অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चार्ल्स स्ट्यूअर्ट पार्नेल

चार्ल्स स्ट्यूअर्ट पार्नेल

चार्ल्स स्ट्यूअर्ट पार्नेल : (२७ जून  १८४६ -६ ऑक्टोबर १८९१). आयर्लंडमधील होमरूल पक्षाचा पहिला अध्यक्ष व एक राष्ट्रीय नेता. तो आयर्लंडमधील ॲवहेन्डेल गावी सधन जमीनदार कुटुंबात जन्मला. वडील जॉन हे एक बडे अधिकारी होते, तर आई डीलिआ ही अमेरिकन नाविक दलातील अधिकाऱ्याची मुलगी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आयर्लंडमध्ये घेऊन तो उच्च शिक्षणासाठी केंब्रिज विद्यापीठात गेला; पण चार वर्षांच्या अध्ययनानंतर पदवी न घेताच विद्यापीठातून बाहेर पडला (१८६९). त्याने १८७२ – ७३ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा दौरा केला. आयर्लंडला परत आल्यावर तो विक्लो कौंटीचा शेरिफ झाला (१८७४). हळूहळू त्याने स्थानिक राजकारणातून आपले लक्ष राष्ट्रीय चळवळीत केंद्रित केले आणि १८७५ मध्ये मीथ कौंटीमधून तो संसदेत निवडून आला. १८७७ – ७८  या काळात संसदेच्या कामात व्यत्यय आणणे, सत्तारूढ पक्षाविरुद्ध असहकार व अडवणूक करणे इत्यादींमुळे त्याची लोकप्रियता वाढली. हे त्याचे वेगळे तंत्र प्रथम प्रचारात आले होते.

१८७८  त्याने कृषी आंदोलनास भाग घेतला. तो लँड लीग या संस्थेचा अध्यक्ष झाला (१८७९). लीगला जमिनींची सुधारणा करणारे कायदे हवे होते; परंतु त्याच वेळी कुळांना जमिनी मिळाल्या पाहिजेत, या तत्त्वाचाही त्याने पुरस्कार केला. या सुमारास होमरूल पक्षाचा तो अध्यक्ष म्हणून निवडला गेला. आपल्या चळवळीस आर्थिक सहाय्य आणि सहानुभूती मिळविण्यासाठी त्याने अमेरिकेचा दौरा केला आणि सु. ७० हजार डॉलर्स जमा केले. तो पुन्हा संसदेवर निवडून आला. या वेळी त्याने ग्लॅडस्टन सरकारच्या धोरणावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली. युनायटेड आयर्लंड नावाचे वृत्तपत्र सुरू केले. यातून तो आपल्या होमरूल पक्षाचा प्रचार व प्रसार करी. त्याच्या बहिष्काराच्या धोरणामुळे दंगेधोपे यांचा जोर वाढला. शांतता व शिस्त प्रस्थापित व्हावी म्हणून संसदेत विधेयक मांडण्यात आले. ते संमतही झाले. या सुमारास ब्रिटिश संसदेने कोअर्शन ॲक्ट व लँड ॲक्ट हे दोन कायदे आयरिश प्रतिकाराला न जुमानता संमत केले. त्याला याने कडाडून विरोध केला.

या त्याच्या कारवायांमुळे ब्रिटिश सरकारने त्यास पकडले व किल्मेनमच्या तुरुंगात घातले. किल्मेनमच्या तुरुंगात पार्नेलची काही अटींवर सुटका करण्यात आली (१८८२). साहजिकच क्रांतिकारक चळवळीचा जोरही कमी झाला. दरम्यान दोन इंग्रजी अधिकाऱ्यांचे खून झाले. त्याचे खापर पार्नेलवर फोडण्यात आले; तथापि आयरिश जनतेने या आरोपाला कडाडून विरोध केला. पार्नेलची लोकप्रियता व होमरूल पक्षाचे वर्चस्व वाढत असता टाइम्स या वृत्तपत्राने पार्नेलची सही असलेले इंग्रज अधिकाऱ्यांच्या खुनांच्या संदर्भातील एक मूळपत्र नकलेसह प्रसिद्ध केले. पार्नेलने पत्राखालील सही बनावट असल्याचे सांगून तक्रार नोंदविली. अखेर चौकशीअंती पार्नेल निर्दोष असल्याचे उघडकीस आले. त्यास पाच हजार पौंड नुकसानभरपाई मिळाली. यामुळे त्याची लोकप्रियता आणखी वाढली.

त्याच्या राजकीय जीवनात कॅप्टन विल्यम ओशे हे निवृत्त लष्करी अधिकारी १८८० पासून आले. त्याने होरूमल पक्षातर्फे त्यांना संसदेत निवडून आणले. ओशेंनी अनेक तंट्यांच्या वेळी मध्यस्थी केली होती. ओशे यांनी १८८९ मध्ये आपल्या कॅथरिन या पत्नीबरोबर घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यात पार्नेल हा सहप्रतिवादी होता. पार्नेल व कॅथरिन यांचे अनैतिक प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. पार्नेल व कॅथरिनने आपला बचाव केला नाही. या अर्जामागे काहींच्या मते, राजकीय वा आर्थिक कारणे असावीत, असाही एक प्रवाद आहे. पार्नेलने पुढे कॅथरिनशी १८९१ मध्ये लग्न केले. त्यामुळे त्याची राजकीय प्रतिमा डागळली आणि थोड्याच दिवसांत तो ब्रिटन (बाइटन) येथे कॅथरिनच्या घरी किरकोळ आजाराने मरण पावला.

संविधानात्मक चळवळींद्वारा त्याने आयर्लंडच्या स्वातंत्र्यासाठी झगडा दिला. डी व्हॅलेरा यांच्या बरोबरीचे स्थान त्याला इतिहासात देण्यात येते.

 

संदर्भ : 1. Abels, Jules, The Parnell Tragedy, New York, 1966.  2. Lyons, F.S.L. Fall of Parnell, London, 1960. 3. O’Brien, E.B. The Life of Charles Stewart Parnell, 2 Vols., London, 1968.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate