অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लक्सेंबर्ग

लक्सेंबर्ग

ड्यूकच्या आधिपत्याखालील पश्चिम यूरोपातील एक भूवेष्टित स्वतंत्र देश ४९ २६' ५२" ते ५० १०' ५८" उत्तर अक्षांश व ५ ४४' १०" ते ६ ३१' ५३" पू. रेखांश यांदरम्यान विस्तारलेल्या या देशाची जगातील लहान देशांत गणना होते. २,५८६ चौ. किमी. क्षेत्रफळ असलेला हा देश साधारणपणे त्रिकोणाकृती असून याची दक्षिणोत्तर लांबी ८२ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ५७ किमी. आहे.

एकूण लोकसंख्या ३,६९,५०० (१९८७) असून पूर्वेस जर्मनी, दक्षिणेस फ्रान्स, पश्चिमेस व उत्तरेस बेल्जियम यांनी हा देश वेढलेला आहे. देशाला ३५६ किमी. लांबीची सरहद्द लाभली असून पूर्व सरहद्द ऊर, स्यूर व मोझेल नद्यांनी बनली आहे. लर्क्सेबर्ग (लोक. ७६, ६४०-१९८७) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन

भूवैज्ञानिक दृष्ट्या लर्क्सेबर्ग म्हणजे दक्षिणेकडील फ्रान्समधील लॉरेन पठार व उत्तरेकडील बेल्जियममधील आर्देन पर्वतरांग यांचा विस्तारलेला भाग आहे.

भौगोलिक रचनेनुसार देशाचे उत्तरेकडील ओएस्लिंग (अपलँड) व दक्षिणेकडील बॉण पेस (गुड लँड) असे दोन भाग केले जातात. यांपैकी ओएस्लिंग हा भाग उंच टेकड्यांचा असून त्याने देशाचा सु. ३३% भाग व्यापला आहे. हा सस. पासून सु. ४०० ते ४९० मी. उंचीचा, दाट जंगलव्याप्त प्रदेश म्हणून ओळखला जातो. बर्गप्लाट्झ (५५९ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याच भागात उत्तर सीमेजवळ आहे.

दक्षिण भागाच्या तुलनेत या प्रदेशातील मृद्रा निकृष्ट प्रतीची असून धातुमळीचा खतासारखा वापर करन तिचा विकास करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. या भागातील दाट जंगले शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरउतारांवरील विस्तृत कुरणांमध्ये दूध व मांस उत्पादनाच्या दृष्टीने गुरुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या भागात सातू, ओट, राय, बटाटे इ. पिके घेतली जातात.

क्षिणेकडील बॉन पेस हा सुपीक प्रदेश असून सस. पासून सु. २७५ मी. उंचीचा आहे. पॅरिस द्रोणीच्या ईशान्येकडील या विस्तारित भागात वालुकाश्माच्या लहानलहान रांगा आहेत. हा भाग यूरोपातील महत्त्वाच्या लोहधातू साठ्यांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथील सुपीक जमिनीत प्रामुख्याने गहू, फळझाडे-विशेषतःद्राक्षे-यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. देशाचा बहुतेक भाग नद्यांनी विच्छेदित झालेला आहे.

येथील नद्या खूपच कमी लांबीच्या असून सर्वसामान्यपणे देशाच्या मध्यभागी एकत्र येऊन पूर्वेस वाहत जातात व पूर्व सरहद्दीवरील मोझेल नदीस मिळतात. स्यूर ही देशातील प्रमुख नदी पश्चिमेस बेल्जियममध्ये उगम पावून देशातून पश्चिम-पूर्व दिशेने वहाते. देशातील तिची लांबी ८० किमी. आहे.

पूर्व सरहद्दीवर ती आग्नेयीस वळते व व्हासरबिलिख शहराजवळ मोझेल नदीस मिळते. या शहरापासून पुढे ती नौवहनास योग्य आहे. आल्झेट ही ६४ किमी. लांबीची तिची प्रमुख उपनदी आल्झेट शहराच्या नैर्ऋत्येस सु. ४ किमी. वर उगम पावून प्रथम पूर्वेस व नंतर उत्तरेस वहात जाऊन एटलब्रुक शहराजवळ स्थूर नदीला मिळते.

लक्सेंबर्ग हे राजधानीचे ठिकाण याच नदीच्या डाव्या काठावर वसलेले आहे. ऊर ही नदी देशाच्या ईशान्य सरहद्दीवरून उत्तर-दक्षिण दिशेने वहात येऊन दीकिर्ख शहराच्या पूर्वेस सु. ९ किमी. वर स्थूर नदीस मिळते. या प्रमुख नद्यांशिवाय उत्तरेकडून येणारी क्लेर्फ नदी व तिला पश्चिमेकडून येऊन मिळणारी व्हिल्टस नदी तसेच ईश, आटेअर, व्हार्क या पश्चिम भागातून वहात येऊन आल्झेट नदीला मिळणाऱ्या नद्यांनी देशाच्या बऱ्याच भागाचे जलवाहन केले आहे.

देशाच्या आग्नेय सरहद्दीवरून दक्षिणोत्तर वाहणारी मोझेल नदी व्हासरबिलिख शहराजवळ स्यूर नदीस मिळते व पुढे पूर्वेस जर्मनीत वहात जाते. झीर ही तिची या देशातील दक्षिणेकडील प्रमुख उपनदी आहे. मोझेल व स्यूर नद्यांची खोरी प्रामुख्याने कुरणे व द्राक्षमळ्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

हवामान

लक्सेंबर्गचे हवामान सौम्य व समशीतोष्ण असून वार्षिक सरासरी तापमान ८ से. असते. उन्हाळा सौम्य असतो. लक्सेंबर्ग शहराचे जानेवारीतील सरासरी तापमान ३ से., तर जुलै महिन्यातील तापमान १९ से. पर्यंत जाते.

उत्तरेकडील ओएस्लिंग भागात मात्र दोन्ही वेळी तापमान यापेक्षा कमी असते. आर्देनच्या उंच भागात हिवाळ्यात बर्फ पडते. या काळात दक्षिण भागातील तापमान ० से. अथवा क्वचित प्रसंगी त्यापेक्षा खाली जाते.

आर्देनच्या डोंगररांगांमुळे उत्तरेकडून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यापासून देशाचे संरक्षण होते. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५१ सेंमी. असून उंच डोंगराळ प्रदेशात पाऊन जास्त काळ पडतो; परंतु जास्तीत जास्त (१०० सेंमी.) व कमीत कमी पावसाची नोंद देशाच्या अनुक्रमे नैर्ऋत्य व आग्नेय भागांत (गुड लँड प्रदेशात) झाल्याचे दिसून येते.

वनस्पती व प्राणी

देशाचा सु. ३३% भाग   (विशेषतःउत्तर भाग) जंगलांनी व्यापलेला असून त्यांत मुख्यतःपानझडी वृक्षांचे प्रमाण जास्त आहे. उंच भागात सूचिपर्णी व कमी उंचीच्या भागात खुरट्या वनस्पती आढळतात. पाइन, चेस्टनट, स्प्रूस; ओक, लिंडेन, एल्म, बीच इ. वनस्पतींसाठी येथील जंगले प्रसिद्ध असून नदीखोऱ्यांतून अनेक प्रकारच्या फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे.

कमी उंचीच्या पठारी भागांत ब्लूबेरी, जनिस्टा, फर्न यांसारख्या छोट्या वनस्पती व  विविध प्रकारची फुलझाडे आढळतात. जंगलात प्रामुख्याने रो हरिण, रानडुक्कर यांसारखे प्राणी असून देशाच्या सर्व भागांत विविध पक्षी दिसून येतात. शिकारीसाठी येथील जंगले प्रसिद्ध आहेत. नद्या व इतर जलाशयांतून प्रामुख्याने पर्च, कार्प, ब्रीम, ट्राउट, पाइक, ईल इ. जलाचर मोठ्या प्रमाणात आहेत.

इतिहास व  राज्यव्यवस्था

लक्सेंबर्गचे भौगोलिक स्थान हे येथील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचे प्रमुख कारण आहे. वेगवेगळ्या काळात याच्या चोहोबाजूंनी झालेल्या साम्राज्य विस्ताराच्या चढाओढींची झळ या प्रदेशाला मोठ्या प्रमाणात सोसावी लागली. सांप्रत लक्सेंबर्ग ज्या भागात आहे, तो प्रदेश इ. स. पू. पहिल्या शतकाच्या मध्यावधीत रोमनांच्या ताब्यात होता.

इ. स. पाचव्या शतकापर्यंत या प्रदेशावर त्यांची सत्ता होती. पाचव्या शतकात फ्रँक लोकांनी तो जिंकला व पुढे शार्लमेनच्या फ्रेंच साम्राज्याचा तो एक भाग बनला. ८४३ मध्ये हा भाग पहिल्या लोथरच्या राज्यात (काही वेळा ‘मिड्ल किंग्ड्म’या नावाने ओळखले जात होते) व त्यानंतर लॉथरिंजच्या ईस्ट फ्रँकिश राज्यात समाविष्ट करण्यात आला. पुढे या भागातील आल्झेट नदीवर (सांप्रतच्या राजधानीच्या जागी) रोमनांनी बांधलेला किल्ला, आर्देन प्रदेशाचा काउंट सीगफ्रीड (शार्लमेनचा वंशज) याने विकत घेतला (१२ एप्रिल ९६३). त्या वेळी हा किल्ला लुसिलिनबर्हुक-लूट्झेलबर्ग (लहान किल्ला)-या नावाने ओळखला जात होता.

काही वर्षानी त्याचे लक्सेंबर्ग हे नाव रूढ झाले. (लक्सेंबर्गचा इतिहास रुढार्थाने या शतकापासून सुरू होतो). अकराव्या शतकात ‘कोनराड’या सीगफ्रीडच्या वारसाने‘काउंट ऑ लक्सेंबर्ग’ असे नाव प्रथमच धारण केले.

सीगफ्रीडच्या वंशावळीत पुढे पुरुष वारसदार न राहिल्याने ११३६ नंतर जर्मन सम्राटाने हा प्रदेश चौथ्या हेन्रीच्या (काही वेळा ‘दुसरा हेंरी’ म्हणून ओळखला जात असे) ताब्यात दिला. थोड्याच दिवसांत त्याची ‘नामुरचा काउंट’ म्हणून नियुक्ती झाली. नामुरच्या प्रशासनाने या प्रदेशावर एकामागून एक अशा चांगल्या राज्यकर्त्याची नियुक्ती केली. त्यांनी प्रथमतःयाच्या आजूबाजूंच्या राज्यांशी विवाहसंबंध जोडून राज्याचा विस्तार केला.

एर्मेसिंदे या काउंटिसच्या करकीर्दीत (११९६-१२४७) या राज्याचा विस्तार तिप्पट वाढला होता. लक्सेंबर्गचा काउंट सातवा हेंरी, पुढे रोमन सम्राट झाल्याने (१३०८) या घराण्याचे महत्त्व खूपच वाढले. त्याचा मुलगा काउंट जॉन (कार. १३०९-४६) हा बोहीमियाचा राजा म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याने राज्याचा विस्तार केला; परंतु उत्तर फ्रान्समधील क्रेसी येथे झालेल्या ‘शतवार्षिक युद्धा’त तो मारला गेला (१३४६). राष्ट्रनेता म्हणून तो पुढे प्रसिद्ध झाला. त्याचा मुलगा चार्लस (१३१६-७८) याच्या कारकीर्दीत (हा रोमन सम्राट चौथा चार्ल्स या नावाने प्रसिद्ध झाला) लक्सेंबर्गला ‘ड्यूक राज्या’चा दर्जा मिळाला, परंतु राज्याची आर्थिक स्थिती मात्र खालावली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate