অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेरिलंड

मेरिलंड

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी अटलांटिक महासागर किनाऱ्यावरील मूळ तेरा राज्यांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ २७,३९४ चौ. किमी. पैकी १,७७७ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांखाली (चेसापीक उपसागर वगळता) आहे. चेसापीक उपसागराखालील क्षेत्रफळ ४,४७० चौ. किमी. आहे. लोकसंख्या ४३,०४,०००(१९८३ अंदाज).

अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ३७° ५३′ ते ३९° ४४′ उ. व ७५° ०४′ ते ७९° २९′ पश्चिम यांदरम्यान. मेरिलंडच्या उत्तरेस पेनसिल्व्हेनिया राज्य,पूर्वेस डेलावेअर राज्य व अटलांटिक महासागर; दक्षिणेस व पश्चिमेस व्हर्जिनिया आणि वेस्ट व्हर्जिनिया ही राज्ये आहेत.

मेरिलंड-व्हर्जिनिया सरहद्दीदरम्यान वॉशिंग्टन डी. सी. (डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया) हा प्रदेश आहे. ॲनॅपलिस (लोकसंख्या ३१,७४०–१९८०) ही राज्याची राजधानी.

भूवर्णन

चेसापीक उपसागरामुळे राज्याचे पूर्व व पश्चिम असे दोन विभाग पडले आहे. मेरिलंडचे पूर्वेकडून पश्चिमेकडे

(१) अटलांटिक किंनारी मैदान, (२) पीडमाँ ट, (३) ब्लू पर्वतरांग , (४) ॲपालॅचिअन कटक व दरीप्रदेश, (५) ॲपालॅचिअन पठार असे पाच प्रा कृतिक विभाग पाडता येतात. त्यांपैकी अटलांटिक किनारी मैदानी प्रदेशात चेसापीक उपसागराच्या पूर्वेकडील संपूर्ण प्रदेशाचा व उपसागराच्या पश्चिमेकडील काही प्रदेशाचा समावेश होतो. या उपसागराच्या पूर्वेकडील मैदानी प्रदेश सपाट असून, पश्चिमेकडील प्रदेशाची उंची १२० मी. पर्यंत वाढलेली दिसते.

पूर्व भागात काही दलदलीचे प्रदेश आहेत. वेस्टर्न शोअरचा बॉल्टिमोरच्या दक्षिणेकडील प्रदेश दक्षिण मेरिलंड म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाच्या पश्चिमेस व उत्तरेस ८० किमी. रुंदीचा पीडमाँट हा पठारी प्रदेश आहे. या भागात कमी उंचीच्या टेकड्या व सुपीक खोरी आहेत. पीडमाँट प्रदेशाच्या मध्य भागातील पार्स रिज (२६८ मी.) व पेनसिल्व्हेनियाच्या सरहद्दीवरील डग हिल रिज (३६६ मी.) हे दोन कटक ईशान्य - नैर्ऋत्य दिशेत पसरले असून,ते पोटोमॅक नदीला मिळणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे प्रमुख जलविभाजक आहेत.

पश्चिमेस मनॉकसी नदीखोऱ्यातील फ्रेडरिक दरीचा प्रदेश हा संयुक्त संस्थानांमधील अत्यंत समृद्ध असा दूधदुभत्यांचा प्रदेश आहे. पीडमाँटच्या पश्चिमेस ब्लू पर्वतरांग ही पर्वतीय भूमीची अरुंद पट्टी आहे. पेनसिल्व्हेनियाच्या सरहद्दीदरम्यान तर ६१० मी पेक्षाही जास्त उंची आढळते.

साउथ मौंटन व कटॉक्टिन मौंटन ह्या प्रदेशातील मुख्य पर्वतरांगा आहेत. वनाच्छादित कटकांवर अधूनमधून आढळणाऱ्या निळसर धुक्याच्या आच्छादनामुळे या प्रदेशाला ब्लू पर्वतरांग असे नाव देण्यात आलेले आहे. त्याच्या पश्चिमेकडील पेनसिल्व्हेनिया व वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांना अलग करणारा मेरिलंडचा अरुंद भूमिप्रदेश म्हणजेच अपॉलॅचिअन कटक व दरी-प्रदेश होय.

या प्रदेशातील पेनसिल्व्हेनिया-वेस्ट व्हर्जिनियादरम्यानची हॅनकॉक येथील मेरिलंडच्या भूमीची रुंदी तर जेमतेम तीन किंमी.च आहे. हेगर्सटाउन या मेरिलंडमधील सर्वांत मोठ्या दरीने या प्रदेशाचा पूर्व भाग व्यापला असून तीमधील सु पीक खोऱ्यांत शेती आणि फळबागांखालील क्षेत्र बरेच आहे. या दरीच्या पश्चिमेस ईशान्य नैर्ऋत्य दिशेस पसरलेल्या कटकांच्या अनेक श्रेण्या असून त्यांपैकी काहींची उंची ६१० मी. पर्यंत आढळते.

या संपूर्ण प्रदेशाचा दोन-तृतीयांश भाग वनाच्छादित आहे. मेरिलंडची अगदी पश्चिमीकडील त्रिकोणाकृती भूमी ॲपालॅचिअन पठारी प्रदेशाने व्यापली आहे. यातील बराचसा भाग ॲलेगेनी पर्वतप्रदेशाने व्यापला असून त्याशिवाय बँकबोन, मिडो व निग्रो या पर्वतरांगा या भागात आहेत.

राज्याच्या नैर्ऋत्य कोपऱ्यात असलेल्या बॅकबोन पर्वतातील बॅकबोन शिखर (१,०२४ मी.) हे राज्यातील सर्वोच्च शिखर आहे. या पठारी प्रदेशातून नद्यांनी खोल दऱ्या निर्माण केलेल्या आहेत. पठाराचा ती नचतुर्थांश भाग वनाच्छादित आहे.

राज्याच्या ईस्टर्न शोअर प्रदेशाच्या दक्षिण भागात हलकी वाळू-मिश्रित लोम मृदा व कडक चिकणमाती, तर उत्तर भागात चांगल्या प्रतीची माती आढळते. वेस्टर्न शोअर विभागात बॉल्टिमोरच्या दक्षिण भागात चिकणमाती आणि लोम मृदा, राज्याच्या उत्तर-मध्य भागात सुपीक चुनखडीयुक्त मृदा, तर पश्चिमीकडील नद्यांच्या खोऱ्यात मृदेचा पातळ थर आढळतो.

राज्यांत कोळसा, ग्रॅनाइट, चुनखडक, नैसर्गिक वायू, संगजिरे, वाळू, जाडी रेव, चिकणमाती इ. खनिज पदार्थ मिळतात.

मेरिलंडमधून वाहणाऱ्या बहूतेक नद्या चेसापीक उपसागराला मिळतात. एल्क, सस्फ्रास, चेस्टर, चॉपटँक, नॅन्टिकोक, वायकोमिको पोकोमो क ह्या ईस्टर्न शोअर विभागाचे स्वतंत्र खनन करून चेसापीक उपसागराला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. उत्तरेकडून पेनसिल्व्हेनिया राज्यातून वाहत येणारी सस्क्वेहॅना नदी मेरिलंडमध्ये चेसापीक उपसागराला मिळते.

गनपावडर, पटॅप्स्को, पटक्संट या वेस्टर्न शोअर विभागाचे खनन करून चेसापीक उपसागराला मिळणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. पोटॉमॅक नदीने राज्याची दक्षिण व नैर्ऋत्य सरहद्द सिमित केलेली आहे. वॉशिंग्टन डी. सी. च्या दक्षिणेस पॉटोमॅकचे पात्र बरेच रुंद झाले असून चेसापीक उपसागराला तो एक फाटाच आहे. पोटोमॅकच्या उपनद्या पश्चिम मेरिलंडचे जलवाहन करतात.

मेरिलंडमधील बहुतेक सरोवरे ही मानवनिर्मित आहेत. राज्याच्या अगदी पश्चिम भागातील ॲलेगनी पर्वतीय प्रदेशातील ‘डीप क्रीक लेक’ हे सर्वांत मोठे (क्षेत्रफळ १,६०० हे.) सरोवर आहे. यॉक्‌गेनी नदीच्या एका लहानशा उपनदीवर बांधलेल्या धरणामुळे या सरोवराची निर्मिती झाली असून जलविद्युत्‌निर्मितीसाठी त्याचा उपयोग केला जातो.

मेरिलंडला अटलांटिक महासागर किनारा केवळ ४९ किमी. लांबीचा लाभला असला, तरी चेसापीक उपसागर व त्याच्या अनेक भुजा आणि उपखाड्या यांमुळे राज्याला एकूण ५,१३४ किमी. लांबीचा समुद्रकिनारा आहे. तसेच त्यावर अनेक उत्तमोत्तम बंदरेही आहेत. ब्लडस्‌व र्थ, डील, हूपर, केंट, स्मिथ, साउथ मार्श, टेलर व टिलमन ही चेसापीक उपसागरांतील प्रमुख बेटे आहेत.

हवामान

मेरिलंडचे हवामान आर्द्र असून समुद्रकिनाऱ्यावरील स्थानामुळे उन्हाळे व हिवाळे दोन्हीही सौम्य असतात. अटलांटिक व चेसापीक किनाऱ्यांवरील प्रदेशांपेक्षा वायव्येकडील पर्वतीय प्रदेशातील तापमान कमी असते.

चेसापीक उपसागराभोवतालच्या प्रदेशातील सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २४° सें. ४° सें., तर वायव्य भागातील गॅरिट परगण्यातील सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २०° से. व –२०° से. असते. वृष्टीचे सरासरी प्रमाणे ११२ सेंमी. आहे.

राज्यातील पर्जन्यवृष्टीचे प्रमाण सामान्यपणे सर्वत्र सारखे असते. हिमवृष्टीचे वार्षिक सरासरी प्रमाण आग्नेय भागात २३ सेंमी., तर ॲपालॅचिअन पठारी प्रदेशात १९८ सेंमी. असते.

वनस्पती व प्राणी

राज्याच्या एकूण क्षेत्रफळांपैकी सु. ४०% अरण्यांखाली आहे. राज्याच्या मध्यभागातील बरेचसे क्षेत्र कठीण वनवृक्षांनी व्यापले आहे. ओक या मुख्य वृक्षविशेषाशिवाय ॲश, बीच, लोकस्ट, हिकरी, मेपल, ट्यूलिप, इ. वृक्षजाती येथील जंगलांत आढळतात. यांशिवाय वेगवेगळी फुलझाडे, फळझाडे, गवत आणि गवताच्या जातीच्या वनस्पतीही पुष्कळ आढळतात.

प्राण्यांमध्ये ससा, मिंक, ऑपॉस्सम, रॅकून, कोल्हा, हरिण, चिपमंक, उद, मांजर, खार, वुडचक, ग्राउझ, बुडचक, तितर, टर्की, रानबदक, इ. प्राणी अधिक प्रमाणा त आढळतात. गाणाऱ्या पक्ष्यांची संख्या पुष्कळ आहे. ‘बॉल्टिमोर ऑरिओल’ (हळदी) याला ‘राज्यपक्षी’ म्हणून मानले जाते.

अटलांटिक किनारा व चेसापीक उपसागरामध्ये वेगवेगळ्या जातींचे मासे सापडतात. ब्लूफिश, खेकडा, खवलेदार पाठीचे कासव, मेनहेडन, ऑयस्टर, ट्राउट, कोळंबी, रॉकफिश, कार्प, कॅटफिश, बास, सकर इ. जलचर अधिक प्रमाणात सापडतात.

चौधरी, वसंत

इतिहास व राज्यव्यवस्था

मरिलंडमधील मूळचे रहिवासी अल्गाँ क्वियन इंडियन व त्यांच्या अनेक शाखा हे होत. चेसापीक उपसागराचा शोध प्रथम स्पॅनिशांनी लावला.

१६०८ मध्ये कॅ. जॉन स्मिथ हा या उपसागरातून मेरिलंड प्रदेशात आला. या उपसागरातील केंट बेटावर विल्यम क्लेबर्न यांने १६३१ साली व्यापारी ठाणे उभारले. ही या भागातील पहिली यूरोपीय वसाहत होय. १६३२ साली इंग्लंडच्या पहिल्या चार्ल्स राजाने दुसरा लॉर्ड बॉल्टिमोर सेसिल क्लॅव्हर्ट याच्या नावे मेरिलंड प्रदेशाची सनद दिली. चार्ल्सची पत्नी हेन्रिएटा मारीआ हिच्या नावावरून या प्रदेशाला मेरिलंड हे नाव देण्यात आले.

सेसिल क्लॅव्हर्ट याने १६३४ साली येथे वसाहतकार पाठविले आणि त्यांनी पश्चिम किनाऱ्याच्या दक्षिण टोकाजवळ सेंट मेरीज सिटी हे शहर वसविले. लेनर्ड क्लॅव्हर्ट हा या वसाहतीचा राज्यपाल म्हणून निवडून आला. तो स्वतः रोमन कॅथलिक असला, तरी वसाहतीच्या विस्तार-विकासाच्या दृष्टीने त्याने धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा केला (१६४९). परीणामतः व्हर्जिनियातून अनेक प्यूरिटनवादी लोंकानी मेरिलंडमध्ये आश्रय घेतला.

धार्मिक स्वातंत्र्याचा प्रदेश म्हणून तेंव्हापासून हे राज्य प्रसिद्ध आहे. तथापि १६५४ साली विल्यम क्लेबर्न या केंट बेटावरील व्यापारी केंद्राच्या नेत्याने काही प्रॉटेस्टंट पंथीयांच्या मदतीने या वसाहतीचा ताबा घेतला. चार वर्षांनंतर ब्रिटिश शासनाच्या आदेशानुसार ही वसाहत पुन्हा लॉर्ड बॉल्टिमोरकडे परत करण्यात आली.

१६८९ साली प्रोटेस्टंट असोसिएशन या संघटनेच्या जॉन कूड या नेत्याने सत्ता बळकावली. मेरिलंडचा कारभार इंग्लडने आपल्याकडे घ्यावा, अशी त्याची मागणी होती. परीणामतः १६९१ पासून इंग्लंडमधून येथे राज्यपाल नेमण्यात येऊ लागला. प्रोटेस्टंट पंथीय चौथा लॉर्ड बॉल्टिमोरच्या कारकीर्दीत १७१५ च्या सुमारास वसाहतीवर पुन्हा एकदा क्लॅव्हर्ट घराण्याचा प्रभाव वाढला.

अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धापर्यंत या वसाहतीवर लॉर्ड बॉल्टीमोर याचाच ताबा होता. मधल्या काळात तंबाखूचे प्रचंड किफायतशीर उत्पादन या वसाहतप्रदेशात होऊ लागले. वसाहतकारांनी भव्य वास्तू उभारल्या. लोकसंख्ये चीही वेगाने वाढ झाली. मेरिलंड व पेनसिल्व्हेनिया यांच्यातील सरहद्दीचे भांडण १७६३ साली मिटले.

स्वातंत्र्ययुद्धकाळातच या राज्याने आपले पहिले संविधान तयार केले. (८ नोव्हेंबर १७७६). त्याच वर्षी सुरक्षिततेच्या दृष्टीने काँटिनेंटल काँग्रेसचे कार्यालय फिलाडेल्फियावरून बॉल्टिमोर येथे हलविण्यात आले.

मेरिलंडचा पहिला राज्यपाल २१ मार्च १७७७ रोजी अधिकारावर आला. स्वातंत्र्ययुद्धात बॉल्टिमोर येथे जहाजे व तोफा तयार करण्यात आल्या.

प्रत्यक्ष व वसाहतीत लढाया अशा कचितच झाल्या. १ मार्च १७८१ रो जी अमेरिकन संघराज्याच्या सनदेला मेरिलंडने संमती दिली. स्वातंत्र्ययुद्धोत्तर काळात पहिली काँग्रेस वसाहतीच्या निमंत्रणावरून ॲनापलिस येथेच भरविण्यात आली. (१७८३–८४). १७८० नंतर व्हर्जिनिया आणि मेरिलंड यांच्यात चेसापीक उपसागरातील नाविक हक्कांबद्दल वाद निर्माण झाला होता; तो पुढे मिटला. अमेरिकन संघराज्यांतील सातवे राज्य म्हणून मेरिलंड अस्तित्वात आले.

(१७८८). देशाच्या राजधानीसाठी वॉ शिंग्टन डी. सी. ही जागा मेरिलंडनेच दिली. १८१२ मधील ब्रिटिशांबरोबर झालेल्या यु द्धात या वसाहतीचा मोठा भाग होता.

चेसापीक उपसागराजगतच्या अनेक नगरांवर आणि कृषिवस्त्यांवर ब्रिटिशांनी हल्ले केले. २४ ऑगस्ट १८१४ रोजी ब्लेडन्झबर्गच्या लढाईत अमेरिकन सैन्या चा पराभव झाला. आणि ब्रिटिश ज. रॉबर्ट रॉ स याने वॉशिंग्टन येथील कॅपिटॉल आणि इतर शासकीय इमारती जाळून टाकल्या.

१२ सप्टेंबर १८१४ रोजी ब्रिटिशांनी उत्तरेकडून बॉल्टिमोरवर हल्ला केला. तथापि अमेरिकन सैन्याने येथे मात्र ब्रिटिश सैन्याला पिटाळून लावले. बॉल्टिमोरच्या लढाईमुळेच स्फूर्ती लाभून फ्रॅन्सिस स्कॉट की या कवीने जे गीत लिहिले (द स्टार-स्पँगल्डबॅनर), तेच पुढे अमेरिकेचे राष्ट्रगीत ठरले.

एकोणिसाव्या शतकात बॉल्टिमोरचा परिसर औद्योगिक दृष्ट्या विकसित झाला. सागरी बंदर व जहाजबांधणीचे केंद्र म्हणून त्याचे महत्त्व वाढले. १८३० मध्ये पीटर कूपरने वाफेचे एंजिन (टॉम थंब) बनविले. बॉल्टिमोर व एलिकॉट सिटी लोहमार्गावर ते वापरले. पहिले सागरीगामी व पोलाद वापरलेले जहाज बॉल्टिमोरमध्येच १८३९ साली बांधण्यात आले. १८५१ मध्ये मेरिलंडने नवे संविधान स्वीकारले.

यादवी युद्धात मेरिलंडने संघराज्याची बाजू घेतली. देशाची राजधानी आणि ही वसाहत गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या राज्यांनीच वेढलेली होती. त्यामुळे मेरिलंडच्या भू मीवर यादवी युद्धकाळात अनेक लढाया झाल्या. त्यांपैकी एंटीटमच्या लढाईत (१८६२) फार मोठी प्राणहानी झाली.

१८६४ साली स्वीकारलेल्या सं वि धानानुसार या वसाहतीत कायद्याने गुलामगिरी बंद करण्यात आली. गुलामगिरीच्या पुरस्कर्त्या नागरिकांना जबर शासन करण्याची तरतूद या संविधानात होती; पण १८६७ च्या (विद्यामान) संवि धानात ही तरतूद सौम्य करण्यात आली. यादवी युद्धोत्त रकाळात वसाहतीची औद्योगिक प्रगती होतच राहिली . एक औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून बॉल्टिमोर विशेष प्रसिद्ध झाले.

पहिल्या महायुद्धकाळात राज्यातील कारखाने व जहाजबांधणी यांच्या वाढीस विशेष चालना मिळाली. अमेरिकन भूसेनेचे अँबर्डीन प्रूव्हिंग ग्राउंड चेसापीक उपसागराच्या वायव्य किनाऱ्यावर स्थापन करण्यात आले. (१९१७).

अमेरिकेच्या प्रख्यात दारूबंदी विधेयकाला (१९१९) मेरिलंडने जोराचा विरोध केला. राज्याच्या स्वायत्ततेवर आक्रमण म्हणून हा विरोध होता. तेव्हापासून ‘फ्री स्टेट’ अशा टोपणनावानेच हे राज्य ओळखले जाते.

१९३० नंतरच्या जागतिक मंदीच्या काळात वसाहतीत समाजकल्याणावर अनेक कायदे आणि योजना संघराज्याच्या मदतीने अंमलात आल्या १९३८ साली राज्यात पहिल्यांदाच आयकरविषयक अधिनियम करण्यात आला. तसेच मोठ्या प्रमाणावर घरबांधणीचा प्रकल्प संघराज्याच्या मदतीने हाती घेण्यात आला.

दुसऱ्या महायुद्धकाळात येथी ल उत्पादक उद्योगधंद्यांची प्रचंड वाढ झाली व त्यासाठी ॲपालॅचिअन डोंगरी भागातून व इतर प्रदेशातून कामगारवर्ग या प्रदेशा त आला. महायुद्धोत्तर काळात राज्यातील दळणवळणव्यवस्थेत सुधारणा झाली. बॉल्टिमोर येथिल आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाला. (१९५०). १९५२–६३ यांदरम्यान बॉल्टिमोर बंदरातील बोगदा, चेसापीक उपसागरातील पूल, जॉन केनेडी आणि बॉल्टिमोर–वॉशिग्टन एक्सप्रेस-वे इ. पूर्ण करण्यात आले. १९६२–६६ या काळात प्रांतिक आणि केंद्रीय निवडणुकांच्या निर्वाचनक्षेत्रांची पुनर्रचना करण्यात आली.

शैक्षणिक क्षेत्रातही १९६० नंतर सुधारणा झाल्या. मेरिलंड विद्यापीठाच्या शाखा काढण्यात आल्या. शिक्षक-प्रशिक्षण महाविद्यालयाचे सर्वसाधारण शासकीय महाविद्यालयांत रूपांतर करण्यात आले व दोन वर्षांचा अभ्यासक्रम असलेली समूह महाविद्यालय सुरू करण्यात आली. चेसापीक उपसागराच्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे मेरिलंडचे आर्थिक औद्योगिक संबंध हे उत्तर, पूर्वेकडील राज्यांशी आधिक आहेत.

बॉल्टिमोर व वॉशिंग्टनदरम्या न अनेक नगरे व औद्योगिक वसाहती वसल्या. त्यांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची समस्या निर्माण झाली. याच संदर्भात १९७२ साली शासनातर्फे सोडतीचाही उपक्रम सुरू करण्यात आला. हवापाण्याच्या प्रदूषणाची समस्याही राज्यात आहे.

दुसऱ्या महायुद्धकाळात हजारो कृष्णवर्णीय लोक दक्षिणेकडून या राज्यात आले व बॉल्टिमोर आणि त्याच्या परिसरात स्थायिक झाल्यामुळे शहराच्या उपनगरात गौरवर्णीय लोक जाऊ लागले.

कृष्णवर्णीय मुलांसाठी वेगळ्या शाळा राज्याच्या कायद्यानुसार होत्या; परंतु १९५४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे घटनाबाह्य ठरले. त्याप्रमाणे बॉल्टिमोरमधील पृथक्‌शिक्षण पद्धती त्वरित बंद करण्यात आली. १९६८ साली मार्टिन ल्यूथर किंग (ज्युनिअर) याच्या खुनानंतर बॉल्टिमोरमध्ये वां शिक दंगली व हिंसाचार उसळला. पण वां शिक ताणतणाव आता कमी होत आहे.

अवकाश संशोधन विकासाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून हे राज्य प्रसिद्ध आहे. ग्रीन बेल्ट येथील गॉडर्ड स्पेस स्टडीज सेंटर (नॅशनल एअरॉनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रे शन) मध्ये नॅसॉ संस्थेतर्फे अवकाशीय प्रकल्पांचे मूलभूत नियोजन केले जाते.

राज्याचा कारभार १८६७ सालच्या संविधानानुसार (१२५ दुरुस्त्यांसह) चालतो. राज्यात द्धिसदनी विधिमंडळ असून वरिष्ठ गृहात ४७ आणि प्रतिनिधिगृहात १४१ निर्वाचित सदस्य असतात. (मुदत ४ वर्षे). राज्यपाल आणि नायब राज्यपाल यांचीही ४ वर्षांसाठी निवड होते. संघराज्याच्या काँग्रेसवर २ सीनेटर व ८ लोकप्रतिनिधी राज्यातर्फे पाठविण्यात येतात.

न्यायव्यवस्था

एक विशेष अपील न्यायालय आणि ८ विभागीय न्यायालये व त्याखालील जिल्हा न्या यालये अशी राज्यातील न्यायखात्याची रचना आहे. सर्व मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राज्यपाल करतो.

जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक मात्र अपील न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश करतो. चारपासून बावीसपर्यंत अशी विविध प्रकारच्या न्यायाधीशांची संख्या असून त्यांची मुदतही वेगवेगळी असते.

राज्यात २३ परगणे आहेत. बॉल्टिमोर शहर स्वतंत्र असून इतर २४ प्रशासकीय विभाग आहेत. बॉल्टिमोर शहरासाठी एक महापौर व १८ सदस्यांची समिती आहे. राज्यातील मोठ्या शहरांतही अशाच प्रकारची प्रशासन व्यवस्था आढळते. परगण्यांचा कारभार पाहण्यासाठी लोकनिर्वाचित सदस्यांच्या समित्या असतात.

सदस्यांची मुदत ४ वर्षांचीअसते. राज्यातील सर्व मोठी शहरे आणि ५ परगणे हे स्वतंत्रपणे आपले प्रशासन चालवितात. राज्यात सर्व परगण्यांना स्वायत्त प्रशासनाची मुभा आहे.

राजकीय दृष्टीने रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव राज्यातील दक्षिण-पश्चिम विभागांतील काही परगण्यांतून दिसून येतो. सामान्य पणे डेमॉक्रॅटिक पक्षाचेच राज्य असून बॉल्टिमोर शहरात ते विशेषत्वाने दिसून येते. अलीकडे मात्र राज्यात दोन्ही पक्ष तुल्यबळ ठरले आहेत.

आर्थिक स्थिती

शेती व्यवसाय राज्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यातील १०,९२,६५२ हे जमीन शेतीखालील असून एकूण जमिनीशी हे प्रमाण ४३% आहे. मका,सोयाबीन, तंबाखू आणि वैरण ही प्रमुख कृषीउत्पादने आहेत. याशिवाय सफरचंद, काकडी, टोमॅटो, गहू, द्वीदल धान्ये, विविध प्रकारची फुलझाडे ही उत्पादने होतात.

पशुपालन व्यवसायही महत्त्वाचा आहे. १९८४ मधील पशुधन पुढीलप्रमाणे होते : दुभत्या गायी १·२५ लक्ष; बदके २ लक्ष; मेंढ्या २० हजार; कोंबड्या ४७ लक्ष; पशुधनाबरोबरच दुग्धोत्पादन व दुग्धव्यवसाय व्यवसाय राज्यात विकसित झालेला आहे.

वाळू, रेती, दगडी कोळसा, चुनखडक, सिमेंट व पीट मुदा, संगजिरे, मौल्यवान खडे इ. महत्त्वाचे खनिजे आहेत. यांपैकी वाळू आणि रेती यांपासून सर्वांत जास्त उत्पन्न मिळते.

गॅरिट परगण्यात नैसर्गिक वायूचे साठे सापडले आहे. राज्यातील प्रमुख उद्योग म्हणजे अन्नप्रक्रिया व अन्नपदार्थ हे होय. त्याखालोखाल पोलादी उत्पादने, विजेची व इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे, रासायनिक पदार्थ आणि वाहतुकीची साधने हे महत्त्वाचे उद्योग आहेत.

मांस डबाबंदीकरण, मसाले व तत्सम अन्नोत्पादनांचे फार मोठे कारखाने बॉल्टिमोरमध्ये तसेच केंब्रिज शहरात आहेत. स्पॅरोज पॉइंट येथील बेथलीएम येथील स्टील कॉ र्पोरेशन जगद्‌विख्यात आहे. रेडिओ आणि दुरचित्रवाणी संच ही इलेक्ट्रॉनिकी उत्पादने होत. त्यांशिवाय यांत्रिक उपकरणे, कागद व कागदी वस्तू तसेच छपाई-साहित्य हेही उद्योग राज्यात आढळतात.

वाहतूक व संदेशवहन

या राज्यात राज्यशासनाच्या अखत्यारीतील महामार्ग ८,४३४ किमी. लांबीचे आहेत. त्याशिवाय २३ परगण्यांतून असलेल्या एकूण सडकांची लांबी २७,७५३ किमी. आहे. राज्यातील १५९ नगरपालिका व महानगरपालिका मिळून ६,३०२ किमी लांबीच्या रस्त्यांची देखभाल पाहतात.

१९८३ साली राज्यांत ३२ लक्ष मोटार वाहनांची नोंद झाली होती. राज्यातील लोहमार्गांची व्याप्ती १,७७० किमी आहे. अधिकृत असे व्यापारी विमानतळ राज्यात ४१ आहेत. बॉल्टिमोर हे संबंध देशातील सहाव्या क्रमांकाचे सागरी बंदर असून तेथून फार मोठा व्यापार चालतो.

लोक व समाजजीवन

राज्यातील लोकसंख्यावाढीचे प्रमाण १९८० च्या जनगणनेनुसार आधीच्या दशकाच्या (१९७०) तुलनेने ७% वाढले आहे. राज्यातील बहुसंख्यांक लोक (सु. ८०%) शहरांत राहतात. त्यांपैकी ९०% लोक बॉल्टिमोर, हेगर्सटाउन, कंबर्लंड, विल्मिंग्टन इ. महानगरांतून आढळतात. राज्यातील विद्यामान समाजात ३२% प्रॉटेस्टंट, २४% रोमन कॅथॅलिक, १०% ज्यू, व उरलेले इतर धर्मपंथांचे अनुयायी आहेत. धार्मिक स्वातंत्र्य देणारे हे अमेरिकेतील आद्य राज्य होय.

राज्यात ६ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे शिक्षण आहे. १९८३ साली प्राथमिक शाळेतील विद्यार्थि संख्या ६,८३,१९४ होती. राज्यात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असलेली ३५ महाविद्यालये, दोन वर्षांचा अभ्यासक्रम असलेली २१ महाविद्यालये आहेत. मेरिलंड आणि टाउसन विद्यापीठांत अनुक्रमे ६२,१५८ व १५,१५७ विद्यार्थि संख्या होती. (१९८३) राज्यशासनाचे शिक्षणमंडळ शालेय शिक्षणाची व्यवस्था पाहते.

या मंडळावर राज्यपालाने नियुक्त केलेले ९ सदस्य (मुदत ५ वर्षे) असतात. हे मंडळ अधीक्षक नेमून शैक्षणिक धोरणांची त्याच्यामार्फत अंमलबजावणी करते. राज्यांत कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांसाठी पृथक्‌शिक्षणाची पद्धत सर्वाोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार (१९५४) बंद करण्यात आली आहे. राज्यात एकूण २६ विद्यापीठे व उच्च शिक्षणसंस्था आहेत. बॉल्टिमोर विद्यापीठ, कॅपिटॉल तंत्रविद्या संस्था, मेरिलंड विद्यापीठ, टाउसन राज्य विद्यापीठ,अमेरिकेची नौदल अकादमी इ. उल्लेखनीय आहेत.

बॉल्टिमोर येथील ईनक प्रॅट मुक्त ग्रंथालय (स्था. १८८२) देशातील एक समृद्ध ग्रंथालय आहे. बॉल्टिमोर येथील पील संग्रहालय (म्युनिसिपल संग्रहालय, स्था. १८१४) जुने व प्रसिद्ध आहे. येथेच एक कलावीथीही आहे. बॉल्टिमोरमधील संग्रहालयात आंरी मातीस ह्या प्रख्यात आधुनिक फ्रेंच चित्रकाराची चित्रे संग्रहीत केली आहेत. बॉल्टिमोरमधील मेरिलंड इतिहास मंडळाच्या संग्रहालयात अमेरिकन राष्ट्रगीताचे मूळ हस्तलिखित तसेच अनेक जुन्या वस्तूजतन केल्या आहेत.

राज्यातील सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत शासनाचा आरोग्य व मानसिक स्वास्थ्य विभाग विविध योजना राबवीत असतो. १९८४ साली राज्यात या विभागाने ८३ रुग्णालयांना (एकूण खाटांची संख्या २१,५६१) परवाने दिले आहेत. आरोग्य विभागाच्या अखत्यारी तच २३ परगण्यांतील आरोग्य विभाग असून बॉल्टिमोर शहरासाठी स्वतंत्र आरोग्य खाते आहे.

१९८३ सालातील आरोग्यसेवेच्या कार्यक्रमानुसार रुग्णांसाठी वैद्यकीय प्रयोगशाळा, शुश्रूषा , घरगुती शुश्रू षोपचार, औषधांचा पुरवठा इ. सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

राज्यातील सामाजिक सुरक्षेच्या अंतर्गत विविध योजना एका स्वतंत्र खात्यातर्फे राबविण्यात येतात. त्यांना स्थानिक समाजसेवा विभाग मदत करतात. निराधार मुले, वृद्ध,अपंग, बेकार इत्यादींना आर्थिक व इतर प्रकारची मदत देण्यात येते. राज्यातील कारागृहांतील कैद्यांची संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेने अधिक असल्याचे दिसते. १ लक्ष लोकांमागे २७७ लोक कारागृहांत असल्याचे दिसून आले. (१९८४) याचे कारण राज्यातील कायद्यानुसार कौटुंबिक संबंधविषयक अधिनियमांचा भंग तसेच गैरवर्तन यांसाठी कारावासाची शिक्षा दिली जाते, हे आहे. कारागृहात शिक्षणाची, धंदेशिक्षणाची सोय, पूनर्वसनार्थ कामे इ. सोयी आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

राज्याचा प्रदीर्घ सागरकिनारा नौ काविहार, मासेमारी, जलतरण इत्यादींसाठी उपयुक्त आहे. नदीकाठ, वनोपवने यांतून शिकारीच्याही सुविधा आढळतात. ऐतिहासिक वास्तू राज्यांत सर्वत्र आढळतात. बॉल्टिमोर येथील व्हर्जिन मेरीचे कॅथीड्रल (स्था. १८२१) देशातील एक आद्य कॅथीड्रल होय. बॉल्टिमोरमधील राष्ट्रीय जलजीवालयांत जलचरांचे ८,०० प्रकार आढळतात.

सेंट मेरीज सिटी हे आद्य वसाहतीचे गाव ऐतिहासिक दृष्ट्या कुतूहलजनक आहे. वसाहतकालीन व यादवी युद्धकालीन इतिहासप्रसिद्ध निदर्शक घटनांची स्थळे राज्यांत आहेत. उदा. शार्प्सबर्गजवळील एंटीटम राष्ट्रीय रणक्षेत्र. येथे सर्वांत भीषण यादवी युद्ध लढले गेले.

प. व्हर्जिनिया व मेरीलंड या दोहोंत विभागलेले हार्पर फेरी राष्ट्रीय ऐतिहासिक उद्यान उल्लेखनीय आहे. राज्यांतील ३३ शासकीय उद्याने व ३ वनविभाग हेही पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. यांशिवाय बॉल्टिमोर, कंबर्लंड , हेगर्सटाउन इ. आधुनिक औद्योगिक शहरे प्रसिद्ध आहे.

राज्यातील प्रिकनेस स्टेक्स म्हणून ओळखली जाणारी दर मे महिन्यातील घोड्यांची शर्यत प्रसिद्ध आहे. यांशिवाय राज्यात पतंग उडविण्याचा उत्सव बॉल्टिमोर शहरात एप्रिलमध्ये तर नित्यनैमित्तिक असे अनेक सण व उत्सव राज्यात सर्वत्र साजरे केले जातात.

 

संदर्भ : 1. Dozer, Donald M. Portrait of the Free State : A History of Maryland, Centreville, 1976.

2. Rollo, V. F. Maryland’s Constitution and Government, Lanham, 1982.

3. Rollo, V. F. The Black Experience in Maryland, Lanham, 1980.

4. Walsh, Richard; Fox, W. L. Ed., Maryland : A History 1632-1974, Baltimore, 1974.

जाधव, रा. ग.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate