অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यूगोस्लाव्हिया

यूगोस्लाव्हिया

(सोशलिस्ट फेडरल रिपब्लिक ऑफ यूगोस्लाव्हिया). आग्नेय यूरोपमधील एक देश. लोकसंख्या २,२९,६३,००० (१९८४ अंदाज). क्षेत्रफळ २,५५,८०४ चौ. किमी. कमाल लांबी ९७८ किमी. व कमाल रुंदी ५०१ किमी. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४०° ५१’ ते ४६° ५३’ उ. व १३° २३’ ते २३° २’ पू. यांदरम्यान. यूगोस्लाव्हियाच्या उत्तरेस ऑस्ट्रिया व हंगेरी, पूर्वेस रूमानिया व बल्गेरिया, दक्षिणेस ग्रीस व अल्बेनिया आणि पश्चिमेस एड्रिॲटिक समुद्र व इटली आहे. देशाला ७८९ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. देशाची १,०५० बेटे असून त्यांपैकी आठ बेटांचे प्रत्येकी क्षेत्रफळ १०० चौ. किमी. पेक्षा अधिक आहे. तसेच वायव्य भागातील ⇨ ट्रीएस्ट ग्रामीण विभाग (ब विभाग) यूगोस्लाव्हियाच्या ताब्यात आहे. बेलग्रेड (लोकसंख्या १४,७०,०७३ – १९८१) हे देशाच्या राजधानीचे शहर होय.

भूवर्णन

देशाचे तीन चतुर्थांश क्षेत्र पर्वतीय प्रदेशाचे व केवळ एक चतुर्थांश क्षेत्र मैदानी प्रदेशाने व्यापलेले आहे. प्राकृतिक दृष्ट्या देशाचे (१) किनारी प्रदेश,

(२) अंतर्गत उच्चभूमी व

(३) पॅनोनियन मैदानी प्रदेश असे मुख्य विभाग पाडता येतात.एड्रिॲटिक समुद्रालगतचा अरुंद किनापट्टीचा प्रदेश प्रामुख्याने खडकाळ आहे.किनारपट्टीबरोबरच किनाऱ्यालगतच्या सहाशेवर बेटांचाही यात समावेश होतो. अनेक ठिकाणी समुद्रकिनाऱ्यालगतच्या पर्वतांची उंची एकदम वाढलेली आढळते. त्यामुळे पर्वताचे उतार तीव्र स्वरूपाचे असून, तेथे प्रचंड कड्यांची निर्मिती झालेली आहे. समुद्रकिनारा दंतुर असल्यामुळे तेथे लहानलहान उपसागर, उपखाड्या व उत्तम नैसर्गिक बंदरांची निर्मिती झालेली दिसते. किनाऱ्यावरील सुंदर पुळणी आणि नयनरम्य सृष्टिसौंदर्य यांमुळे दरवर्षी प्रचंड संख्येने पर्यटक या भागात येतात. चुनखडकाचे प्रमाण अधिक असल्याने या भागाला कार्स्ट भूमिरूप प्राप्त झालेले आहे. भूपृष्ठ नापीक मृदेचे असून ठिकठिकाणी सुपीक जमिनीचे पट्टे आढळतात. येथे डाल्मेशियन प्रकारचा किनारा निर्माण झाला असून निमज्जित स्थलरूपाचे हे उत्तम उदाहरण आहे. समुद्रातील पर्वतरांगांचे माथे द्वीपकल्प, बेटे व द्वीपमालिकांच्या स्वरूपात, तर दऱ्या आखातांच्या आणि समुद्र खाड्यांच्या स्वरूपात दिसतात. किनाऱ्यावर लहानलहान उपसागर आहेत.

अंतर्गत उच्चभूमीच्या प्रदेशात वायव्य - आग्नेय दिशेत एकमेकींना तसेच समुद्रकिनाऱ्याला समांतर अशा अनेक पर्वतरांगा पसरलेल्या आढळतात. या रांगा मध्य, वायव्य, पूर्व व आग्नेय भागांत असून त्या किनाऱ्यापासूनच सुरू झालेल्या दिसतात. पर्वतांची उंची मात्र फार आढळत नाही. देशाच्या वायव्य कोपऱ्यात ज्यूल्यन आल्प्स पर्वत असून त्यातील ट्रीग्लाव्ह हे देशातील सर्वोच्च शिखर (उंची २,८६४ मी.) आहे. प्लोक्ना (उंची २,२२८ मी.), बोबोटोव्ह (२,५२२ मी.), डॅरॅव्हिका (२,६५६ मी.), रुजेन (२,२५१ मी.) व पोलिस्टर (२,६०० मी.) ही या भागातील इतर महत्त्वाची शिखरे आहेत. बर्फावरील शर्यतीच्या खेळांसाठी हा भाग विशेष प्रसिद्ध असून यूगोस्लाव्हियाचे हिवाळ्यातील क्रीडा मैदान म्हणून तो ओळखला जातो. उत्तरेस ऑस्ट्रिया - यूगोस्लाव्हिया सरहद्दींदरम्यान कारावांकेन पर्वतरांग आहे. ज्यूल्यन आल्प्सच्या दक्षिणेस एड्रिॲटिक समुद्राशी समांतर व देशातील सर्वांत महत्त्वाची दिनारिक आल्प्स पर्वतरांग आहे. किनारी प्रदेशाप्रमाणेच येथेही कार्स्ट भूमिरूप आढळत असून सुपीक भूमी थोड्याफार प्रमाणात आहे. येथील वैशिष्ट्यपूर्ण खडकरचनेमुळे त्यांत अनेक गुहांची निर्मिती झालेली आहे. त्यांपैकी ल्यूब् ल्यानाजवळील पोस्टोज्ना येथील गुहा तर जगप्रसिद्ध आहे. पूर्व व आग्नेय विभागांतील पर्वतरांगांचा विस्तार पुढे रुमानिया, बल्गेरिया व ग्रीसमध्ये झालेला आहे. दक्षिणेकडे या विभागाची रुंदी अधिक आहे. पूर्वी परकीय आक्रमणांपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने येथील पर्वतीय प्रदेशांचा खूपच उपयोग झालेला आहे. मात्र देशातील वाहतूक व दळणवळण विकासात हे पर्वतीय प्रदेश प्रमुख अडथळा बनलेले आहेत. अलीकडे मात्र या पर्वतीय प्रदेशांतून अनेक रस्ते व लोहमार्ग काढलेले आहेत. या प्रदेशाच्या पूर्व व दक्षिण भागांत विविध प्रकारची खडकरचना आढळून येते. बराचसा भाग कठीण खडकांचा, नद्यांनी खोदलेला व ओबडधोबड पठारांचा आहे. या उच्चभूमीच्या प्रदेशात वारंवार भूकंपाचे हादरे बसत असतात. १९६३ मध्ये झालेल्या भूकंपाचा तीव्र धक्का स्कॉप्ये शहराच्या बहुतांश भागाला बसला होता. १९७९ मध्ये बसलेल्या भूकंपाच्या तीव्र हादऱ्याने अंतर्गत उच्चभूमीच्या दक्षिण भागातील तसेच आग्नेय किनारी प्रदेशातील अनेक गावांची व नगरांची खूप हानी झाली.

पॅनोनियन मैदानी प्रदेश

हा प्रदेश यूगोस्लाव्हियाच्या उत्तर मध्य भागात आहे. पश्चिमेस स्लोव्हीनियाच्या पूर्व भागापासून ते पूर्वेकडे रूमानियाच्या सरहद्दीपर्यंत हा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. हा बहुतेक सपाट मैदानी प्रदेश असून अधूनमधून कमी उंचीच्या टेकड्या आहेत. देशातील सर्वांत सुपीक मृदा याच प्रदेशात असून, हा देशातील सर्वांत प्रमुख कृषी विभाग आहे. या मैदानी प्रदेशातून डॅन्यूब व तिच्या साव्हा, द्रावा व टिस या उपनद्या वाहतात. या मैदानाच्या दक्षिण भागात बेलग्रेड हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

हवामान व मूळ खडक यांनुसार वेगवेगळ्या प्रदेशातील मृदांमध्ये भिन्नता आढळत असली, तरी सामान्यपणे इतर यूरोपीय देशांमध्ये आढळणारे मृदा प्रकारच या देशामध्येही आढळतात. दिनारिक प्रदेशात चुनखडकापासून तयार झालेली हलकी मृदा असून, विस्तृत प्रदेशात उघडे खडक विखुरलेले आढळतात. काही चुनखडीच्या प्रदेशात, विशेषत: कार्स्ट (पोल्जा) भूमिरूप प्रदेशात चिकणमाती आढळत असून तिला टेरा रोसा म्हणूनही ओळखले जाते. ही बऱ्यापैकी सुपीक मृदा आहे. काही चुनखडीच्या भागात यापेक्षा सुपीक मृदा आहेत. पर्वतीय प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यांत गाळाच्या सुपीक मृदा आढळतात. जास्त उंचीच्या, विशेषतः जास्त पर्जन्याच्या ज्यूल्यन व कारावांकेन आल्प्स पर्वत प्रदेशात पॉडझॉल प्रकारची मृदा आढळते. सर्वाधिक सुपीक मृदा उत्तरेकडील मैदानी प्रदेशात व नद्यांच्या खोऱ्यांत आढळतात. नदीच्या आणि वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण झालेल्या सुपीक मृदा आहेत. येथील अनुकूल हवामानामुळे मूलतः सुपीक मृदांची उत्पादकता वाढण्यास मदत झालेली आहे.

बॉक्साइट, क्रोमाइट, कोळसा, अँटिमनी, तांबे, लोह, जस्त, शिसे, पारा, खनिज तेल व नैसर्गिक वायू ही देशात सापडणारी प्रमुख खनिजे आहेत.

नद्या

डॅन्यूब ही देशातून वाहणारी मुख्य नदी असून ती पॅनोनियन मैदानातून वाहते. हंगेरीतून यूगोस्लाव्हियात प्रवेश करून द्रावा, द्रीना, मोराव्हा, व्हेलिका, बॉस्ना, साव्हा व टिस या उपनद्यासंह ‘आयर्न गेट’ नावाच्या घळईतून डॅन्यूब रूमानियात प्रवेश करते. डॅन्यूब व तिच्या उपनद्यांवर अनेक प्रमुख शहरे वसली असून, त्या जलवाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष उपयोगी आहेत. डॅन्यूबचा यूगोस्लाव्हियातील प्रवाह ५८८ किमी. लांबीचा आहे. नेरेट्‌व्हा, निसाव्हा व वार्दर या देशातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. देशातून वाहणाऱ्या नद्यांपैकी ७०% नद्या काळ्या समुद्राला जाऊन मिळतात व बाकीच्या नद्या इजीअन व प्रामुख्याने एड्रिॲटिक समुद्राला जाऊन मिळतात. अनेक नद्या अरुंद घळ्यांतून वाहताना आढळतात.

अंतर्गत पर्वतीय प्रदेशात शेकडो लहान व सुंदर सरोवरे असून ती पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. लेक स्कूटारी किंवा श्कोडर (क्षेत्र ३९१ चौ. किमी.) हे सर्वांत मोठे सरोवर अल्बेनिया सरहद्दीदरम्यान आहे. याशिवाय अल्बेनिया सरहद्दीदरम्यान ओहरिद (३४८ चौ. किमी.), ग्रीस सरहद्दीवर डॉयरन आणि अल्बेनिया व ग्रीस सरहद्दीवरील प्रेस्पा सरोवर (क्षेत्र २७४ चौ. किमी.) ही संयुक्त हक्क असलेली यूगोस्लाव्हियाची प्रमुख सरोवरे आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate