অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साउथ कॅरोलायना

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अटलांटिक किनाऱ्यावरील एक घटक घटक राज्य.सामान्यपणे त्रिकोणी आकार असलेले हे राज्य दक्षिण अटलांटिक प्रदेशात वसले आहे. राज्याचा पूर्व-पश्चिम विस्तार ४५९ किमी. व दक्षिणोत्तर विस्तार ३६२ किमी. असून एकूण क्षेत्रफळ ८०,५९३ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ४६,७९,२३० (२०११ अंदाज). याच्या उत्तरेस नॉर्थ कॅरोलायना, पश्चिमेस व नैर्ऋत्येस जॉर्जिया, तर पूर्वेस व आग्नेयीस अटलांटिक महासागर आहे. राज्याला सु. ३५० किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. कोलंबिया (लोकसंख्या १,१७,०८८– २००५ अंदाज) हे राज्यातील राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन

कमी उंचीच्या पर्वतश्रेण्या, अरण्ये, समृद्घ शेत-जमीन, किनारी बेटे, दलदली, पुळणी, वाळुयुक्त जमीन, नद्या, मानवनिर्मित सरोवरे,फळबागा इ. विविध भूदृश्ये राज्यात पहावयास मिळतात. प्राकृतिक दृष्ट्या साउथ कॅरोलायनाचे ब्लू रिज, पीडमाँट व किनारी मैदान असे तीन विभाग पडतात. यातील ब्लू रिज व पीडमाँट हे उच्चभूमी प्रदेश तर किनारी मैदान हा सखल प्रदेश आहे. राज्याच्या वायव्य कोपऱ्यात ब्लूरिज ही पर्वतीय श्रेणी असून तिने १,२९० चौ. किमी. क्षेत्र व्यापलेआहे. हा वनाच्छादित प्रदेश असून याची उंची ३६५ ते १,०६५ मी.आहे. ससाफ्रास मौंटन (उंची १,०८५ मी.) हेराज्यातील सर्वोच्च शिखर आहे. ब्लू रिजच्या आग्नेयीस सु. १६० किमी. रुंदीचा पीडमाँट प्रदेश आहे. पीडमाँट प्रदेशाचा उतार ब्लू रिज प्रदेशाकडून मध्यवर्ती भागात असलेल्या फॉल लाइन या द्रुतवाहयुक्त नद्यांच्या खोऱ्याकडे आहे. पीडमाँटच्या आग्नेयीस ८ ते ४८ किमी. रुंदीचा ‘सँड हिल्स’ हा प्रदेश आहे. सँड हिल्सपासून अटलांटिक किनाऱ्यापर्यंतचा राज्याचा दोन तृतीयांश भाग रुंद किनारी मैदानी प्रदेशाने व्यापला आहे. किनाऱ्यापासून वायव्येस ब्लू रिज पर्वतीय प्रदेशाकडे भूभागाची उंची वाढत गेलेली दिसते. दक्षिणेकडील किनारी भागात सागरी बेटांची शृंखलाच निर्माण झालेली आहे. शेतीस उपयुक्त अशा मृदा येथे आढळतात. पर्वतीय प्रदेशात लाल, चिकण व कंकर मिश्रीत तर मैदानी प्रदेशात गाळाची सुपीक जमीन आढळते. महत्त्वाची धातू खनिजे येथे नाहीत. बॅराइट, सिमेंट, व्हर्मिक्युलाइट, चुनखडी, दगड, वाळू, रेती, फेल्स्पार, ग्रॅनाइट, क्यानाइट, अभ्रक, केओलिन इ. अधातू खनिज पदार्थांचे उत्पादन येथून मिळते. सोन्याचेही उत्पादन घेतले जाते.

एकमेकांशी सामान्यपणे समांतर प्रवाहमार्ग असणाऱ्या आग्नेय-वाहिनी नदी संहतींमुळे राज्याचे जलवहन केलेले आहे. पी डी, सँटी, कूपर, एडिस्टो व साव्हॅना या येथील प्रमुख नद्या आहेत. नद्या शीघ्रगतीने वाहत असून मार्गात द्रुतवाह व धबधबे आहेत. जलविद्युत्शक्ती निर्मितीसाठी नद्या उपयुक्त आहेत. नैसर्गिक सरोवरे नसली तर जलविद्युत्शक्ती निर्मिती व पूर नियंत्रणासाठी अनेक कृत्रिम सरोवरांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मासेमारीच्या दृष्टीनेही ही सरोवरे उपयुक्त आहेत. कीअवी, टॉक्सोवे, हार्ट वेल, क्लर्क हिल, मुरे, वॉटरी, मेरिअन, मोल्ट्री आयर ही राज्यातील प्रमुख सरोवरे आहेत.

साउथ कॅरोलायनाचे हवामान आर्द्र व अंशतः समशीतोष्ण प्रकारचे आहे. उन्हाळे दीर्घ, उष्ण व आर्द्र, हिवाळे सौम्य तर वसंत ऋतू अल्पकाळ असतो. हिवाळ्याचे व उन्हाळ्याचे सरासरी तापमान अनुकमे ८° व २७° सेल्सि. असते. पर्जन्यमान चांगले असून बहुतांश भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,११० ते १,२७० मिमी. च्या दरम्यान असते. ब्लू रिजमध्ये ते १,५२० ते १,९५० मिमी. पर्यंत आढळते. येथील वाढीचा काळ अंतर्गत भागात २०० दिवस व किनारी भागात ३०० दिवसांपर्यंत असतो. तीन चतुर्थांश भूमी अरण्याखाली असून वनस्पतिजीवन वैविध्यपूर्ण आढळते. पाईन, फर, ओक, पॉपलर, बर्च, एल्म,स्प्रूस, सायप्रस, वॉलनट, ॲश इ. वृक्षप्रकार येथे आढळतात. विविध फुलझाडांसाठीही हे राज्य प्रसिद्घ आहे. येथे प्राणिजीवनही विपुल आहे. विविध प्रकारचे वन्य प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी व जलाशयांत विविध जातीचे मासे आढळतात

इतिहास

यूरोपियनांच्या वसाहती होण्यापूर्वी या भागात यामासी इंडियन लोकांची वस्ती होती. इ. स. १५२६ मध्ये स्पॅनिश समन्वेषक ल्यूकस व्हास्केझ दे आयलॉन याच्या नेतृत्वाखालील सफरीने सांप्रत जॉर्जटाउन येथे वसाहत स्थापन केली; परंतु ती अल्पकाळ टिकली. त्यानंतर १५६२ मध्ये जीन रिबाऊट या फ्रेंच व्यक्तीने सांप्रत पॅरिस बेटावर वसाहतीची स्थापना केली. तीही अल्पकाळच टिकली. स्पॅनिश व फ्रेंचांच्या या अयशस्वी प्रयत्नांनंतर ब्रिटिशांनी येथे वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. इ. स. १६२९ मध्ये इंग्लंडचा चार्ल्‌स पहिला याने कॅरोलायना नावाचा एक मोठा भूप्रदेश सर रॉबर्ट हीथ यास वसाहतीसाठी दिला. चार्ल्‌स राजाच्या सन्मानार्थ या वसाहतीस ‘कॅरोलायना’ असे नाव देण्यात आले. कॅरोलायना हे चार्ल्‌सचे लॅटिन रूप आहे. वसाहत स्थापन करण्यात रॉबर्ट हीथ हासुद्घा अयशस्वी ठरला. त्यामुळे त्याला दिलेले वसाहतीचे अधिकार काढून घेण्यात आले. इ. स. १६६३ मध्ये चार्ल्‌स दुसरा याने तोच भूप्रदेश सरदार घराण्यातील आठ विश्वासू धनिकांना वसाहतीसाठी दिला. त्यामुळे ते त्या प्रदेशाचे मालक झाले. या प्रदेशात सांप्रत नॉर्थ कॅरोलायना, साउथ कॅरोलायना व जॉर्जियाचा समावेश होता. त्यांनी या प्रदेशात नवीन वसाहती स्थापण्यास सुरुवात केली. दुसऱ्या चार्ल्‌सने प्रसिद्घ केलेल्या सनदेनुसार या राज्यास कॅरोलायना हे नाव कायम झाले. या राज्यात पॅल्मेटो वृक्षांचे अधिक्य असल्याने ‘पॅल्मेटो स्टेट’ या टोपणनावानेही याराज्यास ओळखले जाते. १६७० मध्ये ॲस्ले नदीकाठावरील अल्बेमार्ले पॉईंट येथे पहिल्या कायमस्वरूपी ब्रिटिश वसाहतीची स्थापना करण्यात आली. अमेरिकेतील पहिल्या तेरा वसाहतींपैकी ही एक वसाहत होय. १६८० मध्ये ह्या वसाहतीचे स्थान सांप्रत चार्ल्‌सटन येथे हलविण्यात आले. इ. स. १७०० मध्ये कामासाठी येथे गुलाम आणण्यात आले. भातशेतीचा विकास होऊ लागल्यानंतर बोफर्ट (१७१०) व जॉर्जटाउन (१७२९) या वसाहती स्थापन करण्यात आल्या. १७२९ मध्ये साउथ कॅरोलायना वसाहत ब्रिटिश राजसत्तेखाली आली.

स्पॅनिश, फ्रेंच, इंडियन व चाचे यांच्याकडून निर्माण झालेल्या भीतिदायक वातावरणातही येथील नदी खोऱ्यातील वसाहतींचा फरयुक्त कातडी, तांदूळ व निळीच्या मोठ्या व्यापारामुळे उत्कर्ष झाला. चार्ल्‌सटन हे आग्नेय किनाऱ्यावरील प्रमुख व्यापारी व सांस्कृतिक केंद्र बनले. अमेरिकन क्रांतीच्या काळातराज्यात अनेकदा लष्करी कारवाई झाली. १७७७ मध्ये ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले आणि २३ मे १७८८ रोजी साउथ कॅरोलायनाचा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात आठवे घटक राज्य म्हणून समावेश झाला. १७८६ मध्ये राज्याच्या राजधानीचे ठिकाण अंतर्गत भागातील कोलंबिया येथे हलविण्यात आले. अमेरिकन यादवी युद्घाच्या काळात साउथ कॅरोलायना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून बाहेर पडले (२० डिसेंबर १८६०). पुढे १८६८ मध्ये परत संयुक्त संस्थानात विलीन झाले. पुनर्निर्माण कालावधीत कृष्णवर्णीयांचा प्रशासनातील सहभाग वाढला; परंतु १८७६ मध्ये श्वे तवर्णीयांनी राज्याचे प्रशासन पुन्हा ताब्यात घेतले. १८९५ मधील घटनात्मक दुरुस्तीनुसार कृष्णवर्णीयांचा मतदानाचा हक्क काढून घेतला गेला. त्यामुळे वंशवाद अधिक उफाळला. १९६० च्या दशकाच्या मध्यापर्यंत कृष्णवर्णीय सत्तेपासून दूर राहिले.

आर्थिक स्थिती

साउथ कॅरोलायना हे प्रामुख्याने कृषिप्रधान राज्य आहे. मृदा, अरण्ये व पाणी या नैसर्गिक साधनसंपदेबाबत राज्य समृद्घ आहे. वसाहतकाळात साउथ कॅरोलायनाची अर्थव्यवस्था कृषिउत्पादनांवर व प्रामुख्याने तांदूळ व कापूस उत्पादनांवर आधारित होती. पुढे एकोणिसाव्या शतकातही सुती वस्त्रोद्योगाचा वेगाने विकास होत असताना हीच परिस्थिती होती. त्यानंतर कारखानदारी हा प्रमुख आर्थिक व्यवसाय बनला, तुलनात्मक दृष्ट्या सौम्य हवामान व पुरेसे पर्जन्यमान यांमुळे राज्यात विविध प्रकारची कृषिउत्पादने घेतली जातात. तंबाखू, सोयाबीन, गहू, मका, कापूस, सप्ताळू, भुईमूग, कलिंगड ही येथील प्रमुख कृषिउत्पादने आहेत. इ. स. २००५ मध्ये कृषिपिकांपासून ७२८ द. ल. डॉलर व पशुधन आणि प्राणिज उत्पादनांपासून १,०९१ द. ल. डॉलर उत्पादन मिळाले. येथील शेताचा सरासरी आकार १९६ एकरांचा आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आपली उत्पादने देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत पाठविण्याच्या दृष्टीने शेतकरी आपल्या कृषिउत्पादनांवर प्रक्रिया करीत असतात. व्यापारी फलोद्यानाची शेतीही येथे केली जाते. पशुपालन व कुक्कुटपालन व्यवसायही महत्त्वाचे आहेत. किनाऱ्यावरील व्यापारी मासेमारी व्यवसायातून कोळंबी, खेकडा व कालव शिंपले ही प्रमुख उत्पादने मिळतात.

दुसऱ्या महायुद्घकाळापासून कारखानदारी विस्तारातून औद्योगिक विकास साधण्यावर भर देण्यात आला. राज्यात उद्योगधंदे आकर्षित होण्याच्या दृष्टीने उद्योजकांना वेगवेगळ्या सुविधा पुरविण्यात आल्या. त्यामुळे पूर्वीची कृषिआधारित अर्थव्यवस्था कारखानदारी, व्यापार व पर्यटन व्यवसायावर आधारित बनली. केंद्र शासनाकडून लष्करासंबंधातील वेगवेगळे उद्योगव्यवसाय राज्यात स्थापन केले आहेत. अमेरिकन वस्त्रोद्योगात साउथ कॅरोलायना राज्य आघाडीवर आहे. सुती कापडाचे उत्पादन सर्वाधिक असून कृत्रिम धाग्यापासूनचे कापड व लोकरी कापडाचे उत्पादनही महत्त्वाचे आहे. पुनर्वनीकरण व वनव्यवस्थापनाचे इतर कार्यक्रम राबविल्यामुळे राज्यातील कृषिखालील क्षेत्र कमी होऊन वनांखालील क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे अरण्यांवर आधारित उद्योगही मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहेत. रसायने, तयार कपडे, कागद, खाद्यपदार्थनिर्मिती, विद्युत् उपकरणे, यंत्रसामग्री, वाहतूक साधने, धातू उत्पादने, काचनिर्मिती इ. उद्योग येथे चालतात. देशातील बऱ्याच मोठ्या औद्योगिक उत्पादन संस्था या राज्यात आहेत. राज्यात परकीय गुंतवणूकीचे प्रमाणही फार मोठे आहे. अँडरसन, ग्रीनव्हील, स्पार्टनबर्ग, रॉक हिल व ग्रीनवुड ही राज्यातील प्रमुख औद्योगिक केंद्रे आहेत. १९६० नंतर पीडमाँट प्रदेशाच्या बाहेरील ग्रामीण भाग व लहान नगरांमध्ये उद्योगधंद्यांची स्थापना करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करण्यात आले. इ. स. २००४ मध्ये राज्यात४,२७० कारखाने व त्यांत २,७५,००० कामगार होते. खनिजांपासून इ. स. २००५ मध्ये ६५९ द. ल. डॉलर उत्पादन मिळाले.

राज्यातील नद्या व कृत्रिम सरोवरांचा उपयोग जलविद्युत्निर्मितीसाठी करून घेतलेला आहे. रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग तसेच अंतर्गत व सागरी जलमार्ग अशा सर्व प्रकारच्या वाहतूक सुविधा येथे चांगल्या प्रकारे विकसित झालेल्या आहेत. २००५ मध्ये राज्यात १,०६,६०० किमी. लांबीचे रस्ते व ३,३५२ किमी. लांबीचे लोहमार्ग होते. १९६० च्या दशकापासून राज्यात पर्यटन व्यवसायाच्या विकासास चालना मिळाली आहे. मनोरंजनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे राज्यभर विखुरलेली आहेत. शीत हवामानाचे वनाच्छादित पर्वतीय प्रदेश, राष्ट्रीय वने, उत्तमोत्तम उद्याने, सागरी बेटे, किनाऱ्यावरील पुळणी, मानवनिर्मित सरोवरे, गोल्फ मैदाने, ऐतिहासिक वास्तू इत्यादींमुळे पर्यटन व्यवसायाचा विकास झालेला आहे. चार्ल्‌सटन, आइकेन, मिर्टल बीच,हिल्टन हेड व कॅमडेन ही प्रमुख पर्यटन केंद्रे आहेत. बोफर्ट, जॉर्जटाउन, कोलंबिया येथे अगदी सुरुवातीच्या काळातील अमेरिकन वास्तुशिल्पांचे नमुने पहावयास मिळतात.

लोक व समाजजीवन

यूरोपियन वसाहतकरी पहिल्यांदा येथेआले, तेव्हा या प्रदेशात प्रामुख्याने यानासी इंडियन तसेच मस्कहोजीयन आयरोकोइन व सिओउन इंडियन जमातीच्या लोकांचे वास्तव्य होते. येथील नद्या, विविध भूवैशिष्टये व प्रदेशांना इंडियनांनी आपली नावे दिली होती. अगदी सुरुवातीला येथे आलेल्या गोऱ्या वसाहतकऱ्यांमध्ये प्रामुख्याने इंग्रज, स्कॉटिश व आयरिश अधिक होते. त्यानंतर फ्रेंच, ह्युजेनॉटस्, जर्मन, स्वीस व वेल्श वसाहतकरी आले. कृष्णवर्णीयांना येथे गुलाम म्हणून आणण्यात आले. १६७० नंतर त्यांची संख्या वाढत गेली. १८१० ते १९२० या कालावधीत तर गोऱ्या लोकांपेक्षा कृष्णवर्णीयांची संख्या अधिक झाली. परंतु त्यानंतर कृष्णवर्णीयांची संख्या घटली. आज एकूण लोकसंख्येत कृष्णवर्णीय ३०% आहेत. १९७० च्या दशकापर्यंत ग्रामीण वस्तीचे प्रमाण अधिक होते, परंतु १९८० च्या जनगणनेनुसार निम्म्यापेक्षा अधिक लोक नागरी भागात राहणारे होते. काही विशिष्ट भागातच लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले असून बराचसा प्रदेश अतिशय विरळ लोकवस्तीचा आहे.

साउथ कॅरोलायना विद्यापीठ, कोलंबिया (१८०१); क्लेमसन विद्यापीठ (१८८९), साउथ कॅरोलायना वैद्यकीय विद्यापीठ, चार्ल्‌सटन; विनथ्रॉ प विद्यापीठ, रॉक हिल; साउथ कॅरोलायना राज्य विद्यापीठ, ओरँगबर्ग; फ्रान्सिस मॅरिऑन विद्यापीठ, फ्लॉरेन्स; लँडर विद्यापीठ, ग्रीनवुड ही विद्यापीठे येथे आहेत. याशिवाय राज्यात अनेक सार्वजनिक व खाजगी महाविद्यालये, विविध प्रकारची प्रसिद्घ वस्तुसंग्रहालये, ग्रंथालये, सांस्कृतिक व संशोधन-संस्था आहेत. राज्यातील १,१७२ सार्वजनिक विद्यालयांत ७,०३,७३६ विद्यार्थी व ४६,९१४ शिक्षक (२००४-०५) आणि ३४५ खाजगी शाळांत ५८,००५ विद्यार्थी व ५,३३९ शिक्षक (२००३-०४) होते. चार्ल्‌सटन वस्तुसंग्रहालय (१७७३) हे देशातील सर्वांत जुन्या सार्वजनिक वस्तुसंग्रहालयांपैकी एक आहे. वसाहतकालीन अनेक वास्तू राज्यात आढळत असून त्या दृष्टीने चार्ल्‌सटन महत्त्वाचे आहे. कॅपडेन येथे घोड्याच्या शर्यती, आयकेन येथे पोलो खेळ,मार्टलन्स येथे तंबाखू महोत्सव, तर डार्लिंग्टन स्पीडवे येथे मोटारींच्या शर्यती आयोजित केल्या जातात.

कोलंबिया, चार्ल्‌सटन (लोकसंख्या १,०६,७१२–२००५ अंदाज), रॉक हिल (५९,५५४), मौंट प्लेझंट (५७,९३२), ग्रीनव्हील (५६,६७६) हीराज्यातील प्रमुख शहरे आहेत. राज्याच्या साधारण मध्यभागी असलेले कोलंबिया हे राज्याच्या राजधानीचे तसेच सर्वांत मोठे शहर असून प्रमुख प्रशासकीय,शैक्षणिक, व्यापारी, औद्योगिक व वाहतूक केंद्र आहे. आग्नेय भागात असलेले चार्ल्‌सटन हे प्रमुख बंदर तसेच व्यापारी, औद्योगिक व लष्करी केंद्र आहे. ऐतिहासिक दृष्ट्या ते महत्त्वाचे असून वर्षभर येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. वायव्य भागातील ग्रीनव्हील हे वित्तीय व सांस्कृतिक केंद्र असून सुती वस्त्रोद्योगासाठी महत्त्वाचे आहे.

कुंभारगावकर, य. रा.; चौधरी, वसंत

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate