অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मॅडिसन

मॅडिसन

मॅडिसन

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील विक्सॉन्सिन राज्याची राजधानी व डेन परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,७०,६१६ (१९८०). हे राज्याच्या दक्षिणमध्य भागात, र्मेडोट व मनोन या दोन सरोवरांदरम्यानच्या संयोगभूमीवर वसले आहे. याच्या दक्षिणेस किगॉन्स व वॉबीस ही दोन सरोवरे आहेत.

यहार नदीमुळे ही चारी सरोवरे एकमेकांना जोडलेली असून ही नदी शहराच्या मध्यातून वाहते. न्यायाधीश जेम्स डुएन डॉटी यांनी या निसर्गसुंदर जागेची निवड करून तेथे १८३६ मध्ये या शहराची स्थापना केली व त्याच वर्षी मृत्यू पावलेल्या जेम्स मॅडिसन या अमेरिकेच्या चौथ्या राष्ट्राध्यक्षांच्या स्मरणार्थ शहराला त्यांचे नाव दिले.

मॅडिसनमध्ये झालेली विस्कॉन्सिन विद्यापीठाची स्थापना (१८४९), लेनर्ड जे. फार्वेल याच्या प्रयत्नांमुळे येथे उद्योगधंद्यांच्या उभारणीस मिळालेले प्रोत्साहन (१८५०), येथून सुरू झालेला लोहमार्ग (१८५४) इ. कारणांमुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली. १८४६ मधील केवळ ६२६ लोकवस्तीच्या या खेड्याचे १० वर्षातच (१८५६) ७,००० लोकसंख्येच्या शहरात रूपांतर झाले. ठोक व किरकोळ व्यापाराचे हे केंद्र आहे.

येथील सशस्त्र सैन्यदल प्रशिक्षण संस्था प्रसिद्ध असून सैनिकांना पत्रद्वारा प्रशिक्षण देणारे देशातील ते प्रमुख केंद्र आहे. शैक्षणिक दृष्ट्याही मॅडिसन महत्त्वाचे असून विक्सॉन्सिन विद्यापीठ, मॅडिसन विभाग तांत्रिक महाविद्यालय (१९१२), एजवुड महाविद्यालय (१९२७), अनेक विद्यानिकेतने (पब्लिक स्कूल्स), देशातील जंगलसंपत्तिविषयक-जगामधील या प्रकारची पहिलीच–प्रयोगशाळा (१९१०) यांसारख्या विविध शैक्षणिक तसेच संशोधन संस्था आहेत.

स्टेट हिस्टॉरिकल सोसायटीचे ‘म्यूझीयम ऑफ विस्कॉन्सिन हिस्टरी’, ‘मॅडिसन आर्ट सेंटर’ यांसारखी संग्रहालये व कलादालने शहरात असून नृत्य-संगीतविषयक बरीच केंद्रे आहेत. विद्युत्‌साहित्य, यंत्रे, वैद्यकीय साहित्य, मांस प्रक्रिया, रसायने, दुग्धशाळायंत्रे व उपकरणे, कृषियंत्रे इ. उद्योगधंदे शहरात दिसून येतात. मॅडिसनचा आसमंत कृषिउत्पादने व दूधदुभते यांसाठी प्रसिद्ध आहे.

शहराजवळील सरोवरांत नौकाविहार, जलतरण, मासेमारी इत्यादींच्या सुविधा उपलब्ध आहेत. विंग्रा सरोवराकाठी असलेल्या ‘ हेन्री विलास पार्क ’ या उद्यानात प्रेक्षणीय प्राणिसंग्रहालय आहे. पांढऱ्या ग्रॅनाइटी खडकांत बांधलेले राज्याचे विधानभवन व त्याचा घुमट प्रेक्षणीय आहे.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate