অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अहमद सेकू तूरे

अहमद सेकू तूरे

अहमद सेकू तूरे : गिनी प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व आफ्रिकेचा एक जहालमतवादी नेता. फाराना (गिनी) येथे शेतकरी कुटुंबात जन्म. त्याचे वडील हे अल्मामी सामरी या राज्यकर्त्याचे नातू होत. त्याचे प्राथमिक शिक्षण फाराना येथे झाले. पुढे तो कोनाक्रीच्या तंत्रशाळेत गेला; पण विद्यार्थ्यांचा संप केल्याबद्दल त्याला शाळेतून हाकलण्यात आले (१९३७). पुढे त्याने पत्रद्वारा माध्यमिक शिक्षण घेतले आणि एका व्यापारी संस्थेत नोकरी धरली (१९४०) ; पण लौकरच त्यास टपाल खात्यात नोकरी मिळाली. त्याचा ओढा प्रथमपासून कामगार चळवळीकडे होता. तो तेथील कामगार संघटनेचा पुढारी झाला (१९४५) आणि त्याने ७६ दिवसांचा यशस्वी संप घडवून आणला. यामुळे त्याला नोकरीस मुकावे लागले व काही दिवस तुरुंगवासही भोगावा लागला. या सुमारास युनियन सेजेटिस्ट डेस सिंडिकेट नावाची कामगार संघटना त्याच्या प्रयत्नाने अस्तित्वात आली. त्याचे चिटणीसपद त्याच्याकडे आले. या संघटनेमधूनच इंट्राटेरिटोरिअल रॅसम्बलमेन्ट डेमॉक्रॅटिक आफ्रिकन (आरडीए) या संस्थेचा जन्म झाला; पण राजकारणापेक्षा त्याला कामगार कल्याण अधिक महत्त्वाचे वाटे. गिनीचे राजकारण यासिन डायलो याच्या नेतृत्वाखाली चाले. कॉन्फेडरेशन जनरल डेस ट्रायव्हलर्स (सीजीटी) ही प्रमुख राजकीय संस्था होती.

तूरेच्या कामगारांतील कार्यामुळे त्यास या संस्थेचे मुख्य चिटणीसपद आणि पुढे उपाध्यक्षपद मिळाले. तथापि ही संघटना कम्युनिस्टप्रणीत होती. यातून काही जहालमतवाद्यांनी पार्टी डेमॉक्रॅटिक द गिनी पक्ष (पीडीजी) स्थापन केला. त्याने फ्रेंच सरकारविरुद्ध १९५३ मध्ये दोन महिने संप घडवून आणला. यामुळे गव्हर्नर जनरलला नमते घ्यावे लागले. या घटनेमुळे जहालमतवादी तरुणांचा तो अत्यंत लोकप्रिय नेता झाला. आरडीए ही संघटना हळूहळू मागे पडू लागली आणि पीडीजीचा जोर वाढला. या सुमारास यासिन डायलो मरण पावला (१९५४). त्याची फ्रेंच असेंब्लीतील जागा तूरेने लढविली. तीत तो पराभूत झाला; पण त्याची लोकप्रियता यत्किंचितही कमी झाली नाही. पुढे १९५६ मध्ये तो निवडून आला. त्याने कामगार संघटनांचे फ्रेंच राजकीय संस्थांशी असणारे संबंध तोडले. स्वतंत्र इंट्राटेरिटोरिअल ट्रायव्हलर्स द आफ्रिका नॉयर ही कामगार संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेत अनेक लहान संघटना विलीन झाल्या. तूरे हा तिचा पहिला चिटणीस झाला व नंतर तो अध्यक्ष म्हणून निवडला गेला. तत्पूर्वी कोनाक्री शहराचा महापौर म्हणूनही तो निवडून आला होता. (१९५७). तो गिनीच्या कार्यकारी मंडळाचा उपाध्यक्ष झाला.

फ्रेंच वसाहतींतील या चळवळींमुळे द गॉलने दोन पर्याय जनमतपृच्छेद्वारे लोकांसमोर ठेवले : (१) फ्रेंच संघीय समुदायात सामील होणे व (२) स्वतंत्र राष्ट्र या नात्याने राहणे. तूरेने स्वतंत्र राष्ट्राचा पाठपुरावा केला आणि द गॉलला असे सांगितले की, “आम्ही दारिद्र्यात स्वातंत्र्यास कवटाळू पण आम्हाला गुलामगिरीत ऐश्वर्य नको”. सप्टेंबर १९५८ मध्ये गिनी स्वंतत्र झाले आणि तूरे त्याचा पहिला राष्ट्राध्यक्ष झाला, पण तत्पूर्वी फ्रान्सने जवळजवळ सर्व गिनी लुबाडला होता आणि आपली यंत्रसामग्री व तंत्रज्ञ यांना फ्रान्समध्ये नेले होते; तथापि तूरे डगमगला नाही. त्याने धैर्याने यातून मार्ग काढला. तूरेने आपल्या सु. १५–१६ वर्षांच्या कारकीर्दीत देशांतर्गत अनेक सुधारणा केल्या. त्याकरिता प्रथम घानाकडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले व पुढे १९६५ नंतर ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, चीन, रशिया इ. देशांकडून आर्थिक मदत घेऊन धरणे, जलविद्युत प्रकल्प, रेल्वे, रस्ते, बंदरे इ. अनेक सुधारणा केल्या. सहकारी तत्त्वावर उद्योगधंद्यांची उभारणी केली. खेड्यांतून ग्रामपंचायती मंडळे सुरू करून प्राचीन परंपरागत पद्धती बंद केली. बॉक्साइटची निर्यात केली आणि अर्थव्यवस्था भरभक्कम करण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीस त्याचे धोरण साम्यवादी गटातील धोरणास अनुसरून होते; पण १९६९ च्या शिक्षकांच्या संपातील रशियन दूतावासाच्या मध्यस्थीनंतर ते बदलले. गिनीने १९५९ मध्ये घाना व पुढे १९६१ मध्ये माली या देशांसह एक संघ स्थापन केला. घानाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते आणि सत्तेवरून काढलेल्या एन्‌क्रुमाह यास त्याने आश्रय दिला. १९६४ मध्ये त्याने प्रशासनासाठी चार प्रांतांवर निवासी मंत्री नेमले. ते केंद्रीय कार्यकारी मंडळास जबाबदार असत. आपला डेमॉक्रॅटिक पक्ष वैध ठरवून इतर पक्षांवर त्याने बंदी घातली व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या सभासदसंख्येवर नियंत्रण घातले. त्याची १९६८ मध्ये व पुन्हा नंतर १९७४ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून बिनविरोध फेरनिवड झाली. १९७१ मध्ये पोर्तुगीज गिनीतील भाडोत्री सैनिकांनी गिनीचे नुकसान केले, तेव्हा त्याने संयुक्त राष्ट्रांच्या निदर्शनास ही घटना आणली; पण संयुक्त राष्ट्रांचा हस्तक्षेप गिनीत होऊ दिला नाही. त्याच्या विरुद्ध अनेक कारस्थाने झाली; पण त्याने ती वेळीच मोडून काढली. त्याच्या हुकूमशाही नेतृत्त्वाखाली गिनीची प्रगती झाली असून गिनीचे बहुतेक आफ्रिका आणि पश्चिमी देशांशी आता मित्रत्वाचे संबंध आहेत. १९७५ च्या जुलैमध्ये फ्रान्सशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. तूरे हा गिनीचा जवळजवळ अनभिषिक्त राजाच आहे. एक कुशल संघटक, कामगार चळवळींचा पुढारी आणि जहालमतवादी आफ्रिकी नेता म्हणून तूरे प्रसिद्ध आहे. त्याने La Revolution et l’unite Populaire (१९४६) व Les Poemes militants (१९६४) अशी फ्रेंच भाषेत दोन पुस्तके लिहिली आहेत. पहिले राजकीय विचारांचे असून दुसरे कवितासंग्रह आहे.

 

संदर्भ : Adloff, Richard, West Africa : The French Speaking Nations, Yesterday and Today, Toronto, 1964.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate