অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रेन

रेन

रेन

फ्रान्समधील ईल-ए-व्हीलेन विभागाच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या २,००,३९० (१९८२). काँदेती हे याचे प्राचीन नाव असून हे शहर देशाच्या वायव्य भागात, पॅरिसच्या नैर्ऋत्येस ३११ किमी. अंतरावर व्हीलेन व ईल नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.

मध्ययुगात रेडों या केल्टिक जमातीतील लोकांनी आपली राजधानी येथे स्थापन केली व त्यावरूनच या शहराला हे नाव पडले असावे. रोमन काळात हे आमॅरिक प्रांतातील दळणवळणाचे प्रमुख केंद्र होते. इ. स. दहाव्या शतकात ही ब्रिटनीची राजधानी बनली. येथील पॅलेस दे जस्टिसमध्ये १५६१ ते १६७५ या काळात ब्रिटनीचे विधानभवन होते.

१७२० मध्ये आगीमुळे संपूर्ण नगर उद्धवस्त झाले होते. त्यानंतर त्याची योजनाबद्ध पुनर्रचना करण्यात आली. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात रेनला विशेष महत्व आले. दुसऱ्या महायुद्धकाळात झालेल्या बाँबहल्ल्यामुळे शहाराची खूप हानी झाली. आर्चबिशचेही हे मुख्य ठिकाण आहे.

पूर्वीपासून व्यापारदृष्ट्या महत्व असलेल्या रेनमध्ये दुसऱ्या महायुद्धकाळापासून विशेष औद्योगिक विकास झाला. रेल्वेसाहित्य, लाकडी सामान, स्वयंचलित यंत्रे, कृषियंत्रे, खते, रसायने,अन्नप्रक्रिया, छपाई, वस्त्रे, चामड्याच्या वस्तू, खनिज तेल उत्पादने, इलेक्ट्रॉनिकी साहित्य इ. निर्मितीचे प्रमुख उद्योगधंदे येथे आहेत.

रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्ग यांच्या दृष्टींनी रेन महत्त्वाचे आहे. शहरात रेन विद्यापीठ आहे. १४६० मध्ये हे विद्यापीठ नँट्‌स येथे स्थापन झालेले होते. ते १७३५ मध्ये रेनला हलविण्यात आले. सुप्रसिद्ध फ्रेंच जनरल व राजकारणपटू बूलान्झे (१८३७–९१) याचे हे जन्मस्थान आहे. येथील कॅथीड्रल (१८४४),टाउन हॉल (अठरावे शतक), वेगवेगळी उद्याने, सोळाव्या ते विसाव्या शतकांतील रंगचित्रकलेचा संग्रह असलेले वस्तुसंग्रहालय इ. उल्लेखनीय आहेत.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate