অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निकोलस मरी बटलर

निकोलस मरी बटलर

निकोलस मरी बटलर : (२ एप्रिल १८६२-७ डिसेंबर १९४७). एक अमेरिकन शिक्षणतज्ञ व शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. जन्म एलिझाबेथ (न्यू जर्सी) येथे एका सधन कुटुंबात. न्यूयॉर्क येथील कोलंबिया महाविद्यालयातून बी.ए. (१८८२) व पीएच्.डी. (१८८४) या पदव्या घेतल्यानंतर बर्लिन व पॅरिस येथे जाऊन त्याने तत्त्वज्ञानाचा विशेष अभ्यास केला. त्यानंतर कोलंबिया महाविद्यालयात विविध पदांवर त्याने काम केले. पुढे तेथेच तत्त्वज्ञान विषयाचा प्राध्यापक व प्रमुख म्हणून त्याची नियुक्ती झाली. (१८९०). शिक्षणपध्दती हा त्याचा जिव्हाळ्याचा विषयी होता. १८८६-९१ या दरम्यान मोठे प्रयत्न करून त्याने शिक्षकांसाठी एक प्रशिक्षण संस्था स्थापन केली. हीच संस्था न्यूयॉर्कमध्ये पुढे टीचर्स कॉलेज ऑफ कोलंबिया या नावाने प्रसिध्दीस आली. जॉन विल्यम बर्जेसच्या सहकार्याने त्याने कोलंबिया महाविद्यालयाचे रूपांतर कोलंबिया विद्यापीठात केले आणि त्याचा तो कार्यकारी अध्यक्ष झाला (१९०१). विद्यापीठास अधिकृत मान्यता १९१२ मध्ये मिळाली. आपल्या अध्यक्षीय कारकीर्दीत (१९०२-४५) त्याने या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करून शैक्षणिक व्याप्ती वाढविली. धंदेशिक्षण, वृत्तपत्रविद्या, दंतवैद्यक, सामाजिक आरोग्य, ग्रंथालयशास्त्र यांसारख्या विविध विद्याशाखा त्याने सुरू केल्या आणि विद्यापीठात अद्ययावत सुखसोयी व सुविधा उपलब्ध केल्या. बटलरची शिक्षणाबाबतची कल्पना परिस्थित्यनुरूप बदललेली दिसते. तरूणपणी त्याने तत्कालीन पारंपारिक पंतोजी शिक्षणपध्दतीवर कडाडून हल्ला केला आणि औद्योगिक शिक्षणावर भर दिला होता; पण पुढे जुन्या शैक्षणिक पंरपरेचा वारसा जतन केला पाहिजे, असे मत प्रतिपादले. एवढेच नव्हे, तर शिक्षणशास्त्रातील व्यवसायवाद व वर्तनवाद या संकल्पनांवर त्याने टीका केली.

बटलरचा मूळ पिंड शिक्षकाचा होता; तरी राजकारणातही त्याने रस घेतला. तो रिपब्लिकन पक्षाचा क्रियाशिल सभासद होता. अमेरिकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठी त्याची उमेदवारी पुरस्कृत करण्याबाबत पक्षाच्या मतदारसंघात चर्चाही झाली होती. पक्षाने १९१२ मध्ये जेम्स शर्मन या उपाध्यक्षाच्या मृत्यूनंतर त्या पदासाठी उमेदवार म्हणून त्याची निवडही केली होती; परंतु त्याने ही निवडणूक लढविली नाही. मद्यपानावर नियंत्रण असावे, या मताचा तो पुरस्कर्ता होता; तथापि दारूबंदी व तीसंबंधीची १८वी घटनादुरूस्ती यास मात्र त्याने कडाडून विरोध केला. देशातील अंतर्गत धोरणाविषयी अनेक राष्ट्राध्यक्ष त्याचा सल्ला घेत.

आंतरराष्ट्रीय शांतता चळवळीबद्दल पहिल्या महायुध्दापूर्वीपासून त्याला आस्था होती. निःशस्त्रीकरण व जागतिक शांतता यांकरिता तो अविरत झटला. शिक्षणाद्वारे शांततेचा प्रसार आणि प्रचार करण्याचे कार्य त्याने अंगीकारले. राष्ट्रसंघाच्या निर्मितीस त्याने सक्रिय पाठिंबा दिला. आंतरराष्ट्रीय शांततेसाठी अँड्रू कार्नेगीने मोठा निधी उभा करावा, यासाठी एक योजना बटलर व एलिह्यू रूट यांनी  मांडली. या प्रेरणेतूनच पुढे ‘कार्नेगी एन्डाउमेंट फॉर इंटरनॅशनल पीस’ (१९१०) ही प्रसिध्द संस्था उदयास आली. तिचा तो प्रारंभी विश्वस्त होता व पुढे अध्यक्ष झाला (१९२५-४५). या कामानिमित्त त्याने अनेक देशांना भेटी दिल्या. केलॉग-ब्रिआं यांनी घडवून आणलेल्या शांतता तहाला (१९२८) त्याने अकरावा पोप पायस याची संमती मिळविली.

बटलरने आपले अध्ययन-अध्यापन, शिक्षणपध्दती, आतंरराष्ट्रीय शांतता, प्रचलित राजकारण इत्यादींसंबंधीचे विचार ग्रंथरूपाने प्रसिध्द केले. द मीनिंग ऑफ एज्युकेशन (१८९८); ट्रू अँड फॉल्स डेमॉक्रसी (१९०७); ए एज्युकेशन ऑफ युनायटेड स्टेट्स (१९१०); फिलॉसॉफी (१९११); द. इंटरनॅशनल माइंड (१९१३); बिल्डिंग द अमेरिकन नेशन (१९२३); द फेथ ऑफ लिबरल (१९२४); द पाथ टू पीस (१९३०); लुकिंग फॉर्वर्ड (१९३२) बिट्विन टू वल्डर्स (१९३४);  द फॅमिली ऑफ नेशन्स (१९३८); द वर्ल्ड टूडे (१९४६) इ. त्याची काही महत्त्वाची पुस्तके होत. त्याने द बिझीथिअर्स, रिकलेक्शन्स अँड रिफ्लेक्शन्स ह्या सूचक नावाने दोन खंडात आत्मवृत्त प्रसिध्द केले (१९३९०-४०). १९२८-४१ या कालखंडात तो अमेरिकन ‘अकॅडमी ऑफ आर्टस अँड लेटर्स’ या संस्थेचा अध्यक्ष होता. १९४५ मध्ये त्याने कोलंबिया विद्यापीठाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तो न्यूयॉर्क येथे मरण पावला.

त्याच्या शांतताकार्याचा उचित गौरव त्यास जेन ॲडम्झबरोबर शांतता नोबेल पारितोषिक देऊन करण्यात आला (१९३१). जेन ॲडम्झ (६ सप्टेंबर १८६०-२१ मे १९३५) ही अमेरिकेतील सुप्रसिध्द ‘हल हाऊस’ या समाजकल्याण संस्थेची संस्थापिका. तिचा जन्म सिडरव्हील (इलिनॉय) येथे एका सधन कुटुंबात झाला. रॉकफर्ड महाविद्यालयातून तिने पदवी घेतली (१८८१). लंडनमधील ‘टॉयन्बी हॉल’ या संस्थेतील कार्य पाहून ती प्रभावित झाली आणि एलिन गेट्स स्टार या मैत्रिणीच्या सहकार्याने शिकागोच्या गलिच्छ वस्तीत तिने हल-हाऊस ची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश एकोणिसाव्या शतकातील शिकागोत आलेल्या आप्रवाशांना आसरा देणे, तसेच स्वतंत्रपणे काहीतरी करून दाखविण्याची जिद्द असलेल्या स्त्रियांना सर्वतोपरी मदत करणे, हा होता; परंतु गरीब, निराधार, असाह्य यांच्या सेवेची संस्था म्हणूनच तिचा पुढे विकास झाला. हल हाउसच्या धर्तीवर अमेरिकेत इतरही अशा संस्था उभारण्यात आल्या या संस्थेमुळेच जेनचे अमेरिकेच्या राष्ट्रीय जीवनात पदार्पण झाले.

हल-हाउसच्या विकासासाठी तिने प्रशिक्षण देऊन समाजकार्यकर्ते तयार केले. स्त्रियांना आठ तास काम, बालमजूर, बालन्यायालये इ. महत्त्वाचे कायदे घडविण्यात तिचा मोठा भाग होता. स्त्री स्वातंत्र्य व दारूबंदी या प्रोप्रेसिव्ह पक्षाच्या कार्यक्रमाचा तिने १९१२ मध्ये पुरस्कार केला. पहिल्या महायुध्दकाळात (१९१४-१९) तिने यूरोपातील अनेक देशांना भेटी दिल्या व मध्यस्थीने युध्दविराम करावा, अशी विनंती केली. तिच्या या शांतताकार्याबद्दल तिला नोबेल पारितोषिक देण्यात आले. (१९३१) अविवाहित राहून तिने अखेरपर्यंत समाजसेवेचे व्रत अंगीकारले. शांतता आणि निराधारांचे पुनर्वसन यांसंबंधीचे मौलिक विचार तिने भाषण-लेखनाद्वारे प्रकट केले. तिच्या पुस्तकांपैकी न्यूअर आयडीअल्स ऑफ पीस (१९०७), द स्पिरिट ऑफ यूथ अँड द सिटी स्ट्रीटस (१९०९), ए न्यू कॉन्शन्श अँड अँन एन्शंट ईव्हिल (१९१२), लाँग रोड ऑफ वुमन्स मेमरी (१९१६) इ. पुस्तके आणि ट्वेंटी थिअर्स अँट हल हाऊस (२ खंड-१९१०-१९३०) हे आत्मचरित्र प्रसिध्द असून लोकप्रिय झाले. तिच्या हल हाउसची चळवळ पुढे जगभर प्रसृत झाली. शिकागो येथे ती मरण पावली.

 

संदर्भ :  1. Coon, Horaco, Columbia, Colossus on the Hudson New York, 1947.

2. Davis, A.F. American Heroine the Life and Legend of jane Addoms, Oxford, 1973.

लेखक - रूक्साना शेख

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 2/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate