অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वॉशिंग्टन, डी. सी.

वॉशिंग्टन, डी. सी.

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची राजधानीएक स्वतंत्र संघीय जिल्हा आणि देशातील एक निसर्गसुंदर योजनाबद्ध ऐतिहासिक शहर. महानगराची लोकसंख्या ३९,२३,५७४ असून शहराची ६,०६,९०० होती (१९९०). ते अमेरिकेच्या आग्नेय भागात मेरिलंड आणि व्हर्जिनिया या राज्यांदरम्यान पोटोमॅक नदी व रॉक क्रीक (खाडी) यांत फिलाडेल्फिया आणि न्यूयॉर्क ह्या शहरांच्या नैर्ऋत्येस अनुक्रमे २२० व ३६५ किमी.वर वसले आहे. त्याचे महानगरीय क्षेत्र व शहर असे दोन स्पष्ट भाग आहेत. महानगराचे क्षेत्रफळ ७,५२९ चौ.किमी. असून शहराचे १७४ चौ.किमी. आहे.

महानगरीय क्षेत्रात वॉशिंग्टन शहरासह मेरिलंड राज्यातील चार्ल्स, मंगमरी आणि प्रिन्स जॉर्ज या काउंटी व व्हर्जिनिया राज्यातील आर्लिंग्टन, फेअरफॅक्स, लाउडन आणि प्रिन्स विल्यम या काउंटी व अ‍ॅलेक्झांड्रिया, फेअरफॅक्स आणि फॉल्स चर्च इ. शहरे यांचा अंतर्भाव होतो. यूरोपियनांच्या वसाहतीपूर्वी या भूप्रदेशात पस्कॅड्‌वे इंडियन राहत असत. गोऱ्यांनी सतराव्या शतकात तेथे वसाहत केली आणि जंगल तोडून शेती व्यवसायास प्रारंभ केला. त्यांनी १७४९ मध्ये ॲलेक्झांड्रिया हे पहिले शहर वसविले. या शहरासह त्या भागास व्हर्जिनिया वसाहत हे नाव होते.

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर देशाच्या स्थायी राजधानीच्या कल्पनेस १७८३ मध्ये चालना मिळाली आणि १७९० मध्ये अलेक्झांडर हॅमिल्टन याने राजधानीच्या संदर्भात उत्तर-दक्षिण वादात समझोता करून राजधानी कोणत्याही राज्यात न ठेवता संघीय मालकीच्या जागेत स्वतंत्र स्थळी स्थापण्याचे ठरविले. परिणामतः काँग्रेसने त्यास संमती दिली. ती वसविण्यापूर्वी तिचा आराखडा तयार करण्यात आला आणि राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनने शहराच्या रचनेसाठी १७९१ मध्ये या जागेची निवड केली. कर्नल प्येर चार्लस लान्फान या तरुण फ्रेंच अभियंत्याने राजधानीत पुढील विस्ताराचा अंदाज घेऊन नगराचा आराखडा तयार केला.

जॉर्ज वॉशिंग्टनच्या सन्मानार्थ त्यास वॉशिंग्टन आणि क्रिस्तोफर कोलंबसच्या स्मरणार्थ डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया हे नाव देण्यात आले. प्रशासकीय सोसीसाठी व इतर शासकीय घटक राज्यांहून त्याचे भिन्न स्वरूप ठेवण्यासाठी त्याला संघीय जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे त्याचे पूर्ण नाव वॉशिंग्टन डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया असे झाले. नंतर फिलाडेल्फिया येथील राजधानी १८०० मध्ये येथे हलविण्यात आली.

यावर काँग्रेस (संसद) व संघीय शासनाचे आधिपत्य असून महापौर आणि नगर परिषद हे प्रशासनव्यवस्थेस हातभार लावतात. त्यांच्या १३ सभासदांची दर चार वर्षांनी निवडणूक होते. सर्व अंतिम निर्णयांत संघीय शासनाचा अधिकार अंतिम असून नगर परिषद शहराच्या संदर्भात नियम तसेच अर्थसंकल्प सादर करते आणि त्यांची लोकप्रशासनाद्वारे कार्यवाही करते; परंतु काँग्रेस, व्यवस्थापकीय कार्यालय आणि राष्ट्राध्यक्षांचे अर्थसंकल्पीय कार्यालय नगर परिषदेचा अर्थसंकल्प संमत करतात.

येथील हवामान उन्हाळ्यात दमट व उष्ण असून सरासरी तापमान २६° से. व हिवाळ्यात थंड असून तापमान ३° से. असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १२७ सेंमी. असते. व वॉशिंग्टन शहरात ७०% कृष्णवर्णीय लोक असून उपनगरांतून ८०% गौरवर्णीय लोक राहतात. इतर शहरांप्रमाणे वॉशिंग्टनमध्ये उद्योगधंद्यांचे मोठे कारखाने आढळत नाहीत, कारण शासकीय कामकाज हाच या नगरीचा प्रमुख उद्योग आहे.

वॉशिंग्टनमध्ये १९८० मध्ये शासकीय कार्यालयांतून ३,६२,००० कर्मचारी होते. वॉशिंग्टनमधील बहुतेक सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, प्रमुख स्मारके, वस्तुसंग्रहालये शहराच्या पश्चिम-मध्य भागात केंद्रित झालेली आहेत. येथील रस्त्यांची रुंदी २४ ते ३६ मी. असून शहरातील अर्ध्याहून अधिक भाग रस्त्यांचे जाळे आणि बागबगीचे यांनी व्यापला आहे. नगरातील प्रत्येक चौकात एक तरी वर्तुळाकार बाग आणि थोर व्यक्तीचा पुतळा नजरेस पडतो. शहरात असे सु. ३०० पुतळे आहेत.

वॉशिंग्टनच्या मध्यभागी सु. २६.८ मी. उंचीच्या टेकडीवर कॅपिटॉल नावाची ९१ मी. उंचीची कॉरिंथियन स्तंभांनी युक्त संगमरवरी दगडांत बांधलेली ५४० खोल्यांची भव्य इमारत आहे. तिच्या घुमटाकार शिखरावर सहा मी. उंचीचा स्वातंत्र्यदेवतेचा भव्य पुतळा आहे. कॅपिटॉलची इमारत मध्यभागी धरून शहराचे आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य, ईशान्य असे चार प्रमुख विभाग पाडलेले आहेत आणि दक्षिणोत्तर जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांना पूर्व-पश्चिम आडवे रस्ते छेद देतात. यात संसद (काँग्रेस) भवन असून कार्यालये, संसदेचे ग्रंथालय (याचा जगात दुसरा क्रमांक लागतो), पार्थनॉन शैलीत बांधलेले ग्रीक मंदिरसदृश सर्वोच्च न्यायालय, ‘फोल्जर शेक्सपिअर’ ग्रंथालय, आफ्रिकी कलेचे संग्रहालय या अन्य इमारती आहेत. या टेकडीच्या वायव्येस वनस्पतिशास्त्रातील अनेक (१०,०००) वृक्षप्रकार असलेली युनायटेड स्टेट्‌स बोटॅनिक गार्डन आहे.

कॅपिटॉल टेकडीच्या पश्चिमेकडे नॅशनल मॉल नावाचे चिंचोळे, दुतर्फा वृक्षांनी व्यापलेले पटांगण लागते. त्याच्या बाजूने अनेक इमारती बांधलेल्या आहेत. त्याच्या आणखी पश्चिमेला जॉर्ज वॉशिंग्टन आणि अब्राहम लिंकन यांची स्मारके आहेत. जॉर्ज वॉशिंग्टनचे स्मारक म्हणजे वॉशिंग्टनमधील अतिउंच (१६९.२९ मी.) संगमरवरी शंकुस्तंभऑबेलिस्क. त्यात फिरता जिना असून वरच्या बाजूने शहराचा रमणीय देखावा दिसतो, तर लिंकन स्मारक मंदिरासारखे असून त्यात संगमरवरी दगडांत लिंकनचा आसनस्थ पुतळा आहे. या दोन स्मारकांतून स्वच्छ पाण्याचा प्रवाह वाहतो. त्यात यांची प्रतिबिंबे दिसतात. वॉशिंग्टन स्मारकाच्या दक्षिणेस जेफर्सनचे स्मारक आहे. या भागात शेकडो रंगीबेरंगी जपानी चेरीची झाडे आहेत. मॉलच्या समूहातील स्मिथ्सोनियन संग्रहालयात मूळ स्मिथ्सोनियन संस्थेची इमारत आहे.

ही इमारत म्हणजे मध्ययुगीन स्थापत्यशैलीतील एक भुईकोट किल्लाच असून या इमारतीतील राष्ट्रीय हवाई व अवकाश संग्रहालय, अमेरिकन राष्ट्रीय इतिहास-संग्रहालय, निसर्गेतिहासाचे राष्ट्रीय संग्रहालय, कला आणि औद्योगिक वस्तूंचे संग्रहालय, राष्ट्रीय कलावीथी इ. प्रसिद्ध आहेत. यांपैकी अवकाश संग्रहालयात विमानाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंतच्या विमानशास्त्रातील विकासाची उपक्रमशीलता प्रदर्शित केली आहे. त्यात ऑर्व्हिल राइट याने वापरलेले पहिले विमान (१९०२) असून अंतराळवीरांनी चंद्रावर जाण्यासाठी वापरलेले यानही प्रदर्शित केले आहे. तीच गोष्ट कला व औद्योगि संग्रहालयात दृष्टोत्पत्तीस येते. येथे लष्करातील शस्त्रास्त्रांपासून आजपर्यंतच्या औद्योगिक क्षेत्रांतील, विशषतः रेल्वे, मोटारगाड्या यांच्या उत्क्रांत टप्प्यातील, वस्तूंचे दर्शन होते.

मॉलच्या उत्तरेकडील भागात अनेक शासकीय कार्यालयांच्या इमारती असून पेनसिल्व्हेनिया अ‍ॅव्हेन्यूजवळ अमेरिकन रेडक्रॉस, द नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सीस, जागतिक बँक-मुख्यालय यांच्या इमारती आहेत आणि १६०० पेनसिल्व्हेनिया ॲव्हेन्यूमध्ये ‘व्हाइट हाउस’ या नावाने जगप्रसिद्ध असलेले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व कार्यालय आहे. त्याची बांधणी धवल वालुकाश्मात केलेली असून त्यात १३२ प्रशस्त खोल्या आहेत. या खोल्यांतून सुरेख फर्निचर, रंगीत चित्रे लावलेली आहेत. बागबगीचा आणि व्हाइट हाउस यांनी ७.३ हे. क्षेत्र व्यापले आहे. मॉलच्या दक्षिणेकडील भागात कृषी, ऊर्जा, आरोग्य, गृहनिर्माण, नागरी सुविधा, वाहतूक वगैरे मंत्रालयाशी निगडित कार्यालये आहेत. तेथेच अमेरिकेची टाकसाळ आहे. याशिवाय जॉन एफ्. केनेडी प्रयोगीय कला केंद्र, वॉटरगेट या वास्तू प्रसिद्ध आहेत.

रिचर्ड निक्सन या राष्ट्राध्यक्षाची फेरनिवड व्हावी म्हणून निक्सन प्रशासनातील अनेक उच्चस्तरीय व्यक्तींनी व अधिकाऱ्यांनी अवैध मार्गांचा अवलंब करून लोकशाहीवरच प्रहार करण्याचा प्रयत्न केला (१९७२). परिणामतः हा कट उघडकीस येऊन ही अवैध कृती करणाऱ्यांना शिक्षा झाल्या व राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी राजीनामा दिला. या इमारतीतील या घटनांमुळे यास ‘वॉटरगेट प्रकरण’ असे म्हणतात. वॉटरगेट म्हणजे आलिशान खोल्यांचा समूह. शहरात राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय-उद्यान पेंटॅगॉन वास्तू (संरक्षक दलाचे मुख्यालय), आर्लिंग्टन राष्ट्रीय दफनभूमी, नाविक दलातील योद्ध्यांची स्मारकभूमी, माउंट व्हेर्नॉन (जॉर्ज वॉशिंग्टन याचे मूळ घर) आणि अन्य अनेक वस्तुसंग्रहालाये आहेत.

वॉशिंग्टनच्या नियोजनबद्ध वास्तुबांधणीत तत्कालीन वास्तुविशारदांनी गगनचुंबी इमारती बांधण्याचे कटाक्षाने टाळले आहे आणि कायद्यानेही इमारतींच्या उंचीवर मर्यादा घातली आहे. त्यांनी प्रमुख व भव्य वास्तूंच्या बाबतीत ग्रेको-रोमन अभिजात वास्तुशैलीचे अनुकरण केले असून कॅपिटॉल, सर्वोच्च न्यायालय, लिंकन स्मारक इ. वास्तूंत ते स्पष्टपणे जाणवते, तर कॅथीड्रल, एपिस्कोपल चर्च अशा काही वास्तूंतून मध्ययुगीन यूरोपीय गॉथिक शैलीचे दर्शन होते. याव्यतिरिक्त मध्ययुगीन बायझंटिन व रोमनेस्क शैलीचे घटक काही वास्तूंत आढळतात आणि मशिदीच्या बांधकामात इस्लामी वास्तुशैलीही स्पष्ट जाणवते; तथापि वसाहतकालीन वास्तुशैलीचे नमुने फार थोडे आहेत.

वॉशिंग्टनमध्ये एकूण १२५ पब्लिक स्कूल्स (विद्यानिकेतने) असून जिल्हा शिक्षण मंडळ त्यांची व्यवस्था पाहते. याशिवाय अमेरिकन युनिव्हर्सिटी, कॅथलिक युनिव्हर्सिटी, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया युनिव्हर्सिटी, जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी, साउथ ईस्टर्न युनिव्हर्सिटी, जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी अशी सात विद्यापीठे असून त्यांपैकी हार्व्हर्ड विद्यापीठात गोरेतरांचे वर्चस्व आहे आणि कॅथलिक विद्यापीठ हे अमेरिकेतील रोमन कॅथलिक चर्चचे रार्ष्टीय विद्यापीठ आहे. येथील सार्वजिनक ग्रंथालयात वीस लाख ग्रंथ असून जिल्ह्यामध्ये त्याचा वीस शाखा आहेत. याशिवाय ‘मार्टिन ल्यूथर किंग मीमॉरिअल लायब्ररी’ हे मोठे व मान्यवर ग्रंथालय आहे. वनभोजन, खेळ यांकरिता १५० पटांगणे-उद्याने असून फुटबॉल, बेसबॉल इ. लोकप्रिय खेळ आहेत. वॉशिंग्टनमध्ये सहा दूरचित्रवाणी केंद्रे आणि वीस रेडिओ केंद्रे असून येथून राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल जिऑग्रफिक मॅगॅझीन हे मासिक आणि यू. एस्. न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट हे साप्ताहिक तसेच वॉशिंग्टन पोस्ट हे दैनिक प्रसिद्ध होते.

देशातील सर्व शहरांशी ते रस्त्यांनी, लोहमार्गांनी व हवाईमार्गांनी जोडलेले असून आंतरराष्ट्रीय विमानतळाव्यतिरिक्त हवाई व्यापारी प्रवासासाठी तीन अन्य विमानतळ येथे आहेत.


देशपांडे, सु. र.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate