অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेलिगमन एडविन रॉबर्ट अँडरसन

सेलिगमन एडविन रॉबर्ट अँडरसन

सेलिगमन एडविन रॉबर्ट अँडरसन : (२५ एप्रिल १८६१-८ जुलै १९३९). सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व कोशकर्ता. त्याचा जन्म न्यूयॉर्कमध्ये झाला. त्याचे वडील जोसेफ सेलिगमन बँक व्यवसायी होते. सुरुवातीचे त्याचे शिक्षण घरीच झाले. पुढे कोलंबिया ग्रामर स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेऊन त्याने कोलंबिया विद्यापीठातून पदवी संपादन केली (१८७९). १८८२ मध्ये त्याने त्याच विद्यापीठाच्या अर्थशास्त्र व कायदा या दोन विषयांत पदव्या मिळविल्या. नंतर तो पीएच्.डी. झाला (१८८५). तत्पूर्वी त्याने काही महिने न्यूयॉर्क राज्याच्या न्यायालयात काम केले. पुढे तो कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचा अधिव्याख्याता म्हणून रूजू झाला. पुढे त्याला अर्थशास्त्राचा प्राध्यापक (१८८८) व नंतर अर्थशास्त्र व लोकवित्तव्यवस्था (सरकारी अर्थकारण) अशा दोन्ही विषयांचा प्राध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले. ही दोन्ही पदे त्याने अखेरपर्यंत सांभाळली. कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करताना (१८८५-१९३१) सेलिगमन याने कोलंबिया युनिव्हर्सिटी स्टडीज इन हिस्टरी, इकॉनॉमिक्स अँड पब्लिक लॉ व पॉलिटिकल सायन्स क्वार्टर्ली अशा दोहोंचे संपादन केले.अध्यापनाव्यतिरिक्त सेलिगमन याने नागरी कार्यक्रमांमध्येही रस घेतला. तो अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन या संस्थेचा संस्थापक-अध्यक्ष होता (१९०२-०४). राष्ट्रीय कर संस्थेचा तो दोन वर्षे अध्यक्ष होता (१९१३-१५). अमेरिकन असोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी प्रोफेसर्स (१९१५) या संस्थेच्या उभारणीत त्याचा सिंहाचा वाटा होता. त्या संस्थेचाही तो अध्यक्ष होता (१९१९-२०). न्यूयॉर्क राज्य व न्यूयॉर्क शहर कर आयोग अशा दोन्ही आयोगांचा सल्लागार म्हणून त्याने काम पाहिले आणि राष्ट्रसंघ (१९२२-२३) व क्यूबा सरकार या दोघांनाही करसल्लागार म्हणून साहाय्य केले (१९३२).

सेलिगमन याने कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्र व आर्थिक सिद्धांतांचा इतिहास शिकवत असताना अर्थशास्त्र व राजकीय तत्त्वज्ञान यांचे अलगीकरण करता येत नाही असा विचार मांडला; कारण राजकीय तत्त्वज्ञानामुळे आर्थिक घडामोडींची निश्चिती करणे शक्य होते. त्याची आर्थिक सिद्धांतावरील पुस्तके तसेच अर्थशास्त्रीय परिभाषा या दोहोंचा अमेरिका व यूरोपात मोठा प्रभाव होता. त्याने सुचविलेल्या करविषयक सुधारणा, विशेषतः प्रगतिशील प्राप्तिकर, यांचा अंतर्भाव काही देशांच्या करप्रणालींमध्ये करण्यात आला आहे. स्थूल अर्थशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून त्याने अनेक कर आयोगांवर काम केले. कोलंबिया विद्यापीठात त्याने अर्थशास्त्र विषयाचे मोठे ग्रंथालय उभारले. नव्याने निर्मिती झालेल्या उद्योगांना संरक्षक जकातींचा आधार देण्याची गरज त्याने प्रतिपादिली; कारण त्यांची वाढ होण्यास त्याची आवश्यकता होती.

सेलिगमन याने स्फुटलेखनाबरोबरच ग्रंथलेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन इन थिअरी अँड प्रॅक्टिस (१८९२), द शिफ्टिंग अँड इन्सिडन्स ऑफ टॅक्सेशन (१८९२), एसेज इन टॅक्सेशन (१८९५), द इकॉनॉमिक इंटरप्रिटेशन ऑफ हिस्टरी (१९०२), द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स (१९०५) इत्यादी मान्यवर व प्रसिद्ध आहेत. पहिल्या दोन ग्रंथांत त्याने कर आणि करदात्यांची क्षमता यांचे सैद्धांतिक भाषेत समर्थन केले आहे. शिवाय उत्पादन व वितरण यांच्याशी करसिद्धांत कसा निगडित आहे, याचाही उहापोह केला आहे. द इकॉनॉमिक या ग्रंथात त्याने कार्ल मार्क्सपूर्व लेखकांच्या भौतिकवादी संकल्पनांची चर्चा केली आहे आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या अर्थशास्त्राच्या संकल्पनांचा अन्वयार्थ दिला आहे. तर द प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात अर्थशास्त्राविषयी तात्त्विक चर्चा असून तत्संबंधीचा ऐतिहासिक आढावा दिला आहे. तसेच आर्थिक विकासाच्या विविध अवस्था व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या आर्थिक विकासाचे पैलू स्पष्ट केले आहेत. त्याची सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे एन्सायक्लोपिडिया ऑफ सोशल सायन्सिस या बृहद्कोशाच्या पंधरा खंडांचे साक्षेपी संपादन होय (१९२७-३५). या बृहद्कोशात त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. त्याच्या बहुतेक सर्व ग्रंथांच्या आवृत्त्या निघाल्या असून त्याच्या सैद्धांतिक लेखनावर जे. बी. क्लार्क व ऑस्ट्रियन अर्थशास्त्रज्ञांचा प्रभाव जाणवतो.वृद्धापकाळाने न्यूयॉर्कमधील लेक प्लेसिड येथे सेलिगमनचे निधन झाले.

 

लेखक - गद्रे वि. रा.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

 

अंतिम सुधारित : 7/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate