অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आर्थर सेसील पिगू

आर्थर सेसील पिगू

पिगू, आर्थर सेसील : (१८ नोव्हेंबर १८७७-७ मार्च १९५९). प्रख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ व कल्याणकारी अर्थशास्त्राचा प्रवर्तक. आइल ऑफ वाइटमधील बीचलँड्‌स येथे जन्म. त्याचे वडील सेनाधिकारी होते. हॅरो या प्रसिद्ध विद्यानिकेतनातून आणि किंग्ज महाविद्यालयामधून विशेष नैपुण्यांसह व अनेक पारिताषिके संपादून अनुक्रमे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण. १९०२ मध्ये याच महाविद्यालयात अधिछात्र म्हणून नियुक्ती. १९०८ मध्ये अल्फ्रेड मार्शल या सुविख्यात अर्थशास्त्रज्ञाच्या निवृत्तीनंतर पिगूला वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी अर्थशास्त्राचे अध्यासन मिळाले; ते त्याने पस्तीस वर्षे उत्कृष्ट रीतीने सांभाळले (१९०८-४३). ‘कनलिफ चलन समिती’ (१९१८), ‘शाही प्राप्तिकर आयोग’ (१९१९), ‘चेंबरलेन चलन समिती’ (१९२४) इत्यादींचा पिगू सदस्य होता. चेंबरलेंन समितीच्या अहवालान्वयेच सुवर्णपरिमाणाचे पुनरूज्जीवन करण्यात आले होते.

मानवसमाज सुधारण्याचे एक साधन म्हणूनच अर्थशास्त्राभ्यासाकडे पाहिले पाहिजे, असे मार्शलप्रमाणेच पिगूचेही मत आहे. पिगूच्याच प्रयत्नांमुळे मार्शलचे आर्थिक सिद्धांत प्रसार पावू शकले आणि पुढे विख्यात झालेल्या ‘केंब्रिज अर्थशास्त्र संप्रदाया’ चे वैचारिक अधिष्ठान बनले.

पिगूचा अर्थशास्त्रावरील पहिला ग्रंथ प्रिंसिपल्स अंड मेथड्‍स ऑफ इंडस्ट्रियल पीस-अडम स्मिथ पारितोषिकपात्र निबंधाचा विस्तार -१९०५ मध्ये प्रसिद्ध झाला.त्यामध्ये गणितीय व सांख्यिकीय पद्धतींचा थोडा वापर असून अर्थशास्त्रीय विवेचनाला तात्विक प्रतिपादनाची झालर लावण्यात आली आहे. १९१२ मध्ये वेल्थ अंड वेल्फेअर हा पिगूचा सर्वात महत्वाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. पुढील तीस वर्षांच्या काळात त्याचा विस्तार व द इकॉनॉमिक्स ऑफ वेल्फेअर असा शीर्षकबदलही करण्यात आला. या ग्रंथाच्या १९२०-५२ या काळात चार आवृत्या व सहा पुनर्मुद्रणे काढण्यात आली. पिगूने या ग्रंथात मार्शल व सिजविक या दोहोंच्या विचारांच्या आधारे आपले सिद्धांत मांडले आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाची चलनशीलता. त्याची वितरणपद्धती व त्याचे प्रमाण या सर्वांवर आर्थिक कल्याण अवलंबून असते, या विधानाने प्रारंभ करून पिगूने कमाल समाधानाच्या अवस्था विशद केल्या. पिगूच्या विश्लेषणातील मध्यवर्ती संकल्पना म्हणजे खाजगी निव्वळ उत्पाद व सामाजिक निव्वळ उत्पाद यांमधील फरक स्पष्ट करणे, ही होय. स्पर्धाशील अर्थव्यवस्थेमध्ये निर्णय अशा तर्‍हेने घेतले जातात की, खाजगी निव्वळ उत्पाद कमाल प्रमाणात निर्माण होतात, तेवढ्या प्रमाणात निव्वळ सामाजिक उत्पाद निर्माण होऊ शकत नाही. तथापि योग्य ते कर व अर्थसाहाय्य यांच्या योगे खाजगी व सामाजिक निव्वळ उत्पाद सम होतात आणि सरतेशेवटी अधिकतम सामाजिक कल्याण संभवते. पिगूने कल्याणकारी अर्थशास्त्राच्या ‘फल’ सिद्धांतावर अधिककरून भर दिलेला आढळतो. ग्रंथाचा बराचसा भाग अपूर्ण विभाजनामधून निर्माण होणार्‍या सामाजिक व खाजगी सीमांत निव्वळ उत्पादांमधील फरक, मक्तेदारी व तत्सदृश घटक आणि मक्तेदारी नियंत्रण करण्याच्या पद्धती यांचे विवेचन करण्यात खर्ची पडला आहे; त्यानंतर मजुरीच्या पद्धती व गरीब वर्गातील श्रमिकांचे वेतनदर वाढविण्याच्या पद्धतींसंबंधी चर्चा आहे.

पिगूने मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याच्या नावावर सु. ३० ग्रंथ आणि शंभरांवर पुस्तपत्रे व लेख आहेत. १९१४ मध्ये त्याचे अनएम्‍प्‍लॉयमेंट हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या लहानशा पण लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकात पिगूने तत्कालीन विचारांचा मागोवा घेऊन बेकारीचे मूळ वेतनदरांमधील लवचिकता हे धरले आहे. १९२०-२१ मध्ये युद्धकालीन अर्थकरणाचे विवेचन करणारी त्याची दोन पुस्तके प्रसिद्ध झाली. १९२७ मध्ये इंडस्ट्रियल फ्‍लक्चुएशन्स, १९२८ मध्ये ए स्टडी इन पब्‍लिक फिनॅन्स, १९३३ मध्ये द थिअरी ऑफ अनएम्‍लॉयमेंट, १९३५ मध्ये द इकॉनॉमिक्स ऑफ स्टेशनरी स्टेट्‌स, १९४१ मध्ये एम्‍प्‍लॉयमेंट अंड इक्विलिब्रियम, १९४९ मध्ये द व्हेल ऑफ मनी असे पिगूचे एकेक ग्रंथ प्रसिद्ध होत होते. हे ग्रंथ केन्सपूर्व आर्थिक विचारांची प्रगतावस्था दाखवितात. केन्सने द जनरल थिअरी ऑफ एम्‍प्‍लॉयमेंट, इंटरेस्ट अंड मनी (१९३६) या आपल्या ग्रंथात पिगूच्या द थिअरी ऑफ अनएम्‍प्‍लॉयमेंट ह्या ग्रंथावर टीका केली. पिगूने अनेक लेख व ग्रंथ यांद्वारे केन्सच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने ‘वास्तव-शेष परिणाम’ (रिअल बॅलन्स इफेक्ट) मांडला : वाढणार्‍या किंमतींची जादा मागणीचे प्रमाण कमी करण्याकडे प्रवृत्ती असते. व त्याजोगे समतोल निर्माण होऊ शकतो, हा ‘पिगू परिणाम’ म्हणून प्रसिद्ध आहे. उपर्युक्त ग्रंथांद्वारा पिगूने आपल्या विश्लेषण व रचनासामर्थ्य या दोन साधनांचा प्रभावी उपयोग करून जकात धोरण, औद्योगिक आंदोलने, बेकारी, सरकारी अर्थकारण इ. आर्थिक समस्या कुशलतेने सोडविण्याचा प्रयत्न केला हे. त्याच्या ग्रंथांत जागोजागी विखुलेली गिर्यारोहणासंबंधीची रूपके त्याच्या जीवनात गिर्यारोहणाला केवढे महत्वाचे स्थान हेते, ते स्पष्ट करतात.

कल्याणकारी अर्थशास्त्राचा प्रवर्तक म्हणूनच पिगूला विशेष महत्व दिले जाते. बेकारी, अनारोग्य व वाईट गृहनिवसन यांच्या योगे निर्माण होणार्‍या अपव्ययाला (हानीला) समाज जबाबदार असून त्यानेच त्यावरील उपाययोजनांचा खर्च सोसला पाहिजे, या सिद्धांताचा पिगू हा प्रमुख प्रवर्तक मानतात. अल्फ्रेड मार्शलच्या सिद्धांतांची शिकवण देऊन त्यांचा त्याने प्रसार केला. सनातन अर्थशास्त्रज्ञांच्या विचारधारेतील पिगू हा अखेरचा अर्थशास्त्रज्ञ होय, असे मानले जाते. तो केंब्रिज येथे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी मरण पावला.

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate