অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांतो दोमिंगो

सांतो दोमिंगो

वेस्ट इंडीजमधील डोमिनिकन प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. युरोपियनांचे पश्चिम गोलार्धातील हे सर्वांत जुने वसाहतीचे शहर आहे. लोकसंख्या १४,८४,७८९ (२०१०). हिस्पॅनीओला बेटाची पूर्वेकडील सु. दोन तृतीयांश भूमी डोमिनिकन प्रजासत्ताकाने व्यापली असून या बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर ओसामा नदीच्या मुखावर हे शहर वसले आहे. क्रिस्तोफर कोलंबसचा भाऊ बार्थोलोम्यू याने हिस्पॅनीओला बेटाचा शोध लावला व ४ ऑगस्ट १४९६ रोजी सांतो दोमिंगो येथे वसाहत स्थापन करून ती राजधानी केली. नव्या जगातील ही पहिली स्पॅनिश वसाहत होय. हिस्पॅनीओला बेट व सांप्रत डोमिनिकन प्रजासत्ताक यांची मूळ नावे सांतो दोमिंगो अशीच होती. रोमन कॅथलिक आर्च बिशपचे पश्चिम गोलार्धातील प्राचीन पीठ येथे होते. मूळ सांतो दोमिंगो शहर ओसामा नदीच्या डाव्या तीरावर होते. राणी इझाबेलाच्या सन्मानार्थ त्याचे नाव नूएव्ह इझाबेला असे ठेवले होते. स्पॅनिशांना येथे सोन्याच्या खाणी सापडल्या होत्या. तुफानी हरिकेन वादळामुळे येथील इमारती जमीनदोस्त झाल्या होत्या, त्यामुळे १५०२ मध्ये ओसामा नदीच्या उजव्या तीरावर सांप्रतचे शहर वसविण्यात आले. त्यावेळी काही काळ ही वसाहत सांत्यागो दे गुझमान या नावाने ओळखली जात होती. सांप्रत शहराचा विस्तार नदीच्या उजव्या काठावर पश्चिमेस कॅरिबियन किनाऱ्याने होत गेला आहे.

तर वेस्ट इंडीज बेटे व लगतच्या मुख्य भूमीचे समन्वेषण करून तो प्रदेश आपल्या ताब्यात घेण्यासाठी काढावयाच्या सफरींना निघण्याचे स्पॅनिश समन्वेषकांचे सांता दोमिंगो हे प्रमुख केंद्र होते. स्पॅनिशांची सत्ता असताना या नगराची भरभराट झाली; परंतु त्यानंतर मेक्सिको व पेरुने ताब्यात घेतल्यावर त्याचे महत्त्व कमी झाले. इ. स. १५०९ मध्ये क्रिस्तोफरचा मुलगा द्येगो कोलंबस हा या वसाहतीचा गव्हर्नर झाला. त्याच्या गव्हर्नरपदाच्या कारकीर्दीनंतर इंग्रज व फ्रेंच चाच्यांनी यावर वारंवार हल्ले केले. सन १५५० नंतर येथील सोन्याच्या खाणीही संपुष्टात आल्या होत्या. इंग्लिश चाचा ⇨ सर फ्रान्सिस ड्रेक(सु. १५४०–९६) याने १५८६ मध्ये या नगराची लूट केली. १६५५ मध्ये ब्रिटिश फौजांनी या ठिकाणाचा ताबा घेण्यासाठी केलेला प्रयत्न येथील मूळ रहिवाशांनी हाणून पाडला. त्यानंतर १७९५–१८०९ याकाळात ते फ्रेंचांच्या ताब्यात होते. तद्नंतरच्या स्पॅनिश सत्तेनंतर सांतो दोमिंगोचा ताबा हैतीच्या हल्लेखोरांनी घेतला. सन १८२२ ते १८४४ या कालावधीत हे हैतीच्या आधिपत्याखाली होते. इ. स. १८४४ मध्ये डोमिनिकन प्रजासत्ताक स्वतंत्र होऊन सांतो दोमिंगो त्याची राजधानी झाली. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत हे यादवी युद्घ व राजकीय अस्थैर्य यांत अडकले. जनरल राफाएल लेओनीथास त्रूहीयो मोलीना (कार. १९३०–६१) याच्या हुकूमशाही राजवटीत ३ सप्टेंबर १९३० रोजी वादळाने शहर उद्ध्वस्त झाले. त्रूहीयोने त्याची पुनर्बांधणी केली तसेच राफाएल त्रूहीयो या हुकूम-शहाच्या सन्मानार्थ या शहराचे नामांतर स्यूदाद त्रूहीयो असे केले (१९३६). त्याच्या खुनानंतर शहराचे नाव पूर्ववत सांतो दोमिंगो असे करण्यात आले (१९६१).

सांतो दोमिंगो हे देशातील प्रमुख औद्योगिक, व्यापारी, वित्तीय व सांस्कृतिक केंद्र आहे. जलविद्युत्‌निर्मिती केंद्राद्वारे होऊ लागलेल्या पुरेशा वीजपुरवठ्यामुळे येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. शहरात साखर, कापड, मद्यार्क, प्लॅस्टिक, सिमेंट, चामड्याच्या वस्तू, खनिज तेल, रसायने, प्रशीतके, धातुकर्म, लाकूडकाम, अन्नप्रक्रिया इत्यादींचे कारखाने आहेत. सांतो दोमिंगो हे देशाचे प्रमुख सागरी बंदर आहे. ओसामा नदीच्या मुखाशी असलेल्या या बंदरात मोठ्या जहाजांची वाहतूक होण्याच्या दृष्टीने १९३०च्या दशकात पुष्कळ सुधारणा करण्यात आल्या. बंदराला फारशी नैसर्गिक अनुकूलता लाभलेली नसल्यामुळे लाटांचा जोर कमी करण्यासाठी काँक्रीटचा भक्कम बांध घातला आहे. देशाचा निम्म्याहून अधिक परराष्ट्र व्यापार या बंदरातून होतो. येथून साखर, कॉफी, तंबाखू, लाकूड, काकाओ, चामडी इ. वस्तूंची निर्यात केली जाते. देशातील प्रमुख ठिकाणांशी हे रस्त्याने जोडले असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

सांतो दोमिंगो स्वायत्त विद्यापीठ (स्था.१५३८) हे पश्चिम गोलार्धातील सर्वांत जुने विद्यापीठ येथे आहे. तिसरा पोप पॉल याने हे स्थापन केले असून त्याचे सुरुवातीचे नाव सेंट टॉमस अक्वायनस होते. याशिवाय द पेद्रो हाइन्रिक युरेना नॅशनल युनिव्हर्सिटी (१९६६) आणि टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी या प्रमुख संस्था येथे आहेत. सांतो दोमिंगोत अनेक वसाहतकालीन वास्तू आहेत. त्यांपैकी कॅथीड्रल (१५१४) व द्येगो कोलंबसचा अल्कझार राजवाडा विशेष उल्लेखनीय आहेत. कॅथीड्रल स्पॅनिश वास्तुशैलीतील असून त्यात क्रिस्तोफर कोलंबसच्या संदर्भातील वस्तूंचा संग्रह आहे. येथे एक जुना जीर्णोद्घारित किल्ला आहे. नॅशनल थिएटर स्कूल ऑफ आर्ट, द म्यूझिक कॉन्झर्व्हेटरी आणि द नॅशनल सिंफनी ऑर्केस्ट्रा या संस्था प्रयोगीय कलांसाठी प्रसिद्घ आहेत. राष्ट्रीय ग्रंथालय आणि द म्यूझियम ऑफ डोमिनिकन मॅन ही अनुक्रमे दुर्मिळ ग्रंथ व कोलंबियन पूर्वकाळातील मूल्यवान कलावस्तूंसाठी प्रसिद्घ आहेत. किनाऱ्यावरील सुंदर पुळणी व हॉटेलांची उपलब्धता यांमुळे पर्यटनकेंद्र म्हणूनही हे प्रसिद्घ आहे.

देशपांडे, सु. र.; चौधरी, वसंत

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate