्या ताब्यात आले.

अनेक अँग्लो-अमेरिका लोकांना त्यांच्या सैनिकी सेवेचा मोबदला म्हणून या प्रदेशात जमिनी देण्यात आल्या. त्यांनी नॅचिझ प्रदेशात तंबाखू, नीळ इत्यादींचे उत्पादन सुरू केले व या भागात कृषिविकास घडविला. अमेरिकेच्या राज्यक्रांतीच्या काळात नॅचिझ प्रदेश सापेक्षतः तटस्थच राहिला.

या संधीचा फायदा स्पॅनिश वसाहतकारांनी घेतला व रोझल्या किल्ला घेऊन या भागात स्पॅनिश सत्ता पुन्हा स्थापन केली (१९७९). तेथील अमेरिकन वसाहतकारांनी स्पेनशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली.

१७८१–८२ मधील तेथील ब्रिटिश वसाहतकारांचा अल्पकालीन उठाव वगळता, हा प्रदेश १७९५ पर्यंत अधिकृतपणे व १७९८ पर्यंत प्रत्यक्षात स्पेनच्या ताब्यात राहिला.

अमेरिकन क्रांतीनंतरच्या १७८३ मधील पॅरिस तहान्वये ग्रेट ब्रिटन ३१° अक्षांशाच्या उत्तरेकडील प्रदेश अमेरिकेकडे सुपूर्त केला असला, तरी हे सत्तांतर स्पेनने मान्य केले नाही.

पुढे जॉर्जियाने बूर्‌बाँ परगणा स्थापून (१७८५–८८) या प्रदेशावर हक्क सांगितला आणि नंतर १७९५ मध्ये येथील जमिनीची विक्रीही केली. या प्रादेशिक वादाचा शेवट सॅन लोरेन्झो तहाने (१७९५) झाला व ३१° अक्षांशाच्या उत्तरेकडील प्रदेश स्पेनने अमरिकेला सुपूर्त केला; तथापि प्रत्यक्ष ताबा मिळण्यास पुढे ३ वर्षे लागली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate